११ डिसेंबरच्या सकाळी सगळ्यांनी विजेच्या वायर काढून घ्यायला सुरुवात केली तेव्हा शेजारचा एक दुकानदार हमसून रडायला लागला. “आता आम्ही इथे नाही तर त्याला सुनंसुनं वाटेल असं तो म्हणत होता. आम्हाला सुद्धा थोडं जड जाणार आहे. पण शेतकऱ्यांचा हा विजय या सगळ्याहूनच फार मोठा आहे,” गुरविंदर सिंग सांगतात.
सकाळचे ८.१५ वाजलेत. गुरविंदर आणि
त्याच्या गावातले शेतकरी दिल्लीच्या पश्चिमेकडे असलेल्या टिक्री इथल्या आंदोलन स्थळावरचे
आपले तात्पुरते निवारे आणि घरं उतरवायला लागलेत. गरज पडली तर लाकडाच्या दांडक्याने
बांबूचा सांगाडा मोडला जातोय आणि खालच्या फळ्या मोडण्यासाठी विटांचा वापर केला
जातोय. २० मिनिटात सगळं मोडून एक मोठा ढीग तयार झाला. चहा आणि भजी खाण्यासाठी ते
जरासे थांबले.
“आम्ही आमच्या स्वतःच्या हाताने ही घरं
उभारली होती आणि आता आमच्याच हाताने ती मोडून जाणार आहोत,” ३४ वर्षीय गुरविंदर
सांगतात. पंजाबच्या लुधियाना जिल्ह्यातल्या दांगियाँ गावात त्याच्या कुटुंबाची सहा
एकर शेती आहे ज्यात गहू, भात आणि बटाट्याची शेती केली जाते. “विजयी होऊन घरी जायचं
म्हणून आम्ही एकीकडे खूश असलो तरी इथे ज्यांना जीव लावला त्यांना सोडून जाणंसुद्धा
जिवावर येतंय.”
“आम्ही आलो तेव्हा, आंदोलन सुरू
होण्याआधी इथे काहीही नव्हतं. आम्ही सगळे रस्त्यावर झोपायचो. त्यानंतर आम्ही हे घर
बांधलं,” ३५ वर्षीय दीदार सिंग सांगतात. ते देखील लुधियानाच्या दांगियाँ गावचे
रहिवासी आहेत. त्यांच्या सात एकर रानात ते गहू, तांदूळ, बटाटा आणि भाजीपाला करतात.
“आम्हाला इथे खूप काही शिकायला मिळालंय. खास करून इथे सगळ्यांसोबत राहताना
जाणवलेला बंधुभाव. सगळी सरकारं केवळ भांडणं लावून देण्याचं काम करतात. पण जेव्हा
पंजाब, हरयाणा आणि उत्तर प्रदेशातले आम्ही सगळे इथे एकत्र आलो तेव्हा आम्हाला हे
कळून चुकलं की आम्ही सगळे शेवटी एकच आहोत.”
“पंजाबात आता निवडणुका आहेत आणि
आम्ही योग्य व्यक्तीलाच मत देणार आहोत,” गुरविंदर सांगतात. “आमचा हात धरून आधार देणाऱ्यालाच
आम्ही मत देऊ. आमच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या कुणालाही आम्ही सत्तेत येऊ देणार
नाही,” दीदार म्हणतात.
![It’s difficult for us [to leave]. But the win of the farmers is a bigger celebration', said Gurwinder Singh.](/media/images/02a-Image-33-ST.max-1400x1120.jpg)

