“माझ्या मुलींचं आयुष्य असं नसावं,” विसालाच्ची सांगते. बोलता बोलता समोरच्या चमचमत्या मासळीच्या थरांमध्ये मीठ मिसळण्यासाठी ती खाली वाकते. ४३ वर्षांची विसालाच्ची गेली २० वर्षं तमिळ नाडूच्या किनाऱ्यावर असलेल्या कडलूर ओल्ड टाउन बंदरावर मासळी सुकवण्याचं काम करतीये.
“मी एका भूमीहीन दलित कुटुंबामध्ये लहानाची मोठी झालीये. माझे आई-वडील भातेशतीतले शेतमजूर होते. दोघांनी शिक्षण घेतलंच नव्हतं,” ती सांगते. वयाच्या १५ व्या वर्षी विसालाच्चीचं सक्तीवेलशी लग्न झालं. त्यानंतर दोनच वर्षांत कडलूर जिल्ह्यातल्या भीमराव नगरमध्ये त्यांची मुलगी शालिनी जन्मली.
भीमराव नगरमध्ये शेतीत काम मिळेनासं झाल्यामुळे विसालाच्ची कामाच्या शोधात कडलूर ओल्ड टाउन बंदरावर येऊन पोचली. तेव्हा तिचं वय होतं १७. आणि तेव्हाच तिची भेट कमलवेणीशी झाली. तिनेच मासळी सुकवायचा धंदा काय असतो, त्यातलं कौशल्य तिला शिकवलं. आणि त्यानंतर हे काम विसालाच्चीने आयुष्यभर केलं.
मासळी सुकवणं हा मासे साठवणीतला सगळ्यात जुना प्रकार आहे. यामध्ये खारवणे, स्मोक करणे आणि लोणचं घालणे अशा विविध प्रक्रियांचा समावेश होतो . कडलूर जिल्ह्यात ५,००० मच्छीमार स्त्रिया सध्या मासळीच्या धंद्यात आहेत. त्यातल्या १० टक्के मासळी सुकवणं, क्युअर करणं, मासळी सोलणं अशी कामं करत असल्याचं २०१६ साली झालेल्या सागरी मासे व्यवसाय जनगणनेतून दिसून आलं आहे. कोचीच्या केंद्रीय सागरी मासे व्यवसाय संशोधन संस्थेने ही गणना केली होती. मत्स्यव्यवसाय विभागानुसार २०२०-२१ साली तमिळ नाडूत मासे व्यवसायात कार्यरत असलेल्या स्त्रियांची संख्या २.६ लाख इतकी होती.

उन्हात सुकत घातलेल्या मासळीपाशी उभी असलेली विसालाच्ची. मासळी सुकवणं हा मासे साठवणीतला सगळ्यात जुना प्रकार आहे. यामध्ये खारवणे , स्मोक करणे आणि लोणचं घालणे अशा विविध प्रक्रियांचा समावेश होतो


डावीकडेः विसालाच्ची माशामध्ये मीठ ओत तायत . मत्स्यव्यवसाय विभागानुसार नाडूत मासे व्यवसायात कार्यरत असलेल्या स्त्रियांची संख्या २ . ६ लाख होती ( २०२० - २१ ). उजवीकडेः कडलूर ऑल्ड टाउन बंदरावर मासळी सुकवण्याचं काम सुरू आहे
विसालाच्चीने हे काम सुरू केलं तेव्हा तिची गुरू कमलवेणी चाळिशीत होती आणि माशाचा लिलाव, विक्री आणि सुकवण्याच्या धंद्यात तिचा नीट जम बसला होता. तिच्याकडे २० बाया कामाला होत्या आणि विसालाच्ची त्यातलीच एक. विसालाच्ची पहाटे ४ वाजता बंदरावर पोचायची आणि संध्याकाळी घरी यायला ६ वाजायचे. तेव्हा तिला २०० रुपये मजुरी मिळत होती. कामगारांना नाश्ता, चहा आणि जेवण दिलं जायचं.
*****
२००४ साली त्सुनामी आली. सगळंच बदलून गेलं. विसालाच्चीचं आयुष्यही. “माझा रोजचा पगार त्सुनामीनंतर ३५० रुपये झाला, माशाचं उत्पादनही वाढलं.”
मासे
व्यवसायात झपाट्याने वाढ झाली. रिंग सिएन जाळी वापरून मासेमारी सुरू झाल्याने एका
वेळी जास्त मासळी घावायला लागली. मासेमारीच रिंग सिएनचा वापर मोठ्या प्रमाणावर
केला जातो. यामध्ये गोल जाळी टाकून चहुबाजूंनी वेढा घालून मासे धरले जातात. ही
पद्धत वेरली, मांदेली, बांगडा आणि तेल्या टारलीसाठी वापरली जाते. १९९० च्या दशकात
कडलूर जिल्ह्यात रिंग सिएन अतिशय लोकप्रिय झालं. वाचाः
वेणी
‘बिनधास्त बाई’ कशी झाली त्याची गोष्ट
.
“काम जास्त होतं, नफा जास्त होता आणि मजुरीही,” विसालाच्ची सांगते. “कमलवेणी आम्हाला फार आवडायची. ती स्वतः दिवसभर सगळं काम करायची – लिलाव असू दे, विक्री असू दे किंवा कामगारांवर देखरेख. सगळं स्वतः करायची.”
विसालाच्ची कमलवेणीच्या अगदी विश्वासातली होती. बाहेर जाताना ती मासळी सुकवण्याच्या शेडच्या किल्ल्या विसालाच्चीकडे देऊन जायची. “रजा वगैरे काही नाही. पण आम्हाला फार आदराची वागणूक मिळायची,” विसालाच्ची सांगते.
मासळीच्या किंमती वाढू लागल्या आणि रोज लागणाऱ्या वस्तूंच्याही. सक्तीवेल पाण्याच्या टँकरवर काम करायचा. त्याला दिवसाला ३०० रुपये मिळायचे. ते काही पुरायचे नाहीत. दोघी मुली, शालिनी आणि सौम्या शाळेत जात होत्या. खर्चाचा मेळ घालणं मुश्किल झालं होतं.

