तिच्या आजोबांनी तिचं नाव ‘पुली’ ठेवलं... तामिळमध्ये पुली म्हणजे वाघ. वाघासारखी ताकद होती तिच्या अंगात, म्हणून ती पुली. आजोबांनी कौतुकाने ठेवलेल्या या नावानेच आजही बंदरावर ती ओळखली जाते. के. भानुमती गेली चाळीसेक वर्षं या बंदरावर काम करतेय, गोळा केलेल्या कचर्यातनं माशांचे तुकडे, खवले, डोकं, शेपट्या असं सगळं निवडतेय, वेगळं करतेय आणि विकतेय. पण कडलूर या तामिळनाडूमधल्या मच्छिमार बंदरावर काम करणार्या तिच्यासारख्या अनेक बायकांना सरकारी योजना ‘कामगार’ मानत नाहीत, त्यांना आर्थिक, सामाजिक, अशी कसलीही सुरक्षितता मिळत नाही.

‘‘मी इथे आले ती पस्तीसेक वर्षांची असताना. आल्यावर मी माशांचा लिलाव करायला सुरुवात केली,’’ वय वर्षं ७५ असलेली पुली सांगते. शहराच्या पूर्वेला कडलूर जुनं बंदर आहे. तिथे मासेमारी करून आलेली बोट बंदराला लागली की लिलाव करणारे लोक व्यापार्यांकडून बोली घ्यायला सुरुवात करतात. त्यांनी बोटीमध्ये आधीच गुंतवणूक केलेली असली तर विक्रीच्या दहा टक्के कमिशन त्यांना मिळतं. (वीस वर्षांपूर्वीपर्यंत ते पाच टक्के होतं) पुली या बंदरावर आली तेव्हा तिच्या नातेवाइकांनी तिला हे काम दाखवून दिलं आणि दोन बोटींमध्ये गुंतवणूक करण्यासाठी ५० हजार रुपये कर्ज दिलं. तेव्हापासून दिवस-रात्र मेहनत करून पुलीने ते कर्ज चुकतं केलं. वार्धक्याच्या खुणा जाणवायला लागल्या तेव्हा पुलीने लिलाव करणं बंद केलं आणि ते काम आपल्या मुलीकडे सोपवलं.

सतत माणसांची वर्दळ असलेल्या कडलूर बंदरावर अनेक आवाजांचा कोलाहल असतो. लिलाव करणारे बोली मागत असतात, व्यापारी ती लावत असतात, मासे बोटीतून उतरवले जात असतात, यंत्रं बर्फ फोडत असतात, ट्रक्स येत-जात असतात, मासेविक्रेते आपला व्यवसाय करत असतात... कडलूर जिल्ह्यातलं हे मोठं मासेमारी बंदर आहे. सोथीकुप्पम (हे पुलीचं गाव) आणि आसपासच्या आणखी चार गावांतले मच्छिमार याच बंदराचा वापर करतात. ‘सेंट्रल मरीन फिशरीज रिसर्च इन्स्टिट्यूट’च्या माहितीनुसार, दहा वर्षापूर्वीपर्यंत या पाच गावांच्या मिळून २५६ यांत्रिक आणि ८२२ मोटर लावलेल्या बोटी या बंदरावर होत्या. (अलीकडची आकडेवारी उपलब्ध नाही.)
![“I’d started my kazhar business at the same time [as when I began working at the harbour],” Puli says, referring to her work of collecting and selling fish waste (the scales, heads, tails of fish, shrimp shells and other parts) and bycatch (such as seashells, shrimp, squid and small fishes). This is called kazhivu meen in Tamil, and, more informally, as kazhar. Puli is one of around 10 women at this harbour who collect fish waste and sell it to poultry feed manufacturers – it's a big industry in neighbouring districts like Namakkal. From Rs. 7 for one kilo of kazhar when she started out, the rate now, Puli says, is Rs. 30 per kilo for fish, Rs. 23 for fish heads and Rs. 12 for crab kazhar.](/media/images/04-Puli-3-NR-Puli_gets_by_on_shells_scales.max-1400x1120.jpg)
‘‘मी बंदरावर काम करायला सुरुवात केली तेव्हाच माझा काळरचा धंदा सुरू केला,’’ पुली सांगते. माशांचे अवशेष गोळा करणं आणि विकणं या तिच्या कामाबद्दल ती बोलत असते. हे अवशेष ती अक्षरशः कचर्यातून गोळा करते. त्यात माशांचे खवले असतात, कवच असतात, डोकी आणि शेपट्या असतात, शिंपले असतात, कोलंबीचे वेगवेगळे प्रकार आणि छोटे मासे असतात. तामिळमध्ये या सगळ्याला ‘कळिवू मीन’ म्हणतात आणि बोलीभाषेत ‘काळर’ म्हणतात. कडलूर बंदरावर माशांचा ‘कचरा’ गोळा करून विकणार्या दहाजणी आहेत. पुली त्यातली एक. कोंबड्यांचं खाणं तयार करणार्या उत्पादकांना या सगळ्या जणी हा कचरा विकतात. शेजारच्या नमक्कल जिल्ह्यात कोंबड्यांचं खाणं बनवणं हा एक मोठा उद्योग आहे. पुलीने सुरुवात केली तेव्हा ही काळर सात रुपये किलो विकली जात होती. आता माशांच्या तुकड्यांसाठी ३० रुपये, माशांच्या डोक्यांसाठी २३ रुपये आणि खेकड्यांच्या तुकड्यांसाठी १२ रुपये किलो असा भाव सुरू आहे.

