४ मे रोजी हरिंदर सिंग यांनी त्यांच्या साथीदाराला, पप्पूला शेवटचे दोन मृतदेह दहन करण्यासाठी तयार करायला सांगितलं. त्यांचे साथीदार एकदम चकित का व्हावेत, त्यांना कळालं नाही. त्यांनी वापरलेले शब्दच चकित करणारे होते.

“दो लौंडे लेटे हुए हैं,” ते म्हणाले होते. सुरुवातीला वाटलेलं आश्चर्य सरल्यावर त्यांच्या साथीदारांना कळालं की हरिंदर अगदी सहज बोलून गेले होते पण थोडं हसू आलंच. निगम बोध या दिल्लीच्या सर्वात जास्त गर्दी असलेल्या स्मशानभूमीत काम करणाऱ्या या कामगारांच्या रोजच्या धबडग्यात असे विसाव्याचे क्षण दुर्मिळच.

पण मला त्या शब्दांमागचा अर्थ समजावून सांगायला पाहिजे असं हरिंदर यांना वाटलं असावं. स्मशानभूमीच्या दाहिन्यांशेजारी एका छोट्याशा खोलीत आपल्या सहकाऱ्यांबरोबर रात्रीचं जेवण करत  असलेल्या हरिंदर यांनी एक खोल श्वास घेतला आणि ते म्हणाले, “तुम्ही त्यांना मृतदेह म्हणता. आम्ही म्हणतो पोरं.” कोविडच्या नरकासम असलेल्या या महासाथीत त्यांचा हरिंदर यांचा श्वास थांबलेला नाही हे नशीब म्हणण्याची गत आहे.

“इथे येणारी प्रत्येक व्यक्ती कुणाचा तरी मुलगा, मुलगी असतेच, माझ्या लेकरांसारखी,” पप्पू म्हणतो. “त्यांना दाहिन्यांमध्ये लोटताना वेदना होतात. पण त्यांच्या आत्म्याखातर आम्हाला हे करावं लागतं, हो ना?” निगम बोधमध्ये जवळपास एक महिनाभर दररोज २०० मृतदेह सीएनजी किंवा सरणावर दहनासाठी येत होते.

त्या दिवशी, ४ मे रोजी निगम बोध घाटावरच्या सीएनजी दाहिन्यांमध्ये ३५ देह लोटले गेले होते. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात कोविडच्या दुसऱ्या लाटेचा विळखा दिल्लीला बसला तेव्हा रोजची सरासरी ४५-५० इतकी होती. महामारीच्या अगोदर मात्र या स्मशामभूमीत महिन्याला १०० मृतदेहांचं दहन केलं जात होतं.

दिल्लीच्या कश्मीर गेटपाशी यमुना नदीच्या तीरावर असलेल्या या घाटाच्या प्रवेशद्वारापाशी भिंतीवर एक भव्य शिल्प आहे.  त्यावर लिहिलंयः “मला इथे आणल्याबद्दल आभारी आहे. इथून पुढचा प्रवास मला एकट्यानेच करायचा आहे.” या वर्षीच्या एप्रिल-मे महिन्यात जेव्हा देशाच्या राजधानीला कोविड-१९ चा विळखा पडला तेव्हा गेलेले हे जीव मात्र एकटे नव्हते – पैलतीरावर जाताना त्यांच्यासोबत चार पावलं चालणारे दोस्त त्यांना मिळाले होते.

Left: New spots created for pyres at Nigam Bodh Ghat on the banks of the Yamuna in Delhi. Right: Smoke rising from chimneys of the CNG furnaces
PHOTO • Amir Malik
Left: New spots created for pyres at Nigam Bodh Ghat on the banks of the Yamuna in Delhi. Right: Smoke rising from chimneys of the CNG furnaces
PHOTO • Amir Malik

डावीकडेः दिल्लीमध्ये यमुनेच्या तीरावर असलेल्या निगम बोध घाटावर सरणासाठी नवीन जागा तायर करण्यात आल्या आहेत. उजवीकडेः सीएनजीवर चालणाऱ्या दाहिन्यांच्या धुराड्यातून येणारे धुराचे लोट

आत प्रवेश केला तर सरणावर जळत असलेले मृतदेह आणि यमुनेच्या प्रदूषित पाण्याचा दुर्गंध हवेत साचून राहिला होता. दुहेरी मास्क पार करून नाकाला झोंबत होता. नदीच्या तीरावर किमान २५ तरी चिता पेटल्या होत्या. नदीकाठाला जाणाऱ्या अरुंद बोळाच्या दोन्ही बाजूला देखील सरणं रचलेली दिसत होती – उजव्या हाताला पाच आणि डाव्या हाताला तीन. दहनासाठी थांबलेल्या मृतदेहांची रांग लागलेली होती.

