किमान १३ जणांचा गेल्या दोन वर्षांत जीव गेला आहे, कदाचित १५ जणांचा. अनेक गायी-गुरांचा फडशा पडला आहे. आणि हे सगळं घडलंय यवतमाळ जिल्ह्यातल्या ५० चौरस किमी क्षेत्रात. शेतकरी आत्महत्या आणि कृषी संकटामुळे हा जिल्हा तसाही बदनाम आहेच. गेल्या आठवड्यापर्यंत यवतमाळच्या राळेगावमध्ये एक वाघीण तिच्या दोन पिल्लांसह वावरत होती आणि गावकरी व वन खात्याच्या अधिकाऱ्यांमध्ये खळबळ माजली होती. जवळ जवळ ५० गावांमध्ये शेतीची कामं थंडावली होती. शेतमजूर एकट्याने रानात जायला राजी नव्हते, गेलेच तर गटाने, एकत्र.
“तिचा बंदोबस्त करा,” सगळीकडे एकच मागणी.
वाढता जनक्षोभ आणि लोकांच्या दबावामुळे वन खात्याचे अधिकारी पुरते गांगरून गेले होते. काहीही करून टी १ किंवा अवनी वाघिणीला जेरबंद किंवा ठार करायचं होतं. यातून एक मोठी क्लिष्ट मोहीम सुरू झाली, २०० वन रक्षक, वाघाचा माग काढणारे, निशाणेबाज, महाराष्ट्र वन खात्याचे वरिष्ठ अधिकारी आणि मध्य भारतातले अनेक तज्ज्ञ यात सहभागी झाले. सगळ्यांनी अहोरात्र या भागात तळ ठोकला आणि अखेर २ नोव्हेंबर रोजी टी १ ला मारण्यात आलं आणि ही मोहीम संपली. (पहा, टी १ वाघिणीच्या राज्यातः एका हत्येची चित्तरकथा)
तोपर्यंत, २०१६ पासून आजपर्यंत या वाघिणीने अनेकांचा जीव घेतला आहे. नकळत तिच्या हल्ल्यात बळी पडलेले हे नक्की होते तरी कोण?
*****
एकः सोनाबाई घोसले, वय ७०, पारधी, बोराटी – १ जून २०१६
सोनाबाई टी १ ची पहिली शिकार. १ जून २०१६ रोजी त्या बकऱ्यांसाठी गवत आणायला म्हणून रानात गेल्या. “आलेच जाऊन,” आपल्या आजारी पती, वामनरावांना सांगून सोनाबाई निघाल्या, त्यांचा थोरला मुलगा सुभाष सांगतो. वामनराव आता हयात नाहीत.
त्यांच्यासाठी रोजचंच होतं हे. लवकर उठायचं. घरचं सगळं काम उरकायचं, रानात जायचं आणि हिरवा चारा घेऊन परत यायचं. पण त्या दिवशी सोनाबाई आल्याच नाहीत.
“ते आम्हाला दुपारी म्हटले का ती अजून रानातनं आलीच नाही म्हणून,” सुभाष सांगतात. बोराटीतल्या दोन खोल्यांच्या त्यांच्या घरासमोर गवताने शाकारलेल्या ओसरीत आम्ही बसलो होतो. “मी एका पोराला तिला पहायला पाठवलं, पण ती कुठे दिसतच नाही असं सांगत तो परत आला. तिची पाण्याची बाटली तेवढी होती,” हे ऐकल्यावर सुभाष आणि बाकी एक दोघं रानाकडे निघाले.

बोराटी गावच्या सोनाबाई घोसले, टी १ ची पहिली शिकार, १ जून २०१६. त्यांचा मुलगा सुभाष सांगतो, ‘आम्ही खुणांचा माग काढत गेलो, तर तिचा चिंधड्या झालेला मृतदेह आम्हाला दिसला... हादरून गेलो आम्ही’
कपास, तूर आणि ज्वारीच्या त्यांच्या पाच एकर रानाच्या एका कोपऱ्यात त्यांना जमिनीवर काही तरी ओढत नेल्याच्या खुणा दिसल्या. “आम्ही खुणांचा माग काढत पुढे गेलो तर आमच्या रानापासून ५०० मीटर अंतरावर जंगलामध्ये तिचा घोळसून टाकलेला मृतदेह आम्हाला दिसला,” सुभाष सांगतात. “हादरून गेलो आम्ही.”