डावीकडेः ‘[इथून जाणं] आम्हालाही जड जातंय. पण शेतकऱ्यांचा विजय या सगळ्याहून फार मोठा आहे,’ गुरविंदर सिंग म्हणतात. उजवीकडेः त्यांच्या गावचे शेतकरी टिक्रीवरची आपली घरं उतरवताना
९ डिसेंबर रोजी संयुक्त किसान मोर्चा या आंदोलन करणाऱ्या ४० शेतकरी संघटनांनी दिल्लीच्या वेशीवर गेले वर्षभर सुरू असलेलं आंदोलन स्थगित घेण्याची घोषणा केली. सरकारने आणलेले तीन कृषी कायदे मागे घेतले जावेत आणि इतर मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू होतं.
इतर मागण्या मात्र आजही पूर्ण
झालेल्या नाहीत – शेतमालासाठी किमान हमीभावची कायदेशीर शाश्वती, कर्ज आणि इतरही
अनेक मुद्द्यांवर संयुक्त किसान मोर्चा सरकारशी संवाद सुरूच ठेवणार आहे.
“आम्ही आंदोलन केवळ स्थगित केलंय, संपवलेलं
नाहीये. सैनिक कसे काही दिवस सुट्टीवर जातात तसं शेतकरी आपापल्या घरी निघालेत. जर सरकारने
तशीच वेळ आणली तर आम्ही परतसुद्धा येऊ शकतो,” दीदार सांगतात.
“जर या सरकारने आम्हाला [किमान
हमीभाव आणि शेतीसंबंधी इतर मुद्द्यांवरून] त्रास दिला तर आम्ही जसे इथे आलो तसेच
पुन्हा एकदा परतून येऊ,” गुरविंदर म्हणतात.
दांगियाँ गावच्या आंदोलकांच्या घरांपासून
थोड्या अंतरावर हरयाणाच्या फतेहाबाद जिल्ह्यातल्या धाणी भोजराज गावच्या सतबिर
गोदारांनी नुकताच एका छोट्या ट्रकमध्ये सगळा पसारा लादलाय. दोन पंखे, पाण्याच्या
टाक्या, दोन कुलर, ताडपत्र्या, आणि लोखंडी गज.


डावीकडेः ‘एमएसपीसाठी लढावं लागलं तर आम्ही परत येऊ. आमचं आंदोलन केवळ स्थगित झालंय, केशरी रुमाल बांधलेले सतबिर गोदारा म्हणतात. उजवीकडेः ‘आम्ही इथे कचरा गोळा करायला यायचो तर आमच्यासारख्या गरीब लोकांना दोन वेळचं जेवण मिळत होतं,’ कल्पना दासी सांगतात
“आमच्या गावातल्या एका शेतकऱ्याचा
ट्रक आहे हा. आम्ही फक्त डिझेलचे पैसे भरणार,” ४४ वर्षीय सतबीर सांगतात. “हे सगळं
सामान आमच्या जिल्ह्यातल्या धाणी गोपाल चौकात उतरवून ठेवणार आहोत. पुन्हा येऊन
आंदोलन करायला लागलं तर काय घ्या? सगळं तयारच ठेवणार आहोत. आमच्या सगळ्या मागण्या
तशाही मान्य झाल्याच नाहीयेत. त्यामुळे सगळं सामान एका ठिकाणी बांधून ठेवणार आहोत.
या सरकारला धडा कसा शिकवायचा ते आता आम्हाला कळून चुकलंय.” असं म्हणताच आजूबाजूचे
सगळे हसायला लागले.
“आम्ही सरकारला वेळ दिलाय. एमएसपीसाठी
भांडायची वेळ आली तर आम्ही परत येऊ. आमचं आंदोलन केवळ स्थगित झालंय,” सतबीर
सांगतात. “हे वर्ष आमच्यासाठी ऐतिहासिक होतं. पाण्याचे फवारे झेलले, अश्रुधुराचा
मारा सहन केला. आम्हाला थांबवण्यासाठी मध्ये अडथळे घातले, रस्ते खोदले. सगळं काही
सहन करून आम्ही टिक्रीला पोचलोय.”
११ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजेपर्यंत बरेचसे
आंदोलक शेतकरी टिक्रीहून परत निघाले होते. ज्यांचं सामानसुमान आवरून बांधाबांध
झाली होती ते देखील निघायला लागले होते. ट्रॅक्टरच्या ट्रॉल्यांवर गाद्या, बाजा,
ताडपत्र्या आणि सगळा पसारा लादला होता आणि त्याच्यावर गडी माणसं बसलेली होती. काही
जण ट्रकमधून, काही गाड्यांनी तर काही बोलेरोतून परत निघाले होते.
बहुतेक सगळे जण थेट वेस्टर्न
पेरिफेरल एक्सप्रेसवेनी परत चालले होते तर काही डावीकडे वळून दिल्ली-रोहतक मार्गाच्या
दिशेने गेले (बहादुरगड़ शहराजवळ). भारतीय किसान युनियन (एकता उग्राहा) या संघटनेचा
मुक्काम इथेच आहे.
रस्त्यावर ३० वर्षीय कल्पना दासी आंदोलनस्थळावरून
कचरा गोळा करायला आल्या होत्या. झारखंडच्या पाकुर जिल्ह्यातल्या कल्पना बहादुरगडमध्ये
कचरा वेचण्याचं काम करतात. आज त्यांच्याबरोबर त्यांचा १० वर्षांचा मुलगा आकाश देखील
होता. त्या म्हणतात की एक दिवस हे आंदोलक शेतकरी परत जाणार याची आम्हाला पूर्ण कल्पना
होती तरी देखील आज वाईट वाटतंय. “इथे आम्ही कचरा गोळा करायला यायचो तर आमच्यासारख्या
गरीब लोकांना दोन वेळचं जेवण मिळत होतं,” त्या सांगतात.


