त्यांच्या हसण्यामुळे आमचं लक्ष वेधलं गेलं. काही मुली दोरीवर उड्या मारत होत्या, बरीच मुलं क्रिकेटमध्ये रमली होती, काही पळत होती तर काही नुसतीच कडेला त्यांच्या सवंगड्यांना मोठ्या मैदानावर खेळताना पाहत एकट्याने उभी होती.

पुणे जिल्ह्याच्या दौंडमध्ये पारीच्या जात्यावरच्या ओव्या प्रकल्पासाठीचं आमचं ध्वनीमुद्रण, चित्रीकरण नुकतंच संपलं होतं, तितक्यात मलठणच्या येवले वस्तीवरच्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांच्या हसण्याने आमचं लक्षं वेधून घेतलं.

मैदानात क्रिकेटचा सामना रंगात आला होता, फलंदाजानं कॅमेरा वगैरे जामानिमा घेऊन त्याच्या दिशेने येणाऱ्या आमच्या ताफ्याकडे एकदा पाहिलं आणि परत आपलं लक्ष गोलंदाजाकडे वळवलं आणि जोरदार फटका मारला. फिल्डर्स चेंडूच्या मागे धावले.

काही मुली आमच्याभोवती गोळा झाल्या. त्यांना थोडी गळ घातल्यावर त्या गाणं म्हणायला तयार झाल्या. मात्र सुरुवातीला त्या थोड्या लाजत होत्या. एकमेकींकडे बघत त्यांनी गाणं नीट येतंय ना याची खातरजमा केली. पारी टिमच्या जितेंद्र मैड यांनी मुलांना एका गोलात उभं केलं आणि त्यांना गाणं आणि नाच असणारा एक खेळ शिकवायला सुरुवात केली. सगळे त्याच्या मागोमाग एकेक ओळ म्हणू लागले आणि त्यांनी केलेली क्रिया करू लागले.

व्हिडिओ पहाः ‘चल मेरी गुडिया, तुझे गिनती सिखाउंगी,’ पुणे जिल्ह्याच्या दौंड तालुक्यातल्या येवले वस्तीवरच्या जि.प. शाळेच्या मुलींचं गाणं

“शाळेचे सगळे तास झाले की आम्ही त्यांना तासभर खेळू देतो,” त्यांच्या शिक्षिका सुनंदा जगदाळे सांगतात. शाळेचे मुख्याध्यापक संदीप रसाळ आम्हाला त्यांचं ऑफिस आणि वर्ग दाखवतात. “आमच्याकडे एक संगणकदेखील आहे आणि नुकतंच आम्ही शाळेचं नूतनीकरण आणि रंगाचं काम काढलंय, तुम्हाला जमेल तशी मदत करा आम्हाला,” ते आम्हाला सांगतात आणि जवळच्या शेडमध्ये घेऊन जातात. हे त्यांचं ‘मॉडर्न’ स्वयंपाकघर. ते खूपच नीट लावलेलं आहे, धान्य पोत्यात नाही तर पत्र्याच्या कोठ्यांमध्ये भरून ठेवलंय. इथेच ते पोषक आहार बनवतात.

शाळेत ६ ते १० वयोगटातले एकूण ४३ विद्यार्थी आहेत – २१ मुली आणि २२ मुलं. पहिली ते चौथीच्या प्रत्येक वर्गात सरासरी १० विद्यार्थी आहेत. बहुतेक जण मलठणचेच आहेत तर काही शेजारच्या मुगावचे. “मलठणमध्येच माध्यमिक शाळा आहे, तिथे दहावीपर्यंत वर्ग आहेत. या शाळेतून उत्तीर्ण झाल्यावर बहुतेक विद्यार्थी त्याच शाळेत जातील,” रसाळ आम्हाला सांगतात.

नव्या वर्गखोलीचं काम चालू आहे. सध्या सगळा पसारा पडला आहे, रंगाचे डबे जमिनीवरच आहेत. दूर कोपऱ्यात एक लहानगं बाळ साडीच्या झोळीत गाढ झोपलंय. “ती माझी धाकटी मुलगी. आमची मोठी मुलगी याच शाळेत शिकते,” सुनंदा आम्हाला सांगते. शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षिका हे पती पत्नी आहेत. दोघं मिळून ही शाळा चालवतात आणि त्यांच्या आवाजातला अभिमान आणि चांगलं काही करण्याची आशा लपत नाही. दोघं म्हणजे शाळेचा पूर्ण शिक्षकवर्ग. तो ६५ किमीवर दौंडला राहतात आणि रोज त्यांच्या गाडीने शाळेला येतात.

