शनिवार दुपार, पेडाणाच्या रामलक्ष्मी विणकर  वसाहतीत पाय ठेवताच, मग्गालु (हातमाग)चा 'टक-टक' आवाज स्पष्ट ऐकू येतो.  इथल्या रहिवाशांच्या मते, इथे अंदाजे १४० कुटुंबं  राहतात आणि विणायचं काम करतात. बहुतेक विणकरांनी साठी ओलांडली आहे. त्यांच्यापैकी काहींचा गैरसमज झाला की, मी सरकारी अधिकारी आहे आणि त्यांचं महिन्याचं १००० रुपयाचं पेंशन घेऊन आलो आहे.  मी वार्ताहर आहे हे कळल्यावर त्यांची जरा निराशाच झाली.

“सगळी तरणीताठी मुलं कामाच्या शोधात गाव सोडून गेली आहेत,” मग्गमवर काम करणारे ७३ वर्षांचे विदुमाटला कोटा पैलय्या म्हणाले. ‘इतके सगळे विणकर वृद्ध कसे काय’, या माझ्या प्रश्नावरचं त्यांचं हे उत्तर. त्यांच्या म्हणण्यानुसार, बहुतेक मुलं पेडाणामध्ये, जवळपासच्या गावांमध्ये किंवा जिल्हा मुख्यालय असलेल्या मछलिपटणममध्ये शेतमजूर किंवा बांधकामावर मजूर म्हणून काम करत आहेत.

पैलय्यांचं वृद्धत्व पेंशन फारच थोडं असलं तरी त्यांच्या पत्नीच्या पेंशन मिळून ते घर चालवू शकतायत.  विणकामातून होणारी कमाई मात्र अगदीच तुटपुंजी आहे. - दिवसाला निव्वळ १०० रुपये. "तीन दिवस रोज १०-१२ तास काम केलं तर एक साडी पूर्ण होते. त्याचे मला  ३००-४०० रुपये मिळतात.  ती साडी मी [पेडाणामध्ये] मोठ्या-प्रमुख-विणकरांच्या मालकीच्या दुकानात विकतो. तीच साडी  ते  ६००-७०० रुपयाला विकतात आणि नफा कमवतात. फक्त विणकामावर भागणं अवघड आहे. ..."


Vidumatla Kota Pailayya, 73, working on his maggam in his two-room house in Ramalakshmi weavers' colony

रामालक्ष्मी विणकरांच्या वसाहतीत, आपल्या दोन-खोल्यांच्या घरात,७३ वर्षांचे विदुमातला कोटा पैलय्या,त्यांच्या मग्गमवर काम करताना


यंत्रमाग उत्पादनांमुळे हाताने विणलेल्या कापडाची मागणी लक्षणीयरित्या कमी झालेली आहे, पैलय्या सांगतात. " घर चालवायला पुरेसे पैसे कमवण्यासाठी तरूणांना नोकरीशिवाय  दुसरा पर्याय नाहीये. जर आम्हांला वयाची साथ असती, तर आम्हीदेखील इतर काही काम शोधलं असतं. पण मला दुसरं कोणतंच काम येत नाही..."

आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्यातल्या मछलीपट्टनम बंदरापासून  पेडाना जवळ जवळ १० किलोमीटर दूर आहे. हे दोन उद्योगांचं घर आहे - हातमागावरील विणकाम आणि कलमकारी साचाची/ ठशाची छपाई. हातमागावर विणलेल्या इथल्या सुती साड्यांचा टिकाऊपणा आणि पोत , तर यंत्रमागावरच्या सुती साड्यांवरची कलमकारी छपाई, तिच्या विशिष्ट रंग आणि नक्षीसाठी प्रसिद्ध आहे. .