टी १ – स्थानिक तिला अवनी म्हणायचे – मार्च २०१६ च्या सुमारास इथे आली असावी असा अंदाज आहे. काहींनी तिला पाहिल्याचं म्हटलं आहे, मात्र सोनाबाईंची शिकार होईपर्यंत आपल्या आसपास वाघ राहत आहे याची फारशी कुणाला कल्पना नव्हती. यवतमाळच्या पश्चिमेला ५० किमीवर असलेल्या टिपेश्वर अभयारण्यातून इथे - राळेगाव तालुक्याच्या मधोमध – ती आली असावी असा कयास आहे. तिचा माग काढणाऱ्यांचं म्हणणं आहे की ती २०१४ च्या सुमारास इथे आली आणि त्यानंतर तिने तिचं बस्तान या भागात बसवलं. डिसेंबर २०१७ मध्ये तिला दोन पिल्लं झाली, एक नर आणि एक मादी.
सोनाबाईच्या कुटुंबाला महाराष्ट्र शासनाकडून १० लाख रुपयांची भरपाई मिळाली आहे.
तेव्हापासून, राळेगाव तालुक्यातल्या अनेकांनी ही
वाघीण शिकार केलेल्या व्यक्तीची मान तोंडात पकडते आणि “कशी रक्ताचा घोट घेते” याची
वर्णनं मला सांगितली आहेत.
*****
दोनः गजानन पवार, वय ४०, कुणबी-इतर मागास वर्गीय, सराटी, २५ ऑगस्ट २०१७
आम्ही पोचलो तेव्हा इंदुकलाबाई पवार घरी एकट्याच होत्या. २५ ऑगस्ट २०१७ रोजी त्यांचा धाकटा मुलगा, ४० वर्षीय गजानन टी १ च्या हल्ल्यात बळी पडला होता. लोणी आणि बोराटीच्या मधे असणाऱ्या जंगलाला लागून असलेल्या सराटी गावातल्या आपल्या रानात गजानन काम करत होते. त्या दिवशी दुपारी वाघिणीने मागून त्यांच्यावर झडप घातली. जंगलात ५०० मीटर आत त्यांचा मृतदेह गावकऱ्यांना सापडला.
“गजाननच्या लहानग्या पोरींचा घोर लागून त्याचे वडील चार महिन्यापूर्वी वारले,” इंदुकलाबाई सांगतात. त्यांची सून, मगंला वर्धा जिल्ह्यातल्या आपल्या माहेरी परत गेलीये. “ती इतकी हादरून गेलीये का वाघिणीला पकडत नाही तोवर परत येणार नाही म्हणते ती,” इंदुकलाबाई सांगतात.

इंदुकलाबाई पवार यांचा मुलगा, गजानन (त्यांच्या हातातल्या तसबिरीत) सराटी गावात ऑगस्ट २०१७ मध्ये टी १च्या हल्ल्यात मारला गेला. त्याचा धसका घेऊन काही महिन्यात त्यांच्या पतीचंही निधन झालं, त्या सांगतात
त्या घटनेपासून सराटीमध्ये गावकरी रात्री गस्त घालतात. गावातल्या काही लोकांनी वन खात्याच्या अवनीला पकडायच्या मोहिमेमध्ये रोजंदारीवर काम धरलं आहे. “कापूस वेचायला मजूरच मिळेना गेलेत, भीतीपोटी कुणी रानात जायलाच तयार होत नाहीयेत,” मराठी दैनिक देशोन्नतीसाठी बातमीदाराचं काम करणारे सराटीचे रवींद्र ठाकरे सांगतात.
इंदुकलाबाईंचा थोरला मुलगा, विष्णू, त्यांच्या कुटुंबाची १५ एकर जमीन कसतो. कपास आणि सोयाबीन आणि रब्बीमध्ये गहू करतो.
आपल्या रानात काम करत असताना मागून वाघिणीने हल्ला केल्यामुळे गजानन एकदम हबकून गेले असणार, त्यांची आई म्हणते. त्या अतिशय संतप्त आणि उद्विग्न झाल्या आहेत. “कुठून तर वाघीण येते, आणि माझा मुलगा हातचा जातो. वन खात्याने तिला मारून टाकायला पाहिजे. तेव्हाच आम्हाला धड जगता येईल.”