डावीकडेः ‘सगळ्यात आधी शेकडो ट्रॅक्टर मोगा जिल्ह्यातल्या बुट्टरला पोचतील. दोन-तीन गावं पार केली की आमचं गाव येतं. तिथे सगळे फुलं देऊन आमचं स्वागत करतील आणि तिथून शेवटी आम्ही आमच्या गावी पोचू,’ सिरिंदर कौर सांगतात. उजवीकडेः ट्रॅक्टर ट्रॉलीत सामान लादण्याआधी आपल्या बाकी आंदोलक सहकाऱ्यांबरोबर भांडी साफ करताना
या रस्त्यावरचे (रोहतकच्या दिशेने
निघालेले) ट्रॅक्टर प्लास्टिक आणि कागदाच्या फुलांनी, रंगीबेरंगी झिरमिळ्या आणि
संघटनेच्या झेंड्यांनी सजलेले होते. “आम्ही आमचे ट्रॅक्टर छान सजवू आणि लग्नाची
वरात कशी थाटात जाते तसं इथून नाचत-गात जाऊ,” पंजाबच्या मोगा जिल्ह्याच्या डाला
गावच्या ५० वर्षीय सिरिंदर कौर सांगतात. एका ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये त्यांच्या
कुटुंबाचा सगळा संसार लादलेला होता आणि दुसऱ्या ट्रॉलीत सगळे पुरुष बसले होते. बाया उघड्या कँटर ट्रकमधून
जाणार होत्या.
“सगळ्यात आधी
शेकडो ट्रॅक्टर मोगा जिल्ह्यातल्या बुट्टरला पोचतील. दोन-तीन गावं पार केली की
आमचं गाव येतं. तिथे सगळे फुलं देऊन आमचं स्वागत करतील आणि तिथून शेवटी आम्ही
आमच्या गावी पोचू,” सिरिंदर
कौर सांगतात. आपल्या चार एकर रानात त्यांचं कुटुंब गहू, तांदूळ
आणि हरभऱ्याची शेती करतं. आमचं घर स्वातंत्र्यसैनिकांचं घर आहे, त्या सांगतात. आणि
सध्या [११ डिसेंबर रोजी], “माझा एक दीर टिक्रीला आंदोलन करतोय, एक सिंघुला आणि
माझं कुटुंब इथे [बहादुरगडमध्ये रोहतक रस्त्यावर]. आम्ही सगळे लढवय्ये आहोत आणि
आम्ही हा लढा जिंकलाच. आमची मागणी [तीन कृषी कायदे मागे घ्या] मान्य झाली आणि आता
आमची संघटना [भाकियु एकता उग्राहाँ] जे सांगेल त्याप्रमाणे आमची पुढची कृती असेल.”
शेजारच्याच एका ट्रॉलीमध्ये पंजाबच्या
मोगा जिल्ह्यात्या बढनी कलान गावच्या ४८ वर्षीय किरनप्रीत कौर बसल्या आहेत. त्या
अगदी थकलेल्या दिसतायत. “आम्ही फक्त तासभर झोपलोय. कालपासून सगळी बांधाबांध सुरू
आहे,” त्या सांगतात. “विजयाचा सोहळा सुरू होता, पहाटे तीन वाजेपर्यंत.”
त्यांच्या घरची १५ एकर शेती आहे आणि
त्यात गहू, तांदूळ, मका, मोहरी आणि बटाट्याची शेती करतात. इथे, त्या सांगतात, “इथे
आल्यावर कित्येक लोकांना समजलं की शांतीपूर्ण मार्गाने आंदोलन कसं करायचं ते. आणि
जर आपण आपल्या हक्कांसाठी लढलो तर आपण जिंकू शकतो.”
निघण्याआधी किरनप्रीत आणि इतरांनी
त्यांचा मुक्काम होता ती सगळी जागा साफ केली. “मी जमिनीला माथा टेकला. तिनेच तर
आम्हाला आंदोलन करण्यासाठी जागा दिली. तुम्ही ज्या जमिनीची पूजा करता तीच तुमच्या
पदरात भरभरून टाकते.”


