“जरा डोकं सांभाळून,” मोहम्मद इलियास मला म्हणतो. तो आणि शब्बीर हुसेन मला हुंदरमान ब्रोकमधल्या या घरांमध्ये घेऊन जात होते. लडाखमधल्या कारगिल बाजारपेठेपासून आठ किलोमीटरवरच्या या निर्मनुष्य वसाहतीत पोचण्यासाठी आम्ही आलो तो तीव्र वळणं असणारा रस्ता वाट अगदी चिंचोळा आणि घेरी आणणारा होता.

किमान चारशे वर्षांपूर्वी, इथली सुपीक जमीन आणि उदंड जलस्रोत पाहून कारगिलमधल्या पोएन आणि कारकेचु या दोन गावातल्या ३० कुटुंबांनी हिमालयाच्या कुशीत असलेल्या या ‘ब्रोक’ (बाल्टी भाषेमध्ये या शब्दाचा अर्थ आहे गुरांना चरण्यासाठी उन्हाळ्यातलं नंदनवन) मध्ये येऊन वस्ती करण्याचं ठरवलं. दगड, माती, लाकूड आणि तुसाचा वापर करून सहा टप्प्यांमध्ये ही घरं बांधण्यात आली आहेत. २७०० मीटर उंचीवर असणाऱ्या, आजूबाजूच्या खडकाळ परिसरात सामावून गेलेल्या या जवळ जवळ एकसंध असणाऱ्या संपूर्ण वस्तीला पर्वतांनी आधार दिला आहे.

यातलं प्रत्येक घर दुसऱ्या घराला फार कौशल्याने जोडलेलं आहे, जेणेकरून डिसेंबर ते मार्चदरम्यान जेव्हा इथे ५ ते ७ फूट बर्फ पडतो तेव्हा इथल्या रहिवाशांना घराबाहेर यायला लागू नये. “या घरांची छपरं, दरवाजे आणि खिडक्या अगदी लहान आणि कमी उंचीच्या ठेवण्यात आल्या होत्या, ज्याद्वारे जास्तीत जास्त उष्णता घरातच राहावी. प्रत्येक मजल्याच्या सज्जाच्या खोल्यांची वाऱ्याच्या दिशेला असणारी एक भिंत आहे जी विलोच्या फांद्यांनी विणलेली आहे. यातनं हवाही खेळती राहते आणि उन्हाळ्यात थंडगार झुळूक अनुभवता येते,” फुटक्या दगडी पायऱ्या चढून एका सज्जाच्या खोलीकडे जाता जाता इलियास सांगतो.
PHOTO • Stanzin Saldon
PHOTO • Stanzin Saldon

हुंदरमान ब्रोकचं स्थापत्य स्थलसापेक्ष आणि टिकाऊ आहे. प्रत्येक मजल्यावर वायुविजन व्हावं यासाठी विलोच्या फांद्यांनी विणलेली भिंत आहे

इलियास आणि शब्बीर दोघं तिशीचे आहेत आणि दोघं याच गावात लहानाचे मोठे झालेत. इलियासचा कारगिलमध्ये एक छोटा छापखाना आहे आणि शब्बीर टॅक्सी चालवतो – आम्ही त्याच्याच गाडीतून इथे आलो. गेल्या काही वर्षांमध्ये हुंदरमान ब्रोकची (शासकीय कागदपत्रांमध्ये याची नोंद पोएन गावाची वस्ती असा आहे) दोन वगळता बाकीची सगळी कुटुंबं एक किलोमीटर उंचीवर असणाऱ्या थोड्या मोठ्या आणि मोकळ्या ढाकळ्या वस्तीत रहायला गेली आहेत. याची कारणं म्हणजे – एक तर १९७१ साली झालेलं भारत-पाकिस्तान युद्ध आणि मग वाढत्या लोकसंख्येला जागा पुरेनाशी झाली (२०११ च्या जनगणनेनुसार एकत्रित लोकसंख्या - २१६) आणि हिवाळ्यात हिमप्रपाताचा धोकाही होताच. नव्या वस्तीचं नावदेखील हुंदरमानच आहे.