*****
तीनः रामाजी शेंद्रे, वय ६८, गोंड गोवारी, लोणी, २७ जानेवारी, २०१८
जानेवारी महिन्यातली बोचरी थंडी असणारी ती संध्याकाळ आठवली तरी आजही कलाबाईंच्या काळजाचा थरकाप उडतो. ७० वर्षीय रामाजींनी नुकतीच रानात शेकोटी पेटवली होती. गव्हाचं उभं पीक रानडुकरं आणि नीलगायींपासून वाचावं म्हणून. रानाच्या दुसऱ्या कडेला कलाबाई कापूस वेचत होत्या. अचानक त्यांना आवाज ऐकू आला, पाहिलं तर वाघीण त्यांच्या नवऱ्यावर मागून झडप घालत होती. झुडपातून अचानक टी १ आली आणि तिने रामाजींची मान तोंडात धरली. क्षणात ते गतप्राण झाले, कलाबाई सांगतात.
रामाजीच रानातलं सगलं पहायचे कारण त्यांची दोन मुलं इतरांच्या रानात मजुरी करायची. “आमचं लगीन झाल्यापासनं एक न् एक दिवस आम्ही रानात एकत्र काम केलंय,” कलाबाई सांगतात. “आमची जिंदगीच होती ती.” आता त्या रानात जात नाहीत, त्या सांगतात. “मला धडकी भरते.”

आपले पती रामाजी यांच्यावर टी १ ने हल्ला केलेला कलाबाईंनी आपल्या डोळ्यांनी पाहिला. त्यांच्या घरी आम्ही गेलो तेव्हा त्या दिवशीचा थरार त्या सांगतात आणि म्हणतात की त्यांना रानात गेलं तर धडकी भरते
त्यांच्या झोपड्यात एका खुर्चीत बसलेल्या कलाबाईंना शब्द सुचत नाहीत. आलेला कढ परतवत, कष्टाने त्या आमच्याशी बोलतात. भिंतीवर त्यांच्या पतीचा फोटो तसबिरीत लावलाय. “मी मदतीसाठी हाका मारायला म्हणून उमाटावर पळत गेले,” त्या सांगतात. रामाजींच्या फोटोकडे पाहून त्या म्हणतात, “आपल्याला असं मरण येईल असं त्यांच्या मनातही आलं नसेल.”
आपला जीव वाचवण्यासाठी कलाबाई उमाटाकडे पळाल्या आणि वाघिणीने रामाजींचा देह रानातून ओढत जंगलात नेला.
बाबाराव वाठोदे, वय ५६, जवळच आपल्या गुरांसह थांबलेले होते. रामाजींची मान टी १ ने तोंडात धरलेली त्यांनी पाहिली, तेव्हा त्यांनी ओरडून तिच्या दिशेने काठी भिरकावली. वाघिणीने त्यांच्याकडे रोखून पाहिलं, शिकार उचलली आणि तिथनं निघून गेली. वाठोडे सांगतात, त्यांनी तिचा पाठलाग केला, पण अचानक एक ट्रक मध्ये आला तेव्हा तिने रामाजींचा देह तिथेच टाकला आणि ती जंगलात गायब झाली.
रामाजींचा मुलगा, नारायण, डोळ्याने अधू आहे. त्याला वन खात्याकडून गस्त घालण्याचं आणि गुरं चरायला नेणाऱ्या गुराख्यांच्या सोबत जाण्याचं काम मिळालं आहे. नारायणचा मोठा मुलगा, सागर, याने शाळा सोडली आहे आणि आता तो वडलांना शेतीच्या कामात आणि वनखात्याच्या वनरक्षक म्हणून मिळालेल्या कामामध्ये मदत करतो. १२ ऑक्टोबर रोजी कलाबाईंना त्यांच्या घरी भेटायला गेलो असता कलाबाईंनी आम्हाला सांगितलं.
*****
चारः गुलाबराव मोकाशे, वय ६५ गोंड आदिवासी, वेडशी, ५ ऑगस्ट २०१८
त्यांचे थोरले भाऊ नथ्थूजी त्यांना जंगलात जास्त आत जाऊ नको म्हणून बजावून सांगत होते, मात्र गुलाबरावांनी त्यांचं बोलणं मनावर घेतलं नाही. दिवस होता, ५ ऑगस्ट.
“काही तरी धोका आहे हे मला जाणवलं, कारण आमच्या गायी एकदम हंबरायला लागल्या. त्यांना कदाचित कसला तरी वास लागला असावा,” वयस्क असलेले नथ्थूजी त्या दिवशी काय घडलं ते त्यांच्या वऱ्हाडी भाषेत सांगत होते.