आंध्र प्रदेशातील ३,६०,००० हातमाग विणकरांपैकी सुमारे ५,०००-१०,००० विणकर () - पेडाणात राहतात (राज्याच्या हातमाग आणि वस्त्रोद्योग विभागानुसार). त्यांच्यातील एक, कोथापल्ली येल्लाराव, वय ८५, अजूनही अच्चू’वर  काम करणाऱ्या  थोड्या लोकांपैकी एक. अच्चू प्रक्रियेत, हाताने एक एक धागा जुळवला जातो आणि मग त्यापासून मग्गमवर कापड विणलं जातं. येल्लाराव १९६० च्या दशकात पूर्व गोदावरी जिल्ह्यातून  बायको आणि  आणि दोन मुलांना घेऊन पेडाणात आले आणि इथे स्थायिक झाले. इथल्या अनेकांचीही अशीच कहाणी आहे. त्यांच्या कुटुंबातले, आपल्या अंगच्या कलेचा वापर करून घर चालवणारे ते शेवटचेच.  त्यांची मुलं बांधकाम मजूर म्हणून, तर नातवंडं इलेक्ट्रीशियनची कामं करतात


Kothapalli Yella Rao, 85, (featured in the top image) is among the last few in Pedana still working on acchu (left), a process that uses this frame to weave a fabric; some time ago, he stopped using the wooden charkha (right)

कोथपल्ली येल्लाराव, वय ८५, (लेखाच्या सुरुवातीचा फोटो) हाताने एकेक धागा जुळवून त्यानंतर मग्गमवर कापड विणणाऱ्या पेडाणातल्या शेवटच्या काही विणकरांपैकी एक. अच्चू(डावीकडे)  काही काळापूर्वी, त्यांनी लाकडी चरखा (उजवीकडे) वापरणं थांबवलं.


माझ्या प्रश्नांवरची त्यांची उत्तरं त्यांची विद्वत्ता दाखवून देतात. त्यांच्या बहुतेक उत्तरांची सुरुवात १७ व्या शतकातील तेलगू कवी वेमनांच्या वचनांनी होते.  "जमिनीचा हा तुकडा मी १९७० मध्ये ३०० रुपयाला  विकत घेतला. त्या दिवसांमध्ये मी घरपट्टी म्हणून  १ रुपया भरत असे. " ते म्हणतात. "आता, याच घरपट्टीसाठी मला  ८४० रुपये भरावे लागतायत. १९७० मध्ये माझी कमाई दिवसाकाठी१ रूपयाहून थोडी कमी होती. आता मी दिवसाला जवळ जवळ १०० रुपये कमवतो. आता तुम्हीच हिशोब करा..."

हातमाग उद्योगाला उतरती कळा लागल्यावर, इथल्या अनेकांनी विणकाम सोडून कलमकारी करण्याचा पर्याय निवडलाय  पेडाणातील बहुतेक जुने कलमकारी कामगार आधी विणकर होते - त्यांपैकी अनेक जण म्हणतात की, एक समुदाय म्हणून त्यांना कलमकारी आणि विणकामाच्या कलेचा आणि त्यातल्या कष्टांचा अभिमान आहे आणि त्यामुळेच   शेती आणि बांधकामापेक्षा ते कलमकारीला प्राधान्य देतात.


The fabric is put into boiling water with raw leaves to give the Kalamkari prints better colour and texture

उकळत्या पाण्यात कच्ची पाने टाकून कापड त्यात बुडवून ठेवलं जातं, ज्यामुळे कलमकारी छपाईच्या कापडांना  उत्तम रंग आणि पोत मिळतो


आंध्र प्रदेशात कलमकारी छपाईची दोन मुख्य केंद्रं आहेत,  एक म्हणजे पेडाणा आणि दुसरं आहे  चित्तूर जिल्ह्यातलं श्रीकलाहस्ती. . स्थानिकांच्या मते, पेडाणामध्ये सुमारे १५,०००-२०,००० कलमकारी कारागीर राहतात. हा आकडा पडताळून पाहणं कठीण आहे कारण राज्य सरकारने शहरातील विणकाम आणि छपाई कामगारांना अजूनही कलाकार ओळखपत्र दिलेलं नाही. संघटना सुरू करणं. , कर्ज घेणं आणि शासकीय योजना आणि निधी मिळविण्यासाठी या ओळखपत्राची त्यांना नक्कीच मदत होऊ शकेल.