सहा वर्षांपूर्वी कारगिलच्या एका स्थापत्य अभियंत्याला हा मौल्यवान ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ठेवा सापडला, तोपर्यंत या जुनी वस्ती असणाऱ्या ब्रोकचा वापर जनावरं बांधण्यासाठी आणि सामानसुमान ठेवण्यासाठी केला जात होता. त्याने हा ठेवा संग्रहालयात गुंफणकार असणारे कारगिलचे एक प्रतिष्ठित रहिवासी अजाझ हुसेन मुन्शी यांच्या निदर्शनास आणून दिला, ज्यांनी नव्या वस्तीतल्या काही रहिवाशांना इथे पर्यटनाला कसा वाव आहे हे समजावून सांगितलं. मग त्यांनी एकत्र मिळून एक वारसा स्थळ म्हणून हुंदरमान ब्रोकचा विकास करायला सुरुवात केली. त्यांनी तीन खोल्यांचं एक संग्रहालय सुरू केलं ज्यात पुरातन आणि काही अलिकडल्या काळातल्या वस्तू जतन करण्यात आल्या आहेत. या जागेला आता आठवणींचं संग्रहालय असं नाव देण्यात आलं आहे. बुटक्या दरवाजाचं हे जुनं दगडी घर आपो हसन यांचं आहे, जे आता नव्या वस्तीत राहतात आणि बार्ली आणि भाजीपाला पिकवतात.

आम्ही या संग्रहालयात फेरफटका मारत होतो तेव्हा आमची चाहुल लागताच तिथनं उतारावरून मोहम्मद मुसा धावत धावत खाली आले आणि त्यांनी छानसं हसत ‘अस्सलाम आलैकुम!’ म्हणून आमचं स्वागत केलं. “डोंगरातली ती पायवाट दिसतीये तुम्हाला?” अंदाजे पन्नाशीचे असणारे मुसा विचारतात. पूर्वी हमाली काम करणारे मुसा आता वीजखात्यात कामगार आहेत. “मी लहान असताना पोरं एक दोन तास पायी पायी ब्रोलमोच्या शाळेत जायची, हे हुंदरमानचं ‘जुळं’ गाव. आता पाकिस्तानात आहे.”

PHOTO • Sharmila Joshi
PHOTO • Stanzin Saldon

‘मी सगळी युद्धं या डोळ्यांनी पाहिलीयेत,’ मोहम्मद मुसा सांगतात. उजवीकडेः शब्बीर हुसैन, मोहम्मद इलियास आणि अजाझ मुन्शी हुंदरमानच्या खडकाळ पठारावर

हुंदरमानकडे जाणाऱ्या वळणावळणाच्या चढणीवर, उंच पर्वतरांगांमध्ये एक सुंदरशा जागी दरीच्या पल्याड, अंदाजे पाच किलोमीटरवर ब्रोलमोचा काही भाग नजरेस पडतो. या वस्त्या कारगिलच्या उत्तरेला आहेत, भारत-पाक नियंत्रण रेषेला लागून. त्यामुळे इथे कायमच सैन्याचा वावर असतो.

इथल्या स्थानिकांच्या सांगण्यानुसार, ब्रोलमोसारखंच ब्रोकदेखील आधी हुंदरमो म्हणून ओळखलं जायचं. भारतीय सैन्याच्या मेजर मान बहादुर यांच्या सन्मानात या गावाचं नाव नंतर हुंदरमान पडलं. १९७१ च्या युद्धात पाक सैन्याला माघारी धाडण्यात मान यांची भूमिका मोलाची होती. १९६५ पर्यंत हा सगळा प्रदेश पाकिस्तानमध्ये होता. १९६५ च्या भारत-पाक युद्धानंतर हा प्रदेश ‘नो मॅन्स लॅण्ड’ जाहीर झाला. नंतर १९७१ मध्येच हुंदरमान अधिकृतरित्या भारतात असल्याचं जाहीर करण्यात आलं आणि ब्रोलमो, बिलारगु आणि ओल्डिंग पाकिस्तानात गेले.

“१९७१ मध्ये इथल्या अनेक मुस्लिम कुटुंबांनी पाकिस्तानात जायचा निर्णय घेतला,” मुसा सांगतात. “पण ज्यांना आपलं घरदार सोडून जाण्याचा विचारही सहन झाला ते नाही ते इथेच राहिले.” सीमेवरच्या आणि दोन देशांमधल्या वैरामुळे काही कुटुंबांचीच फाळणी झालीये.

सीमेपलिकडे राहणाऱ्या चुलत बहिणीच्या लग्नाचे फोटो इलियास हुडकून काढतो. “हे माझे चुलते आणि या त्यांच्या मुली. आम्ही हिच्या लग्नाला जाऊ शकलो नाही. वाईट या गोष्टीचं वाटतं की सगळ्या प्रक्रिया पूर्ण करण्यात महिनोनमहिने जातात, पण पूर्वी मात्र आम्ही एका दिवसात तिकडे पोचत असू. किती तरी कुटुंबं अशीच एकमेकापासून तुटलीयेत. प्रत्यक्षात जवळ तरी किती लांब.”

