आजवर संजय गोपेचं एकही पाऊल कधी अडखळलं नाहीये – कारण त्याने आजवर एकही पाऊल जमिनीवर टाकलं नाहीये. १८ वर्षांचा हा मुलगा चाकाच्या खुर्चीला खिळलेला आहे. माझी त्याची भेट झाली बांगोमध्ये. झारखंडच्या पूर्बी सिंघभुम जिल्ह्याच्या जादुगुडा गावात. युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड या कंपनीच्या खाणींपासून हे गाव फक्त सहा किलोमीटरवर आहे.
यूसीआयएल ही सरकारी कंपनी असून त्यांची पहिली खाण १९६७ साली खोदली गेली. जादुगुडा आणि आसपासच्या सहा खाणींमधून निघणाऱ्या खनिजावर प्रक्रिया करून त्यापासून ‘यलोकेक’ (युरेनियम ऑक्साइडचं मिश्रण) तयार करून आणि हैद्राबादमधील न्यूक्लियर फ्युएल कॉम्प्लेक्स इथे पाठवलं जातं.
दोन वर्षांचा झाला तरी संजय चालत नव्हता म्हणून काळजीत पडलेल्या त्याच्या आई-वडलांनी त्याला युसीआयएलच्या हॉस्पिटलमध्ये नेलं. त्याचे वडील रोजंदारीवर काम करतात आणि आई भाताच्या खाचरात कामाला जाते. त्यांच्या गावातले बहुतेक हेच काम करतात. काही जण खाणींमध्ये काम करतात आणि बाकीच्यांचं असं म्हणणं आहे की त्यांना नोकरी देण्याचं वचन दिलं होतं पण आजवर त्यांना नोकऱ्या मिळालेल्या नाहीत. डॉक्टरांनी संजयच्या आई-वडलांना सांगितलं की काळजीचं काहीही कारण नाहीये. त्यामुळे तेही तो चालेल याची वाट पाहत राहिले. पण त्यांच्या लेकाने पहिलं पाऊल काही टाकलं नाही. पहिलंच नाही तर एकही पाऊल संजय टाकू शकला नाही.
८०० लोकसंख्या (जनगणना, २०११) असलेल्या बांगोमध्ये संजयसारख्या अनेक मुलांना जन्मतःच व्यंग आहे किंवा काही दगावली आहेत. या गावातली बहुतेक कुटुंबं संताल, मुंडा, ओराँव, हो, भूमीज आणि खरिया आदिवासी आहेत. २००७ साली शांती आणि विकासासाठी भारतीय वैद्यक (Indian Doctors for Peace and Development) या संस्थेने केलेल्या एका अभ्यासानुसार खाणींच्या जवळ (०-२.५ किमी) राहणाऱ्या मुलांमध्ये जन्मजात व्यंगांमुळे मृत्यू येण्याचं प्रमाण खाणींपासून दूर (३०-३५ किमी) राहणाऱ्यांपेक्षा ५.८६ पट अधिक आहे.
गर्भ पडून गेल्याचं प्रमाणही जास्त असल्याचं इथल्या बाया सांगतात. खाणींमध्ये काम करणाऱ्या किंवा प्रक्रिया केंद्रात आणि टेलिंग पाँड (युरेनियम खनिजावर प्रक्रिया केल्यानंतर जो विषारी मैला मागे राहतो त्याची तळी) जवळ काम करणाऱ्या अनेकांना कॅन्सर आणि टीबीमुळे आपला जीव गमवावा लागला आहे.
ही व्यंगं आणि आजार अधिक किरणोत्सर्जन आणि किरणोत्सारी कचऱ्याशी संबंधित असल्याचं अनेक भारतीय आणि आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञ सांगत आले आहेत. खासकरून विषारी पाण्याच्या तळ्यांच्या आजूबाजूला असलेल्या वस्त्यांना हा धोका अधिक असतो कारण काही ना काही कारणाने त्यांचा या पाण्याशी संपर्क येतो. पण, युसीआयएल मात्र आपल्या वेबसाइटवर असा दावा करतं की “हे आजार... किरणोत्साराशी संबंधित नसून कुपोषण, हिवताप आणि गलिच्छ राहणी वगैरेंमुळे होत आहेत.”
पूर्बी सिंघभुममध्ये युसीआयएलच्या सात खाणी आहेत – जादुगुडा, भातिन, नरवापहार, बागजाता, तुरामडीह, माहुलडीह आणि बांडुहुडांग. किरणोत्सर्गाच्या जीवघेण्या परिणामांविरोधात इथल्या न्यायालयांमध्ये याचिका दाखल झाल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. २००४ साली तीन न्यायमूर्तींच्या एका खंडपीठाने आण्विक ऊर्जा आयोगाच्या प्रतिज्ञापत्राच्या आधारे ही याचिका रद्द केली. यात आयोगाने म्हटलं होतं की “युरेनियमच्या कचऱ्यातून होणारा किरणोत्सर्ग टाळण्यासाठी व नियंत्रित करण्यासाठी पुरेशी पावलं उचलण्यात आली आहेत.” देशाची युरेनियमची गरज भागवली जात असताना इथल्या गावकऱ्यांना किती मोठी किंमत चुकवावी लागत आहे याकडे जादुगुडा आणि आसपासच्या झारखंडी ऑर्गनायझेशन अगेन्स्ट रेडिएशनसारख्या (किरणोत्सारविरोधी झारखंडी संघटना) जन संघटना मात्र सातत्याने लक्ष वेधून घेत आल्या आहेत.

