यंदा हिवाळा चांगलाच कडक असल्यामुळे अब्दुल माजीद वनी खूश आहेत. जास्तीत जास्त लोकांना कांगरी हवी असणार अशी त्यांना आशा आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये काश्मीरच्या काही भागात तापमान -१० अंशाखाली गेलं होतं.

५५ वर्षीय वनी मध्य काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यात चरार-इ-शरीफमध्ये राहतात आणि तिथेच काम करतात. श्रीनगरहून ३२ किलोमीटर दूर असणाऱ्या या गावात कांगरी बनवणारे अनेक कारागीर आहेत. फुललेले निखारे ठेवण्यासाठीचं मातीचं मडकं वेताच्या टोपलीत ठेवतात, त्याला म्हणतात कांगरी. काश्मीरमध्ये अनेक जण या टोपलीची कडी हातात धरून फिरनच्या (गुडघ्यापर्यंत येणारा लोकरीचा अंगरखा) आत कांगरी ठेवतात. कांगरीतले फुललेले निखारे काश्मीरच्या गोठवणाऱ्या लांबलचक हिवाळ्यांमध्ये ऊब देतात. (काही अभ्यासांमध्ये फक्त काश्मीरमध्ये आढळणाऱ्या ‘कांगरी-कॅन्सर’चा उल्लेख आढळतो. दीर्घ काळ निखारे त्वचेच्या जवळ धरल्यामुळे होणारा हा विशिष्ट स्वरुपाचा कॅन्सर आहे. पण त्याविषयी परत कधी तरी.)

“आम्ही वेताच्या सुंदर कांगऱ्या बनवतो, त्यासाठी आमचा हा भाग प्रसिद्ध आहे,” चरार-इ-शरीफच्या कानिल मोहल्ल्यात राहणारा ३० वर्षीय उमर हसन दार म्हणतो. इथले कारागीर आणि कामगार कांगरी बनवण्याच्या उद्योगात आहेत. विलो म्हणजेच वाळुंजीचं लाकूड जवळपासच्या जंगलांमधून मिळतं आणि त्याच्या फांद्या काढून त्यापासून टोपल्या विणल्या जातात. कधी कधी शेतकऱ्यांकडून विकत घेऊन हे लाकूड उकळून मऊ करतात, त्याची साल तासून काढून टाकतात. यासाठी हातानंच तयार केलेल्या एका अवजाराचा वापर होतो (याला छाप्पून म्हणतात. लाकडाचे दोन दांडके काटकोनात बसवून जमिनीत घट्ट रोवलेले असतात) आणि मग हे फोक भिजवून, सुकवून नंतर रंगवले जातात. त्यानंतर या वेताच्या टोपल्या विणल्या जातात.

या सगळ्याला एक आठवड्याचा काळ लागतो, कारण या काड्या पूर्ण वाळाव्या लागतात. हिवाळा सुरू होण्याआधी ऑगस्ट महिन्यात शक्यतो कांगऱ्या विणायला सुरुवात होते. आणि कधी कधी मागणी असेल त्याप्रमाणे अगदी हिवाळा सुरू असतानाही कांगऱ्या विणल्या जातात. फेब्रुवारी संपेपर्यंत हिवाळा उतरतो.

पूर्वी कांगऱ्या म्हणजे फक्त मातीची मडकी असायची, त्याभोवती टोपली नसायची. गावातल्याच कुंभारांकडून ही मडकी विकत घेतली जायची. पण कालांतराने काही कारागिरांनी मडक्यांभोवती विविध प्रकारच्या टोपल्या विणायला सुरुवात केली, यांची किंमत जुन्या कांगऱ्यांपेक्षा जास्त असते. स्वस्त कांगरी घ्यायची तर आता १५० रुपये पडतात आणि ती विणण्यासाठी ३-४ तास लागतात, नाजूक नक्षीकाम असणारी रंगी-बेरंगी कांगरी – जी विणण्यासाठी ३-४ दिवस लागू शकतात – घ्यायची तर अगदी १८०० रुपयांपर्यंत किंमत जाऊ शकते, उमर मला सांगतो. त्यात त्याला १००० ते १२०० रुपयांपर्यंत नफा मिळतो.

