गुरप्रताप सिंग अकरावीत शिकतो आणि त्याचा चुलत भाऊ सुखबीर सातवीत. दोघंही पंजाबच्या अमृतसर जिल्ह्यातून आलेत. सध्या ते शाळेत जात नसले तरी त्यांचं वेगळ्या तऱ्हेचं शिक्षण मात्र सुरू आहे.
“आम्ही शेतकऱ्यांच्या इलाक्याची राखण करतोय, रोज रात्री, आणि आम्ही ते करत राहू,” हरयाणाच्या सोनिपतमधल्या सिंघु-दिल्ली सीमेवर १७ वर्षांच्या गुरप्रतापने मला सांगितलं.
दिल्लीच्या वेशीवर विविध ठिकाणी जमलेल्या शेतकरी कुटुंबांमधल्ये शेकडो-हजारो लोकांपैकी हे दोघं. काही शेतकरी, दोन आठवडे आधीच दिल्लीत पोचले होते. उत्तर दिल्लीच्या बुरारी मैदानात त्यांनी तळ ठोकलाय.
आंदोलकांच्या कुठल्याही तळावर जा, या वर्षी सप्टेंबर महिन्यात केंद्राने संसदेत रेटून पारित केलेले तीन कृषी कायदे मागे घ्यावेत यासाठी त्यांनी सुरू केलेलं भव्य पण शांततामय आंदोलन शमताना दिसत नाही. आगामी काळात मोठ्या लढाईसाठी शेतकरी सज्ज झालेत, त्यांच्या मागण्यांबद्दल ठाम आणि ध्येयाशी बांधील.
आता रात्र होत आलीये, अनेक जण निजण्याच्या तयारीत आहेत. सिंघु आणि बुरारीमधल्या त्यांच्या तळावर मी हिंडत होतो. काही शेतकरी त्यांच्या ट्रकमध्ये तर काही जण पेट्रोल पंपावर मुक्काम करतायत. काही जण रात्रभर घोळक्याने गाणी गात बसलेत. माया, बंधुभाव, मैत्री आणि निग्रह आणि विरोधाची भावना त्यांच्या या सगळ्या मेळ्यातून जाणवत राहते.
शेतकरी या तीन कायद्यांचा विरोध करत आहेतः शेतमाल व्यापार आणि वाणिज्य (प्रोत्साहन व समन्वय) कायदा, २०२०, शेतकरी (सक्षमीकरण व संरक्षण) हमीभाव व कृषी सुविधा करार कायदा, २०२० आणि अत्यावश्यक वस्तू (सुधारणा) कायदा, २०२०.
त्यांच्या दृष्टीने या कायद्यांद्वारे शेतीवरचा त्यांचा हक्क आणि भाग देशातल्या धनाढ्य कॉर्पोरेट कंपन्यांना देण्यात येईल आणि त्यांना या कंपन्यांच्या भरवशावर सोडून देण्यात येणार आहे. “ही फसवणूक नाहीये, तर मग दुसरं काय आहे?” अंधारातून एक आवाज येतो.
“आम्ही शेतकऱ्यांनी या कॉर्पोरेट कंपन्यांचा अनुभव घेतलेला आहे – आणि आमचा त्यांच्यावर विश्वास नाही. त्यांनी या आधी आमची फसवणूक केलीये, आणि आम्ही काही खुळे नाही आहोत. आमचे हक्क काय आहेत ते आम्हाला माहित आहे,” त्या दिवशी संध्याकाळी सिंघु इथे मुक्कामी असलेल्या शेतकऱ्यांशी मी बोलत होतो, त्यातल्या अनेक आवाजांपैकी हा एक होता.
कोणत्याही परिस्थितीत कायदे रद्द होणार नाहीत असा सरकारची होरा दिसत असताना काहीच तोडगा न निघता हे त्रिशंकू स्थितीत जाईल याची त्यांना काळजी वाटत नाही? ते तगून राहतील?
“आम्ही मजबूत आहोत,” पंजाबचा आणखी एक शेतकरी म्हणतो. “आम्ही आमचं स्वतःचं जेवण रांधतोय, दुसऱ्यांना खायला घालतोय. आम्ही किसान आहोत, तटून कसं रहायचं ते आम्हाला माहितीये.”