सोळा वर्षांची होती तेव्हा पुलीचं नागपट्टिनम जिल्ह्यातल्या एका मच्छिमाराशी लग्न झालं. चार मुलं झाली त्यांना, पण पुलीचा नवरा कुप्पुसामी चिडखोर आणि मारकुटा होता. पुलीचे वडील सोथीकुप्पम गावचे पंचायत सदस्य होते. त्यांनी पुलीला मुलांसह घरी यायला सांगितलं. तिची आई बंदरावर लिलाव करत होती. पुली माहेरी आल्यानंतर तीन वर्षांनी आई गेली आणि पुलीच्या नातेवाइकांनी आता तिला लिलाव करायला सांगितलं. ‘‘मलाही मुलांसाठी पैसे हवेच होते,’’ पुली सांगते.

पहाटे चार ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत पुली बंदरावर असते. माशांच्या अवशेषांना मीठ लावत असते, ते बांधत आणि विकत असते. वास कमी होण्यासाठी ‘काळर’ला पहिल्या दिवशी मीठ लावून ठेवलं जातं. दुसर्या दिवशी तो सुकवला जातो आणि मग जाळीच्या पिशव्यांमध्ये भरला जातो. या जाळीच्या पिशव्या पुली बंदरावरूनच चार रुपयाला एक या भावाने विकत घेते. कधीकधी ती रिकामी झालेली मिठाची पोती वापरते. या पोत्याचा भाव आहे १५ रुपयाला एक.
काळरची एक पिशवी २५ किलोची असते. ‘‘पूर्वी मी
आठवड्याला चार-पाच पिशव्या विकायचे,’’ पुली सांगते. ‘‘आता मात्र कोविड आणि
रिंगसीन नेटवर आलेल्या बंदीमुळे मासळी कमी घावते, व्यापारही कमी होतो.’’ आता ती
नमक्कलच्या खरेदीदाराला आठवड्याला दोन पिशव्या विकते. त्यातून आठवड्याला तिला
साधारण १२५० रुपये मिळतात.
कडलूर बंदरावर स्त्रिया अनेक कामं करत असतात... माशांचा लिलाव, विक्री, मासे सुकवणं आणि वेचणं... हे सारं करणार्या स्त्रियांच्या बोलण्यात सतत येते ती त्यांच्या रोजच्या उत्पन्नाची अनिश्चितता. मच्छिमार गावांमधल्या बर्याच तरुण स्त्रिया मासेमारीशी संबंधित या कामांपासून लांबच राहातात. त्यामुळे बंदरावर काम करणार्या स्त्रियांपैकी बहुसंख्य वयस्करच आहेत.

‘‘काळरसाठी मी पैसे देत नाही कुणाला,’’ पुली सांगते. ‘‘बंदरावर मासे कापणार्या बायका असतात, त्यांच्याकडून मी गोळा करते ते.’’ रोज सकाळी चार वाजता ती बंदरावर येते आणि ग्राहकाला मासे साफ करून देणारे विक्रेते आणि इतरांकडून हा ‘कचरा’ गोळा करते. काळरसाठी पुली पैसे देत नाही, पण मासे विक्रेत्यांसाठी कधीकधी शीतपेयं मात्र घेते. ‘‘ते मासे विकायला बसतात ती जागा स्वच्छ करायला मी त्यांना मदत करते, त्यांच्याशी बोलते, गप्पा मारते,’’ ती सांगते.