Left: Manzoor Ahmad, 40, weaving a colourful kangri at a workshop in Charar-i-Sharief in Badgam district. Right: Khazir Mohammad Malik, 86, weaving a monochromatic kangri in his workshop at Kanil mohalla in Charar-i-Sharief
PHOTO • Muzamil Bhat
Left: Manzoor Ahmad, 40, weaving a colourful kangri at a workshop in Charar-i-Sharief in Badgam district. Right: Khazir Mohammad Malik, 86, weaving a monochromatic kangri in his workshop at Kanil mohalla in Charar-i-Sharief
PHOTO • Muzamil Bhat

डावीकडेः मंज़ूर अहमद, वय ४०, बडगम जिल्ह्याच्या चरार-इ-शरीफमध्ये आपल्या वर्कशॉपमध्ये कांगरी विणत बसलेत. उजवीकडेः खाजिर मोहम्मद मलिक, वय ८६, चरार-इ-शरीफच्या कानिल मोहल्ल्यात एकरंगी कांगरी विणतायत

कांगरीचा व्यवसाय जरी केवळ हंगामी असला तरी हे काम करणाऱ्या कारागिरांची आणि त्यांना वाळुंज पुरवणाऱ्या शेतकऱ्यांची त्यातून वर्षभराची बेगमी होते. चरार-इ-शरीफमधले कारागीर मला सांगतात की दर हिवाळ्यात ते सुमारे ५०,००० ते ६०,००० कांगऱ्या विकताता आणि त्यातून एकूण १ कोटीची कमाई होत असावी. सध्याच्या कडाक्याच्या हिवाळ्यामध्ये तर धंदा चांगला होण्याची आशा आहे. “या हंगामात एक कोटीहून जास्त धंदा करण्याची आमची इच्छा आहे, कारण कांगरीची मागणी थांबण्याचं नाव नाहीये,” वनी सांगतात. जून ते डिसेंबर या सहा महिन्यांच्या काळात महिन्याला रु. १२,००० ते रु. १५,००० इतकी कमाई होत असल्याचं ते सांगतात.

कांगरीचं जवळ जवळ सगळं काम पुरुष करतात, मात्र वाळुंजीच्या फांद्या तासण्याचं काम मात्र बायांचं असतं. “मी बारावीत असतानाच लाकडाची साल काढायचं काम करायला लागले,” निघत अझीझ (तिच्या विनंतीवरून नाव बदललं आहे) सांगते, ती आता पदवीधर आहे. “वाळुंजीच्या फांदीची साल नीट काढायला फार कसब लागतं. नाही तर ती तुटून वाया जाते.” निघतसारख्याच अनेक तरुण मुली गंदरबलच्या उमेरहेरे भागात तासण्याचं काम करतात. वाळुंजीची एक मोळी तासण्याचे त्यांना ४० रुपये मिळतात. अशा ७-८ मोळ्या त्या ३-४ तासात सोलू शकतात.

पण काही बायांचं मात्र असं म्हणणं आहे की त्यांना हे काम आता करायचं नाहीये. “वाळुंज तासण्याच्या कामाकडे गावातले लोक चांगल्या नजरेने बघत नाहीत. त्यांना असं वाटतं की हे गरिबांचं काम आहे. त्यांच्या टोमण्यांमुळे मला हे कामच सोडून द्यावंसं वाटतंय,” उमेरहेरेची परवीना अख़्तर सांगते.

घरच्यांच्या कांगरीसाठी निखारे फुलवण्याचं कामही घरच्या बायाच करतात. बाजारातून कोळसा विकत आणला जातो – शक्यतो जर्दाळू आणि सफरचंदांच्या लाकडापासून कोळसा पाडतात. “सकाळी आणि सूर्य मावळल्यावर मी कांगऱ्या भरून ठेवते. अख्ख्या काश्मीरमध्ये बाया हिवाळ्यात हे काम करत असतात,” श्रीनगरच्या अली कादल भागात राहणाऱ्या ५० वर्षीय हाजा बेगम सांगतात. त्या त्यांच्या एकत्र कुटुंबासाठी म्हणून रोज १० कांगऱ्या भरून ठेवतात. भाजी विकणाऱ्या आपल्या पतीसाठीही.

ऊब मिळवण्यासाठी आता इतर पर्याय वापरात येऊ लागले आहेत – घरभर उष्णता निर्माण करणारी यंत्रं आहेत किंवा मध्य आशियातून आलेल्या बुखारी (लाकडाच्या शेकोट्या) आहेत. पण काश्मीरच्या शून्याखाली तापमान जाणाऱ्या गोठवणाऱ्या थंडीत, खास करून गावपाड्यांवर गरिबासाठी आजही कांगरीच ऊब देतीये. आपल्या अंगरख्यांच्या आड कांगरीतले फुललेले निखारे मोठ्या हिवाळ्यांमध्ये तासंतास ऊब निर्माण करतात.