आवारातला एक भाग सपाट करून तिथे एक तात्पुरतं स्मशान सुरू करण्यात आलं होतं. २१ चिता पेटल्यानंतरही जागा कमी पडत होती. मध्यभागी असलेल्या एका छोट्या झाडाची पालवी पेटत्या चितांच्या ज्वाळांनी करपून गेली होती. काफ्काच्या कथांमधल्या निर्मम दलदलीत आज देश ढकलला गेलाय, त्याचं प्रतीक भासत होती ती पालवी.

इथल्या कामगारांनाही हे कळत होतं. ते ज्या सीएनजी दाहिन्या असलेल्या सभागृहांमध्ये काम करत होते तिथे बाकी लोकही होते, इथे तिथे जाणारे, रडणारे, गेलेल्यांचं दुःख करणारे आणि त्यांच्या आत्म्याला सद्गती मिळावी यासाठी प्रार्थना करणारे. मिणमिणत्या ट्यबूलाइटमध्ये प्रकाशछायेचा खेळ सुरू असलेल्या प्रतीक्षाकक्षांचा वापर क्वचितच होत होता.

यातल्या सहा दाहिन्यांपैकी “निम्म्या गेल्या वर्षी [२०२०] बसवल्या आहेत, करोनारुग्णांच्या मृतदेहांची रांग लागायला लागली, त्यानंतर,” पप्पू सांगतात. कोविड-१९ ची साथ पसरल्यानंतर सीएनजी दाहिन्यांचा वापर केवळ करोनारुग्णांच्या दहनासाठी केला जाऊ लागला.

दहनासाठी जागा झाली की मृत व्यक्तीचे नातेवाईक, रुग्णालयाचे कर्मचारी किंवा स्मशानभूमीतले कर्मचारी देह दाहिनीपाशी घेऊन येतात. काही मृतदेह पांढऱ्या कापडात लपेटलेले आहेत – इतरांपेक्षा ते नशीबवानच म्हणायचे. काही प्लास्टिकच्या पांढऱ्या पिशव्यांमध्ये बांधलेले, रुग्णवाहिकेतून थेट दाहिनीपाशी आणले जात होते. काही स्ट्रेचरवरून आत आणले गेले काही खांद्यावर किंवा हातात.

त्यानंतर स्मशानभूमीतले कर्मचारी मृतदेह चाकांच्या एका सरकत्या फळीवर ठेवतात जो तिथून दाहिनीत सरकवला जातो. यानंतरची कृती मात्र झटक्यात करावी लागते. मृतदेह दाहिनीत गेला की क्षणात ती फळी ओढून घ्यायची आणि दाहिनीचं दार बंद करून कड्या लावायच्या. पाणावल्या डोळ्यांनी लोक आपल्या जिवलगाची रवानगी दाहिनीत होताना पाहतायत आणि दाहिनीच्या धुराड्यातून काळ्या धुराचे लोट बाहेर पडतायत.

Left: A body being prepared for the funeral pyre. Right: Water from the Ganga being sprinkled on the body of a person who died from Covid-19
PHOTO • Amir Malik
Left: A body being prepared for the funeral pyre. Right: Water from the Ganga being sprinkled on the body of a person who died from Covid-19
PHOTO • Amir Malik

डावीकडेः सरणावर ठेवण्यासाठी मृतदेह तयार केला जातोय. उजवीकडेः कोविड-१९ मुळे मरण पावलेल्या एका व्यक्तीच्या मुखात गंगाजलाचे शेवटचे थेंब टाकले जातायत

“रोज पहिलं शव पूर्ण जळायला दोन तास तरी लागतात,” पप्पू मला सांगत होते. “दाहिनी तापायला वेळ लागतो ना. त्यानंतरच्या प्रत्येकाला दीड तास पुरतात.” प्रत्येक दाहिनीत एका दिवसात ७ ते ९ देहांचं दहन करता येतं.