वेडशी गावात टी १ ने गुलाबराव मोकाशे या साठीच्या शेतकऱ्याला ठार मारलं. त्यांच्या विधवा पत्नी, शकुंतला, थोरले बंधू नथ्थूजी आणि मुलगा किशोर (खुर्चीत बसलेला) त्यांच्यावरच्या हल्ल्याविषयी सांगतायत
काही मिनिटातच त्यांना वाघाच्या गुरकावण्याचा आणि मग त्यांच्या भावावर हल्ला चढवल्याचा आवाज आला. प्रचंड मोठं धूड होतं ते, आणि त्याच्यासमोर गुलाबरावांचं अजिबात काही चाललं नसतं. नथ्थूजी हतबलपणे पाहत राहिले. ते जोरात ओरडले, त्यांनी वाघिणीच्या दिशेने दगड भिरकावले. तिने गुलाबरावांचा देह तिथेच टाकून दिला आणि ती झुडपात गायब झाली. “मी मदत मागायला म्हणून गावात पळालो,” ते सांगतात. “बरेच गावकरी माझ्या बरोबर आले आणि आम्ही माझ्या भावाचा मृतदेह घरी आणला... पुरता घोळसून काढला होता तिने.”
त्या धक्क्यातून आणि भीतीतून नथ्थूजी आजही बाहेर आलेले नाहीत. हे दोघं भाऊ नित्यनेमाने गावातली १०० गुरं जवळच्या जंगलात चारायला घेऊन जात असत – वेडशी गाव राळेगावच्या जंगलात एकदम आत आहे, आणि गेल्या दोन वर्षांपासून टी १ने याच भागावर कब्जा केलेला होता.
ऑगस्ट २०१८ मध्ये टी १ ने तीन जणांना मारलं. सर्वात आधी, गुलाबराव, मग ११ ऑगस्ट रोजी शेजारच्या विहीरगावातल्या एकाला तिने मारलं आणि तिसरा क्रमांक होता २८ ऑगस्ट रोजी पिंपळशेंड्यातल्या एकाचा.
या घटनेनंतर गुलाबरावांचा मुलगा किशोर याला वनखात्याने रु. ९००० प्रति महिना या पगारावर वनरक्षक म्हणून कामावर घेतलं आहे. तो सांगतो की आता गावातले मेंढपाळ आणि गुराखी एकत्र गुरं चारायला घेऊन जातात. “आम्ही आता संगटच राहतो. वाघीण कुठे पण लपलेली असू शकते म्हणून आम्ही जंगलात जास्त आत जात नाही.”
*****
पाचः नागोराव जुनघरे, व ६५, कोलाम आदिवासी, पिंपळशेंडा (ता. कळंब, राळेगाव तालुक्याला लागून) २८ ऑगस्ट २०१८
ते टी १ चे शेवटचे बळी.
जुनघरेंची स्वतःच्या मालकीची पाच एकर जमीन होती आणि ते गुराखी होते. रोज सकाळी ते शेजारच्या जंगलामध्ये गुरं चरायला घेऊन जायचे. त्यांची मुलं स्वतःचं रान कसायची आणि दुसऱ्याच्या रानात मजुरी करायची.
विटा-मातीचं बांधकाम असलेल्या आपल्या घरात बसलेल्या त्यांच्या पत्नी, रेणुकाबाई सांगतात की २८ ऑगस्ट रोजी त्यांच्या गायी घरी परत आल्या आणि जोरजोरात हंबरू लागल्या. पण त्यांचे पती काही परतले नाहीत. “मला वाटलंच, काही तरी अभद्र घडलंय,” त्या सांगतात.

पिंपळशेंड्याचे नागोराव जुनघरे टी१ चे शेवटचे बळी. त्यांच्या विधवा पत्नी रेणुकाबाई सांगतात, ‘त्यांचा मृतदेह शोधायला आम्हाला जरा जरी उशीर झाला असता, तर कदाचित आमच्या हाती काहीच लागलं नसतं...’
त्याच क्षणी गावातले काही जण जुनघरे जिथे गुरं चारायचे, त्या दिशेने धावले. या वेळी देखील त्यांना रानातून काही तरी ओढत नेल्याच्या खुणा दिसल्या आणि एक किलोमीटर अंतरावर जंगलात त्यांचा मृतदेह त्यांना दिसला. “वाघिणीने त्यांच्या गळ्याचा घोट घेतला होता आणि नंतर त्यांना जंगलात ओढून नेलं होतं,” रेणुकाबाई सांगतात. “आम्हाला जरा जरी उशीर झाला असता, तर आमच्या हाती काहीच लागत नव्हतं...”
