दिनकर ऐवळेंसाठी यंदाचं वर्ष मुक्यागत गेलंय, कितीक महिने झाले त्यांच्या बासऱ्यांमधून सूरच उमटले नाहीयेत. “या वाद्याचा थेट तोंडाशीच संपर्क येतोय. सध्याच्या करोनाच्या काळात असा स्पर्श झाला तर लागण व्हायचा धोका असतोय,” आपल्या विटा-मातीच्या घरात बसलेले ऐवळे सांगतात.

त्यांच्या बाजूलाच एक लाकडी संदूक आहे जिच्यात चिकार अवाजरं आहेत. मागच्या वर्षीपर्यंत  जशी त्यांची कामाची पद्धत होती त्याप्रमाणे ही अवजारं वापरून पलिकडच्या कोपऱ्यातले वेळूचे शेंडे कोरून त्याची बासरी करण्यासाठी त्यांना तासभरही लागणार नाही.

ते तर दूरच, आम्ही बोलतो होतो तेव्हा ७४ वर्षीय ऐवळेंची नजर त्या निर्जीव बांबूकडे लागून राहिली होती. मार्च २०२० मध्ये टाळेबंदी लागली आणि तेव्हापासून त्यांचं काम पूर्ण ठप्पच झालंय म्हणा ना. त्या आधी पन्नास वर्षांहून अधिक काळ वर्षातले २५०-२७५ दिवस, दिवसाला १० तास – तब्बल दीड लाख तास त्यांनी केवळ आपली कला समृद्ध करण्याच घालवलेत.

वयाच्या १९ व्या वर्षी ऐवळेंनी बासऱ्या बनवायला सुरुवात केली, तेव्हापासून त्यांनी इतका काळ सलग कधीच त्यांचं काम थांबवलेलं नाही. इतकंच नाही गेल्या वर्षभरात महाराष्ट्र आणि कर्नाटकातल्या गावांमध्ये जत्रांमध्ये बासऱ्या विकण्यासाठी शेकडो किलोमीटर पालथे घालतात तेही यंदा नाही. कारण मोठ्या जत्रांना अजूनही परवानगी मिळालेली नाही.

Top left: The flute-makers toolkit with (left-to-right) a hacksaw blade, two types of patli, hatodi, three types of chaku (knives) a cleaning chaku, two varieties of masudichi aari, pakad, two aari for making holes, and the metal rod on top is the gaz. Top right: The tone holes on a flute are made using these sticks which have marks for measurements. Bottom: Dinkar Aiwale has spent over 1.5 lakh hours perfecting his craft and now takes less than an hour to make a flute
PHOTO • Sanket Jain

डावीकडेः बासरी कारागिराची अवजारं (डावीकडून उजवीकडे) कानस, दोन प्रकारची पतली, हातोडी, तीन प्रकारचे चाकू, सफाईचा चाकू, दोन प्रकारच्या मसुदीच्या आऱ्या, पक्कड, भोकं पाडण्यासाठी दोन आऱ्या आणि वरती आडवा ठेवलेला लोखंडी गज. वर उजवीकडेः बासरीवरची स्वरांची छिद्रं पाडण्यासाठी हे मापं असलेले रुळ वापरले जातात. खालीः आजपावेतो बासऱ्या करण्यामध्ये दिनकर ऐवळेंचा किती वेळ गेला हे मोजलं तर ते भरतात दीड लाख तास आणि आता त्यांना बासरी तयार करण्यासाठी तासही लागत नाही

ऐवळे महाराष्ट्राच्या पन्हाळा तालुक्यातल्या कोडोली या २९,००० (जनगणना, २०११) लोकसंख्येच्या गावातले रहिवासी असून ते होलार या अनुसूचित जातीचे आहेत. टाळेबंदी आधी देखील या गावात बासऱ्या बनवणारं त्यांचं एकमेव कुटुंब होतं.

पूर्वीच्या काळी त्यांच्या समाजाची पुरुष मंडळी सनई आणि डफडं वाजवायची, गावोगावी सण-समारंभांमध्ये वाजवायला जायची. त्यांचा एक बँडदेखील होता. १४-१५ वादक असलेल्या या बँडमध्ये दिनकर १९६२ साली, वयाच्या १६ व्या वर्षी आले. आठवीत शाळा सोडल्यानंतर ते त्यांच्या वडलांना, बाबुरावांना साथ करू लागले. नंतरच्या काळात त्यांनी दोन बँडमध्ये वादन केलं, एक त्यांच्या गावातला आणि दुसरा शेजारच्या गावातला. दोघांचं नाव हनुमान.