निगम बोध घाटावरच्या दाहिन्यांचं सगळं काम हे चार जण पाहतात. हे चौघंही उत्तर प्रदेशातल्या कोरी या दलित समाजाचे आहेत. यांच्यातले सर्वात ज्येष्ठ आहेत हरिंदर, वय ५५. ते मूळचे उत्तर प्रदेशातल्या बलियाचे आहेत. २००४ सालापासून ते इथे काम करतायत. २०११ साली इथे आलेले पप्पू, वय ३९ काशीराम नगर जिल्ह्यातल्या सोरोन तालुक्याचे आहेत. बाकी दोघं नुकतेच कामाला लागलेत. ३७ वर्षीय राजू मोहन देखील सोरोनचे आहेत आणि २८ वर्षीय राकेश गोंडा जिल्ह्यातल्या भुवन मदार माझा गावचा रहिवासी आहे.

एप्रिल आणि मे महिन्यात रोज हे सगळे प्रत्येकी १५-१७ तास काम करत होते – सकाळी ९ ते मध्यरात्रीपर्यंत. कामाचा ताण इतका होता की जीव धोक्यात होते. विषाणूपासून एक वेळ बचाव करता आला असता पण ८४० अंश सेल्सियस इतक्या उष्णतेत त्यांचं शरीर पार वितळून गेलं असतं. “रात्री भट्टी बंद केली आणि त्यानंतर आत मृतदेह ठेवला तर सकाळी फक्त राख राहिलेली असायची,” हरिंदर सांगतात.

आणि अशा परिस्थितीत ते कसलीही सुटी न घेता काम करतायत. “सुट्टीचा प्रश्नच नाहीये. साधा चहा किंवा पाणी प्यायला सुद्धा वेळ मिळत नाही तर?” पप्पू म्हणतात. “एक दोन तास जरी आम्ही इथून कुठे गेलो तर इथे नुसता गोंधळ उडेल.”

इतकं असूनही त्यांच्यापैकी कुणीही कायमस्वरुपी नोकरीत नाही. निगम बोध घाट महानगरपालिकेची स्मशानभूमी असून बडी पंचायत वैश्य बीसे अगरवाल (लोकांच्या बोलण्यात 'संस्था' म्हणून प्रसिद्ध) या धर्मादाय संस्थेतर्फे तिचं काम पाहिलं जातं.

संस्था हरिंदर यांना महिन्याला १६,००० रुपये देते. म्हणजेच दिवसाला ५३३ रुपये. एका दिवसात आठ देहांचं दहन केलं तर प्रत्येकाचे ६६ रुपये. पप्पू यांना महिन्याला रु. १२,००० तर राजू मोहन आणि राकेश यांना प्रत्येकी ८,००० रुपये मिळतात. “संस्थेने आमचा पगार वाढवायचं कबूल केलं होतं. किती ते काही सांगितलं नाही,” हरिंदर सांगतात.

Left: Harinder Singh. Right: The cremation workers share a light moment while having dinner in a same room near the furnace
PHOTO • Amir Malik
Left: Harinder Singh. Right: The cremation workers share a light moment while having dinner in a same room near the furnace
PHOTO • Amir Malik

डावीकडेः हरिंदर सिंग. उजवीकडेः राजू मोहन, हरिंदर, राकेश आणि पप्पू दाहिन्यांच्या शेजारच्या खोलीत जेवण करतायत, क्षणभर विश्रांती

दहनासाठी रु. १,५०० शुल्क घेणाऱ्या (महामारीच्या आधी रु. १,०००) या संस्थेच्या मनात पगारवाढीचा विषय नाहीसं दिसतं. संस्थेचे जनरल सेक्रेटरी सुमन गुप्ता म्हणतातः “आम्ही जर त्यांचा पगार वाढवला तर आम्हाला वर्षभर त्यांना तेवढी रक्कम द्यायला लागेल.” त्यांना “भत्ता” दिला जात असल्याचं ते पुढे सांगतात.

रात्रीचं जेवण सुरू आहे ती खोली म्हणजे भत्ता असं त्यांना म्हणायचं नसावं म्हणजे झालं. दाहिन्यांपासून फक्त पाच मीटरवर असणारी ही खोली उन्हाळ्यात भट्टी बनते. म्हणूनच पप्पू यांनी बाहेर जाऊन सगळ्यांसाठी थंड पेयं आणली. त्यावर ५० रुपयांपेक्षा जास्त खर्च आला. त्या दिवशी दहन केलेल्या एका देहाच्या शुल्काहून जास्तच.