विसालाच्ची आणि तिच्यासोबतची एक कामगार नुकतीच विकत घेतलेली मासळी घेऊन जातायत. ती रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगार बायांना ३०० रुपये मजुरी, चहा आणि जेवण देते

विसालाच्ची विकत घेतलेला बाजार नीट बघून घेतीये. ३-४ किलो ताज्या मासळीपासून किलोभर सुकट तयार होतं
“कमलवेणी मला खरंच फार आवडायची पण कसं होत होतं, नफा कितीही असू दे, मला फक्त रोज मजुरीच मिळत होती,” विसालाच्ची सांगते. आणि पुढे काय पाऊल उचललं त्याकडे निर्देश करते.
याच सुमारास विसालाच्चीने स्वतःच मासळी विकत घेऊन सुकवून विकण्याचं ठरवलं. कमलवेणी कुठे तरी प्रवासात असताना तिला विसालाच्चीचे स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे उद्योग कळले. तिने तिला लगेचच कामावरून काढून टाकलं. ती सलग १२ वर्षं हे काम करत होती.
आता मुलींच्या शाळेची वर्षाची ६,००० रुपये फी भरणं अशक्य झालं. कुटुंबाच्या खस्ता वाढल्या.
महिनाभराने तिची गाठ मासे व्यापारी कुप्पमाणिक्कम यांच्याशी पडली. त्यांनी तिला बंदरावर परत बोलावलं. तिला सुकवण्यासाठी पाटीभर मासळी दिली आणि त्यांच्या शेडमधली थोडी जागा फुकट वापरायलाही दिली. पण कमाई काही जास्त नव्हती.
२०१० साली विसालाच्चीने या धंद्यात उतरायचं ठरवलं. तिने गावातल्याच एका नावेच्या मालकाकडून दररोज २००० रुपयांची मच्छी उसनी घ्यायला सुरुवात केली. आता तर काम आणखीच खडतर झालं. तिला बंदरावर ३ वाजताच यावं लागत असे. मासळी घ्यायची, सुकवण्याचं काम करायचं, विकायची आणि रात्री ८ वाजेपर्यंत घरी परतायचं. विसालाच्चीने महिला बचत गटाकडून ३०,००० रुपये कर्जही घेतलं. वर्षाला ४० टक्के व्याजदराने. दोन वर्षांत फेडण्याच्या बोलीवर. बचत गटाच्या कर्जाचे व्याजदर जास्त असले तरी खाजगी सावकारांपेक्षा कमीच म्हणायचे.
कुप्पमाणिकम बरोबरही थोडे खटके उडायला लागले. मासळी सुकवण्यासाठी ती त्याच्याच शेडमधली थोडी जागा वापरत होती. “पैशावरून वाद होते. त्याने मला किती मदत केली हे तो सारखं सारखं मला आठवण करून द्यायचा,” ती सांगते. विसालाच्चीने सुकट ठेवण्यासाठी स्वतःच १००० रुपये महिना भाड्याने शेड घेण्याचं ठरवलं.