“माझ्या वडलांसारखं मी देखील क्लॅरिनेट आणि ट्रम्पेट वाजवलं, ३८ वर्षं,” ऐवळे अगदी अभिमानाने सांगतात. आपल्या या वारशाबद्दल सांगताना ते अपार कौतुकाने म्हणतात, “वाजंत्र्याचा मुलगा रडला तरी स्वरातच रडणार.” ते सनई आणि बासरीदेखील तितक्याच सहजपणे वाजवायचे.

पण बँडमध्ये वाजवायचे फार काही पैसे मिळायचे नाहीत. “१४-१५ जणांच्या गटाला मिळून तेव्हा तीन दिवसांच्या कार्यक्रमाचे ६० रुपये मिळायचे,” ते सांगतात. म्हणजे तीन दिवस वाजवून हातात शेवटी ४ रुपये पडायचे. त्यामुळे मग दिनकर भर म्हणून मजुरीला जायचे. तेही पुरत नाही असं झाल्यावर त्यांनी दुसरं काही तरी कौशल्य शिकायचं ठरवलं.

व्हिडिओ पहाः कोल्हापूरच्या कोडोलीतले बासरीचे स्वर

“दुसरा काही पर्यायच नव्हता,” बासऱ्या बनवायला सुरुवात कशी केली त्याबद्दल ते सांगतात. “प्रपंच चालवायचा कसा? मजुरी परवडत नव्हती.” त्या काळी, १९६० च्या सुमारास दहा तास शेतमजुरी केल्यावर त्याचे त्यांना १० आणे मिळायचे. जवळपास २० वर्षं ऐवळेंनी शेजमजुरी केली, “दोन वेळचं जेवण सुटेल” असं काही मिळेपर्यंत.

त्यांच्या समस्यांवरची कळ होती त्यांच्या दिवंगत सासऱ्यांच्या हाती. इथून २० किलोमीटरवर असलेल्या सावर्डे गावात राहणाऱ्या दाजीराम देसाईंनी त्यांना बासऱ्या कशा बनवायच्या ते शिकवलं. ते अधून मधून बँडबरोबर प्रवास करायचे, वाजवायचे. ते काही त्यांनी थांबवलं नाही. (२००० साली त्यांच्या पत्नी ताराबाई यांची बायपास शस्त्रक्रिया झाली आणि त्यांना त्यांची काळजी घेण्यासाठी घरी थांबावं लागलं. तेव्हा कुठे त्यांचा प्रवास थांबला. २०१९ साली ताराबाई निवर्तल्या).

त्यांचा मुलगा, ५२ वर्षीय सुरेंद्र यांनी देखील आपल्या वडलांकडून अतिशय सुरेल बासऱ्या तयार करण्याची कला शिकून घेतलेली आहे. (दिनकर आणि ताराबाईंच्या दोन मुली विवाहित आहेत आणि एकीचं निधन झालं आहे). वयाच्या १३ व्या वर्षी सुरेंद्र बासऱ्या विकू लागले आणि १६ व्या वर्षी आपल्याच वडलांप्रमाणे त्यांनी १० वीत असताना शाळा सोडली आणि ते पूर्ण वेळ काम करायला लागले. “पहिलं, नको वाटायचं, [रस्त्यात बासऱ्या विकायची] लाज वाटायची,” ते सांगतात. “पण पोटाला लाजून चालतंय का?”

गेल्या वर्षी टाळेबंदी लागेपर्यंत सुरेंद्र आपल्या वडलांबरोबर नेमाने बासऱ्या विकण्यासाठी फिरत होते. पार पुणे मुंबईलाही ते जायचे. पण मार्च ते ऑक्टोबर २०२० या काळात त्यांच्याकडची एकही बासरी विकली गेली नाही. एकच ऑर्डर मिळाली ती नोव्हेंबरमध्ये. सांगलीतल्या एका विक्रेत्याला वेगवेगळ्या आकाराच्या (सर्वात मोठी बासरी २.५ फुटाची असते) पाच डझन बासऱ्या हव्या होत्या. त्या सगळ्यांचे मिळून त्यांना १,५०० रुपये मिळाले. विक्री नाही, कमाई नाही अशा त्या काळात मुलांनी, नातवंडांनी पाठवलेल्या पैशावरच त्यांनी दिवस काढलेत.

