गुलाम मोहिउद्दिन मीर यांच्या १३ एकर बागेत ३००-४०० सफरचंदाची झाडं आहेत आणि दर वर्षी साधारणपणे त्यांना प्रत्येकी २० किलो अशी ३६०० खोकी इतकं फळ मिळतं. “आम्ही १००० रुपयाला एक खोकं विकायचो. आणि आता आम्हाला एका खोक्यामागे ५००-७०० रुपये मिळतायत,” ते सांगतात.
बडगम जिल्ह्यातल्या क्रेमशोरा गावातल्या ६५ वर्षीय मीर यांच्याप्रमाणेच काश्मीरमधल्या इतर शेतकऱ्यांचंही प्रचंड आर्थिक नुकसान होत आहे. इथला सफरचंदांचा उद्योगच ५ ऑगस्टपासून मोठ्या संकटात सापडला आहे. याच दिवशी केंद्र सरकारने अनुच्छेद ३७० हटवलं आणि या राज्याचं रुपांतर केंद्रशासित प्रदेशात केलं.
इथल्या स्थानिक अर्थकारणाचा मोठा भाग म्हणजे सफरचंदं. जम्मू आणि काश्मीरमध्ये एकूण १ लाख ६४ हजार ७४२ हेक्टरवर सफरचंदांची लागवड केली जाते आणि (फलोत्पादन संचलनालयाच्या आकडेवारीनुसार) २०१८-१९ या वर्षात राज्यात १८ लाखांहून अधिक फळांचं उत्पादन झालं. जम्मू आणि काश्मीर सरकारच्या फलोत्पादन विभागाच्या अंदाजानुसार जम्मू आणि काश्मीरमध्ये किमान ३३ लाख लोकांची उपजीविका फळबागांवर (सफरचंदासहित) अवलंबून आहे आणि फलोत्पादन विभागाचे संचालक ऐजाज अहमद यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार या उद्योगाचं मूल्य ८,००० ते १०,००० कोटी रुपयांइतकं आहे.
शिवाय बाहेरच्या राज्यातल्या श्रमिकांना या राज्यात (आता केंद्रशासित प्रदेशात) काश्मीर खोऱ्यातल्या बागांमध्ये रोजगार मिळतो. मात्र ऑगस्ट महिन्यात जी काही राजकीय उलथापालथ झाली त्या काळात यातले बरेच मजूर इथून परत गेले. ऑक्टोबर महिन्यात ११ बिगर रहिवासी, ज्यात प्रामुख्याने ट्रक ड्रायव्हर आणि कामगारांचा समावेश होता, दहशतवाद्यांच्या हल्ल्यात मरण पावले. यामुळे काश्मीरमधली सफरचंद देशभरातल्या बाजारांमध्ये पाठवण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत.
आणि काश्मीरमध्ये एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यातली लोकांची आणि फळांची वाहतूकही खडतरच आहे. कारण अजूनही सार्वजनिक वाहतूक, बस किंवा टॅक्सी ठप्पच आहेत.
काही व्यापारी थेट सफरचंद उत्पादकांकडून फळ खरेदी करून दिल्लीच्या बाजारात पाठवतात जिथे खोक्यामागे त्यांना १४०० ते १५०० रुपये इतका दर मिळतो. इतर व्यापारी जे शासकीय यंत्रणेमार्फत विक्री करतात ते अद्याप विक्री सुरू होण्याची वाट पाहतायत. दरम्यान काही जणांचं म्हणणं आहे सरकारला माल विकू नका असा संदेश असलेली काही पोस्टर रात्रीत लावली आहेत (कुणी ते स्पष्ट नाही).

बडगमच्या क्रेशमोरा गावचे गुलाम मोहिउद्दिन मीर यांना सफरचंदातून होणारी वर्षाची कमाई यंदा निम्म्याने घटण्याची भीती वाटू लागली आहे. राज्यातील फलोत्पादन उद्योगाचं मूल्य रु. ८,००० ते १०,००० कोटींच्या घरात आहे आणि काश्मीरमधल्या आणि बाहेरच्या लाखो लोकांना हा उद्योग रोजगार पुरवतो


कश्मीरच्या मध्यवर्ती भागातल्या बडगम जिल्ह्यातल्या मुनीपापी गावात मी ऑक्टोबरच्या मध्यावर गेलो असता तिथल्या रहिवाशांनी सांगितलं की इथल्या अंदाजे २०० कुटुंबांच्या स्वतःच्या सफरचंदाच्या बागा आहेत. जुलै ते नोव्हेंबर या काळात व्यापारी सफरचंद आणि पेअरने भरलेले ट्रक काश्मीरहून थेट दिल्लीच्या बाजारपेठेत पाठवतात