विसालाच्ची (डावीकडे) शेडमधून सुकट भरून ठेवण्यासाठी एक क्रेट घेऊन येतीये. तिच्या हाताखाली काम करणाऱ्या दोघी कामगारांसोबत जेवण झाल्यानंतर जराशी विश्रांती (उजवीकडे). २०२० साली तमिळ नाडू शासनाने रिंग सिएन मासेमारीवर बंदी घातली आणि त्यानंतर तिची कमाई खूपच खालावली. हाताखालच्या कामगारांना काढून टाकावं लागलं


डावीकडेः विसालाच्ची आणि तिचा नवरा सक्तीवेल (उभा) आणि एक कामगार मासळी साफ करून सुकवतायत. उजवीकडेः उन्हं उतरायला लागली की सक्तीवेल सुकलेले मासे गोळा करतात
स्वतःचं स्वातंत्र्य आणि व्यवसाय हे दोन्ही टिकवून ठेवण्यासाठी विसालाच्चीला आजूबाजूच्या लोकांच्या खूप शिव्याशाप खावे लागले आहेत. कडलूरमध्ये पट्टनवर आणि पार्वदराजकुलम हे दोन्ही समुदाय सर्वात मागासवर्गीय (एमबीसी) या प्रवर्गात येतात. आणि माशाच्या धंद्यावर त्यांचाच ताबा आहे. विसालाच्ची दलित आहे. “मच्छीमारांना वाटायचं ते मला त्यांच्या बंदरावर माझा धंदा करू देतायत म्हणजे जणू काही माझ्यावर उपकारच करतायत. ते वाटेल ते बोलतात आणि ते माझ्या मनाला लागायचं,” विसालाच्ची सांगते.
खरं तर मासळी सुकवायचं काम तिने एकटीनेच सुरू केलं पण नंतर तिचा नवराही तिला मदत करू लागला. धंदा वाढत गेला तसं विसालाच्चीने दोन बाया हाताखाली घेतल्या. ती त्यांना ३०० रुपये रोज, चहा आणि जेवण देत असे. मासळी भरून ठेवणं आणि नंतर सुकण्यासाठी परत उन्हात पसरून ठेवणं हे त्यांचं काम. मासे खारवण्यासाठी आणि पडेल त्या कामासाठी ३०० रुपये रोजावर तिने एका मुलालाही कामावर ठेवलं.
रिंग सिएन जाळ्याने मासे धरणाऱ्यांकडून मुबलक मासळी मिळत असल्याने विसालाच्ची आठवड्याला ८,००० ते १०,००० रुपये कमावू शकत होती.
सौम्या या आपल्या धाकट्या मुलीला नर्सिंगच्या कोर्सला टाकणं तिला शक्य झालं, थोरल्या शालिनीने रसायनशास्त्रात पदवी मिळवली. त्यांच्या लग्नाचा खर्चही विसालाच्चीच्या कमाईतूनच झाला.
*****
विसालाच्ची आणि तिच्यासारख्या इतर अनेकांना रिंग सिएन मासेमारीमुळे भरभराट पहायला मिळाली असली तरी या प्रकारच्या मासेमारीमुळे माशांचा बेसुमार उपसा झाल्याचा अनेक शास्त्रज्ञांचं आणि परिस्थितिकी तज्ज्ञांचा दावा आहे. त्यामुळे अशा मासेमारीवर बंदी यावी यासाठी मोठा संघर्ष झाल आहे. पर्स सिएन जाळ्यांचा, ज्यामध्ये रिंग सिएन जाळ्यांचा वापर २००० सालापासूनच अवैध असला त्याची अंमलबजावणी फार काटेकोरपणे कधीच केली गेली नव्हती. २०२० साली तमिळ नाडू शासनाने मासेमारीसाठी मोठ्या जाळ्यांच्या वापरावर बंदी आणेपर्यंत तर नाहीच.

