“वर्षभरात आमची किती तरी जनावरं बिबट्याच्या तोंडी जातात. ते रात्री येऊन पिलं उचलून घेऊन जातात,” शेरडं राखणारे गौर सिंग ठाकूर सांगतात. तिथला स्थानिक भुटिया कुत्रा शेरूसुद्धा त्यांना काहीही करू शकत नाही, ते म्हणतात.
हिमालयाच्या गंगोत्री पर्वतरांगांमध्ये आमची त्यांच्याशी गाठ पडली. उत्तरकाशी जिल्ह्यातल्या सौरा गावातल्या सात कुटुंबांची मेंढरं ते राखतात. गौर सिंगसुद्धा २,००० मीटर खाली असलेल्या या गावाचेच रहिवासी आहेत. वर्षातले नऊ महिने ते ही मेंढरं राखतात. तसा त्यांचा करारच झालेला आहे. पाऊस येवो किंवा बर्फ, त्यांना घर सोडून बाहेर पडावंच लागतं. मेंढर चारायची, मोजायची आणि सुखरुप परत आणायची.
“इथे बघा, ४०० मेंढरं आणि १०० शेरडं असतील,” डोंगरउतारावर चरत असलेल्या जित्राबाकडे पाहत ४८ वर्षांचे हरदेव सिंग ठाकूर म्हणतात. “जास्त पण असतील,” नक्की आकडा किती हे काही ते खात्रीने सांगू शकत नाहीत. हरदेव गेली १५ वर्षं मेंढरं राखतायत. “काही मेंढपाळ आणि हाताखाली काम करायला माणसं दोन आठवड्यांसाठी येतात. माझ्यासारख्या काही जणांना हे काम आवडतं, आणि ते जास्त काळ थांबतात,” ते सांगतात.
ऑक्टोबर महिना सुरू आहे. उत्तराखंडच्या गढवाल हिमालयातल्या गंगोत्री पर्वतरांगांमध्ये, चुली टॉप या विस्तीर्ण गवताळ पट्ट्यातलं गवत बोचऱ्या वाऱ्यांवर डुलतंय. एकमेकांना ढुसण्या देत जाणाऱ्या मेंढरांसोबत जाणाऱ्या मेंढपाळांनी थंडीपासून बचाव म्हणून अंगावर ब्लँकेट लपेटून घेतली आहेत.

गुरु लाल (डावीकडे), गौर सिंग ठाकूर आणि विकास धोंडियाल (मागील बाजूस) गंगोत्री रांगांमध्ये सूर्यास्ताच्या वेळी जित्राब गोळा करतायत


डावीकडेः राखण करणारा भुटिया कुत्रा शेरू मेंढपाळांसाठी फार कामाचा आहे. उजवीकडेः मेंढरं आणि शेरडं उत्तरकाशीच्या सौरा गावाच्या वर चुली टॉप या बुग्यालमध्ये चरतायत
इतक्या उंचावरच्या पर्वतरांगांमध्ये मेंढरं राखणं हे खूपच जिकिरीचं काम आहे. झाडांच्या वर, मोठमोठाल्या खडकांमध्ये आणि डोंगराळ भूप्रदेशात शिकारी पटकन दिसतही नाहीत. दोन पायांचे असोत नाही तर चार पायांचे. जित्राब थंडी किंवा इतर आजारांमुळे मरण पावण्याची देखील भीती असते. “आम्ही तंबू ठोकून राहतो आणि जनावरं आमच्याच आसपास असतात. दोन कुत्री देखील आहेत, पण बिबटे कोकरं आणि करडं उचलून नेतात,” हरदेव सांगतात. त्यांची एकूण ५० मेंढरं आहेत आणि गौर सिंग यांची ४० च्या आसपास.
हे मेंढपाळ आणि त्यांचे दोन साथीदार पहाटे ५ वाजल्यापासून कामाला लागलेत. बेंबटणाऱ्या मेंढरांना गोळा करून ढुसण्या देत त्यांना डोंगरात वरती नेलंय. शेरूची तर फारच मदत होते. सगळ्या मेंढ्या एकाच ठिकाणी गोळा झाल्या तर तो त्यांना हाकलतो. आणि सगळ्यांनाच नीट चरता येतं.
हे कळप एका दिवसात २० किलोमीटर अंतर फिरतात. शोध असतो चांगलं गवत असणाऱ्या हिरव्या गवताळ पट्ट्यांचा. जास्त उंचीवरच्या पर्वतरांगांमध्ये बर्फ जिथून सुरू होतं त्याखाली गवताळ कुरणं असतात. पण अशी गवताळ कुरणं किंवा बुग्याल आणि त्यामध्ये वाहतं पाणी मिळणं तसं अवघडच. गवताच्या शोधात हे मेंढपाळ उत्तरेच्या दिशेने अगदी १०० किलोमीटर प्रवास करून जातात. अगदी चीनच्या सीमेपर्यंत.

