ओन्नुपुरममध्ये दुपारचे वेळ आहे. हातमागाच्या पायपट्ट्यांचा आवाज आसमंतात भरून राहिला आहे. “रेशमाचं काम सुरू कसं होतं पहायचं असेल तर पहाटे ५ वाजता यावं लागेल,” ६७ वर्षांचे एम. के. गोदंडबणी मला म्हणतात. ओन्नुपुरममध्ये रंगहीन कच्च्या रेशीम धाग्यांच्या गासड्या येतात आणि त्यावर गोदंडबणी आणि इतर विणकरांनी काम केलं की तेच धागे भरजरी सहा वार रेशमी साड्यांच्या रुपात इतून १५० किलोमीटरवर चेन्नईतल्या प्रतिष्ठित दुकानांमध्ये आणि इतरही बाजारपेठांमध्ये पोचतात.
तिरुवन्नमलाई
जिल्ह्यातल्या पश्चिम अरणी तालुक्यातल्या ओन्नुपुरम गावातली बहुतेक विणकर मंडळी
रक्ताच्या किंवा लग्नाच्या नात्यातली आहेत. घरटी एक तरी माग आहेच, पिढ्या न्
पिढ्या वापरात असलेला. “आमची मुलं शाळेत जाऊन शिक्षण घेतात पण विणकामही शिकतात,
आमची परंपरा आहे ही,” आपल्या १६ वर्षांच्या मुलाला एक गडद गुलाबी रंगाच्या रेशमी
साडीचं काम कसं संपवायचं दाखवता दाखवता ५७ वर्षांचे देवसेनापती राजगोपाल म्हणतात.
अरणी तालुक्यातल्या विणकर कुटुंबांनी सुरू केलेल्या विविध सहकारी संस्था किंवा लघु उद्योग विणकरांकडून या साड्या विकत घेतात आणि नामांकित कंपन्या आणि शोरुम्सना वितरित करतात. हे खरेदीदार विणकरांना गिऱ्हाइकांच्या पसंतीनुसार नक्षीकाम सुचवतात आणि बहुतेक वेळा पारंपरिक नक्षीची जागा आधुनिक आकृत्या घेतात.
बदल्यात विणकरांना बरा पैसा मिळतो. सरस्वती ईश्वरायन पावु पुनाइथल दुरुस्त करतात. हे काम शक्यतो स्त्रियाच करतात. ४५००-४८०० सुटे धागे मागावर बसवायचे ज्यामुळे साडीचा ताणा विणता येतो. अशा प्रत्येक कामाचे त्यांना सहकारी संस्था किंवा कुटुंबाकडून रु. २५०/- मिळतात आणि महिन्याला तिला अशी ६ ते ८ कामं मिळतात.
इथले विणकर साधं नक्षीकाम असणाऱ्या चार साड्या विणल्यावर रु. २,५००/- कमवतात. “आम्ही आठवड्याचे सातही दिवस काम करतो. आमची एकच सुट्टी असते, महिन्यातून एक दिवस, पौर्णिमेला,” आपल्या मागावरून लक्ष ढळू न देता सरस्वती गंगाधरन सांगतात. “आमचं भलं केल्याबद्दल आम्ही या दिवशी देवाचे आभार मानतो.” इतर विणकरांप्रमाणे सरस्वती यांनाही सहकारी संस्थेकडून साड्यांची कामं मिळतात. त्या महिन्याला १५ ते २० साड्या विणतात आणि सुमारे रु. १०,००० कमावतात.
“याच्यावरच आमचं पोट आहे आणि आम्हाला हे काम सोडायचं नाहीये. आम्ही जर विश्रांती घेतली तर आमचाच घाटा होतो,” सोन्याच्या जरीचं काम असणारी एक भरजरी साडी विणता विणता जगदेशन गोपाल सांगतात.
या
चित्रकथेची वेगळी आवृत्ती
२८
फेब्रुवारी २०१८ रोजी द पंच मॅगेझिनमध्ये प्रकाशित झाली आहे.

