अनंतपूरमधल्या आंबेडकरांच्या पुतळ्याला दररोज नवा पुष्पहार घालण्यात येतो. रोज सकाळी ८:३० च्या सुमारास ए. सुभान त्यांच्या कुटुंबीयांनी गुंफलेला गुलाब आणि कमळाचा हार आंबेडकरांच्या सोनेरी पुतळ्याला अर्पण करतात. सुभान नाही तर त्यांचा १७ वर्षांचा भाचा बबलू, दोघं मिळून नेमाने हे काम पार पाडतात.
हा नेम २०१० पासून सुरु झाला. त्या वर्षी वाहतुकीला अडथळा म्हणून आंबेडकरांचा एक पुतळा पाडण्यात आला व त्याच्या ऐवजी हा पुतळा उभा करण्यात आला. हा पुतळा क्लॉक टॉवरपासून १ किमी दक्षिणेला अनंतपूर शहराच्या मध्यवर्ती भागात उभा असून सुभान यांच्या फुलांच्या दुकानाहून चालत जाण्याच्या अंतरावर आहे.
जवळपासचे इतर पुतळे मात्र एवढे सुदैवी नाहीत. त्याच रस्त्यावर क्लॉक टॉवरनंतर लगेच इंदिरा गांधींचा पुतळा लागतो. आता तो गोणपाटाने झाकून ठेवण्यात आला असला तरी आंध्र प्रदेशात काँग्रेसचं शासन असताना (२००४–२०१४) त्याला चांगले दिवस आले होते. २०१३ मध्ये या पुतळ्याची जुनी प्रतिकृती आंध्र प्रदेश विभाजन विरोधकांनी जाळली होती. त्यानंतर नवा पुतळा बसवण्यात आला खरा, पण तो झाकूनच ठेवण्यात आला आहे. याच रस्त्यावर असलेला राजीव गांधींचा पुतळा देखील झाकून ठेवण्यात आला आहे. यातून जणू काही काँग्रेस पक्षाचं राज्यातील अंधारलेलं भवितव्यच अधोरेखित होतंय!

अनंतपूरमधील सर्वच ऐतिहासिक व राजकीय नेत्यांचे पुतळ्यांचा जयंत्या साजऱ्या झाल्या की लोकांना विसर पडतो
याच रस्त्यावर इतरही पुतळे आहेत – स्वतंत्र तेलुगू भाषिक आंध्र प्रदेशाकरिता उपोषण करताना हुतात्मा झालेले पोट्टी श्रीरामुलू, अबुल कलाम आझाद, वाय. एस. राजशेखर रेड्डी, बाळ गंगाधर टिळक, बाबू जगजीवन राम, कांशी राम आणि मदर तेरेसा. कधीकधी यांनाही पुष्पहाराचा लाभ होतो. मात्र, काही दिवसांनी हारांचं रुपांतर निर्माल्यात होतं तसं लोकांनाही त्यांचा विसर पडू लागतो.

सुभान , ज्यांचं दुकान आंबेडकरांच्या पुतळ्याहून काही अंतरावरच आहे , म्हणतात , “ आमच्यासाठी आंबेडकर आदरणीय आहेत, म्हणून आम्ही हे करतो ”
डॉ. आंबेडकरांची गोष्ट वेगळी आहे, ते मात्र कायम स्मरणात राहतात. क्लॉक टॉवर जवळील आंध्र बँकेत रोखपाल असलेले ए. मल्लेश सुभान यांना दर महिन्याच्या सुरुवातीला हारांचे पैसे देतात. “ते दरमहा मला १,००० रुपये देतात,” धर्माने मुसलमान असलेले ३६ वर्षीय सुभान सांगतात. “आम्हाला यातून नफा कमवत नाही, आमच्यासाठी आंबेडकरांच्या आदरणीय आहेत म्हणून आम्ही हे सगळं करतो.” सुभान यांच्या दुकानात एक हार जशी फुलं वापरली आहेत त्यानुसार ६० ते १३० रुपयाला मिळतो.