डावीकडेः बढनी कलानच्या किरनप्रीत कौर, अमरजीत कौर आणि गुरमीत कौर त्यांच्या गावाच्या ट्रॉलीत बसून माघारी निघाल्या आहेत. ‘आम्ही फक्त तासभर झोपलोय. कालपासून सगळी बांधाबांध सुरू आहे,” त्या सांगतात. “विजयाचा सोहळा सुरू होता, पहाटे तीन वाजेपर्यंत,’ किरनप्रीत सांगतात. उजवीकडेः ‘आमच्या गावात आमचं स्वागत होईल,’ बठिंड्या भाकियु नेत्या परमजीत कौर म्हणतात
बहागुरगड़मध्ये भाकियुने मंच उभारला
आहे. त्याच्या जवळच संघटनेच्या बठिंडा जिल्ह्याच्या नेत्या परमजीत कौर
ट्रॉल्यांमध्ये सगळं सामान बसवण्याचा खटाटोप करतायत. साठीच्या परमजीत यांनी रस्त्याच्या
दुभाजकामधल्या जमिनीत बटाटा, टोमॅटो, मोहरी आणि इतर पालेभाज्या लावल्या होत्या. ती
सगळी भाजी त्यांनी काढून घेतलीये. (पहाः टिक्रीचे शेतकरी ‘हे सगळं आयुष्यभर
विसरणार नाहीत’) “मी भाजी खुडली आणि इथल्या
कामगारांना देऊन टाकली,” त्या सांगतात. “इथल्या अगदी मोजक्या गोष्टी आम्ही सोबत
नेणार आहोत. आम्ही लाकूड, ताडपत्री सगळं काही इथल्या गरीब लोकांना देऊन टाकलंय.
त्यांची घरं तरी ते उभारू शकतील.”
आज रात्री आमची ट्रॉली वाटेतल्या
गुरुद्वारेत थांबेल आणि उद्या सकाळी आम्ही निघू, त्या सांगतात. “आमच्या गावात आमचं
स्वागत होईल. आमची जमीन आज आम्ही वाचवू शकलो म्हणून आम्ही जल्लोश करणार आहोत. आमचा
लढा अजूनही संपलेला नाही. आम्ही दोन दिवस विश्रांती घेऊ आणि त्यानंतर आमच्या इतर मागण्यांसाठी
पंजाबात आमचा लढा सुरूच असेल.”
त्या बोलत असतानाच मागे आंदोलक शेतकरी
ट्रॅक्टर ट्रॉली, ट्रक आणि इतर गाड्यांमधून घरच्या वाटेने निघाले होते. वाहतूक सुरळीत
ठेवण्यासाठी हरयाणा पोलिस तैनात होते. आंदोलन स्थळ सुरू होतं तिथे, पंजाब किसान
युनियनच्या मंचापाशीच जेसीबी मशीनच्या सहाय्याने रस्त्यात बसवलेले अडथळे तोडून
टाकले जात होते. गेल्या वर्षी शेतकऱ्यांना दिल्लीत येण्यापासून रोखण्यासाठी हे अडथळे
उभे केले होते.
सकाळी ११ वाजेपर्यंत टिक्रीचं मैदान
जवळपास रिकामं झालं होतं. काही मोजके आंदोलक परत जाताना दिसत होते. वर्षभर किसान मजदूर
एकता झिंदाबादच्या नाऱ्यांनी दणाणून गेलेलं हे आंदोलन स्थळ आज मुकं झालं होतं. आता
हे नारे आणि जल्लोश शेतकऱ्यांच्या स्वतःच्या गावात असाच सुरू राहील. आपला लढा आता
तिथे लढण्याच्या इराद्यानेच त्यांनी आपला डेरा इथून हलवला आहे.