बालकृष्ण कुप्पुस्वामी चरख्यावर सूत कातताना


डावीकडेः वेंकटेशन पेरुमल ओन्नुपुरममधल्या मोजक्या विणकरांपैकी आहेत जे हातमागावर विणण्यासाठी नक्षी काढून, आलेख कागदावर छिद्रं करून विणण्यासाठी नक्षीची प्रारुपं तयार करतात – त्यांच्या वडलांकडून त्यांना ही कला वारशाने मिळाली आहे. बाकी अनेक ठिकाणी ही प्रक्रिया आता संगणकावरील सॉफ्टवेअर आणि छपाईने घेतली आहे. उजवीकडेः ओन्नुपुरममधल्या विणकरांच्या पुढच्या पिढीतले अनेक जण लहानपणापासूनच ही कला शिकायला सुरुवात करतात


शकुंतला, वय अंदाजे ८० वर्षं, चरख्यावर सूत काततात, गेली साठहून अधिक वर्षं त्या हे करतायत


शांती दुराईस्वामी, धागे तयार करणाऱ्या एका छोट्या कारखान्यात काम करतात. इथली यंत्रं ९० डेसिबलपर्यंत आवाज करतात. उजवीकडेः धाग्यांच्या कारखान्यातला आणखी एक कामगार फिरत्या चाकावर धागा चढवताना


उजवीकडेः रंगवण्याआधी एक कामगार पाण्यामध्ये धागे बुडवतोय. साडीच्या लांबीएवढे धागे कापून एकदम गडद रंगात – गुलाबी, पोपटी इत्यादी – रंगवले जातात. धागे रंगवण्याच्या कामाला २-३ दिवस लागू शकतात. रंगाऱ्यांना शक्यतो तिघांच्या गटात काम दिलं जातं आणि ज्या दिवशी काम मिळतं तेव्हा त्यांना प्रत्येकी दिवसाला रु. २०० मिळतात. उजवीकडेः अरुणाचलम पेरुमल धागे रंगवताना. वयाच्या १२ व्या वर्षापासून ते या व्यवसायात आहेत

एम. के. गोदंडबणी साडीसाठी मागावर ताणा तयार करतायत


मनोन्मणी पुन्नकोडी आणि त्यांचे कुटुंबीय पहाटे ताणा तयार करतात. तांदळाच्या पाण्याने माग धुऊन घेतला जातो. पिष्टमय पाण्यामुळे धागे पटकन वेगळे होतात आणि कडकही होतात. मागासाठी धाग्यांचे विशिष्ट संख्येचे संच केले जातात


डावीकडेः सरस्वती ईश्वरायन ताणा मागाला जोडतात, ज्याला पूर्वापारपणे ‘पावु पुनाइथल’ म्हणतात. हे काम शक्यतो स्त्रियाच करतात ज्या हाताने मागावर ४,५०० ते ४,८०० धागे बसवतात. उजवीकडेः जयकांता वीरबतिरन, वय ४५, एक नक्षीविरहित साडी विणतायत, जिच्यावर नंतर भरतकाम केलं जाणार आहे. बहुतेक घरांमध्ये माग जमिनीवरच ठेवले जातात. आणि पायपट्ट्यांसाठी जमिनीत लहानसा खड्डा केलेला असतो.


डावीकडेः साडीच्या एका क्लिष्ट नक्षीसाठी निर्मला अनेक खुट्ट्या वापरतात. उजवीकडेः कामात मग्न देवसेनातिपती राजगोपाल

जगदेशन गोपाल पूर्ण जरीची एक साडी विणतायत. अशा साडीचं वजन २ ते ५ किलो भरू शकतं

देवसेनातिपती राजगोपाल साडीचं विणकाम संपवून मागावरून साडीचा तागा कापतायत. त्यांचा मुलगा जवळच अरणी शहरात माध्यमिक शाळेत शिकतोय आणि त्यांना विणकामातही मदत करतो

‘याच्यावरच आमचं पोट आहे आणि आम्हाला हे काम सोडायचं नाहीये. आम्ही विश्रांती घेतली तर आमचाच घाटा आहे,’ जगदेशन गोपाल म्हणतात

सुंदरम गंगाधरन आणि त्यांची मुलगी सुमती (छायाचित्रात नाही) दोघंही चरितार्थासाठी विणकाम करतात


डावीकडेः नरसिंहन धनकोडी, वय ७३ गेली पन्नास वर्षं विणकाम करत आहेत आणि त्यांना अजूनही हे काम करत रहावंसं वाटतंय. उजवीकडेः ‘आम्ही आठवड्याचे सातही दिवस काम करतो,’ ६७ वर्षांच्या सरस्वती गंगाधरन सांगतात

देवसेनातिपती कोदंडपाणी आणि त्यांच्या पत्नी गोमती तयार झालेली साडी खोक्यात ठेवतायत. विणकरांना त्यांनी विणलेल्या साड्या नीट घडी घालून खोक्यात बांधून त्यांना काम देणाऱ्या सहकारी संस्थांना द्याव्या लागतात
अनुवादः मेधा काळे