स्वतः जातीभेदाचा अनुभव घेतल्याने मल्लेश यांच्या मनात आंबेडकरांविषयी आदर आहे. “[माझ्या गावी] जेवण, पाणी, डोक्याला तेल, वाचायला पुस्तकं, लिहायला पाटी... काही काही नव्हतं,” ते म्हणतात. “आता देवाने आम्हाला सगळं काही दिलंय. तो देव म्हणजे – आंबेडकर.” मल्लेश अनंतपूर तालुक्यातील आत्मकुर गावचे मडिगा दलित आहेत.
“आमच्या गावी पिण्याच्या पाण्याची एकच विहीर होती,” ते आठवून सांगतात, “[जमीन मालक असणारे] शेतकरी पाणी काढायला आले तरच आम्हाला तेथून पाणी मिळत असे. नाहीतर आम्हाला पाणीच मिळत नसे. मडिगा दलितांची [विहिरीला] शिवताशिवत चालत नसे.”
शाळेत असताना मल्लेश आणि इतर दलित विद्यार्थ्यांना वर्गात एका कोपऱ्यात बसावं लागे, तर उच्चवर्णीय विद्यार्थी पुढील रांगांमध्ये बसत असत. “आमच्याकडे लिहायला पाट्या नव्हत्या. म्हणून आम्हाला बाहेरून माती आणून [जमिनीवर सारवून] त्यावर लिहावं लागे,” ते म्हणतात. “जर कोणी ‘ए मडिग्या! ती माती बाहेर फेक!’ असं सांगितलं तर आम्हाला माती बाहेर फेकावी लागत असे. मास्तरही दलित मुलांना त्यांच्या जातीवरून हिणवत असत आणि बरेचदा त्यांना छडीने बदडून काढत असत.
५९ वर्षीय मल्लेश यांना सातवी झाल्यानंतर वडील वारले म्हणून व घरी आईला कामात हातभार लावण्यासाठी शाळा सोडावी लागली. त्यांचे वडील शेतमजूर होते. नंतर मल्लेश यांनी अनंतपूरमधील शासकीय वसतिगृहात मदतनीस म्हणून काम केलं, आणि त्याच दरम्यान सरकारी नोकरीचा शोध सुरू केला. १९८२ मध्ये ते आंध्र बँकेत दरमहा ५०० रुपयांवर मदतनीस म्हणून रुजू झाले. १९८५ मध्ये बँकेत मुलाखतीत उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांची चांगल्या पगाराच्या सहायक कारकुनाच्या पदावर बढती झाली.

२०१० मध्ये सहायक कारकून म्हणून काम करत असताना ए . मल्लेश यांनी ‘असंच’ ठरवलं की, आपल्याला जमेल तोपर्यंत आपण आंबेडकरांच्या पुतळ्याला रोज हार घालायचा
‘मला अनुभव आलेल्या घटनांवरून त्यांना किती कष्ट झेलावे लागले असतील, हे मला समजतं. आमच्याकरिता त्यांनी जे काही करून ठेवलं आहे ते पाहूनही आपण शिकू शकतो. त्यांनीच तर आपलं संविधान लिहिलं ना?’
अनेक दलित आघाड्या आणि कर्मचारी संघांचे सदस्य असलेले ए. मल्लेश अगदी अलिकडच्या काळापर्यंत त्यांच्या बँकेच्या अनुसूचित जाती व जमाती कर्मचारी कल्याण संघाचे विभागीय अध्यक्ष होते. जातीभेदाविरुद्ध त्यांनी अनेक आंदोलनांमध्ये भाग घेतला. १९९५ च्या दरम्यान अशाच एका प्रसंगाचा निषेध करण्यासाठी डावे पक्ष आणि इतर कार्यकर्त्यांसोबत अनंतपूर ते आलमूर अशा १० किमी पदयात्रेत त्यांनी भाग घेतल्याचं त्यांना स्मरतं. ९० च्या दशकात मल्लेश दांडोरा नावाच्या एका दलित गटाचे सदस्यही होते. मात्र २००० च्या दशकात राजकीय मतभेदांमुळे त्यांनी तो गट सोडला.