गुरप्रताप सिंग, वय १७ आणि सुखबीर सिंग, वय १३ अमृतसर जिल्ह्यातले विद्यार्थी सिंघुमध्ये आम्हाला भेटले, ते ‘रोज रात्री सिंघुमधल्या शेतकऱ्यांच्या इलाक्याची राखण’ करतायत
हरयाणाचेही असंख्य जण इथे आलेत, आंदोलकांना शक्य ती मदत करण्यासाठी. कैथाल जिल्ह्यातले पन्नाशीचे शिव कुमार बाभड सांगतात, “आमचे शेतकरी बांधव इतक्या दूर दिल्लीच्या वेशीवर आलेत, आपल्या घराची ऊब सोडून. आम्हाला जमेल ते सगळं आम्ही त्यांना पुरवतोय.”
आपले भाईबंद त्यांची कशी काळजी घेतायत आणि त्यांची सद्भावना सिंघु आणि बुरारीजवळ असलेल्या शेतकऱ्यांच्या बोलण्यातून जाणवते. “लोक आमच्या मदतीसाठी येतायत. सीमेजवळ डॉक्टरांनी वेगवेगळी शिबिरं सुरू केली आहेत, आम्हाला वैद्यकीय मदत मिळतीये,” एक आंदोलक सांगतात.
“आम्ही पुरेसे कपडे आणलेत,” अजून एक जण सांगतो. “तरी देखील लोक किती तरी कपडे आणि पांघरुणं दान करतायत. हा जत्था आता घरासारखा वाटू लागलाय.”
सरकार आणि कॉर्पोरेट जगताविषयी तीव्र संताप आणि तक्रारीचा सूर ऐकायला मिळतो. “सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात केलाय,” एक आंदोलक म्हणतो. “आम्ही या देशाला खाऊ घालतो आणि त्या बदल्यात आमच्या वाट्याला अश्रूधूर आणि पाण्याचे फवारे आलेत.”
“जेव्हा कडाक्याच्या थंडीत शेतकरी त्यांची वावरं भिजवत असतात, तेव्हा हेच धनदांडगे, राजकारणी, आपल्या ऊबदार बिछान्यात झोपलेले असतात,” आणखी एक सांगतो.
विरोधाचा हा निर्धार वरवरचा नाहीः “आम्ही दर वर्षी कडाक्याचा हिवाळा सहन करतो. पण या हिवाळ्यात, आमच्या काळजात विस्तव पेटलाय,” संतप्त असा एक शेतकरी म्हणतो.
“तुम्हाला हे ट्रॅक्टर दिसतायत?” त्यातला एक जण विचारतो. “हीच आमची शस्त्रं आहेत. पोटच्या लेकरांप्रमाणे आम्ही त्यांना जपतो.” दिल्लीच्या वेशीवर हजारो ट्रॅक्टर उभे आहेत आणि त्यांना जोडलेल्या ट्रॉल्यांमध्ये बसून हजारो लोक इथे दाखल झालेत.
आणखी एक जण बोलतोः “मी मेकॅनिक आहे. आणि मी स्वतःच निश्चय केलाय की यातल्या एक न् एक शेतकऱ्याचा ट्रॅक्टर मी फुकटात दुरुस्त करून देणार आहे.”
इथल्या प्रत्येकाला जाणवतंय की त्यांच्यासमोरची लढाई दीर्घकाळ चालणार आहे. काही जण म्हणतात की हा तंटा पुढचे अनेक महिने असाच चालू राहणार आहे. पण कुणीही मागे हटायला तयार नाही.
त्यातला एक जण या सगळ्याचं सार सांगतोः “आमचा मुक्काम ते तीन कायदे रद्द होईपर्यंत. किंवा मग मृत्यू येईपर्यंत.”

उत्तर दिल्लीच्या बुरारीच्या मैदानावरचे सत्तरीचे हे आंदोलनकर्ते सरकारवर शेतकऱ्यांचा विश्वासघात केल्याचा आरोप ठेवतात. तीन कृषी कायदे रद्द केल्याशिवाय मागे हटणार नसल्याचं ते ठासून सांगतात. नाही तर मग ‘आमचा इथला मुक्काम मृत्यू येईपर्यंत.’

रात्र होत चाललीये, उत्तर दिल्लीच्या बुरारी मैदानातला एक तरुण आंदोलक

हरयाणाच्या सोनिपतमध्ये दिल्लीच्या सिंघु सीमेवर शेतकरी संध्याकाळची प्रार्थना करतायत. अनेक गुरुद्वारांनी लंगर आयोजित केले आहेत, जिथे काही पोलिसांनाही जेवण वाढलं गेलं.

सिंघु सीमेपाशी शेतकऱ्यांचा एक गट त्यांच्या जत्थ्यातल्या आंदोलकांसाठी स्वयंपाकाच्या तयारीत आहे, सिंघु आणि बुरारी दोन्ही ठिकाणी अशा अनेक चुली पेटल्या आहेत.

सिंघु सीमेवरच्या तळावर रात्री लंगर सुरू आहे.

बुरारी मैदानावर एका ट्रकमध्ये चढत असलेले एक वयस्क शेतकरी. काही शेतकरी आंदोलनादरम्यान रात्री आपल्या ट्रकमध्ये झोपतायत.

सिंघु सीमेवर आपापल्या ट्रकमध्ये विश्रांती घेणारे शेतकरी

सिंघु सीमेवरच्या पेट्रोल पंपावर निजलेले काही आंदोलक

आंदोलकांनी त्यांच्यासोबत हजारो ट्रॅक्टर आणले आहेत, अनेकांसाठी हा केवळ वाहतुकीचं साधन नाही. बुरारीतला एक जण म्हणतो तसं, ‘हे ट्रॅक्टर आमचं शस्त्रही आहेत’.

‘मला झोप आली नाहीये, सरकारने आमची झोप पळवून लावलीये,’ उत्तर दिल्लीच्या बुरारीमध्ये आंदोलनस्थळी असलेले एक शेतकरी सांगतात.