PHOTO • Sanket Jain
PHOTO • Sanket Jain

दिनकर ऐवळे आपल्या बासऱ्यांसाठी कोल्हापूर जिल्ह्याच्या आजरा आणि चंदगड तालुक्यातल्या बाजारातून उत्तम दर्जाचा बांबू स्वतः निवडून आणतात. उजवीकडेः शेंड्याचा हवा तेवढा लांब तुकडा कापल्यानंतर तो पोकळ करण्यासाठी त्यातून ते झटकन एक लोखंडी रुळ आरपार फिरवतात

नोव्हेंबर महिन्यानंतरही धंद्याला उभारी आलेली नाही. गेल्या साली २१ फेब्रुवारी २०२१ रोजी ते सांगली जिल्ह्यातल्या औंदुंबरे गावातल्या जत्रेत गेले होते, ती त्यांची शेवटची जत्रा. “कुठल्या बी जत्रेत आरामात दोन अडीच ग्रॉस माल जातोय (१ ग्रॉस – १४४ नग),” सुरेंद्र सांगतात. जत्रांसाठी ऐवळे आगाऊ तयारी करून ठेवतात, जादाच्या ५०० बासऱ्या तयार करतात.

दर वर्षी ते महाराष्ट्र आणि कर्नाटकातल्या गावांमधल्या मिळून ७० जत्रांना तरी जात असत. “आम्ही स्टँडला ५० बासऱ्या अडकवतो आणि दिवसभर बासरी वाजवत फिरतो. आमचं संगीत लोकांना आवडलं तरच ते आमच्याकडून बासरी विकत घेणार ना,” दिनकर सांगतात.

आपल्या बासऱ्यांसाठी ऐवळे कोल्हापूर जिल्ह्याच्या आजरा आणि चंदगड तालुक्यातल्या बाजारातून एकदम उत्तम दर्जाचा बांबू स्वतः निवडून घेऊन येतात. सध्या ८-९ फुटाच्या एका शेंड्याला २५ रुपये पडतात. “मी बासऱ्या बनवायला सुरुवात केली तेव्हा, १९६५ साली मी ५० पैसे देत होतो. एका शेंड्यातून ७-८ बासऱ्या बनतात,” ऐवळे सांगतात.

उभ्या बासरीसाठी जेवढी लांबी हवी त्याप्रमाणे बांबूचे तुकडे कापले जातात – ऐवळे १५ वेगवेगळ्या आकाराच्या बासऱ्या करतात. त्यानंतर बांबू आतून पोकळ करून घेण्यासाठी ते झटक्यात एक रुळ आरपार फिरवतात. जरा जरी चूक झाली तरी बासरीचा स्वर बिघडतो आणि चांगल्या दर्जाचं वाद्य तयार होत नाही.

PHOTO • Sanket Jain
PHOTO • Sanket Jain

डावीकडेः फुंकरीच्या छिद्रामध्ये लाकडाचं बूच बसवण्याआधी, बासरीच्या आकाराप्रमाणे ते तासून घ्यावं लागतं. उजवीकडेः फुंकरीच्या छिद्रात बूच ठोकून बसवलं जातंय

बासऱ्या तयार करण्याआधी ऐवळे किलोभर सागापासून छोट्या ठोकळ्यासारख्या खुट्ट्या कापून घेतात. बांबू साफ झाला की सागाची खुट्टी फुंकरीच्या छिद्रात हातोडीने ठोकून बसवली जाते, जेणेकरून फुंकरीची हवा निसटणार नाही.

ऐवळेंच्या पत्नी, ताराबाई देखील बासऱ्या बनवायच्या. खुट्ट्या करण्यात त्या जास्तच माहीर होत्या. “तिची आठवण म्हणून तिनी बनवलेल्या खुट्ट्या मी जपून ठेवल्यात,” पाणावलेल्या डोळ्यांनी ऐवळे सांगतात.