१९९६ च्या दरम्यान मल्लेश यांनी १० वीच्या परीक्षेची तयारी केली व ती परीक्षा ते उत्तीर्ण झाले. त्यामुळे २०१३ मध्ये ते सहायक कारकून या पदावरून बढती होऊन सध्या रोखपाल म्हणून कार्यरत आहेत. सध्याच्या नोकरीतून त्यांना सुरुवातीच्या ५०० रूपयांपेक्षा कितीतरी पटीने अधिक पगार मिळतो.
२०१० मध्ये सहायक कारकून म्हणून काम करीत असतानाच ए. मल्लेश यांनी ‘असंच’ ठरवलं की, आपल्याला जमेल तोपर्यंत आपण आंबेडकरांच्या पुतळ्याला रोज हार घालायचा. त्यांना आठवतं की, बँक कर्मचारी आणि इतर दलित लोकांत झालेल्या अशाच एका बैठकीत सर्वांनी मिळून आंबेडकरांना हार घालण्यासाठी निधी एकत्रित करायचं ठरवलं. पण, मल्लेश यांना काही हाराचा पैसा गोळा करत प्रत्येकाच्या मागे हिंडायचं नव्हतं. मग त्यांनी आणि आंध्र बँकेच्या दुसऱ्या शाखेत मदतनीस असलेले एम. गोपाल यांनी दोघांत मिळून खर्च करायचं ठरवलं. मागच्या वर्षी गोपाल यांनी पैसे द्यायचं थांबवलं आणि आता मल्लेश एकटेच सगळा खर्च करतात.


(डावीकडे) एकीकडे मल्लेश आंबेडकरांच्या पुतळ्याला रोज हार घालतात, (उजवीकडे) तर दुसरीकडे बराच काळ लोटला, इंदिरा गांधींचा पुतळा गोणपाटाने झाकून ठेवण्यात आला आहे.
मल्लेश यांना आंबेडकरांनी लिहिलेलं वाचायला किंवा त्यांच्यावरील भाषणं ऐकायला आवडत नाही. त्यांच्या मते दलित म्हणून जगण्यातच त्यांना खरे आंबेडकर कळलेले आहेत. “मला अनुभव आलेल्या घटनांवरून त्यांना किती कष्ट झेलावे लागले असतील, हे मला समजतं. आमच्याकरिता त्यांनी जे काही करून ठेवलं आहे ते पाहूनही आपण शिकू शकतो. त्यांनीच तर आपलं संविधान लिहिलं ना?”
जमलं तर शनिवार–रविवार किंवा सणावाराच्या दिवशी मल्लेश स्वतः पुतळ्याला हार घालतात. पुतळ्याला ऊन, वारा आणि पक्षांच्या शिटण्यापासून संरक्षण मिळावं यासाठी एक छप्पर बांधायची विनंती ते आता जिल्हा प्रशासनाला करणार आहेत. “सुरुवातीला आम्ही आंबेडकरांसाठी प्रयत्न करू. नंतर मग कांशी राम आणि जगजीवन राम यांच्यासाठीही तशीच विनंती करू.”
आंबेडकरांच्या पुतळ्यावरील हार सर्वांच्या बघण्यात येत नसला तरी दुसऱ्या दिवशी सकाळी रस्ता झाडणाऱ्या सफाई कामगारांना त्याबद्दल माहिती आहे. “कोणीतरी, बहुतेक कोणीतरी मोठा माणूस रोज पुतळ्याला हार घालत असतो. मला त्याचं नाव माहीत नाही,” जी. रामालक्ष्मी म्हणतात. त्या स्वतः दलित असून नगरपालिकेने त्यांना रस्त्यांची झाडलोट करायला नेमलेलं आहे. त्या हे सांगत असताना भक्तिभावे कानशिलाला हात लावतात. “जेव्हा मला पुतळ्याला हार घातलेला दिसतो, मनात वाटतं की देवाचं (आंबेडकर) सगळं छान चाललंय. दररोज कामावर येताना आम्ही त्यांचीच पूजा करतो.”
अनुवाद: कौशल काळू