तिने रात्रीचं जेवण आटोपलं, पण रोजसारखं टीव्ही बघायचा नाही, असं ठरवलं. मुलांनी आज व्हेजिटेबल्स इन शेझवान सॉस विथ राईसची फर्माईश केली होती. आज सकाळी भाजीवाल्याकडे लाल किंवा पिवळी शिमला मिरची नव्हती. "मंडी बंद कर दिया, मॅडम. लॉकडाऊन तो हैं ही, उपर से कर्फ्यू. सब्जी कहाँ से लाए? ये सब्जी भी अभी खेत से लेके आते हैं," गाडीवर त्याच त्या भाज्या घेऊन येतो अशी तिने तक्रार केली, तेंव्हा त्या भाजीवाल्याने आपली व्यथा मांडली.
जीवन आपली
कशी परीक्षा पाहतंय, यावर तो बरंच काही बोलत राहिला, पण तिने ऐकणं थांबवलं होतं. तिचं डोकं रात्रीचं जेवण मागणीनुसार कलात्मकतेने
कसं बनवता येईल, यात लागून होतं. दिवसाअखेरीस चायनीज-थाई ग्रेव्हीबरोबर कोकची सोय केल्याने मुलांनी
कुरकुर केली नाही, त्यामुळे तिला आनंद झाला. पण, गेले काही दिवस तिला टीव्ही पाहून बरं वाटत नव्हतं.
वृत्तवाहिन्यांचा तिला प्रचंड तिटकारा होता. पडद्यावर तेच ते चित्र वारंवार दाखवत राहतात. झोपडपट्ट्यांमध्ये पाणी न मिळणारे गरीब लोक, संरक्ष साहित्याशिवाय काम करणारे सफाई कर्मचारी, आणि त्याहून वाईट - घरी जाताना मध्येच किंवा शहरांमध्ये अडकून पडलेले लाखो उपाशी स्थलांतरित लोक, औषधोपचार आणि अन्नाअभावी मरून पडताहेत, काही जण आत्महत्या करताहेत आणि कित्येक लोक आंदोलन करीत, मागण्या करीत, रस्त्यावर दंगे करीत आहेत.
सैरावैरा पळणाऱ्या वाळवीसारखं हे दृश्य कोणी किती वेळ पाहू शकेल? ती आपलं लक्ष परत व्हॉट्सॲपमध्ये घालते, जिथे तिच्या एका ग्रुपमधील मैत्रिणी आपल्या नवलाईच्या पाककलेचं प्रदर्शन करताहेत. तीही आपल्या डिनर टेबलवरून एक फोटो काढून पाठवते. दुसऱ्या ग्रुपमध्ये लोक मुंबईच्या ब्रीचकँडी क्लबजवळील समुद्रात बागडणाऱ्या डॉल्फिन्सचे, नवी मुंबईत आलेल्या बगळ्यांचे, कोळीकोड मधील रस्त्यांवर फिरणाऱ्या मलबार उदमांजराचे, चंदिगढमधील सांभरचे व्हिडीओ शेअर करीत आहेत. अचानक, तिला आपल्या मोबाईलवर चढून येणाऱ्या लाल मुंग्यांची एक रांग दिसून येते…
या कवितेसोबत असलेली चित्रे ही एका कलाकाराच्या मनातील 'मुंग्यांची' चाल आहे. ती कलाकार म्हणजे लाबोनी जांगी. ही एक स्वयंभू चित्रकार असून सेंटर फॉर स्टडीज इन सोशल सायन्सेस, कोलकाता येथून मजुरांच्या स्थलांतरावर पीएच. डी. करतेय
स्वयंपाकघराच्या दरवाजाखालील
उजव्या कोपऱ्याशी असलेल्या
एका लहानशा घोळक्यातून निघाल्या
एका सरळ रांगेत
अगोदर वर
नंतर डावीकडे,
नंतर खाली
आणि पुन्हा एका सरळ रांगेत
स्वयंपाकघराच्या ओट्यालगत
ह्यांची चाल
एका मागोमाग एक
शिस्तीत काम करत्या मजुरांसारखी
त्यांचा वावर नेहमीचाच
आईच्या हातून थोडी साखर सांडली
किंवा फरशीवर
एखादं झुरळ मरून पडलं असेल तेंव्हा
एकेक दाणा किंवा
अख्खा मुडदा
ओढून नेणाऱ्या
मुंग्यांचं ते शिस्तबद्ध चालणं
तिला उबग आणायचं.
आई मदतीला धावत येईस्तोवर
ती घर डोक्यावर घेई.
आज जणू काही हिशेब चुकता करायला
त्या तिच्या घरावर चाल करून गेल्या
तिला आश्चर्य वाटलं
रात्री अपरात्री
दुःस्वप्नवत्
असंख्य लाल मुंग्या
तिच्या घरी कशा काय!
ना रांग
ना क्रम
ना शिस्त
आईने वारुळावर
गॅमाक्सीन पावडर भुरभुरली
की कसे घोळकेच्या घोळके
बाहेर पडत --
सैरभैर, गोंधळलेल्या,
श्वास घेण्यास आसुसलेल्या
त्यांनी आज तिच्या घराचा ताबा घेतला.
ती चटदिशी त्यांना घालवून लावते
बैठकीच्या बाहेर
दूर अंगणात
आणि दार पक्कं बंद.
पण तेवढ्यात
त्या परततात
एकाच वेळी लक्ष लक्ष
खिडकीच्या चौकटीतून
दाराच्या फटीतून
जी काही केल्या दिसत नाही
दाराला गेलेल्या तड्यांतून
मुख्यद्वाराच्या कुलुपाच्या भोकातून
न्हाणीघराच्या जाळीतून
पांढऱ्या सिमेंटमधील भेगांतून
दोन फरशांमधून
स्विचबोर्डच्या मागून
ओल पडलेल्या भिंतींच्या खाचांतून
केबलमधील पोकळीतून
कपाटातील अंधारातून
पलंगाखालच्या रितेपणातून
पीडित मुंग्यांचे घोळके मोकाट सुटलेत
आपल्या घराच्या शोधात
खंडित, नष्ट अन् उद्ध्वस्त
आपल्या जीवनाच्या शोधात
कुणाच्या बोटांमध्ये चिरडलेले
कुणाच्या पायदळी घुसमटणारे
भुकेले घोळके
तहानलेले घोळके
रागावलेले घोळके
लाल दंश करणारे
श्वासासाठी तडफडणाऱ्या
लाल मुंग्यांचे घोळके.
ध्वनी: सुधन्वा देशपांडे हे जन नाट्य मंचाशी निगडित अभिनेता व दिग्दर्शक आहेत आणि लेफ्टवर्ड बुक्समध्ये संपादक आहेत.
अनुवाद: कौशल काळू