पप्पू नंतर मला सांगतात की एक देह दहन करण्यासाठी जवळपास १४ किलो सीएनजी लागतो. “दिवसातला पहिला मृतदेह जळण्यासाठी आपल्या स्वयंपाकघरात असतात तसले दोन सिलिंडर गॅस लागतो. त्यानंतरच्या मृतदेहांना कमी – एक किंवा दीड सिलिंडरमध्ये काम होतं.” एप्रिल महिन्यात निगम बोध घाटावरच्या सीएनजी दाहिन्यांमध्ये ५४३ देहांचं दहन करण्यात आलं, गुप्ता सांगतात. आणि त्या महिन्याचं संस्थेचं सीएनजीचं बिल होतं रु. ३,२६,९६० फक्त.

दहनाची प्रक्रिया जास्त वेगाने व्हावी यासाठी हे कामगार भट्टीचं दार उघडतात आणि लांब काठीच्या मदतीने मृतदेह भट्टीत अगदी आत ढकलतात. “तसं जर केलं नाही ना, तर एक मृतदेह संपूर्ण जळून राख व्हायला २-३ तास लागतील,” हरिंदर सांगतात. “सीएनजीची बचत करायची तर आम्हाला पटपट काम उरकायला लागतं. नाही तर संस्थेचंच नुकसान होईल.”

संस्थेचा खर्च वाचावा म्हणून हे चौघं झटत असले तरी संस्थेने मात्र गेल्या दोन वर्षांपासून त्यांचा पगार वाढवलेला नाही. “आता तर आम्ही करोनारुग्णांचं दहन करतोय, आमचा जीव धोक्यात घालून,” पप्पू म्हणतात. पगार वाढवला नाहीये याबद्दल ते नाराज आहेत. “आम्हाला सांगितलं जातं, ‘संस्था देणग्यांवर चालते, त्यामुळे काय करणार?’” हरिंदर सांगतात. खरंच त्यांच्यासाठी अक्षरशः काहीही केलेलं नाहीये.

Pappu (left) cuts bamboo into pieces (right) to set up a pyre inside the CNG furnace
PHOTO • Amir Malik
Pappu (left) cuts bamboo into pieces (right) to set up a pyre inside the CNG furnace
PHOTO • Amir Malik

पप्पू २०११ पासून निगम बोध घाटावर काम करतायत. सीएनजी दाहिनी पेटवण्यासाठी बांबूची कांडकं करणं हे त्यांच्या अनेक कामांपैकी एक

त्यांचं तर लसीकरण देखील पूर्ण झालेलं नाहीये. या वर्षी सुरुवातीला आघाडीच्या कर्मचाऱ्यांचं लसीकरण सुरू होतं तेव्हा हरिंदर आणि पप्पू यांना लशीचा पहिला डोस मिळाला. “दुसरा डोस घ्यायला जाणंच होत नाहीये कारण वेळच नाहीये. इथे स्मशानभूमीतच सगळा वेळ चाललाय,” पप्पू म्हणतात. “आणि जेव्हा मला फोन आला तेव्हा मी लसीकरण केंद्रातल्यांना सांगितलं की माझा डोस दुसऱ्या कुणाला तरी द्या म्हणून.”

त्याच दिवशी सकाळी दाहिनीच्या शेजारच्या कचरापेटीवर आदल्या दिवशी आलेल्या लोकांनी पीपीइ किट तशीच टाकून दिली होती. खरं तर बाहेरच्या बाजूला असलेल्या मोठ्या कचरापेटीत त्याची विल्हेवाट लावण्याच्या सूचना आलेल्यांना दिलेल्या असतात. तरी अनेकांनी तिथे हॉलमध्येच त्यांची पीपीइ किट टाकून दिली होती. पप्पूंनी काठीने ती तिथनं काढली आणि बाहेर नेली. त्यांनी स्वतः मात्र पीपीइ किट घातलं नव्हतं किंवा त्यांच्या हातात साधे हातमोजे देखील नव्हते.

दाहिन्यांपाशी असह्य उष्णता असते, त्यामुळे पीपीइ किट घालणं शक्यच नाही, पप्पू सांगतात. “शिवाय पीपीइ किट पेट घेण्याची शक्यता जास्त असते. दाहिनीत जेव्हा पोट जळतं ना तेव्हा आगीच्या ज्वाळा कधी कधी दाराबाहेरही येतात. पीपीइ किट काढणं अवघड होऊ शकतं. जीवच जायचा,” ते सांगतात. हरिंदर म्हणतात, “ते किट घातलं तर माझा श्वास घुसमटतो. मला काही मरणाची घाई झालेली नाहीये, काय?”