PHOTO • Stanzin Saldon
PHOTO • Stanzin Saldon

दरीच्या पल्याड आहे ‘जुळं गाव’ पाकिस्तानातलं ब्रोलमो (डावीकडे). संग्रहालयातल्या वस्तूंमध्ये पत्रं आणि पूर्वीची पाकिस्तानाची पारपत्रं आहेत

“सहा वर्षांपूर्वीपर्यंत, सैन्याच्या विशेष परवानगीशिवाय कोणत्याच पर्यटकाला हुंदरमानला येता यायचं नाही,” हुंदरमान संग्रहालयाच्या पायऱ्यांवर आम्ही ऊन खात बसलेलो असताना कारगिलचे गुंफणकार अजाझ मुन्शी सांगतात (त्यांनी गुंफण केलेल्या कारगिलच्या मुन्शी अझीझ भट संग्रहालयावर एक वेगळी कहाणी तयार होईल). “पर्यटनाच्या दृष्टीने या जागेचं मोल आणि समृद्ध असा वारसा लक्षात घेऊन, बाहेरच्या जगाला इथे येऊ द्यावं अशी सैन्याला विनंती करण्यात आली.” यासाठी भरपूर वेळही गेला आणि खूप पाठपुरावाही करावा लागला.

कारगिलच्या उत्तरेला, सीमेलगतच्या एका गावात – जिथे अलिकडेच पर्यटनाची संकल्पना रुजली आहे – तिथे हे पुनरुज्जीवनाचं काम हाती घेणं, तसं वातावरण तयार करणं म्हणजे आर्थिक आणि सांस्कृतिकदृष्ट्याही अडचणीचं होतं. आतापर्यंत वैयक्तिक देणग्या आणि सेवाभावी कामातूनच संसाधनं गोळा झाली आहेत. काही गावकऱ्यांचा आधी जरा विरोध होता कारण आपल्या सांस्कृतिक आणि धार्मिक मूल्यांचं अवमूल्यन होईल अशी भीती त्यांच्या मनात होती. “पर्यटनाच्या दृष्टीने इथे संवर्धन आणि पुनरुज्जीवनाच्या कामाचं महत्त्व लोकांना आणि प्रशासनाला समजावून सांगणं हे तेव्हाही आणि आजही मोठं आव्हानच आहे,” मुझम्मिल हुसैन सांगतात. ते कारगिलमध्ये संवर्धन, संस्कृती आणि इतरही मुद्द्यांवर काम करणाऱ्या रूट्स कलेक्टिव्ह या गटाचं काम करतात. हुंदरमान प्रकल्प सुरू करण्यात यांचा मोठा हातभार आहे. “या जीर्ण, मोडकळीस आलेल्या घरांमध्ये लोकांना रस आहे हे पाहून ते बुचकळ्यात पडले होते. बाह्य जगाच्या प्रभावाबाबत एक नकारात्मक भावनाही होतीच. पण जसजसा काळ पुढे जातोय तसं लोक जास्त मोकळे झालेत, खास करून तरूण मुलं नव्या गोष्टी स्वीकारतायत आणि आमच्या कामाला पाठिंबाही देतायत.”

२०१५ साली गुजरात आणि महाराष्ट्रातले स्थापत्य कलेचे विद्यार्थी आणि फ्रान्स व जर्मनीतल्या इतर काही जणांनी ब्रोकच्या पुनरुज्जीवनाचा आराखडा बनवायला गावकऱ्यांना मदत केली. तेव्हापासून हे आठवणींचं संग्रहालय जणू गतकाळातल्या आयुष्याची एक साठवणीची खोली झालंय. इथे पाहण्यासाठी काय काय आहे – स्वयंपाकाची पुरातन भांडी-कुंडी, अवजारं, कपडे आणि घरातले बैठे खेळ अशा (डोंगरातल्या घरांमधल्या) असंख्य सांस्कृतिक वस्तू. भारत-पाक युद्धाच्या आठवणीदेखील इथे आहेत, पाकिस्तानी सैनिकांच्या मागे राहिलेल्या काही वस्तू आहेत, जे सीमेपार गेले अशा काही गावकऱ्यांचे फोटो आहेत. काही पत्रंदेखील ठेवली आहेत – इलियासच्या चुलत्यांनी लिहिलेल्या एका पत्रात ते इथल्या सगळ्यांची चौकशी करतात आणि भारतातल्या त्यांच्या गणगोताला दुआ पाठवतात.

