अमरोहाहून दिल्लीला जाणाऱ्या, सकाळी लवकर निघणाऱ्या काशी विश्वनाथ एक्सप्रेसमध्ये ऐनुल बसली तेव्हा तिच्या मनात शंकांचं वादळ उठलं होतं. “मी घाबरले होते. माझ्या मनात एकच विचार येत होता, मी बंबईला निघालीये. मी इथनं खूप लांब चाललीये. तिथले लोक कसे वागतील माझ्याशी? मला कसं जमेल सगळं?” या चिंतेने महिलांसाठीच्या जनरल डब्यात बसलेल्या या १७ वर्षांच्या ऐनुलचा रात्रभर डोळ्याला डोळा लागला नाही.

तिचे सासरे अलीम त्याच गाडीने प्रवास करत होते. दिल्लीहून त्या दोघांनी दुसरी गाडी पकडली आणि ते बांद्रा टर्मिनसवर उतरले. मग त्यांनी ऐनुलला माहिमच्या नयी बस्ती या वस्तीतल्या तिच्या नव्या घरी नेलं. आणि मग स्वतः मखदूम अली माहिमी दर्ग्याच्या बाहेर भीक मागायच्या त्यांच्या कामावर गेले.

तीन वर्षांनी ऐनुल शेखलादेखील काही काळासाठी हे काम करावं लागलं. तिचा १८ महिन्याचा मुलगा मध्य मुंबईतल्या कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये अनेक आठवडे दाखल होता, कसल्या आजाराने ते काही ऐनुलला माहित नाही. त्याचा खर्च भागवण्यासाठी हे काम तिच्या कामी आलं. “मला [दवाखान्याचे पैसे देण्यासाठी] कुणाकडूनच कर्ज मिळत नव्हतं कारण ते कोण फेडणार ना?”

मुंबईच्या गाडीत बसल्यावर तिच्या मनाला लागलेली चिंता काही बिनबुडाची नव्हती.

त्या दिवशी गाडीत ऐनुलजवळ फक्त एक कापडी पिशवी होती ज्यात तिचे काही कपडे होते. आपल्या सासरी नेण्यासाठी एक एक करत जमा केलेली सगळी भांडीकुंडी आतापर्यंत विकली गेली होती. लहानपणापासून तिने अपार कष्ट केले होते – लोकांच्या घरी धुणी-भांडी, केर फरशी करायची, रानात मजुरी करायची. “बदल्यात मला खायला मिळायचं किंवा थोडे पैसे. मग मी ते पैसे डब्ब्यात साठवून ठेवायची. असं करत करत माझ्या लग्नापुरते पैसे मी जमा केले होते. मला वाटतं, मी ५००० रुपये तरी जमा केलेच असणार. मग त्यातले थोडे पैसे घेऊन मी दुकानात जायची आणि पितळी वाट्या, थाळ्या, डाव असं काही विकत घ्यायची, अगदी तांब्याची डेकचीसुद्धा घेतली होती मी.”

A woman and her son and daughter
PHOTO • Sharmila Joshi

ऐनुल शेख, सोबत तिचा धाकटा मुलगा जुनैद आणि मुलगी मेहजबीन. तिच्या मोठ्या मुलाने, मोहम्मदने फोटो काढून घ्यायला नकार दिला

तिचं लग्न झालं आणि ती तिच्या नवऱ्याच्या, जमीलच्या घरी रहायला आली, अमरोहातल्या ती रहायची त्याच गल्लीत. आणि मग त्याने त्याच्या दारूपायी ती सगळी भांडी एक एक करत विकून टाकली. बांद्रा टर्मिनसला ती उतरली त्यानंतर जवळ जवळ १० वर्षं किंवा जास्तच, तो तिला अगदी रक्त निघेपर्यंत मारहाण करायचा. ती मुंबईला आली तेव्हाच कधी तरी ही मारहाण सुरू झाली. नक्की कधी ते तिलाही आठवत नाही. “मी माझ्या आईला फोन करून सांगायची,” ऐनुल सांगते. “ती म्हणे, तुला तिथे रहायचंय, त्यामुळे काही तरी मार्ग काढ...”

