हिवाळ्याची थंडगार सकाळ. नैन राम बाजेला मुनसियारी तहसीलमधल्या जैती गावातल्या आपल्या घराच्या छतावर बसले आहेत. त्यांच्या मागे कपड्यांची वळण, वर हलकेसे ढग आणि दूर अंतरावर पंचाचुली पर्वतरांगा. विळ्यासारखं गोल पातं असलेल्या एका अवजाराने ते रिंगल किंवा पहाडी रिंगल या हिमालयातील बांबूच्या बारीक पट्ट्या काढतायत. या विळ्याला पहाडी भाषेत बरंश म्हणतात. शून्याखाली तापमान असणाऱ्या या हवेतही ते हातमोजे किंवा पायमोजे घालत नाहीत. बोचरा वारा त्यांच्या त्वचेला झोंबतोय. पण नैन राम यांचं काम चालूच आहे, अविरत.

“मी काल हा रिंगल पहाडातून आणलाय. यातून दोन टोपल्या तरी होतील,” माझ्याकडे किंवा कॅमेऱ्याकडे बिलकुल न पाहता ते सांगू लागतात. वयाच्या १२ वर्षापासून नैन राम बांबूच्या वस्तू बनवतायत. त्यांनी ही कला त्यांच्या वडलांकडून शिकली, पण यात इतका कमी पैसा आहे की त्यांच्या वडलांना आपल्या मुलानी यात पडावं असं काही वाटत नव्हतं. तर, ते सांगतात, “लहानपणी मी दुसऱ्याच्या जागेतून बांबू चोरून आणायचो आणि त्याच्या काय काय वस्तू बनवायचो, फुलदाण्या, केराच्या टोपल्या, पेनस्टँड आणि गरम चपात्या ठेवायला टोकऱ्या. चिक्कार.”

आता ५४ वर्षांचे असणारे नैन राम यांच्या मते ते केवळ त्यांची बोटं आणि विळ्याच्या मदतीने रिंगलपासून काहीही बनवू शकतात. “माझ्यासाठी हा मातीच्या गोळ्यासारखा आहे. त्यापासून अगदी काही पण बनू शकतं,” काही पातळ आणि काही जाड पट्ट्या जमिनीवर ठेवता ठेवता ते म्हणतात. “हे काही एखाद्या कामगाराचं काम नाहीये – हे कौशल्य आहे. तुम्हाला हे शिकून घ्यावं लागतं आणि मुळात चिकाटी पाहिजे – एखाद्या कलेसारखी.”

A man sitting on the terrace of his house and weaving bamboo baskets
PHOTO • Arpita Chakrabarty

नैन राम बांबूच्या पातळ पट्ट्या एकमेकीत विणून टोपलीसाठी मजबूत असं बूड तयार करतात, आणि मग मेहनतीने त्याला गोलाई देतात

रिंगल बांबू बहुधा समुद्रसपाटीपासून १००० ते २००० मीटर उंचीवर वाढतो. मुनसियारी शहर २,२०० मीटर उंचीवर आहे आणि जैती हे गाव तिथून सहा किलोमीटरच्या अंतरावर आहे. त्यामुळे बांबू आणायला डोंगर चढून तरी जावं लागतं नाही तर उतरून तरी. जिथे रिंगल मिळेल त्याप्रमाणे. उत्तराखंडच्या पिथोरागढ जिल्ह्यातलं आयुष्य खूप खडतर आहे आणि लोकांकडे उपजीविकेचे फार कमी पर्याय आहेत. बांबूची उत्पादनं तयार करणं हा बाजेला जातीच्या लोकांचा परंपरागत व्यवसाय आहे – पण जैतीच्या ५८० लोकांमधले नैन राम हे शेवटचे बांबू विणकर.

