साताऱ्याच्या माण तालुक्यातल्या म्हसवडमध्ये शेरडांच्या बाजारात विठोबा यादव त्यांची शेळी आणि एक महिन्याचं करडू कुणी खरेदी करतंय का याची वाट पाहत बसलेत. सकाळी सात वाजता ते जीपने आलेत आणि आता १०.३० वाजायला आलेत.
दुधाच्या शेळीला बाजारात एरवी ७००० ते ८००० रुपये इतका भाव मिळतो, पण १६ किलोमीटरहून वळईहून आलेल्या ८० वर्षांच्या विठोबांनी अगदी ३००० मिळाले तरी शेळी विकायची ठरवलीये. तरीही त्यांची शेळी काही विकली जाईना. “कुणी इचारायला आलंच नाही. कुणी येऊन साधी किंमत बी इचारली न्हाई,” हताश होऊन विठोबा म्हणतात आणि बाहेर गावी परतणाऱ्या जीपकडे धावतात.


डावीकडे: ‘ कुणी इचारायला आलंच नाही ’ , विठोबा यादव हताश होऊन सांगतात. मध्येः शेरडं बाजारात आणण्यासाठी विक्रेते आणि व्यापारी जीप किंवा टेंपोचा वापर करतात. शीर्षक छायाचित्रः म्हसवडच्या बाजारात खरेदीदाराच्या प्रतीक्षेत काही जण
२०१७ सालापासूनच या भागात दुष्काळ पडलाय आणि आता मांग समाजाच्या विठोबा यादवांसारख्या अनेकांना त्यांची शेरडं राखणं कठिण होत चाललंय. बकरे खाटकाला विकले जातात पण शेळ्या शक्यतो राखण्यासाठीच विकत घेतात. पण पाणी आणि चाऱ्याचं इतकं प्रचंड दुर्भिक्ष्य आहे की कुणीच शेळ्या घ्यायला तयार नाही.
विठोबा यादवांसारख्या अनेक भूमीहीनांसाठी शेरडं राखून चार पैसे कमवणं शक्य होतं. अडचणीच्या वेळी ही शेरडंच त्यांचा ‘विमा’ असतात, पण दुष्काळाने आता या विम्याचं संरक्षणही मिळेनासं झालं आहे.
अनुवादः मेधा काळे