जशी विकलेली भांडीकुंडी मागे राहिली तसंच ऐनुलचं कुटुंबही ती मागे सोडून आली होती. उत्तर प्रदेशच्या ज्योतिबा फुले नगर जिल्ह्यातल्या अमरोहा शहराच्या वेशीवरच्या (तेव्हाच्या) ग्रामीण भागातल्या बतवाल मोहल्ल्यात तिचं कुटुंब रहायचं – आई, दोघी बहिणी आणि तीन भाऊ. ऐनुलचे वडील न्हावी होते, ते काही वर्षांपूर्वी वारले. “आमची जात सलमानी,” धारावीला लागून असलेल्या पत्रे आणि सिमेंटच्या पत्र्यांनी बांधलेल्या पोटमाळ्यावरच्या आपल्या खोलीत बसलेली ऐनुल सांगते. “आमच्या जातीत परंपरेने पुरुष वारकाचं काम करतात. अब्बा छपराखाली बसायचे, केस कापायचे, दाढी करून द्यायचे आणि काही रुपयांची कमाई व्हायची त्यांची. आम्ही फारच गरीब होतो. आम्हा सहा भावंडांना भूक लागली की अम्मी कोमट पाणी द्यायची प्यायला किंवा पोट भरावं म्हणून एखादा गुळाचा खडा. अंगावरचे कपडे कधीच धड नसायचे, पायातल्या चपला तशाच, कायम विजोड – एका पायात निळी तर दुसऱ्या पायात काळी, तीदेखील सेफ्टी पिनांनी कशीबशी दुरुस्त केलेली.”

सहा भावंडांमध्ये सगळ्यात धाकटी असणारी ऐनुल शाळेत कधीच गेली नाही. जरा कळू लागल्यावर या सहाही भावंडांनी काम करायलाच सुरुवात केली – एक भाऊ गॅरेजमध्ये तर दोघं जण हातरिक्षा ओढायचे. तिची आई आणि तिची मोठी बहीण घरी विड्या वळायच्या (दोघींनाही नंतर क्षय झाला), आणि १००० विड्यांमागे ५० रुपये कमवायच्या.  ऐनुल तिच्या मोठ्या बहिणीसोबत जवळच्याच जोया गावात शेतात मजुरी करायला जाऊ लागली. मोबदला म्हणून धान्य मिळायचं, घरच्या शिध्यात तेवढीच भर पडायची. “पण त्या काळात ना,” ती सांगते, “मी मस्त काम करायची, कसलीच चिंता नसायची. मी निवांत असायची आणि हसू शकायची.”

काळ लोटला, आणि शेख कुटुंबाने ऐनुलचे वडील काम करायचे त्याला लागून एक बऱ्यापैकी ऐसपैस घर बांधलं. तिच्या आईने एका स्थानिक संघटनेच्या योजनेअंतर्गत दाई प्रशिक्षण घेतलं आणि तिला थोडेफार पैसे मिळू लागले. पण ऐनुल १३ वर्षांची होती (ऐनुलला सगळ्या गोष्टी अगदी बारकाव्यांसकट आठवतात, मात्र वय आणि वर्षांच्या बाबत मात्र तिची स्मृती तितकीशी अचूक नाही) तेव्हा तिच्या वडलांना पक्षाघाताचा झटका आला आणि दोन वर्षं ते आजारपण टिकलं. तसंही त्यांच्यामागे काही तरी आजारपण असायचंच. या दुखण्याने मात्र शेख कुटुंबाला अगदी हलाखीत लोटलं. “आम्ही खूप प्रयत्न केले, आमच्या मोहल्ल्यातल्या लोकांनीदेखील मदत केली. पण आम्ही काही त्यांना वाचवू शकलो नाही.” ऐनुल साधारण १५ वर्षांची होती, तेव्हा तिचे वडील वारले. तिला सोळावं लागलं आणि तिच्या भावांनी तिचं लग्न ठरवून टाकलं.