पश्चिम दिल्लीच्या टिक्रीच्या आंदोलन स्थळावर हरयाणाच्या फतेहाबाद जिल्ह्याच्या धाणी भोजराज गावचे आंदोलक शेतकरी आपले निवारे उतरवून सामान ट्रकमध्ये लादतायत

गरज पडल्यास बांबूंचे सांगाडे लाकडाच्या दांडक्यांनी मोडले जातायत आणि खालच्या फळ्या विटांनी पाडल्या जातायत

आदल्या रात्रीच सगळ्या सामानाची बांधाबांध सुरू झालीये, ११ डिसेंबरच्या पहाटेपर्यंत लोक आवराआवरी करत होते. ‘आम्ही आमच्या स्वतःच्या हाताने ही घरं उभारली होती आणि आता आमच्याच हाताने ती मोडून जाणार आहोत’

गुरविंदर सिंग (मध्यभागी, मोरपंखी रंगाची पगडी परिधान केलेले) आणि त्यांच्या गावातले इतर आंदोलक पश्चिम दिल्लीच्या टिक्रीमध्ये आंदोलन स्थळावर आपले निवारे उतरवतायत

गाद्या, बाजा, ताडपत्री आणि इतर सामान लादलेल्या ट्रॉल्यांवर बसलेली गडी माणसं. काही जण ट्रकमधून, काही गाड्यांनी आणि काही बोलेरोने परततायत

हरयाणाच्या बहादुरगड शहराजवळच्या आपल्या मोठ्या निवाऱ्यातून (२५ जणांची राहण्याची सोय इथे होती) पंखा आणि विजेची जोडणी काढतायत. जसकरन सिंग (मागच्या बाजूला, निळ्या स्वेटरमध्ये) म्हणतातः ‘आमच्या मागण्या मान्य झाल्यामुळे आम्ही खूश आहोत. वेळ आली तर आम्ही परत येऊ’

रोहतक मार्गावरचे आपले निवारे हटवल्यानंतर आंदोलकांनी लाकडी टेबलं आणि वापरात येऊ शकतील अशा अनेक वस्तू स्थानिक मजूर स्त्रियांना देऊन टाकल्या