कडलूर बंदरावर बायका करत असलेल्या कामांपैकी काही थेट माशांशी संबंधित, तर काही अप्रत्यक्ष. त्यात मासे विकणं, माशांवर केल्या जाणार्या प्रक्रिया हे तर असतंच; पण मच्छिमार कामगारांना बर्फ, चहा, जेवण, नाश्ता विकणं अशीही कामं असतात. राष्ट्रीय मत्स्यपालन धोरण २०२० मधल्या आकडेवारीनुसार मासे पकडून आणल्यानंतर जी कामं केली जातात, त्यात ६९ टक्के स्त्रिया असतात. ही कामं जमेस धरली तर मत्स्यपालन हे मुख्यतः स्त्रियांचं क्षेत्र म्हणावं लागेल.
२०२० चं मत्स्यपालन धोरण या क्षेत्रात स्त्रियांचा सहभाग वाढवण्याची गरज अधोरेखित करतं. त्यासाठी सहकारी संस्था, वेगवेगळ्या योजना, कामाची परिस्थिती सुधारणं अशा उपायांचाही उल्लेख करतं. पण अशा सगळ्या योजनांचा भर असतो तो यांत्रिकीकरणावर, या महिलांच्या रोजच्या समस्यांकडे मात्र या योजना पाहातच नाहीत!

मासेमारीच्या क्षेत्रात असणार्या महिलांना सहाय्यकारी ठरतील अशा उपायांऐवजी किनारपट्ट्यांचं परिवर्तन, भरपूर भांडवलाची गरज असणार्या मत्स्यपालनाला आणि माशांच्या निर्यातीला उत्तेजन देणारं धोरण यामुळे या महिलांच्या समस्या अधिकच गहन होत आहेत. या बदलांमुळे या क्षेत्रात महिलांचं असणारं योगदान मोजलंच जात नाही. मोठ्या पायाभूत सुविधांमधली वाढती गुंतवणूक आणि छोट्या मच्छिमारांनी छोट्या प्रमाणात केलेल्या मासेमारीला प्रतिबंध करत निर्यातीला प्रोत्साहन देणार्या ‘मरीन प्रॉडक्ट्स एक्सपोर्ट डेव्हलपमेंट अथॉरिटी’ची १९७२ मध्ये केलेली स्थापना, या गोष्टी मासेमारीच्या क्षेत्रात येण्यासाठी माहिलांना अडथळा ठरत आहेत. २००४ मध्ये आलेल्या त्सुनामीनंतर तर या प्रक्रियेला अधिकच गती आली आहे, कारण नव्या बोटी आणि नवी उपकरणं यांच्यातली गुंतवणूक वाढली आहे.
बंदरावरच्या या कामांमध्ये गुंतण्याऐवजी त्यापासून दिवसेंदिवस अधिकाधिक स्त्रिया दूर जात आहेत. कडलूर बंदरावर काम करणार्या बायका सांगतात की, त्यांना मासे विकायला, कापायला, सुकवायला, साफ करायला इथे जागाच मिळत नाही. सरकारी यंत्रणेने फक्त काही महिला विक्रेत्यांनाच बर्फाचे खोके दिले आहेत. काही गावा-शहरांमध्ये महिला मासे विक्रेत्यांना बाजारात जागा दिली आहे. पण वाहतुकीची सोयच नाही, त्यामुळे बहुतेक वेळा या महिला दूरवरच्या ठिकाणी मासे विकायला जातात त्या तंगडतोड करतच.

‘‘मी या बंदरावरच, माझ्या कामाच्या ठिकाणाच्या जवळच एका छोट्याशा झोपडीत राहाते,’’ पुली सांगते. पण पाऊस पडतो तेव्हा मात्र ती सोथीकुप्पमपासून तीन किलोमीटरवर असलेल्या तिच्या मुलाच्या, मुथुच्या घरी जाते. ५८ वर्षांचा मुथु बंदरावर मासेमारी करतो. तो रोज पुलीसाठी जेवण घेऊन येतो. शिवाय पुलीला दरमहा एक हजार रुपये वृद्धत्व पेन्शनही मिळते. माशाच्या कामातून मिळणारे पैसे पुली आपल्या मुलांना देते. तिला दोन मुलगे आणि दोन मुली. वयाच्या चाळीशीत-पन्नाशीत असलेले. कडलूर जिल्ह्यात हे सगळे मासेमारी करतात. ‘‘काय नेणार आहे मी माझ्याबरोबर?’’ पुली म्हणते, ‘‘काहीच नाही ना?’’
संशोधन आणि लेखन यात सहभाग देणार्या यू. दिव्यउतिरण, निकोलस बौट्स, तारा लॉरेन्स, अजित मेनन, पी. अरुण कुमार, भगत सिंग आणि इतर यांच्यासह.
अनुवाद: वैशाली रोडे