त्यांच्याकडचं एकमेव संरक्षक साहित्य म्हणजे मास्क. तोही अनेक दिवसांपासून वापरात असलेला. “आम्हाला विषाणूची लागण होईल याचीच काळजी असते. पण हे असं संकट आहे ज्याकडे दुर्लक्ष करणं शक्य नाही,” पप्पू सांगतात. “लोक आधीच दुःखात आहेत, आम्ही त्यांच्या वेदनेत भर घालू इच्छीत नाही.”

त्यांना फक्त तितकाच धोका नाहीये. एकदा एकाचं दहन करत असताना पप्पूंचा डाव हात इतका जबरदस्त पोळला की त्याचा व्रण अजूनही राहिलाय. “मला लगेच लक्षात आलं होतं, दुखलं पण होतं. पण करणार काय?” माझी गाठ पडली त्याच्या एक तास आधीच हरिंदर यांना दुखापत झाली होती. “मी दरवाजा बंद करत होतो तेव्हा गुडघा दुखावलाय,” ते सांगतात.

Left: The dead body of a Covid-positive patient resting on a stretcher in the crematorium premises. Right: A body burning on an open pyre at Nigam Bodh Ghat
PHOTO • Amir Malik
Left: The dead body of a Covid-positive patient resting on a stretcher in the crematorium premises. Right: A body burning on an open pyre at Nigam Bodh Ghat
PHOTO • Amir Malik

डावीकडेः स्माशानभूमीच्या आवारात करोनारुग्णाचा मृतदेह स्ट्रेचरवर पडून आहे. उजवीकडेः निगम बोध घाटावर सरण पेटलंय

“भट्टीच्या दाराचा दांडा तुटला होता. बांबू अडकवून आम्ही दुरुस्त केलाय,” राजू मोहन सांगतात. “आम्ही आमच्या सुपरवायजरला तो दुरुस्त करून घ्यायला सांगितलं. तो म्हणाला, ‘लॉकडाउन सुरू असताना कसं काय दुरुस्त करणार?’ कुणी काही करणार नाही, आम्हाला माहितीये ना,” हरिंदर म्हणतात.

साधी प्रथमोपचाराची पेटी देखील उपलब्ध नाहीये.

आता तर नवीनच संकट निर्माण झालंय. मृतदेह दाहिनीत पाठवण्याआधी मृताचे नातेवाईक पाणी आणि तूप ओततात, त्यामुळे घसरून पडण्याचा धोका निर्माण झालाय. “याला परवानगीच नाहीये. एक तर स्वच्छतेच्या दृष्टीकोणातून आणि ते धोक्याचंही आहे. पण लोक सूचना ऐकतच नाहीत,” दिल्ली मनपाचे अधिकारी अमर सिंग सांगतात. महामारीच्या काळात निगम बोध घाटाचं काम बघण्यासाठी दिल्ली मनपाच्या सात अधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे, त्यातले ते एक.

रात्री आठ वाजण्याआधी आलेल्या मृतदेहांचं त्याच दिवशी दहन करण्यात येतं, सिंग सांगतात. त्यानंतर येणाऱ्यांना दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत थांबावं लागतं. तिथे तेव्हा कुणीही नसतं. त्यामुळे रात्रभर थांबण्यासाठी रुग्णवाहिका जास्त शुल्क घ्यायला लागल्या, ते म्हणतात. “त्यामुळे यावर तातडीचा एकच उपाय आहे, अहोरात्र दाहिन्या सुरू ठेवायला पाहिजेत.”

पण हे शक्य होतं का? “का नाही?” सिंग म्हणतात. “तुम्ही तंदूरमध्ये चिकन भाजता तेव्हा तंदूरला काही तरी होतं का? इथल्या भट्ट्या २४ तास चालू शकतात. पण संस्था परवानगी देत नाहीये.” पप्पूंना मात्र हे पटत नाही. “यंत्राला सुद्धा, माणसाप्रमाणे, थोडा वेळ तरी विश्रांती पाहिजेच.”