मुनसियारीतल्या अगदी दूरदूरच्या ठिकाणांहून नैन राम यांना लोक त्यांच्या घरी बोलवतात. मग ते दिवसभर तिथे काम करतात आणि कधी कधी रात्रीदेखील. या डोंगराळ भागात एका ठिकाणाहून दुसरीकडे बोजा वाहून नेणं सोपं नाही, त्यामुळे ते लोकांच्या घराजवळच बांबू गोळा करून आणतात आणि तिथेच बांबूच्या वस्तू बनवतात. मोबदला म्हणजे काम करायला जागा आणि जेवण. एका दिवसाचे ते ३०० रुपये घेतात, मग त्या एका दिवसात एक टोपली होऊ दे नाही तर चार. दर महिन्याला त्यांना असं दहा एक दिवसांचं काम मिळत असेल, अगदी क्वचित १५ दिवस.

सुदैवाने त्यांच्या वस्तूंना मुनसियारीत चांगली मागणी आहे, खासकरून बाया सरपण आणि चारा आणण्यासाठी वापरतात त्या टिकाऊ आणि हलक्या करंड्यांना. झाकण आणि कडी असणाऱ्या काही टोपल्या अन्नपदार्थ नेण्यासाठी वापरल्या जातात. नवीन लग्न झालेल्या मुली माहेरहून सासरी निघतात, तेव्हा खासकरून या टोपल्या वापरल्या जातात.

A man is sitting on the floor inside his house and weaving bamboo strips into a basket
PHOTO • Arpita Chakrabarty
The man has finished weaving his basket
PHOTO • Arpita Chakrabarty
Different types of woven bamboo baskets
PHOTO • Arpita Chakrabarty

नैन राम वयाच्या १२ वर्षांपासून टोपल्या विणतायत. ‘हे काही एखाद्या कामगाराचं काम नाहीये – हे कौशल्य आहे. तुम्हाला हे शिकून घ्यावं लागतं आणि मुळात चिकाटी पाहिजे – सगळ्याच कलांसारखी.’

ज्या दिवशी बांबू शोधायला जंगलात जातात त्या दिवसाचे त्यांना पैसे मिळत नाहीत. “जेव्हा लोक मला घरगुती वापराच्या वस्तू बनवून देण्यासाठी घरी बोलवतात, तेव्हाच मी पैसे घेतो,” ते सांगतात. परवान्याशिवाय जंगलातला बांबू तोडायला मनाई आहे (वन संवर्धन कायदा, १९८०), पण नैन राम यांना परवानगीचा कधीच प्रश्न आलेला नाही कारण ते स्थानिक जनता आणि शासनाच्या सहयोगातून रक्षित केलेल्या वनांमध्ये किंवा वन पंचायतींमध्येच बांबू तोडायला जातात.

इकडे जैतीमध्ये घराच्या छतावर बसलेले नैन राम जरा काम थांबवतात, कोटाच्या खिशातून बिडी काढतात, डोक्याला गुंडाळलेला मफलर सोडतात आणि पायातले बूट काढून ठेवतात. बिडी शिलगावतानाच ते म्हणतात, त्यांना रिकामं बसायला फारसं आवडत नाही. “जरी मला कुणी बोलावणं धाडलं नाही, तरी मी (जंगलातून) थोडा रिंगल आणतो आणि घरबसल्याच काही तरी तयार करतो,” ते सांगतात. “कधी कधी मी या वस्तू गावच्या बाजारातल्या दुकानात पाठवतो, पर्यटक तिथे त्या विकत घेतात. मला एका टोपलीमागे १५० रुपये मिळतात. दुकानदार मात्र २०० ते २५० रुपयाला ती विकत असणार. या सगळ्यात माझाच घाटा होतो पण हे सोडून मला दुसरं काय माहितीये? एक सही तेवढा करता येते मला.”