‘आम्ही आमचे ट्रॅक्टर छान सजवू आणि लग्नाची वरात कशी थाटात जाते तसं इथून नाचत-गात जाऊ,’ सिरिंदर कौर सांगतात

पंजाबच्या फरीदकोट जिल्ह्यातल्या बागियाना गावातल्या शेतकऱ्यांनी आंदोलनाच्या पहिल्या दिवशी आणि शेवटच्या दिवशी हजर असलेल्यांचा सत्कार केला

पंजाबच्या मोगा जिल्ह्यातल्या डेमरू खुर्द गावातले आंदोलक शेतकरी रोहतक मार्गावरच्या आंदोलनस्थळावरून माघारी निघाले आहेत

पंजाबच्या मोगा जिल्ह्यातल्या डेमरू खुर्द गावातले आंदोलक शेतकरीः सामानाची बांधाबांध झाली, ट्रकमध्ये सगळं लादलंय, चला सगळ्यांचा एकत्र फोटो होऊन जाऊ दे

पंजाबच्या मनसा जिल्ह्यातले एक शेतकरी ट्रकने परत निघाले आहेत, चेहरा हास्याने उजळला आहे

पंजाबच्या मनसा जिल्ह्यातले एक शेतकरी ट्रकने परत निघाले आहेत – विजयी आणि निश्चयी

डावीकडून उजवीकडेः मुख्तयार कौर, हरपाल कौर, बयांत कौर आणि हामिर कौर आंदोलन स्थळावरून निघण्याआधी रोहतक मार्गावर गिद्दाचा (विजय साजरा करण्याचा एक नाच) आनंद घेतायत

परमजीत कौर यांनी रस्त्याच्या दुभाजकामधल्या जमिनीत बटाटा, टोमॅटो, मोहरी आणि इतर भाजीपाला लावला होता. त्या सांगतात, ‘मी आजच भाजी काढली आणि इथल्या मजुरांना वाटून टाकली’

११ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजेपर्यंत टिक्रीचं मैदान जवळपास रिकामं झालं होतं. काही मोजके आंदोलक निघण्याच्या तयारीत होते

११ डिसेंबरः हरयाणाच्या बहा दुरगडमध्ये भारतीय किसान युनियन (एकता उग्राहाँ) च्या मुख्य मंचाशेजारीः वर्षभराची लगबग आता एकदम शांत, सुनीसुनी

शेतकऱ्यांनी दिल्लीत येऊ नये म्हणून रस्त्यात उभे केलेले अडथळे संघटनेच्या मंचापासून थोड्याच अंतरावर जेसीबी मशीनच्या सहाय्याने तोडून टाकले जातायत

पंजाबच्या मोगा जिल्ह्यात भलूर गावी आंदोलक शेतकरी विजयोल्लास साजरा करतायत

११ डिसेंबर रोजी ट्रॅक्टर ट्रॉली, ट्रक आणि गाड्यांनी रोहताक मार्गावरून आपापल्या गावी परत निघालेले आंदोलक शेतकरी

शेतकऱ्यांची वाहनं घरच्या वाटेने निघाली तेव्हा वाहतूक सुरळीत रहावी यासाठी हरयाणा पोलिसांनी पोलिस तैनात केले

वाटेमध्ये आंदोलकांना नमन करणारे नागरिक

शेतकरी माघारी निघाले आणि गेलं वर्षभर ‘किसान मजदूर एकता झिंदाबाद’ च्या नाऱ्याने दणाणून गेलेलं आंदोलन स्थळ आता मुकं झालंय. आता हे नारे आणि जल्लोश शेतकऱ्यांच्या स्वतःच्या गावात असाच सुरू राहील. आपला लढा आता तिथे लढण्याच्या इराद्यानेच त्यांनी आपला डेरा इथून हलवला आहे.