कोविड-१९ च्या टाळेबंदीमुळे तेहत्ता गावातली चातोर पाराची नेहमीची भाजी मंडई बंद झाली. आणि मग पश्चिम बंगालच्या नाडिया जिल्ह्यातल्या या गावात दत्ता पारा भागामध्ये सकाळी ६ ते १० या वेळेत एक तात्पुरती मंडई सुरू झाली. हे गाव तेहत्ता तालुका १ मध्ये येतं आणि हा भाग एप्रिल महिन्यात पश्चिम बंगाल सरकारने ‘हॉटस्पॉट’ असल्याचं जाहीर केलं होतं. मंडई भरलेली असतानाची ही काही दृश्यं:

प्रोशांतो मोंडल, वय ४८ रोज सकाळी दाल-पुरी आणि संध्याकाळी आलू बोंडा म्हणजेच बटाटावडे विकतात. पण टाळेबंदीमध्ये रस्त्यावर शिजवलेलं अन्न विकण्यावर बंधनं आल्यामुळे त्यांनी भाजी विकायला सुरुवात केलीये. एरवी त्यांची दिवसाला ४०० रुपयांची कमाई आता १५० रुपयांवर आलीये. “भाजीच्या धंद्याची मला फार काही माहिती नाहीये,” ते म्हणतात.

५६ वर्षांचे भाजीविक्रेते राम दत्ता शांती हलदरकडून लिंबू चहा विकत घेतायत. पूर्वी दिवसाला त्यांची ३०० रुपयांची कमाई व्हायची. ती आता निम्म्यावर आलीये. ते म्हणतात, “आधीसुद्धा फार काही भाजी विकली जायची नाही, आता तर अजूनच कमी झालाय धंदा.” शांती हलदर, वय ४८ गेल्या २० वर्षांपासून झाल-मुरी विकतायत, पण टाळेबंदीतल्या शिजवलेल्या अन्नाच्या विक्रीवर असणाऱ्या निर्बंधांमुळे ते आता चहा विकतायत. त्यांची कमाईदेखील दिवसाला २५०-३०० रुपयांवरून १००-१२० रुपयांवर आलीये.

सुखेन (डावीकडे) आणि प्रसेनजीत हलदर (उजवीकडे) भाऊ आहेत. सुखेन आधी खानावळीत स्वैपाक्याचं काम करायचा आणि महिन्याला १०,००० रुपये कमवायचा. आता मात्र ती कमाई दिवसाला २०० रुपयांवर आलीये – आणि त्याचीही खात्री नाही. प्रसेनजीत एका माशाच्या तळ्यावर काम करायचे आणि अर्धा वेळ एका गवंड्याच्या हाताखाली. दोन्ही कामातून त्यांची बरी कमाई व्हायची – दिवसाला २५० रुपये – आणि त्यांना कामावरून मासे घरी नेता यायचे. टाळेबंदीत तेही आता थांबलंय.


डावीकडेः २३ वर्षांपासून ४७ वर्षीय प्रफुल्ला देबनाथ (टाळेबंदीत बंद असलेल्या) समबय कृषी उन्नयन समिती मार्केटमध्ये पडेल ती कामं करत होते. ते गिऱ्हाइकांचं सामान घरी पोचवणे, आणि गाड्यांमधला माल दुकानात उतरवण्याचं काम करतात. आणि सगळा बाजार जे रोज झाडून काढतात – प्रत्येक भाजीवाल्याकडून रोज २ रुपये आणि दुकानदारांकडून १ रुपया गोळा करतात. पण आता हा बाजारच दत्ता पाराच्या खुल्या मैदानात हलवल्यामुळे त्यांची जी काही तुटपुंजी कमाई होती ती देखील थांबली. अर्थात काही भाजीवाले त्यांची नाष्टा आणि जेवणाची सोय करतायत. “मी झाडून काढलं नाही तर अख्ख्या बाजारात घाण होईल,” ते म्हणतात. “आणि मी जर बाजार झाडून काढला तर सगळे माझं नाव घेतील. माझ्यासारखं काम दुसरं कुणी करूच शकणार नाही!” उजवीकडेः बाजार थोडाच वेळ चालू असतो, त्यामुळे अनेक जण अगदी शेवटच्या क्षणी बाजार करायला येतात, स्वस्तात माल मिळेल अशा आशेने. खोका रॉय, वय ५० सुतारकाम करायचे, त्यानंतर त्यांनी घरूनच एक किराणा मालाचं दुकान चालवलं आणि आता ते टाळेबंदीमुळे बाजारात भाजी विकतायत. दिवसाला ४००-५०० रुपयांवरून त्यांची कमाई २००-२५० रुपयांवर आलीये. “पोलिसांची गस्त असल्यामुळे लोक घरातून बाहेरच पडत नाहीयेत,” ते म्हणतात. “मग तुम्हीच सांगा, भाजीपाला तरी कसा विकायचा आम्ही?”