बासरीवरची स्वरछिद्रं करताना मापाच्या खुणा असलेल्या सागाच्या पट्ट्यांचा वापर केला जातो. हे काम अचूक व्हावं यासाठी ऐवळेंकडे अशा १५ प्रकारच्या पट्ट्या आहेत. ते आणि सुरेंद्र कोल्हापूर शहरातल्या कारखान्यांमध्ये जातात जिथे संवादिनी तयार करणारे निष्णात कारागीर त्यांना पट्ट्यांवर खुणा करून देतात.

त्यानंतर पारंपरिक अवजारं वापरून खुणांवर छिद्रं केली जातात. “ड्रिल मशीन वापरली तर अख्खी बासरीच चिरते. त्यामुळे आम्ही कोणतीही यंत्रं वापरत नाही,” ऐवळे सांगतात. बोलत असतानाच ते फुंकरीच्या छिद्रापाशी निगुतीने मसूद कोरतात. “मसूद म्हणजे बासरीचं नाक असल्यासारखं आहे. त्यातून हवा आत बाहेर जाऊ शकते.”

PHOTO • Sanket Jain
PHOTO • Sanket Jain

डावीकडेः मापाची पट्टी आणि बांबूचा तुकडा शेजारी शेजारी ठेवून स्वरछिद्रांच्या खुणा केल्या जातात. उजवीकडेः बासरीवरच्या कच्च्या खुणांच्या जागी तापलेला गज वापरून पक्की छिद्रं केली जातात

त्यानंतर बांबूमध्ये नीट छिद्रं करण्यासाठी ते किमान सहा लोखंडी गज तापवतात. “शक्यतो आम्ही एका वेळी ५० बासऱ्या करायला घेतो. तीन तासात सगळं काम संपतं,” ऐवळे सांगतात. पहाटे ते अंघोळीचं पाणी तापवतात, त्याच चुलीत गज तापायला ठेवतात. “एका फटक्यात दोन्ही कामं उरकतात,” ते म्हणतात.

स्वरांची छिद्रं पाडून झाली की ते सँडपेपरच्या सहाय्याने बासरी गुळगुळीत करतात. आता खुट्टीचा जादाचा तुकडा कापून तो निमुळता केला जातो. यामुळे फुंकरीचं भोक आणि मसुदाच्या मध्ये हवा जाण्यासाठी छोटीशी फट तयार होते.

“बांबूचा प्रत्येक तुकडा आमच्या हातातून किमान पन्नास वेळा जात असेल,” ही सगळी लांबलचक प्रक्रिया ऐवळे सांगतात. “बासरी दिसायला साधी असली तरी बनवणं इतकं काही सोपं नाहीये.”

सुरेंद्रंच्या पत्नी, चाळिशीत असलेल्या सरिता देखील खुणा केलेली छिद्रं गज तापवून मोठी करण्याचं, सागाच्या ठोकळ्याच्या खुट्ट्या करायचं काम करतात. “भगवंतानेच आमच्या हातात ही कला दिलेली आहे,” त्या म्हणतात. “आम्हाला ती शिकाया लागत नाही.”

PHOTO • Sanket Jain
PHOTO • Sanket Jain

डावीकडेः फुंकरीच्या भोकाजवळ मसूद तयार करतायत. उजवीकडेः तापलेला गज वापरून बासरीवर पक्की छिद्रं केली जातात

टाळेबंदीच्या आधी जत्रांमध्ये दिनकर आणि सुरेंद्र मोठ्या बासऱ्या (संगीतकार-वादक वाजवतात त्या) ७०-८० रुपयांना एक आणि छोट्या मुलांसाठीच्या बासऱ्या २०-२५ रुपयांना एक अशा किमतीला विकत होते. गेल्या वर्षापर्यंत विविध आकाराच्या १०-१२ बासऱ्या विकल्या गेल्या तर त्याचे त्यांना ३००-३५० रुपये मिळत होते.

ऐवळे आडव्या बासऱ्या देखील बनवतात. “आम्ही त्याला कृष्णाची मुरली म्हणतो. ती शुभ शकुन मानली जाते त्यामुळे लोक ती घराबाहेर अडकवतात,” ऐवळे सांगतात. “कृष्णाची मुरली १०० रुपयांपर्यंत विकली जाते आणि शहरात तिला खूप जास्त मागणी आहे,” ते सांगतात. बासऱ्यांना मिळणारा भाव पाहिला तर त्यातून त्यांच्या प्रचंड मेहनतीला न्याय मिळत नाही. तरीही “पुरेसा पैसा येतो,” ऐवळे सांगतात, टाळेबंदीच्या आधीच्या दिवसांबद्दल.