येथील कामगारांच्या मते, पेडानातील कलमकारी आणि हातमाग उद्योग देशाच्या स्वातंत्र्यापूर्वीपासूनच चालू आहे.  २०१३ मध्ये, सरकारने कलमकारीला 'भौगोलिक संकेत' देखील प्रदान केला - एखाद्या उत्पादनाला  GI चिन्ह मिळणं याचा अर्थ असा की त्या उत्पादनाचं एक विशिष्ट उगमस्थान आहे आणि त्या स्थानामुळे त्यात काही गुणधर्म आहेत किंवा त्याला एक प्रतिष्ठा आहे. (मात्र GI चिन्हामुळे बनावटी कलमकारी साड्यांचं पेव फुटलं आणि  अस्सल साड्यांचं जे नाव तयार झालं होतं त्यावर विपरित परिणामदेखील झाल्याचं दिसतं. ).

पेडाणातील कलमकारी कारखान्यांचे  मालक जवळच्या मछलीपट्टनममधल्या  घाऊक विक्रेत्यांकडून मोठ्या प्रमाणावर यंत्रमागावरच्या साड्या घेऊन येतात. त्यांचे कामगार या साड्यांवर अगदी फुलांपासून ते पौराणिक विषयावरील विविध चित्रांची छपाई करतात. त्यासाठी लाकडी साचे आणि चमकदार नैसर्गिक रंग वापरले जातात. या यंत्रमागावर बनविलेल्या कलमकारी छपाईच्या वेगळ्या साड्या पेडाणातील अधिक कष्टाने बनविलेल्या हातमागाच्या साड्यांपेक्षा स्वस्त असतात.  प्रत्येक साडी मुख्य विणकरांच्या मालकीच्या स्थानिक दुकानांमध्ये साधारणपणे  ५०० रुपयाला  विकली जाते.


Kalamkari designs are made with these wooden blocks and bright natural dyes and colours

कलमकारी नक्षी बनवणारे हे लाकडी साचे आणि चमकदार नैसर्गिक रंग आणि रंगद्रव्यं


दैवपु कोटेश्वर राव, वय ५३, जात देवणगी  – इथली एक वरचढ जात.  ते पश्चिम गोदावरी जिल्ह्यातून पेडाणात स्थलांतरित झाले. १९७४ पासून ते विणकाम करत आहेत, पण त्यातून मिळणारं उत्पन्न बायको आणि दोन मुलींच्या पालनपोषणासाठी पुरेसं नव्हतं. १९८८ मध्ये त्यांनी विणकाम सोडून दिलं आणि ते एका देवणगीच्या मालकीच्या कलमकारी कारखान्यात  १० रुपयाच्या रोजावर लागले.  आता ते  ३०० रुपये रोजाने काम करतात.

येथील अनेक पुरूष कामासाठी बाहेरगावी, शहरांमध्ये स्थलांतर करीत असल्याने, कलमकारी उद्योगात महिलांची संख्या जास्त आहे. पद्मलक्ष्मी, वय ३०, त्यांच्या पतीचं नुकतंच निधन झालं आहे. त्यांना पाच आणि सहा वर्षांच्या दोन शाळकरी मुली आहेत. त्या आता आपल्या विधवा आईसह राहतात ज्या एक टपरी (बड्डी कोट्टू) चालवतात. जिथे मिठाई, पान-सिगारेट, आणि इतर वस्तू मिळतात.


Kalamkari artisans creating block prints in a workshop in Pedana

पेडाणातील कारखान्यात कलमकारी कारागीर ठशाची छपाई करताना


लक्ष्मीचे आई-वडील सुमारे ५० वर्षांपूर्वी पूर्व गोदावरी जिल्ह्यातून इथे स्थलांतरित झाले.  लक्ष्मी वयाच्या १२ व्या वर्षापासून कलमकारीचं काम करत आहेत. "तेव्हा दिवसाचा रोज .४० रुपये  होता. आज १८ वर्षानंतरही मी दिवसाला फक्त  २०० रुपयेच कमवू शकते," त्या म्हणतात. "माझ्याहून कमी अनुभवी पुरूषांना  ३०० रुपये किंवा त्याहून जास्त रोज मिळतो.   मालकांना जाब विचारला तर ते सरळ म्हणतात की बाया पुरूषांपेक्षा कमी काम करतात. खरं तर आम्ही त्यांच्या एवढं नाही, त्यांच्यापेक्षा जास्तच काम करतो. मला महिन्याला  ३५००-४००० रुपयापेक्षा जास्त मिळत नाहीत. आमच्यापैकी बहुतेकांना सावकारांकडून व्याज घेण्याशिवाय पर्याय नाही आणि तेही अतिशय चढ्या व्याजाने.”