काही काळ ऐनुल तिच्या सासऱ्यांच्या, अलीम यांच्या घरी राहिली. ते काही महिने मुंबईत भीक मागायचे आणि मग काही महिने अमरोह्याला येऊन त्या पैशावर दिवस काढायचे. तिची सासू, जमीलची आई काही काळापूर्वी गेली आणि तिचा दीर बतवाल मोहल्ल्यात न्हावी म्हणून काम करायचा. तिचं लग्न झाल्यावर अंदाजे एका वर्षाने अलीम ऐनुलला घेऊन मुंबईला आले.

A road in Dharavi, a slum in Mumbai

या गल्लीत ऐनुलचं एक खोलीचं घर आहे

जमील छोटीमोठी कामं करायचा – धारावीच्या रिसायकलिंगच्या क्षेत्रात हमाल म्हणून, यात त्याची दिवसाला १५०-२०० रुपयांची कमाई व्हायची किंवा गहू, तांदूळ घेऊन उत्तर प्रदेशला जाणाऱ्या ट्रकवर मदतनीस म्हणून. अलीम त्यांना अधून मधून काही पैसे देऊन हातभार लावत असत. तो काही फार भला मनुष्य नव्हता आणि त्यात त्यांना जुगाराची आदत होती, ऐनुल म्हणते, तरी त्यांचा आधार होता तिला.

मुंबईला आल्यावर सुरुवातीची काही वर्षं ऐनुलने पैशासाठी म्हणून काही काम केलं नाही. “मला दर्ग्याजवळ मागायला जाऊ दे, म्हणून मी माझ्या नवऱ्याला विनवायची,” ती सांगते, “मी घरकाम करू का असंही त्याला विचारायचे, पण तो मला कुठेही जाऊ द्यायचा नाही. मला तो रोज ३० रुपये द्यायचा आणि त्याच्यातच मला सगळ्या गोष्टी भागवायला लागायच्या. आमच्या शेजारचे लोक चांगल्या दिलाचे होते आणि कधी कधी आम्हाला उरलंसुरलं अन्न द्यायचे.” मात्र जेव्हा तिचा थोरला मुलगा आजारी पडला तेव्हा मात्र ऐनुलने जमीलचे नियम धुडकावून दर्ग्यामध्ये काम करायला सुरुवात केली.

अलीम आठ वर्षांपूर्वी वारले, “आणि दैवाचे फासे फिरले.” जमील तसाही हिंसकच होता, आता तो जास्तच क्रूर होऊ लागला होता. “मी खूप मार खाल्लाय,” ऐनुल सांगते. “मी त्याच्या किती तरी घाण घाण शिव्या पचवल्यायत. एकदा त्याने मला माहीमला रेल्वेच्या रुळांवर ढकलून दिलं आणि म्हटला, जा मर.” तिच्या अंगावरची एक जुनी जखम तिने मला दाखवली – वरनं पडल्यामुळे तिची गुडघ्याची वाटीच फुटली होती. “तो मला हाताने, काठीनी, चिमट्याने, काय हाताला लागेल त्याने मारायचा. काय करणार? सहन करायचं झालं.”

हे सगळं चालूच होतं, त्यातच ऐनुलला तीन लेकरं झाली – दोन मुलगे, आता १५ वर्षांचा असलेला मोहम्मद आणि ९ वर्षांचा जुनैद, आणि ११ वर्षांची मेहजबीन. “कधी कधी मला लोक सांगायचे, की नवऱ्याला सोडून दे,” ती सांगते, “पण माझ्या पोरांचं काय? असं काही झालं तर आमच्या बिरादरीत त्यांची लग्नंच होणार नाहीत.”

काही दिवसांनी ऐनुलला दर्ग्यात एक बाई भेटली, तिने तिला महिना ६०० रुपयावर घरकामावर घेतलं. तेव्हापासून आजपावेतो ऐनुलने किती तरी कामं केलीयेत – कंत्राटदार मंगल कार्यालयात भांडी घासायला मजुरांना घेऊन जातात त्या ‘वाडी लाइन’ मध्ये, जोगेश्वरीत एका घरी नर्स म्हणून.