गेली पन्नास वर्षं इतकया सुरेख बासऱ्या बनवल्याचा, त्यातल्या बारीक कामाचा ऐवळेंच्या दृष्टीवर परिणाम झाला आहे. काही वर्षांपूर्वी त्यांना मोतीबिंदू निघाला. २०११ आणि २०१४ साली त्यांच्या दोन शस्त्रक्रिया झाल्या. “आता मला स्पष्ट दिसाया लागलंय,” ते म्हणतात. “पण या कामामुळे पाठदुखी देखील होते.”

त्यांना जर कुणी विचारलं की ‘संपूर्ण आयुष्य तुम्ही काय केलं?’ तर दिनकर ऐवळे म्हणतात, “मी त्यांना अभिमानाने सांगू शकेन की केवळ या बासऱ्यांच्या जोरावर माझी सगली मुलंबाळं आणि नातवंडं शिकू शकली, प्रगती करू शकली. मी त्यांना मार्गस्थ करू शकलो. हे सारं या कलेमुळेच घडलंय.”

PHOTO • Sanket Jain

वर डावीकडेः ऐवळेंनी बासरीवर पाडलेली पक्की छिद्रं. जरा जरी चूक झाली तरी बासरीचा दर्जा बिघडतो, ती बेसुरी होते. वर उजवीकडेः बासरीच्या नाकाप्रमाणे काम करणारं मसूद निगुतीने कोरलं जातं. खाली डावीकडेः सुरेंद्र ऐवळे, वय ५२ बासरी बनवतात, वाजवतात आणि ही कला जिवंत ठेवणारे ऐवळेंच्या घराण्याच्या शेवटच्या पिढीचे सदस्य आहेत. खाली उजवीकडेः दिनकर आणि ताराबाईंची जुनी तसबीर

२००० सालापासून ऐवळे इतरांना बासरी वाजवायला शिकवू लागले. आणि आता कोडोलीमध्ये ते ‘मास्तर’ म्हणून ओळखले जातात. त्यांच्या शिष्यांमध्ये – आतापर्यंत ५० तरी असतील असा त्यांचा अंदाज आहे – आसपासच्या गावातल्या आणि शहरांतल्या डॉक्टर, शिक्षक, शेतकरी, उद्योगपतींचा समावेश आहे. या शिकवणीसाठी ते कसलीही फी घेत नाहीत. “लोकांनी माझं नाव जरी लक्षात ठेवलं ना, तितकंच खूप आहे,” ते म्हणतात.

टाळेबंदी लागल्यावर जो काही गोंधळ उडाला त्याचा ऐवळेंच्या धंद्याला चांगलाच फटका बसलाय. तरीही त्यांना पूर्ण विश्वास आहे की बासरीसाठी कायमच चांगली मागणी राहणार आहे. पण ते हेही जाणतात की तरुण पिढीच्या आकांक्षा फार वेगळ्या आहेत आणि फार थोड्या लोकांना बासरी कशी करायची ते शिकायची इच्छा आहे. “तुम्हाला पुरेसा पैसा मिळू शकतो, पण इतके कष्ट कुणाला करायचेत? ज्याला आवड त्याला सवड. इच्छेचा प्रश्न आहे,” ते म्हणतात.

आज वयाच्या ७४ व्या वर्षी देखील दिनकर यांची इच्छा प्रबळ आहे. आजही बासरी तयार करणं थांबलेलं नाही, मात्र बासरी वाजवताना थोडा दम लागायला लागलाय. “मी आहे तोपर्यंत हे [बासरी बनवण्याची आणि वाजवण्याची कला] आहे,” ते म्हणतात.

अनुवादः मेधा काळे

Sanket Jain

Sanket Jain is a journalist based in Kolhapur, Maharashtra. He is a 2022 PARI Senior Fellow and a 2019 PARI Fellow.

Other stories by Sanket Jain
Translator : Medha Kale
mimedha@gmail.com

Medha Kale is based in Pune and has worked in the field of women and health. She is the Translations Editor, Marathi, at the People’s Archive of Rural India.

Other stories by Medha Kale