२८ नोव्हेंबर रोजी अनेक राज्यांतले शेतकरी बिजवासन येथे आयोजकांनी थाटलेल्या मुक्कामस्थळी पोचू लागले होते. दिल्लीतल्या अनेक मुक्कामांपैकी हा एक. २९ नोव्हेंबरला तिथे हजारो शेतकरी जमा झाले होते आणि रामलीला मैदानाच्या दिशेने कूच करण्याच्या तयारीत होते. या दोन्ही दिवशी टिपलेली ही काही क्षणचित्रं.

गटप्रमुख शेतकऱ्यांना मोर्चामध्ये काय खबरदारी घ्यायची हे सांगतायत आणि काही अडचण आल्यास उपयोगी ठरणारे संपर्क क्रमांक देतायत.

राजस्थानच्या नागौर तालुका आणि जिल्ह्याहून आलेले शेतकरी बोअरवेलच्या खाऱ्या पाण्याने त्यांच्या जमिनी आणि पिकांचं कसं नुकसान होतंय ते सांगतात. “आम्ही फक्त पावसाळ्याचे चार महिने शेती करतो, बाकीचा काळ आम्हाला इतर गावात शेतात किंवा इतर मिळेल ती मजुरी करावी लागते,” ते सांगतात. नागौर तालुक्याच्या जोधियासी गावचे ७५ वर्षीय शेतकरी, सुरधन सिंग म्हणतात. “माझं वय झालंय त्यामुळे मला कुणीच शेतमजुरीची किंवा इतर कामं देत नाहीत. त्यामुळे आता गाणं सादर करणं आणि माझी कर्मकहाणी लोकांना सांगणं इतकंच काम आहे माझ्याकडे.”

राजस्थानच्या नागौर तालुक्यातले शेतकरी पारंपरिक गाणी सादर करण्याच्या तयारीत.

आपल्या पालकांबरोबर मोर्चासाठी अनेक छोटी मुलं आली आहेत.

पश्चिम बंगालच्या खेड्यापाड्यातले शेतकरी रामलीला मैदानाच्या दिशेने जातायत.

दक्षिण परगणा जिल्ह्याच्या जयनगर II तालुक्यातल्या सोनाटिकरी गावच्या २२ वर्षीय रिंकू हलदरला लहानपणी पोलिओची लागण झाली होती. आपल्या शेतकरी कुटुंबाच्या पाठीशी ठाम उभी असलेली रिंकू म्हणते, “माझा शेतकऱ्यांना पूर्ण पाठिंबा आहे. मी पार दिल्लीपर्यंत आलीये जेणेकरून सरकार आमच्या परिस्थितीकडे लक्ष देईल. कीटकनाशकं आणि विजेचे दर वाढत चाललेत, पण आम्हाला मात्र चांगला माल झाला तरी फायदा होत नाही. कोलकात्यात तुम्ही मालासाठी [भात] जास्त पैसे मोजता पण आमच्या गावी आम्हाला तेवढा भाव मिळत नाही.”

मोर्चादरम्यान पश्चिम बंगालचे एक शेतकरी पारंपरिक गाणं गातायत.

हरयाणाच्या मेवात जिल्ह्यातल्या तावडू तालुक्यातले शेतकरी शेतातल्या अपुऱ्या वीज पुरवठ्याबद्दल तक्रार करतात – रात्री ११ ते पहाटे ५ असा फक्त सहा तास. “रात्री ११ वाजता शेतकऱ्याने पिकाला कसं पाणी पाजावं?” ते विचारतात.

बिजवासनपासून १० किलोमीटर चालल्यावर क्षणभर विश्रांती घ्यायला थांबलेला एक शेतकरी.

महाराष्ट्राच्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिरोळ तालुक्याच्या जांभळी गावचे ७२ वर्षीय शेतकरी, नारायण भाऊ गायकवाड, बासरी वाजवतायत.

महाराष्ट्राच्या पालघर जिल्ह्यातले आदिवासी शेतकरी रामलीला मैदानावर पारंपरिक गाण्यांवर लयीत फेर धरतायत.

रामलीला मैदानावर मांडवात राज्यवार बसलेले शेतकरी.

संध्याकाळी उशीरा, सगळे रामलीला मैदानावर चालू असलेले कार्यक्रम पाहतायत.
अनुवादः मेधा काळे