एवढ्या सगळ्या वर्षांत ती माहिम-धारावीमध्ये छोट्या भाड्याच्या खोल्यांमध्ये राहिलीये, मुलांना घेऊन, नवरा बहुतेक वेळा जवळच्या फूटपाथवर झोपायचा. कधी कधी तर तिनेही रस्त्यावर दिवस काढलेत. धारावीत भाड्याने खोली घ्यायची म्हणजे किमान ५००० रुपये डिपॉझिट भरावं लागतं. ऐनुलकडे बहुतेक वेळा तेवढेही पैसे नसायचे. “पण हळू हळू माझ्या लोकांशी ओळखी वाढल्या आणि मग मला बिगर डिपॉझिटची खोली मिळू लागली. मी किती तरी खोल्या सोडल्या [भाडं दिलं नाही म्हणून] रस्त्यावर आले, परत खोली शोधली, परत सोडली...”

A woman crouching on the floor of her house
PHOTO • Sharmila Joshi

ऐनुल तिच्या घरी, इथे तिला जरा स्थिरावल्यासारखं वाटतंय

एवढ्या सगळ्या वर्षांत ऐनुल माहिम-धारावीमध्ये छोट्या भाड्याच्या खोल्यांमध्ये राहिलीये, आणि कधी कधी तर रस्त्यावर. ‘मी किती तरी खोल्या सोडल्या [भाडं दिलं नाही म्हणून] रस्त्यावर आले, परत खोली शोधली, परत सोडली...’

२०१२ च्या जानेवारीत तिच्या वस्तीत आग लागली. “रात्रीचे ३ वाजले होते, सगळे जण झोपलेले होते,” ऐनुल सांगते. “आम्ही छपरावर चढलो आणि पळालो.” आगीनंतर ती आणि तिची मुलं माहीम-सायन पुलाजवळ आठ महिने राहिले, तिचा नवराही सोबत होता. “पावसाळ्यातले हाल तर विचारूच नका,” ती म्हणते. “पाऊस कोसळायला लागला की मी मुलांना घेऊन जवळच्या भंगारच्या दुकानात आडोशाला थांबायची.”

स्थानिक संघटना आणि पुढाऱ्यांनी आगीमुळे पीडित लोकांना मदत केली, ऐनुल सांगते. तिलादेखील धान्य, भांडीकुंडी, एक स्टोव्ह आणि चटया मिळाल्या. हळूहळू जशा तिच्या ओळखी वाढल्या, मैत्रिणी मिळाल्या तसं त्यांच्या मदतीने सुमारे दोन वर्षांपूर्वी तिने आता ते सगळे राहतात ती ही पुलावरची खोली पाहिली. जवळच्या अशाच इतर कोंदट खोल्यांहून ही वेगळी आहे, तिला एक मोठी खिडकी आहे आणि थोडी फार हवा खोलीत येते. “तिथे एक छानशी गच्चीसारखी आहे,” ती काहिशा अभिमानाने मला सांगते.

२०१५ च्या मार्चपासून, ऐनुलला एका कागद पुनर्वापर केंद्रात कागद निवडायचं काम मिळालंय. पुनर्वापर आणि अशाच अतर मुद्दयांवर काम करणाऱ्या एका स्थानिक सामाजिक संस्थेने हे केंद्र सुरू केलं आहे. तिथे तिला महिन्याला खात्रीशीर असा ६००० रुपये पगार मिळतो – आणि तितकंच नाही, आपण स्वतःही काही आहोत विश्वासही. या पगारातून खोलीच्या भाड्याचे ३,५०० रुपये आणि बाकी किराणा, पीठ-मीठ आणि भाजीपाल्यावर १,००० रुपये जातात – आगीत त्यांचं रेशन कार्ड गेलं आणि अजून तरी तिला नवं कार्ड मिळालेलं नाही. वीजबिल आणि इतर खर्च बाकीच्या पैशातून निघतो. “मला आता इतकं बरं वाटतं ना – माझी पोरं कशी पोटभर जेवू शकतायत.”

तिच्या घरचे सगळे जवळच्या सार्वजनिक संडासचा वापर करतात. सार्वजनिक नळाचं पाणी घेण्यासाठी महिन्याला २०० रुपये लागतात (गल्लीतल्या एका गुंड बाईला हप्ता म्हणून). ऐनुल रोज संध्याकाळी ७-८ या वेळात पाणी भरते – बादल्या, डब्बे आणि बाटल्यांमध्ये. “माझा लेक मोहम्मद पाणी भरून न्यायला मदत करतो,” ती सांगते. तिची मुलगी मेहजबीन चंट आहे आणि मी तिथे होते तेव्हा ती तिच्या शाळेच्या पुस्तकात रमलेली होती. ती ६ वीत आहे आणि थोडा बुजरा मात्र हसरा असणारा तिचा धाकटा भाऊ, जुनैद दुसरीत. दोघंही जवळच्या मनपाच्या शाळेत जातात.

