“याला इथे हलबी आणि गोंडीमध्ये घोडोंडी म्हणतात. म्हणजे घोडेस्वारी. या काठ्या चालवताना किंवा त्यांच्यावरून धावताना तुम्हाला घोडा चालवत असल्यासारखी मजा घेता येते,” किबईबलेंगा गावचे (जनगणनेत किवईबलेगा अशी नोंद) एक तरुण शिक्षक आणि रहिवासी असणारे गौतम सेथिया सांगतात.

छत्तीसगडच्या बस्तरमधल्या कोंडागाव जिल्ह्यातल्या कोंडागाव तालुक्यात हे गाव येतं. या गावाच्या झगदहीनपारा या पाड्यावर किशोरवयीन मुलं – इथे मुलींना मी घोडोंडी खेळताना पाहिलं नाही – हरेली अमावास्येच्या (जुलै-ऑगस्ट दरम्यान) दिवशी या काठ्या चालवतात. हा खेळ नयाखानी (छत्तीसगडच्या इतर भागात नवाखानी म्हणतात), म्हणजे ऑगस्ट-सप्टेंबर मध्ये गणेश चतुर्थीनंतर – पर्यंत चालतो.

व्हिडिओ पहा – घोडोंडीः बस्तरची तोल सांभाळायची धमाल

“आम्ही देखील भरपूर खेळलोय हा खेळ,” गौतम सांगतो. गावातच बनणाऱ्या या काठ्यांबद्दल तो सांगतो. या काठ्यांना छत्तीसगडच्या इतर भागात आणि ओडिशामध्ये गेडी म्हणतात. “आम्ही स्वतःच त्या बनवायचे [शक्यतो साल किंवा कराच्या लाकडापासून].”

मुलाच्या उंचीप्रमाणे आणि त्याचं कसब किती त्याप्रमाणे पायपट्टी बसवली जाते. धडपडत, इतरांचं निरीक्षण करून आणि पारंपरिक जत्थ्यांमधल्या कलाकारांचे या काठ्यांवरचे खेळ बघत बघत मुलं या काठ्या चालवायला शिकतात.

नयाखानीच्या दुसऱ्या दिवशी, इथे लोक घोडोंडीच्या प्रतीकात्मक देवतेची पूजा करतात, सगळ्या काठ्या एका ठिकाणी जमा करतात आणि इथल्या विधींचा भाग म्हणून त्या मोडून टाकतात.

अनुवादः मेधा काळे

Purusottam Thakur
purusottam25@gmail.com

Purusottam Thakur is a 2015 PARI Fellow. He is a journalist and documentary filmmaker. At present, he is working with the Azim Premji Foundation and writing stories for social change.

Other stories by Purusottam Thakur
Translator : Medha Kale
mimedha@gmail.com

Medha Kale is based in Pune and has worked in the field of women and health. She is the Translations Editor, Marathi, at the People’s Archive of Rural India.

Other stories by Medha Kale