A man sitting on top of the terrace of his house amidst bamboo strips
PHOTO • Arpita Chakrabarty
A man standing inside a house
PHOTO • Arpita Chakrabarty
A woman standing outside her house holding two woven bamboo vases filled with plastic flowers
PHOTO • Arpita Chakrabarty

नैन राम (डावीकडे) जैती गावातल्या त्यांच्या घराच्या छतावर बसून टोपल्या विणतायत. त्यांचा मुलगा, मनोज (मध्यभागी) मात्र वडलांच्या व्यवसायात पडलेला नाही, तो खानावळ चालवतो. देवकी देवी (उजवीकडे) त्यांच्या पतीने विणलेल्या दोन फुलदाण्या घेऊन उभ्या आहेत. त्यांच्या कारागिरीचा त्यांना अभिमान आहे

नैन राम यांनी अनेकांना रिंगलपासून वस्तू बनवायचं प्रशिक्षण दिलं आहे, एका स्थानिक सामाजिक संस्थेच्या महिलांसकट. पण सरकारने मात्र रिंगल बांबूच्या वस्तूंना प्रोत्साहन देण्यासाठी फारसं काही केलेलं नाही. या वस्तूंपासून थोडा तरी नफा मिळावा म्हणून किमान विक्री किंमत निर्धारित केलेली नाही किंवा या वस्तूंसाठी बाजारपेठ तयार व्हावी यासाठीही पावलं उचललेली नाहीत. कदाचित यामुळेच नैन राम यांची मुलं आपल्या वडलांकडून ही कला शिकण्यापासून परावृत्त झाली आहेत. नैन राम आता त्यांच्या घराण्यातले शेवटचे रिंगल विणकर आहेत. मुनसियारी तहसीलमध्ये बांधकामावर काम केलेलं परवडेल असंच त्यांच्या मुलांना, मनोज आणि पूरण राम यांना वाटतं.

मनोज जैतीच्या जवळ एक धाबा चालवतो. तो सांगतो, “या वस्तूंचा काय उपयोग आहे? मुनसियारीत कुणीही या वस्तू विकत घेत नाही. कधी तरी पर्यटक असल्या गोष्टी विकत घेतात, पण पोटापाण्यासाठी तुम्ही त्यांच्यावर अवलंबून राहणार का? त्यातून काही ठोस असं उत्पन्न मिळत नाही. आणि खरं तर नवीन काही शिकण्याचं आता माझं वय राहिलेलं नाही.” खरं तर तो केवळ २४ वर्षांचा आहे. नैन राम यांच्या पत्नी, देवकी देवी, वय ४५, त्यांच्या कुटुंबाच्या जमिनीच्या छोट्याशा तुकड्यात बटाट्याचं पीक घेतात. त्या सांगतात की त्यांच्या पतींनी बनवलेल्या सगळ्या गोष्टी विकल्या जातात. मोठ्या कौतुकाने त्या नैन राम यांनी बनवलेल्या फुलदाण्या आणि टोपल्या दाखवतात.

दुपार होईपर्यंत, आभाळ ढगांनी झाकोळून गेलंय, नैन राम त्यांच्या घराच्या छतावर बसून टोपल्या विणण्यात मग्न आहेत. “पाऊस येईल कदाचित,” ते सांगतात. बूट आणि लोकरीची टोपी घालून ते घरात जातात, त्या दिवशीची त्यांची पहिली बांबूची टोपली पूर्ण करण्यासाठी. दिवस मावळेपर्यंत, या कारागिराचे कुशल हात कदाचित अजून एक किंवा दोन टोपल्यादेखील झरझर विणतील.


अनुवादः मेधा काळे

Arpita Chakrabarty

Arpita Chakrabarty is a Kumaon-based freelance journalist and a 2017 PARI fellow.

Other stories by Arpita Chakrabarty
Translator : Medha Kale
mimedha@gmail.com

Medha Kale is based in Pune and has worked in the field of women and health. She is the Translations Editor, Marathi, at the People’s Archive of Rural India.

Other stories by Medha Kale