परिमल दलालांकडून गिऱ्हाइक भाजी घेतायत. गेली ३० वर्षं हेच काम करत असल्याने ५१ वर्षीय परिमल इतरांपेक्षा या धंद्यात सराईत आहेत. ते म्हणतात, “माझ्या धंद्यात फार काही बदल झाला नाहीये. माझं गिऱ्हाईक इथे पण येतंय.”

कार्तिक देबनाथ अंडी, आलं, कांदा, लसूण, मिरची आणि इतर भाज्या विकतायत. ते ४७ वर्षांचे आहेत आणि गेल्या तीन दशकांपासून या व्यवसायात आहेत. “माझा धंदा चांगला चालू आहे,” ते म्हणतात. “आता तर काही नवं गिऱ्हाइक पण मिळालंय.”

३७ वर्षांचे बबलू शेख शेतकरी आहेत आणि भाजी देखील विकतात. ते मास्क म्हणून गमजाच वापरतात.
![Left: Khakon Pramanick, 45, who sells chickens and sometimes migrates to other states to work at construction sites, is now struggling with a drop from both sources of income. Right: Bharat Halder, 62, was a mason’s helper before he started selling fish around three years ago, hoping to earn more. During the lockdown, his earnings have dropped from around Rs. 250 a day to less that Rs. 200, he says. The supply of fish is also uncertain. “Fish is no longer coming from Andhra Pradesh due to the lockdown,” he says. “So the local pond and river fish [in smaller quantities] are now sold here.”](/media/images/09a-_DSC0045.max-1400x1120.jpg)
![Left: Khakon Pramanick, 45, who sells chickens and sometimes migrates to other states to work at construction sites, is now struggling with a drop from both sources of income. Right: Bharat Halder, 62, was a mason’s helper before he started selling fish around three years ago, hoping to earn more. During the lockdown, his earnings have dropped from around Rs. 250 a day to less that Rs. 200, he says. The supply of fish is also uncertain. “Fish is no longer coming from Andhra Pradesh due to the lockdown,” he says. “So the local pond and river fish [in smaller quantities] are now sold here.”](/media/images/09b-_DSC9999-2.max-1400x1120.jpg)
डावीकडेः खाकोन प्रामाणिक, वय ४५ चिकन विकतात आणि कधी कधी बांधकामावर मजुरीसाठी परराज्यात स्थलांतर करून जातात. या दोन्हीतून मिळणारं उत्पन्न घटल्यामुळे त्यांच्यासाठी अवघड झालंय. उजवीकडेः भारत हलदर, वय ६२ एका मिस्त्रीच्या हाताखाली काम करायचे. जास्त उत्पन्नाच्या आशेने त्यांनी तीन वर्षांपूर्वी त्यांनी मासे विकायला सुरुवात केली. टाळेबंदीच्या काळात, त्यांची कमाई दिवसाला २५० रुपयांवरून कशीबशी २०० रुपयांवर आलीये. माशाचा पुरवठा पण अनिश्चित झालाय. “टाळेबंदीमुळे आंध्र प्रदेशातून मासे येतच नाहीयेत,” ते म्हणतात. “त्यामुळे आता इथलेच तळ्यातले आणि नदीतले मासे आता थोड्याफार प्रमाणात इथे विकले जातायत.”
![Sridam Mondal, 62, mainly sells bananas and, at times, also a few vegetables. “The sales are very low [during the lockdown],” he says.](/media/images/10-_DSC9985.max-1400x1120.jpg)
श्रीदम मोंडल, वय ६२ प्रामुख्याने केळी विकतात आणि कधी कधी काही भाजीपालादेखील. “[टाळेबंदीच्या काळात] विक्री फारच कमी झालीये,” ते म्हणतात.

साधू शेख, वय ५६ यांना शेताच्या जरा बाजूला जागा मिळालीये, बाकीच्या विक्रेत्यांपासून लांब. त्यांनी आपल्या छोट्या शेतातला भाजीपाला आणि कैऱ्या विकायला आणल्या आहेत.

छत म्हणून प्लास्टिकचा कागद नसल्याने, भर उन्हात ५८ वर्षीय सदानंद रॉय उघड्या मैदानात मध्यावर बसून छत्रीच्या सावलीत भाजी विकतायत. ते दिल्लीत घरकामगार म्हणून काम करायचे पण टाळेबंदीच्या काळात गावी परतले. सध्या फक्त भाजी विकून होणारी कमाई हेच काय ते त्यांचं उत्पन्न आहे, यातून त्यांना दिवसाला ५०-१०० रुपये मिळतात. “मी काही रोज इथे येत नाही, कारण कधी कधी विकायला माझ्यापाशी भाजीपालाच नसतो,” ते म्हणतात. “पुढे काय वाढून ठेवलंय, काय माहित.”
अनुवादः मेधा काळे