विसालाच्ची खारवलेले मासे सुकवण्यासाठी एका क्रेटमध्ये ठेवतायत

मासे खारवण्यासाठी विसालाच्चीला मदत करणारा एक मुलगा
“आम्ही चांगला पैसा कमावत होतो. आता मात्र फक्त हाता-तोंडाची गाठ आहे,” विसालाच्ची म्हणते. बंदीमुळे फक्त तिचंच नाही तर एकूणच मच्छीमार समुदायाचं किती नुकसान झालंय ते विसालाच्ची सांगते. आता रिंग सिएन बोटी असणाऱ्या नाव मालकांकडून मासे विकत घेणंच थांबलं. ते खराब झालेली किंवा उरलेली मासळी तिला स्वस्तात विकायचे.
आता विसालाच्चीसमोर चढ्या भावाने मासळी विकणाऱ्या ट्रॉलर बोटी एवढाच पर्याय उरला आहे. एप्रिलच्या मध्यापासून ते जूनपर्यंत माशांच्या विणीच्या काळात या बोटी मासेमारी करत नाहीत. तेव्हा मात्र आणखी चढ्या भावाने मासे विकणाऱ्या फायबर बोटींशिवाय पर्यायच राहत नाहीत.
जर मासळी मिळत असेल आणि हंगाम चांगला असेल तर तिला आठवड्याला ४,००० ते ५,००० रुपये मिळतात. खापी आणि सौंदाळे सुकवणं यातलंच एक काम. सुक्या खापीला किलोमागे १५० ते २०० रुपये भाव मिळतो तर सौंदाळ्याला थोडा जास्त, २०० ते ३०० रुपये. ३-४ किलो ओली मासळी सुकवली तर त्यापासून १ किलो सुकट मिळते. ओली खापी आणि सौदाळ्याचा भाव अनुक्रमे ३० ते ७० रुपये किलो असतो.
“आम्ही १२० रुपये किलो भावाने मासळी घेतली तर ती आम्ही १५० रुपये किलो भावाला विकू शकतो. अर्थात बाजारात सुकटीची आवक किती होते त्यावर ते अवलंबून असतं. कधी कधी फायदा होतो, कधी कधी नुकसान,” तिची आर्थिक स्थिती कशी आहे ते विसालाच्ची सांगते.
आठवड्यातून एक दिवस ती टेंपो भाड्यावर घेते आणि सुकटीच्या दोन बाजारात माल घेऊन जाते – कडलूर आणि शेजारचा नागपट्टिणचा बाजार. ३० किलो सुकटीच्या एका क्रेटमागे २० रुपये वाहतूक खर्च येतो. दर महिन्याला किमान २० क्रेट माल तयार करण्याची तिची धडपड असते.


दिवसभराच्या कामाच्या रगाड्यानंतर विसालाच्ची घरी जरा निवांत बसलीये. दिवसभरात कामच इतकं असतं की स्वतःसाठी निवांत असा वेळ तिला कमीच मिळतो


विसालाच्ची आणि सक्तीवेल आपल्या घराबाहेर (उजवीकडे). सक्तीवेल तिच्या व्यवसायात तिला मदत करतात. आपल्या दोघी मुलींचं शिक्षण आणि लग्नाचा खर्च स्वतःच्या पैशातून करता आला याचं विसालाच्चीला समाधान आहे. आता मात्र तिच्या डोक्यावरचा कर्जाचा बोजा वाढत चालला आहे
रिंग सिएन मासेमारीवर बंदी आल्यानंतर मासळीचा खरेदीचा भाव वाढला आहे, मीठ, वाहतूक, गोण्या अशा सगळ्याच खर्चात वाढ झाल्याने तिचा खर्च वाढत चालला आहे. तिच्या कामगारांच्या मजुरीतही वाढ होऊन ३५० रुपये झाली आहे.
पण विसालाच्चीवरचं ८०,००० रुपयांचं कर्ज (एप्रिल २०२२) आणि सुकटीला मिळणारा भाव यांचा मात्र काहीच ताळमेळ नाही. यातले ६०,००० ताजी मासळी उधार देणाऱ्या नाव मालकाला परत करायचे आहेत आणि बाकी बचत गटाकडून घेतलेलं कर्ज आहे.
२०२२ च्या ऑगस्टपर्यंत विसालाच्चीने हाताखालचे कामगार कमी केले होते आणि धंदाही. “आता मीच मासे खारवण्याचं काम करते. मी आणि माझा नवरा दोघं मिळूनच धंद्याचं सगळं पाहतोय. लागलीच तर कधी कुणाची मदत घ्यायची. सध्या आम्हाला दिवसातून फक्त चार तास आराम मिळतो,” ती सांगते.
विसालाच्चीला एकाच गोष्टीचं समाधान आहे. ती म्हणजे ती शालिनी, वय २६ आणि सौम्या, वय २३ या आपल्या दोघी मुलींना शिकवू शकली आणि त्यांची लग्नांचा खर्चही स्वतःच्या पैशातून करू शकली. पण धंद्याला लागलेली उतरती कळा तिच्यासाठी चिंतेचा विषय ठरली आहे.
“संकटच आहे. आणि कर्जाचा बोजा वाढत गेलाय,” ती सांगते.
२०२३ साली जानेवारी महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने काही अटी आणि शर्तींच्या अधीन राहून पर्स सिएन मासेमारीला परवानगी देण्याचा निवाडा दिला. हा थोडा दिलासा असला तरी त्यामुळे आपलं नशीब पालटणार का याची विसालाच्चीला शंकाच आहे.
व्हिडिओ पहाः कडलूर मासेमारी बंदरावर स्त्रियांची विविध कामं
सहाय्यः यू. दिव्यायुथिरन