सिंग आणि पप्पू दोघांनाही मान्य आहे की स्मशानभूमीवर कामगारांची संख्या अपुरी आहे. “आधीच खूप ताण आहे, त्यांच्यापैकी एकालाही काही झालंच तर सगळं कामच ठप्प होईल,” सिंग सांगतात. ते हेही सांगतात की या कर्मचाऱ्यांचा विमा काढलेला नाही. पप्पू जरा वेगळा विचार करतात. “माझ्यासारखे आणि हरिंदरसारखे अजून कामगार असले तर काम जरा सुरळीत होईल आणि आम्हालाही थोडी विश्रांती मिळेल,” ते म्हणतात.

Left: The large mural at the entrance of Nigam Bodh Ghat. Right: A garland of marigold flowers and dried bananas left on the ashes after cremation
PHOTO • Amir Malik
Left: The large mural at the entrance of Nigam Bodh Ghat. Right: A garland of marigold flowers and dried bananas left on the ashes after cremation
PHOTO • Amir Malik

डावीकडेः निगम बोध घाटाच्या प्रवेशद्वारापाशी असलेलं भव्य शिल्प. उजवीकडेः दहन झाल्यानंतर राहिलेल्या राखेवर वाहिलेला झेंडूचा हार आणि सुकलेली केळी

गुप्तांना मी विचारलं की त्यांच्यापैकी कुणाला काही झालं तर कसं. ते शांतपणे म्हणाले, “उरलेले तिघं आहेत काम करायला. किंवा मग बाहेरून कामगार आणावे लागतील.” कर्मचाऱ्यांना भत्ता मिळतोय, ते म्हणतात. “आम्ही त्यांना खायलाही घालत नाही, असं काही नाहीये. आम्ही त्यांना जेऊ घालतो. औषधं, सॅनिटायझर, सगळं पुरवतो.”

त्याच दिवशी संध्याकाळी हरिंदर आणि त्यांचे सहकारी शेजारच्या छोट्याशा खोलीत जेवायला बसले होते. दाहिनी पेटत्या शरीरातून ज्वाळा बाहेर फेकत होती. या कामगारांनी स्वतःसाठी थोडी व्हिस्की ओतून घेतली होती. “आम्हाला [दारू] प्यावीच लागते. त्याशिवाय आमचा निभावच लागणार नाही,” हरिंदर सांगतात.

महामारीच्या आधी दिवसातून व्हिस्कीचे तीन पेग [एक पेग ६० मिली] पुरायचे. पण आता मात्र ते म्हणून दिवसभर प्यायलेले असतात, तरच हातून काम होतं. “सकाळी एक क्वार्टर [१८० मिली], दुपारी जेवताना एक, संध्याकाळी एक आणि रात्रीच्या जेवणासोबत एक. कधी कधी तर घरी गेल्यावर सुद्धा आम्ही थोडी घेतो,” पप्पू सांगतात. “एक बरं आहे, संस्था आम्हाला [दारू पिण्यापासून] अडवत नाही. उलट ते एक पाऊल पुढे आहेत. आम्हाला रोज दारू पुरवतात,” हरिंदर सांगतात.

मेलेल्या माणसाचं दहन करण्याचं दुःख आणि कष्ट या दोन्हीपासून या मुक्तीदात्यांना थोडा दिलासा मिळतो तो दारूतून. “ते मरण पावलेत, आणि इथलं कष्टाचं थकवणारं काम करून आम्हीही,” हरिंदर म्हणतात. “मी एक पेग घेतो आणि त्या देहाकडे पाहतो तेव्हा मी भानावर येतो,” पप्पू सांगतात. “आणि कधी कधी जेव्हा इथला धूर आणि धुरळा घशात जातो ना तेव्हा तो दारूच्या घोटाबरोबर घशाखाली जातो.”

क्षणभराची विश्रांती संपते. पप्पूंकडे त्या 'दोन पोरांचं' काम असतं. “आम्हाला पण रडू येतं. डोळे भरून येतात. नक्कीच येतात,” गहिवरून, पाणावल्या डोळ्यांनी ते म्हणतात. “पण आम्हाला मन घट्ट करावं लागतं, त्याची जपणूक आमच्याच हातात आहे.”

Amir Malik

Amir Malik is an independent journalist, and a 2022 PARI Fellow.

Other stories by Amir Malik
Translator : Medha Kale
mimedha@gmail.com

Medha Kale is based in Pune and has worked in the field of women and health. She is the Translations Editor, Marathi, at the People’s Archive of Rural India.

Other stories by Medha Kale