पेडाणात कलमकारी कामगारांची  संघटना नाही. (हातमाग विणकरांची एक आहे, पण संघटनेची बांधणी विस्कळित आहे. ).  असं म्हणतात की संघटना बांधणीचेसर्व प्रयत्न  कलमकारी कारखान्याच्या मालकांनी, प्रसंगी हिंसा आणि पैसा वापरूनही,  मोडून काढले आहेत.  "सरकारने कलमकारी कारागीर आणि हातमाग विणकरांना निदान कलाकार ओळखपत्र तरी दिलं पाहिजे," रूद्राक्षुल कनकराजु, वय ४०, सांगतात. वरकमाईसाठी ते कधी कधी विणकाम करतात. "त्याची आम्हांला संघटित व्हायला आणि आमच्या हक्कांसाठी लढायला नक्कीच मदत होईल."


An empty Kalamkari workshed on a rainy day;  work is possible only on sunny days because drying is an important part of the block printing process

पाऊस चालू असल्यामुळे रिकामा असणारा कलमकारी कारखाना. छपाईचं काम लख्ख उन्हातच होऊ शकतं, कारण रंग सुकवणं हा ठशाच्या छपाई प्रक्रियेचा महत्त्वाचा भाग आहे


राज्य सरकारने, वारंवार, विणकरांना त्यांची पारंपारिक कला पनरूज्जीवित करण्यासंदर्भात आश्वासने दिली आहेत. मे २०१४ च्या राज्याच्या निवडणुकांमधलं एक वचन होतं, हातमागाची कर्जमाफी . आंध्र प्रदेश सरकारने कर्जमाफीसाठी एकूण १११ कोटी मंजूर केले. मात्र पेडाणाच्या  विणकरांना केवळ २.५ कोटी कर्जमाफी मिळाली.

२०१४ मध्ये, भारतीय जनता पक्षाच्या सरकारने, पारंपरिक कलांचं जतन करण्याच्या हेतूने, पायाभूत सुविधा आणि तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी, पेडाणातील हातमाग उद्योगासाठी, स्फुर्ती (पारंपरिक उद्योग पुनर्निर्माण निधी योजना) योजना सुरू केली. पण ही योजनाही  दप्तर दिरंगाईत अडकून पडलेली आहे.

पित्चुक (?) भिमलिंगम, वय ७३, एक मोठे, प्रमुख-विणकर आणि पेडानणाच्या, हातमाग विणकर आणि कलमकारी कारागीर  वेलफेअर असोसिएशनचे एक माजी पदाधिकारी. ते सांगतात,  "मोठे-मुख्य विणकर आता स्थिरस्थावर आहेत. राज्याने कारागीर आणि कामगारांची काळजी घेतली पाहिजे. हातमाग संस्था उभारून आणि आवश्यक सर्व निधी उपलब्ध करून देऊन, सरकारने दिलेली सर्व आश्वासनं प्रत्यक्षात आणली पाहिजेत. त्याची सुरूवात सर्व कामगारांना ओळखपत्र प्रदान  करून करता येईल, जेणेकरून  त्यांच्या मालकांशी योग्य वाटाघाटी  करणं त्यांना शक्य होईल. "

तोपर्यंत पेडाणातले मग्गम क्षीणपणे टकटक करत राहतील आणि कलमकारी कारागिरांना त्यांचे छपाईचे लाकडी साचेच बुडण्यापासून वाचवतील, कदाचित.

Rahul Maganti

Rahul Maganti is an independent journalist and 2017 PARI Fellow based in Vijayawada, Andhra Pradesh.

Other stories by Rahul Maganti
Translator : Medha Kale
mimedha@gmail.com

Medha Kale is based in Pune and has worked in the field of women and health. She is the Translations Editor, Marathi, at the People’s Archive of Rural India.

Other stories by Medha Kale