Young boys standing together outside school
PHOTO • Binaifer Bharucha
Girls skipping under the tree on their school playground
PHOTO • Binaifer Bharucha

रोज दुपारी खेळाचा एक तास सगळे विद्यार्थी – २१ मुली आणि २२ मुलं शाळेच्या मैदानात येतात

इतक्यात पुढची फलंदाजी कुणाला मिळणार याच्यावर खेळाडूंची चांगलीच जुंपलीये. त्यातला एक शहाणा मुलगा त्यांना सांगतो की आपल्याकडे पाहुणे आलेत आणि त्यांच्यासमोर आपण जरा नीट वागायला पाहिजे. यामुळे भांडण तिथल्या तिथेच विरतं, हातापायीवर जात नाही.

दुपारी ३ वाजता खेळाची सुटी संपते आणि शिक्षक मुलांना वर्गात परत बोलवतात. त्यांना वर्गातले बाक, खुर्च्या नीट करायला, दप्तरं, पाण्याच्या बाटल्या, उडीच्या दोऱ्या, बॅट आणि बॉल नीट जागच्या जागी ठेवायला सांगतात. सगळे पटापट मदत करतात. मुलं-मुली शांतपणे हे काम संपवतात आणि मैदानात येऊन नीट ओळीत उभे राहतात. आणि मग शांतपणे सगळे वंदे मातरम म्हणतात – शाळेतला हा नियमित पाठ आहे.

Teachers standing outside school
PHOTO • Samyukta Shastri

सुनंदा जगदाळे आणि त्यांचे पती संदीप रसाळ एकत्र मिळून शाळा चालवतात, त्याबद्दलचा त्यांना वाटणारा अभिमान लपत नाही

शेवटची ‘भारत माता की जय’ची घोषणा नीट एका सुरात येत नाही आणि नंतर तर कशी तरीच होते. त्यामुळे शिक्षिका जरा रागावतात. परत एकदा सगळ्यांना एका मोठ्या विद्यार्थ्याच्या मागे घोषणा नीट म्हणायला सांगतात. ही घोषणा छान होते आणि मग सगळे इकडे तिकडे जायला लागतात. मग मुख्याध्यापकांभोवती सगळ्यांचा गराडा पडतो. सगळ्यांचा एकच प्रश्न, “सर आज घरचा अभ्यास काय करायचाय?”

“आज आपण अंक मोजायला शिकलोय. तुम्ही जितके शिकला आहात त्याप्रमाणे १०० किंवा ५०० पर्यंत सर्व अंक लिहून काढायचे,” रसाळ सर सांगतात. वेगवेगळ्या वर्गाच्या विद्यार्थ्यांना कमी जास्त अभ्यास – सगळ्या वयाच्या सगळ्या मुलांची शाळा एकाच वर्गात भरते.

“सर, आम्ही एक लाखापर्यंत आकडे शिकलोय, म्हणजे आम्ही एक लाखापर्यंत अंक लिहायचे ना?” मोठ्या वयाच्या एका मुलाचा प्रश्न, अर्थात इयत्ता चौथी.

पालक येतात आणि मुलं घरी जायला लागतात. काही दुचाकीवर किंवा सायकलवर मागे बसून जातात. काही जण वाट बघत मैदानात बसून राहतात. आम्ही त्यांचा निरोप घेतो आणि या मुलांनी आमच्या झोळीत टाकलेला आनंद सोबत घेऊन परतीच्या वाटेने निघतो.

Namita Waikar
namita.waikar@gmail.com

Namita Waikar is a writer, translator and Managing Editor at the People's Archive of Rural India. She is the author of the novel 'The Long March', published in 2018.

Other stories by Namita Waikar
Translator : Medha Kale
mimedha@gmail.com

Medha Kale is based in Pune and has worked in the field of women and health. She is the Translations Editor, Marathi, at the People’s Archive of Rural India.

Other stories by Medha Kale