सफरचंदाचा सगळा व्यापार बोलाचालीवर चालतो. मार्च-एप्रिल मध्ये व्यापारी बागांमध्ये येऊन मोहोर कसा आहे ते पाहतात आणि किती माल होणार याचा अंदाज बांधून बागांच्या मालकांना आगाऊ पैसे देतात. फळं काढणीला आली की व्यापारी परततात. सध्याच्या अंदाधुंदीमध्ये सगळा धंदाच कोलमडलाय


३२ वर्षांच्या एका व्यापाऱ्याने नाव उघड न करण्याच्या अटीवर मला सांगितलं, “माझं सगळं काम मोबाइल फोनवरून चालतं – कामगारांना कामासाठी बोलावून घ्यायचं, छाटणी आणि पॅकिंग केंद्रातल्या लोकांशी बोलायचं, दिल्लीतल्या व्यापाऱ्यांशी संपर्क साधायचा, माल पाठवल्यानंतर ट्रक चालक आणि माल वाहतूक करणाऱ्यांशी संपर्कात रहायचं. सरकारने फोन सुविधा बंद केल्यानंतर आमचं रोजचं काम ठप्प झालंय”

कामगार असणारा ताहिर अहमद बाबा सांगतो की त्याने आतापर्यंत भारताच्या किती तरी शहरात तात्पुरत्या कामासाठी प्रवास केलाय पण आता मात्र त्याला काश्मीरच्या बाहेर जाण्याची भीती वाटू लागलीये


सफरचंदांची तोडणी करणारे आणि पॅकिंग करणारे सांगतात की या सगळ्या संकटात त्यांच्या रोजगारात ४०-५० टक्क्यांची घट झालीये – दिवसाकाठी ५००-६०० रुपयांवरून २५०-३०० रुपये

बडगममध्ये खाजगी शाळेत बसचालक असणाऱ्या अब्दुल रशीद याला ऑगस्टपासून, जेव्हा शाळा बंद झाल्या, त्याचा पगार मिळालेला नाही. “माझ्यासारखे कामकरी वर्गातले लोक कसे जगू शकणार आहेत?” तो विचारतो. “त्यामुळे मग आम्ही इथे आलोय, काही तरी कमाई करायला लागेल ना”

बडगमच्या हुरू गावातल्या एका शाळेत चालक म्हणून काम करणाऱ्या बसीर अहमद यांनाही ऑगस्टपासून पगार मिळालेला नाही. त्यामुळे तेदेखील काही तरी कमाई होईल या आशेने बागेत आले आहेत. “हे काही आमचं काम नाही – दुसऱ्यापुढे हात पसरल्यासारखं आहे हे,” ते म्हणतात. “झाडावर चढणं आम्हाला जिकिरीचं वाटतं, पण सध्याच्या परिस्थितीत आमच्यासमोर दुसरा पर्याय नाही”

बसित अहमद भट याने डेहराडूनमधील कॉलेजमधून प्राणीशास्त्र विषयात पदवी घेतली आहे. तो म्हणतो की सध्याच्या अनिश्चिततेच्या वातावरणात त्याला नोकरी शोधणं – किंवा मिळणं – शक्य नाही. तो त्याच्या वडलांच्या बागेत परतला होता आणि माझी त्याची गाठ पडली तेव्हा तो मजुरांना फळं तोडायला मदत करत होता.

अनेक कश्मिरी व्यापाऱ्यांनी मला सांगितलं की दिल्लीतले व्यापारी त्यांना भाव पाडून माल विकायला लावत आहेत, ज्यामुळे त्यांचा प्रचंड तोटा होतोय. अधिकारी हेच सांगतायत की ते अधिकृत योजनांखाली फळ विकत घेतायत, पण सगळे बाजार, अगदी श्रीनगरच्या बाहेर असणारा बाजारही अजून बंद आहे. हरताळ असल्यामुळे तसंच बाजारात माल नेला तर दहशतवादी किंवा अज्ञान बंदूकधारी हल्ला करतील या भीतीने माल बाजारात नेला जात नाहीये – आणि इथे बाजार म्हणजे शासनाचं प्रतीक आहे
अनुवादः मेधा काळे