गेल्या पाच दशकांपासून जादुगुडाच्या डोंगरांमध्ये युरेनियमचं उत्खनन सुरू आहे – आसपासच्या गावांना अर्ध्या शतकापासून जास्त काळ विषारी संसर्गाचा वारसा मिळाला आहे

तुरामडीहमध्ये खुली खाण (जादुगुडाहून २० किलोमीटरवर), खाणीपासून अगदी ५०० मीटरवर लोकांची वस्ती आहे. बिहार विधानसभेच्या पर्यावरण समितीने १९९८ साली एका अहवालात नमूद केलं होतं की कोणत्याही गाव-वस्तीपासून पाच किलोमीटरच्या आत खाणीतून निघणारा कचरा टाकला जाऊ नये

कालिकापूर गावातला अंदाजे ७ वर्षांचा अमित गोपे जन्मतःच मानसिक व्याधीने ग्रस्त आहे. तो बोलत नाही, चालत नाही, दिवसभर आपल्या खाटेवर पडून असतो

मुलं बांगोच्या कच्च्या मातीच्या रस्त्यावर खेळतायत – विषारी खनिज प्रक्रिया केंद्र आणि कचरा टाकला जातो तिथून ही जागा फार काही दूर नाही.

कालीबुढी गोपे, वय १८ हिला अस्थिव्यंग असून पाठीला कुबड आहे. ती जास्त काळ उभी राहू शकत नाही, पण आठवड्यातून दोन दिवस इथून ३५ किलोमीटरवर असलेल्या जमशेदपूरमधे इंटरमिजिएट कॉलेजला जाते.

१४ वर्षीय अनामिका ओरामच्या चेहऱ्यावर गाठ आहे आणि ती कर्करोगाची असू शकते. डॉक्टरांचं म्हणणं आहे की ती काहीही करून काढून टाकायला हवी, पण अनामिकाच्या घरच्यांना उपचाराचा खर्च परवडणारा नाही.

३५ वर्षीय तारक दास मला कालिकापूरमधल्या एका किराणा मालाच्या दुकानात भेटले. आमच्या कुटुंबाला मदत कधी मिळेल, त्यांनी विचारलं. “दादा, मला दोन मुलं आहेत, एक मुलगी आणि एक मुलगा,” ते म्हणाले. “मला कायम घोर लागलेला असतो. मी काम करतोय तोवर ठीक आहे, त्यानंतर त्यांचं कसं होणार? मी थोडा वेळ जरी उभा राहिलो ना, तरी माझी कंबर दुखायला लागते. पण माझ्या पोराबाळांसाठी मला काम तर करावंच लागणार ना.”

या टेलिंग पाँडमध्ये युरेनियम प्रक्रिया केंद्रातील मैला आहे. तुमराडीह खाणीजवळच्या एका पाड्याशेजारून हा मैला वाहतो जातो.

१८ वर्षीय हरधन गोपेच्या चेहऱ्यामध्ये व्यंग आहे आणि त्याच्या शरीराच्या मानाने त्याचं डोकं लहान आहे. असं असूनही तो शेतात काम करतो आणि आपल्या वडलांना भातशेतीत हातभार लावतो.

जादुगुडाजवळच्या सुवर्णरेखा नदीतून एक मुलगा शिंपले गोळा करतोय. मैल्याच्या तलावांमधलं पाणी थेट नदीत जात असल्यामुळे मासळी आणि अन्य जीव आता नाहीसे होऊ लागले आहेत.

अंदाजे १८ वर्षांची पार्वती गोपे (मध्यभागी) बांगोमधल्या एका शिकवणीला जाते. तिचे वडील शेती करतात. “मला सरकारी नोकरी करायचीये,” ती म्हणते. “पण अभ्यासासाठी सगळी पुस्तकं काही माझ्याकडे नाहीत. माझे बाबा सांगतात की घरचं भागवणंच अवघड झालंय, त्यामुळे माझा दवाखाना कसा काय करणार?”

सोळा वर्षांच्या राकेश गोपेला सेरेब्रल पॉल्सी हा आजार आहे. त्याची बहीण गुडिया सात वर्षांची असताना मरण पावली. कसं तरी करून चाकाच्या खुर्चीत बसून तो शाळेत जातो. तिथे त्याला पोषण आहार मिळतो आणि शासनाकडून महिन्याला ६०० रुपये अपंगत्व निर्वाह भत्ता. त्याची आई म्हणते, “मला भविष्याची सारखी काळजी लागलेली असते... आम्ही नसू तेव्हा याचं कसं काय होणार? त्याचं त्याला काहीसुद्धा करता येत नाही.”

राकेश आणि गुडियाची आई [नाव माहित नाही] भाताच्या शेतात काम करते. आपल्या मुलीचा फोटो दाखवते. गुडियाला अस्थिव्यंग होतं आणि ती सात वर्षांची असताना अपस्माराचा झटका येऊन मरण पावली. ती म्हणते, “राकेश जन्मला त्यानंतर आम्हाला समजलं की तो चालू शकणार नाही किंवा स्वतःचं स्वतः काहीच करू शकणार नाही. खूप वाईट वाटलं होतं. गुडिया जन्मली तेव्हा सगळे खूप खूश होते पण लगेचच आम्हाला लक्षात आलं की ती देखील चालू शकणार नाही...”

राकेशला पाय हलवताच येत नाहीत. बांगोतल्या घरी त्याची आई रोज त्याला आंघोळ घालते आणि आत घेऊन जाते.