या घटनेनंतर त्यांचा थोरला मुलगा, कृष्णा याला वन खात्याने गावातल्या गुराखी आणि मेंढपाळांना सोबत करण्यासाठी वनरक्षक या पदावर कामावर घेतलं आहे. त्यांचा धाकटा मुलगा, विष्णू आपल्या गावी किंवा पांढरकवडा-यवतमाळ मार्गावरच्या मोहादा या गावात रोजंदारीवर काम करतो. (पहा, ‘त्यांना घरी परत आलेलं पाहिलं की मी वाघोबाचे आभार मानते’ )
कोलाम लोकांनी भीतीपोटी शेती करणं थांबवलंय. “आता मला माझ्या पोराच्या जीवाचा घोर लागलाय,” रेणुकाबाई म्हणतात. “घरच्यांसाठी म्हणून त्याने हे काम धरलंय, दोन पोरी आहेत त्याच्या. त्या वाघिणीचा बंदोबस्त होत नाही तोपर्यंत तर त्यानं हे काम करू नये.”
हत्तीनेही घेतला एक बळी
अर्चना कुळसंघे, वय ३०, गोंड आदिवासी, चाहंद, ३ ऑक्टोबर २०१८
आपल्या घरासमोरच शेण गोळा करत असताना मृत्यूने तिच्यावर मागून घाला घातला. चाहंदहून ३५ किमीवर असणाऱ्या लोणी गावात वनखात्याच्या अधिकाऱ्यांचा तळ होता. तिथून एक हत्ती साखळदंड तोडून उधळला. तो मागून आला, त्याने अर्चनाला सोंडेत उचललं आणि काही मीटर अंतरावरच्या कपाशीच्या रानात फेकलं. ती जागीच मरण पावली, काय झालं हे कुणाला कळायच्या आतच.

टी १ ला जेरबंद करण्यासाठी आणलेल्या हत्तीच्या हल्ल्यात चाहंद गावची अर्चना कुळसंघे मरण पावली. त्यांच्या घरी, तिचा शोकाकुल नवरा, मोरेश्वर, मुलगा नचिकेत आणि सासू, मंदाबाई
“मी ओसरीत दात घासत होतो, तांबडं फुटायचं होतं,” शेतमजूर असणारा मोरेश्वर सांगतो. त्यांचा पाच वर्षांचा मुलगा नचिकेत त्याला चिकटून उभा होता. “खूप मोठा आवाज आला आणि आमच्या शेजाऱ्याच्या घरामागून एक हत्ती धावत आला आणि आमच्या घरांच्या समोरच्या रस्त्याच्या दिशेने धावत गेला.” अर्चनाला हत्तीने उचलून फेकलेलं तो असहाय्यपणे पाहत उभा राहिला होता.
या हत्तीने शेजारच्या पोहना गावातल्या आणखी एकाला जखमी केलं. तीन दिवसांनी त्या माणसाने प्राण सोडला. त्यानंतर महामार्गावर हत्तीला शांत करून ताब्यात घेण्यात आलं.
मोरेश्वरची आई, मंदाबाई म्हणतात की त्यांची सून मरण पावल्यामुळे त्यांच्या घरावर संकटच कोसळलंय. “माझ्या नातवंडांचं कसं होणार त्याचाच मला घोर लागून राहिलाय,” त्या म्हणतात.
गजराज – चंद्रपूर जिल्ह्यातल्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातून बोलावण्यात आलेला हत्ती – टी १ चा माग काढण्यासाठी बोलावण्यात आलेल्या पाच हत्तींपैकी एक. त्याला वन खात्याने परत पाठवलं. आधीच्या मोहिमांसाठी सहाय्य घेण्यात आलेले चार हत्ती मध्य प्रदेशातून आणण्यात आले होते. मात्र या घटनेनंतर ही मोहीम थोडा काळ थांबवण्यात आली आणि या चार हत्तींनाही परत पाठवण्यात आलं. गजराज का उधळला याची आता वन खात्याकडून चौकशी करण्यात येणार आहे.
*****
टी १ ला ठार मारण्यात आल्यानंतर ज्या गावकऱ्यांना वनरक्षक म्हणून नोकऱ्या देण्यात आल्या होत्या, त्यांचं आता काय होणार याबद्दल कसलीही स्पष्टता नाही. नुकसान भरपाई म्हणून त्यांना रोजंदारीवर इतर कामासाठी वन खातं काम देऊ करेल अशी शक्यता आहे. जे मरण पावले त्यांची कुटुंबं १० लाख रुपये नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहेत. काहींना ती मिळालीये, काहींची कागदपत्रांची प्रक्रिया चालू आहे.
अनुवादः
मेधा
काळे