PHOTO • Stanzin Saldon
PHOTO • Stanzin Saldon
PHOTO • Stanzin Saldon

या संग्रहालयात स्वयंपाकाची जुनी भांडी, पारंपरिक बैठे खेळ आहेत आणि भारत-पाक युद्धातल्या क्षेपणास्त्रांचे अवशेषही

भारत आणि पाकिस्तानमधल्या युद्धातली काडतुसं, क्षेपणास्त्रांचे अवशेष, बंदुका आणि पिस्तुलं देखील आहेत इथे. “मी या वस्तीत राहून ती युद्धं माझ्या डोळ्यांनी पाहिलीयेत,” मुसा सांगतात. “माझे वडील, वस्तीतल्या बहुतेक पुरुषांप्रमाणे पाकिस्तान सैन्यासाठी हमाली करत आणि मी आणि माझे समवयस्क भारतीय सैन्यासाठी. या माझ्या गाढवाच्या पाठीवर किती तरी प्रकारची रसद [अन्न, दारुगोळा, औषधं, इत्यादी] लादून पर्वतांमध्ये नेली असेल. लोकांना आपल्या इतिहासाशी दुवा सांधता यावा यासाठी या संग्रहालयात असणाऱ्या या स्मृती जतन व्हायला हव्यात. इतरांनी इथे येऊन हुंदरमानची आणि इथल्या लोकांची कहाणी समजून घेतली तर फार बरं वाटेल मला.”

या संग्रहालयाच्या गुंफणकारांनी भविष्यासाठी अनेक आराखडे तयार केले आहेत. “आम्ही विविध अवकाश तयार करू पाहतोय. वाचण्यासाठी, ध्यानधारणेसाठी खोल्या आणि संग्रहालयाशेजारीच खास लडाखी खाणं देणारं एक उपहारगृह,” अजाझ मुन्शी सांगतात, “पण यासाठी सहाय्य मिळवण्यात काही आम्हाला अजून यश आलेलं नाही.”

पण, या गावाचं अर्थकारण हळू हळू बदलू लागलंय. परंपरागत शेती, पशुपालन आणि प्रवासी वाहतुकूशिवाय आता पर्यटकांची ये जा सुरू झाल्यामुळे रोजगाराच्या काही नव्या संधी निर्माण होऊ लागल्या आहेत. गावकऱ्यांनी स्थानिक पदार्थ आणि वस्तू विकणारी छोटी छोटी दुकानं थाटली आहेत. आमच्यासोबत पूर्ण वेळ असलेला शब्बीर म्हणतो, “मी नऊ वर्षांपासून टॅक्सी चालवतोय पण सध्या हुंदरमानला येणाऱ्या लोकांची संख्या वाढलीये. उन्हाळ्यात अगदी भर हंगामात मी [स्थानिक, भारतीय आणि परदेशी] पर्यटकांना घेऊन कारगिल मार्केट ते ब्रोक अशा किमान तीन तरी खेपा करतो, आणि असा मी काही एकटा नाहीये.”

हुंदरमान ब्रोकमधल्या अनेक घराण्यांचे इतिहास आणि आठवणी आता कारगिलच्या पलिकडे जगाला पहायला मिळतील ही आशा आहेच पण नीट जतन केला नाही तर हा सगळा ठेवा इतिहासात विरून जाईल अशी भीतीही इथल्या रहिवाशांच्या मनात आहे. “आपण सत्वर काही केलं पाहिजे. बाकीचं पुनरुज्जीवनाचं काम सुरू होईपर्यंत जितके उन्हाळे वाया जातील, तितकं नुकसान हे येणारे हिवाळे घेऊन येतील,” इलियास म्हणतो. तसंच वर्षानुवर्षं भारत-पाकिस्तानाच्या शत्रुत्वाच्या झळा सहन केल्यानंतर त्याला इतर गावकऱ्यांप्रमाणे शांतता हवीयेः “आम्हाला आता अजून कुठली युद्धं नकोत. आमचं हे स्वप्न – हे वारसा स्थळ – प्रत्यक्षात आणण्यासाठी आम्हाला शांतता नांदायला हवीये.”


अनुवादः मेधा काळे

Stanzin Saldon

Stanzin Saldon is a 2017 PARI Fellow from Leh, Ladakh. She is the Quality Improvement Manager, State Educational Transformation Project of the Piramal Foundation for Education Leadership. She was a W.J. Clinton Fellow ( 2015-16) of the American India Foundation.

Other stories by Stanzin Saldon
Translator : Medha Kale
mimedha@gmail.com

Medha Kale is based in Pune and has worked in the field of women and health. She is the Translations Editor, Marathi, at the People’s Archive of Rural India.

Other stories by Medha Kale