PHOTO • Muzamil Bhat

३२ वर्षीय फारुक अहमद वनी मध्य काश्मीरच्या गंदरबल जिल्ह्यातल्या उमेरहेरेचे रहिवासी आहे. तो कंत्राटदार आहे, शेतकऱ्यांकडून ओली वाळुंज घेऊन त्यावर प्रक्रिया करून ती कांगरी विणणाऱ्यांना विकायचं काम तो करतो

PHOTO • Muzamil Bhat

उमेरहेरेत बाया खांद्यांवरून वाळुंजीच्या मोळ्या वाहून आणतात आणि मग पुढची प्रक्रिया सुरू होते

PHOTO • Muzamil Bhat

उमरहेरेमध्ये आशिक अहमद, वय २२ आणि त्याचे वडील गुलज़ार अहमद, वय ५४ त्यांच्या घराजवळच्या कारखान्यात रात्रभर पाण्यात उकळत असलेल्या वाळुंजीच्या फांद्या बाहेर काढतायत. “वाळुंज तोडल्यानंतर सर्वात आधी हे करावं लागतं. ती पाण्यात भिजवून ठेवली की तिची खडबडीत साल तासायला सोपी जाते,” आशिक सांगतो

PHOTO • Muzamil Bhat

उमेरहेरेचा रहिवासी, वासीम अहमद, वय ३२, रात्रभर वाळुंज उकळत ठेवण्यासाठी भट्टीत लाकडं सरकवतोय

PHOTO • Muzamil Bhat

चरार-इ-शरीफचे रहिवासी खाज़िर मोहम्मद मलिक, वय ८६ गेल्या ७० वर्षांपासून कांगरीच्या व्यवसायात आहेत. “मी माझ्या वडलांकडून ही कला शिकलोय,” ते सांगतात. “कांगरीशिवाय काश्मीरचे लोक हिवाळ्यात तगून राहू शकणार नाहीत. माझ्या कांगऱ्या लोकांना ऊब देतायत ते पाहून मनाला आनंद मिळतो”

PHOTO • Muzamil Bhat

खाज़िर मोहम्मद मलिक आणि मन्झूर अहमद चरार-इ-शरीफच्या आपल्या कारखान्यात कांगरी विणतायत

PHOTO • Muzamil Bhat

चरार-इ-शरीफच्या कानिल मोहल्ल्यात राहणारे ४० वर्षीय मन्झ़ूर अहमद गेल्या २५ वर्षांपासून कांगऱ्या विणतायत. “मी एका दिवसात ३-४ साध्या कांगऱ्या विणतो. पण एखादी भारी, जास्त काम असलेली कांगरी विणायची तर ३-४ दिवस लागतात,” ते सांगतात

PHOTO • Muzamil Bhat

गुलाम नबी मलिक, वय ६४ चरार-इ-शरीफच्या कानिल मोहल्ल्याचे रहिवासी आहेत. ते म्हणतात, “मी माझ्या वडलांकडून हे विणायला शिकलो. ते म्हणायचे की तुमच्याकडे जर पुरेसं कसब नसेल ना तर तुम्ही कांगरीचा कानही विणू शकणार नाही. एक कांगरी अगदी बरोबर, बिनचूक विणायला मला नऊ वर्षं लागली”

PHOTO • Muzamil Bhat

चरार-इ-शरीफच्या ७० वर्षीय मुगली बेगम सांगतात, “गेली ५० वर्षं माझे शौहर [खाज़िर मोहम्मद मलिक] कांगरी विणतायत आणि मला त्यांचं काम फार आवडतं. त्यांना कांगरी विणताना पाहणं म्हणजे जणू स्वतःच कांगरी विणण्यासारखं आहे”

PHOTO • Muzamil Bhat

फिरदौसा वनी, वय ५५, श्रीनगरच्या नवकादल भागात राहतात. त्यांच्या घराच्या बाहेर गांजीनमध्ये कांगरीत निखारे भरतायत

PHOTO • Muzamil Bhat

चरार-इ-शरीफमधलं कांगरीचं दुकान, इथे सरासरी रोज १०-१२ गिऱ्हाईक तरी येतात

PHOTO • Muzamil Bhat

बाहेर बर्फ पडतंय, श्रीनगरच्या एका मातीच्या घरात चरार-इ-शरीफमध्ये बनलेली एक कांगरी भिंतीवर टांगून ठेवलीये

अनुवादः मेधा काळे

Muzamil Bhat

Muzamil Bhat is a Srinagar-based freelance photojournalist.

Other stories by Muzamil Bhat
Translator : Medha Kale
mimedha@gmail.com

Medha Kale is based in Pune and has worked in the field of women and health. She is the Translations Editor, Marathi, at the People’s Archive of Rural India.

Other stories by Medha Kale