A woman standing on a ladder amidst hutments in Dharavi, a slum in Mumbai
PHOTO • Sharmila Joshi
The view from a hutment room in Dharavi
PHOTO • Sharmila Joshi

अंजुलच्या घरी पोचण्यासाठी ती उभी आहे त्या दोन शिड्या चढून वर जावं लागतं. उजवीकडेः तिच्या घराच्या खिडकीतून दिसणारं दृश्य, ‘बंबई’ची एक झलक

मोहम्मदने पाचवीतच शाळा सोडली. तो आता एका वेल्डरकडे १०० रुपये रोजावर अधूनमधून काम करतो, किंवा कधी कधी त्याच्या एका शेजाऱ्याची पुस्तकं पोचवायचंही काम करतो, त्यात त्याची थोडी कमाई होते. त्याच्या आशा आकांक्षाही थोडक्याच आहेत – त्याच्या शेजाऱ्यासारखं फूटपाथवर पुस्तकांचं एखादं दुकान थाटायचं, किंवा मेकॅनिक व्हायचं, त्याच्या चुलत्यासारखं. किंवा, तो म्हणतो, “मला खरं तर अगदी मनापासून आमच्या बिरादरीतल्या इतरांसारखं न्हावी व्हायचंय, पण ते सगळं काम मला शिकून घ्यावं लागेल... म्हणून मग मी पडेल ते काम करणार, काय हरकत आहे. मी पैसे कमवीन आणि माझ्या अम्मीला त्यातले थोडे देईन.”

आताशा त्याच्या वडलांनी जर ऐनुलवर हात उगारला तर तो मधे पडून त्यांना अडवायचा प्रयत्न करतो. त्यामुळे जमील आता तिच्यावर नुसता ओरडत राहतो. इतक्या वर्षांची मारहाण, उपसलेले कष्ट आणि उपासमार याचा ऐनुलच्या तब्येतीवर खोल परिणाम झालाय – तिचा चेहरा सुकलाय, रक्तदाबाचा त्रास आहे आणि डोकेदुखी कायमचीच आहे.

क्वचित कधी ऐनुल बतवाल मोहल्ल्याला जाऊन आलीये. तिची आई क्षयाच्या दुखण्याने अखेर वारली तोवर ती तिच्यापाशी रहायची. “ती मला थोडेफार पैसे पाठवायची, मला मदत करायचा प्रयत्न केला तिने... माझ्या अम्मीने,” हळुवार आवाजात ऐनुल सांगते. ती अजूनही दर काही वर्षांनी तिच्या जन्मगावी जाऊन येते. आणि सध्या भाचीच्या लग्नासाठी अमरोह्याला रेल्वेने जायचा तिचा विचार चालू आहे.

“माझ्या मनात आत अशी एक इच्छा आहे, माझ्या स्वतःच्या गावात एक घर बांधावं. माझा प्राण जाईल, तो माझ्या मातीतच जावा. माझा जीव काही या बंबईत रमत नाही... माझी श्वास कोंडतो इथे... माझ्या गावी, आम्ही उपाशी होतो, पण तरी काही तरी करून जगत होतो. माझ्या सगळ्या आठवणी तिथल्या आहेत, माझं बालपण तिथे गेलंय. माझ्या गावी किती मोकळ्याने हसायची मी.”

अनुवादः मेधा काळे

Sharmila Joshi

Sharmila Joshi is former Executive Editor, People's Archive of Rural India, and a writer and occasional teacher.

Other stories by Sharmila Joshi
Translator : Medha Kale
mimedha@gmail.com

Medha Kale is based in Pune and has worked in the field of women and health. She is the Translations Editor, Marathi, at the People’s Archive of Rural India.

Other stories by Medha Kale