“हे वाद्य माझं नाही,” किशन भोपा सांगतात. काही क्षणांपूर्वीच त्यांनी आणि त्यांच्या पत्नी बाबुडी भोपी यांनी तयार केलेलं रावणहत्था हे वाद्य त्यांच्या हातात आहे.

“मी वाजवतो ते. पण ते माझं नाहीच,” किशन सांगतात. “राजस्थानची शान आहे ते.”

रावणहत्था हे एक तंतुवाद्य आहे. किशन यांच्या घराण्याच्या गेल्या अनेक पिढ्या बांबूचं हे वाद्य तयार करतायत आणि वाजवतायत. त्यांच्या मते या वाद्याचं मूळ रामायणात आहे. रावणहत्था हे नाव लंकापती रावणावरून पडलं असल्याचं ते सांगतात. इतिहासकार आणि लेखक मंडळी देखील मान्य करतात आणि सांगतात की रावणाने शिवाची उपासना करण्यासाठी, त्याची कृपा रहावी म्हणून हे वाद्य तयार केलं.

'रावणहत्थाः एपिक जर्नी ऑफ ॲन इन्स्ट्रुमेंट इन राजस्थान' या २००८ साली प्रकाशित झालेल्या पुस्तकात लेखिका डॉ. सुनीरा कासलीवाल लिहितात, “रावणहत्था हे बोने वाजवण्यात येणारं सर्वात जुनं वाद्य आहे.” ते व्हायोलिनप्रमाणे वाजवलं जात असल्याने अनेक तज्ज्ञांच्या मते या वाद्यापासूनच व्हायोलिन आणि चेलोसारखी वाद्यं विकसित झाली असावीत.

किशन आणि बाबुडी यांचं रोजचं जगणं या वाद्याशी, त्याच्या निर्मितीशी अगदी जवळून जोडलेलं आहे. उदयपूरच्या गिरवी तालुक्यात बारगाव या गावातलं त्यांच्या घराभोवती लाकडाचे ओंडके, नारळाच्या करवंट्या, बकऱ्याचं कातडं आणि तारा अशा सगळ्या वस्तूंचा ढिगारा पडलेला दिसतो. या सगळ्यातूनच रावणहत्था तयार होतं. हे दोघं नायक जातीचे असून राजस्थानात त्यांची गणना अनुसूचित जातीत होते.

चाळिशी पार केलेले किशन आणि बाबुडी रोज सकाळी ९ वाजता घर सोडतात आणि गणगौर घाट या उदयपूरमधल्या सुप्रसिद्ध पर्यतनस्थळावर पोचतात. किशन पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी रावणहत्था वाजवतात, त्यांच्या शेजारी बसलेल्या तिथे दागिने विकतात. संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास आपली पथारी आवरून दोघं घरी परततात. घरी त्यांची पाच लेकरं वाट पाहत असतात.

या चित्रफितीत किशन आणि बाबुडी रावणहत्था तयार करण्याची सगळी प्रक्रिया सांगतात. तितकंच नाही, त्यांचं जगणं कसं या वाद्याभोवती गुंफलं गेलं आहे तेही आपल्याला समजतं. ही कला जिवंत ठेवण्यात त्यांना काय काय अडचणी येतात हेही दोघं जण मोकळेपणी सांगतात.

चित्रफीत पहाः रावणहत्थ्याचे विरते सूर

Urja
urja@ruralindiaonline.org

Urja is a Video Editor and a documentary filmmaker at the People’s Archive of Rural India

Other stories by Urja
Text Editor : Riya Behl

Riya Behl is a journalist and photographer with the People’s Archive of Rural India (PARI). As Content Editor at PARI Education, she works with students to document the lives of people from marginalised communities.

Other stories by Riya Behl