गुरू लाल, गौर सिंग ठाकूर, विकास धोंडियाल यांची मेंढरं डोंगरउतारांवर चरतायत. दूर अंतरावर हिमालयाची बर्फाच्छादित शिखरं दिसतायत
ही मेंढपाळ मंडळी तंबूंमध्ये राहतात आणि कधी कधी चन्नीचाही वापर करतात. चन्नी म्हणजे दगड रचून केलेला जनावरांसाठीचा एक साधासा गोठा. त्याच्यावर प्लास्टिकचं छत करून आडोसा तयार केला जातो. कुरणांच्या शोधात डोंगरात जास्त उंचावर जायला लागलं की झाडं विरळ व्हायला लागतात आणि मग लाकूडफाटा गोळा करण्यासाठी त्यांना जास्त कष्ट घ्यावे पडतात.
“आम्ही आमच्या घरापासून वर्षातले नऊ महिने लांब असतो. आम्ही गंगोत्रीजवळ हरसिलमध्ये सहा महिने राहिलो आणि त्यानंतर इथे [चुली टॉप] आलो; इथे येऊन आम्हाला दोन महिने झालेत. आता हिवाळा वाढायला लागलाय आणि आता आम्ही आमच्या घरी परत जाऊ,” हरदेव सांगतात. उत्तरकाशी जिल्ह्याच्या भटवारीमधल्या सौरा गावाजवळच्या झामलो या पाड्यावर ते राहतात. त्यांची सौरामध्ये एक बिघ्याहून थोडी कमी जमीन आहे. (एक बिघा म्हणजे एकराचा पाचवा हिस्सा). त्यांची बायको आणि मुलं शेती पाहतात. घरच्यापुरता भात आणि राजमा पिकवतात.
तीन महिने बर्फात कुठेही काहीही करता येत नाही तेव्हा मेंढरांचे कळप आणि मेंढपाळही गावात राहतात. प्राण्यांचे मालकही त्यांची तब्येत नीट आहे का वगैरे पाहतात. मेंढपाळाला राखणीचे दर महिना ८ ते १० हजार रुपये मिळतात. पण एखादी मेंढी गेली तर तिचे पैसे कापून घेतले जातात. हाताखाली काम करणाऱ्यांना मोबदला वस्तूरुपात दिला जातो. त्यांना ५-२० बकरी दिली जातात.


डावीकडेः जनावरांसाठी बांधलेले दगडाचे साधेसे गोठे म्हणजेच चन्नी या भागात बऱ्याच ठिकाणी पहायला मिळतात. उजवीकडेः राखण करणारा शेरू आणि (डावीकडून) हरदेव सिंग ठाकूर, गौर लाल, विकास धोंडियाल आणि गौर सिंग ठाकूर
उत्तरकाशी या जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा छोट्या गावांमध्ये देखील मेंढा किंवा बकरा १०,००० रुपयांपर्यंत विकला जातो. “सरकार आमच्यासाठी एक गोष्ट करू शकेल. शेरडं किंवा मेंढरं विकण्यासाठी एक कायमस्वरुपी जागा मिळाली तर आम्हाला फार मदत होईल. भावसुद्धा बरा मिळू शकेल,” गौर सिंग सांगतात. त्यांना सध्या जोरदार सर्दी झाली आहे. त्यांच्यासारख्या मेंढपाळांना औषध-गोळ्यांसाठी येणाऱ्या जाणाऱ्या लोकांवर अवलंबून रहावं लागतं कारण वैद्यकीय सुविधांपर्यंत पोचणं दुस्तर आहे.
“हिमाचल प्रदेशात २,००० किलोमीटर प्रवास केला तेव्हा मला हे काम मिळालंय,” गुरू लाल सांगतात. चाळिशीचे लाल मूळचे सिमला जिल्ह्याच्या दोदरा-क्वार तालुक्याचे आहेत. “माझ्या गावात कसलंच काम नाहीये.” लाल दलित आहेत. नऊ महिन्यांच्या कामाचा मोबदला म्हणून त्यांना १० शेरडं मिळणार आहेत. घरी परतल्यावर ते ही शेरडं विकतील तरी किंवा काही पाळून पिलांची पैदास करतील. घरी त्यांची बायको आणि १० वर्षांचा मुलगा आहे.
काम किंवा नोकऱ्या नाहीत म्हणूनच हरदेव सिंग सुद्धा राखुळी झाले. “माझ्या गावातली माणसं मुंबईला हॉटेलमध्ये कामासाठी जातात. इथे पर्वतांमध्ये थंडी तरी असते नाही तर सगळं ओलंचिक्क. इथे हे काम कुणालाच करायचं नाहीये. रोजंदारीपेक्षा हे जास्त खडतर आहे. आणि मजुरीची कामं तरी कुठे मिळतायत?” ते विचारतात.

गंगोत्रीच्या पर्वतरांगांमध्ये सूर्य उगवतोय आणि मेंढपाळ आपली जनावरं चारणीला घेऊन निघालेत
या वार्तांकनासाठी अंजली ब्राउन आणि संध्या रामलिंगम यांनी मोलाचं सहकार्य केलं आहे. त्यांचे आभार.
अनुवाद: मेधा काळे