“आम्ही एक वेळ उपाशी राहू, पण आम्ही आमच्या पक्षाचे झेंडे घेऊन बाहेर पडणारच. जायलाच पाहिजे. आमच्यापाशी पर्यायच नाहीये,” तालुपुरूमध्ये एम. नारायणस्वामी सांगतात. अनंतपूर जिल्ह्याच्या रापताडू विधानसभा मतदार संघात येणाऱ्या त्यांच्या गावी ते रेशन दुकान चालवतात. आज - ११ एप्रिलपर्यंत ज्या प्रकारे निवडणुकांचा प्रचार चालू आहे त्याबद्दल ते बोलतायत. लोकसभा आणि विधानसभा अशा दोन्हीसाठी आज राज्यात मतदान होणार आहे. लोक काय विचार करतायत, ते कसं काय मतदान करणार आहेत आणि कुणाला मत देणार आहेत आणि का हे सगळं ते बोलतात.

इथे बरचसं लक्ष आणि चर्चा आहे ती दोन विधानसभा जागांची – रापताडू आणि पुलिवेंदुला हे अनुक्रमे हिंदूपूर आणि कडपा लोकसभा मतदार संघात येतात.

रापताडूमध्ये लढा आहे सत्ताधारी तेलुगु देसम पक्षाचे पारिताला श्रीराम आणि वायएसआर काँग्रेस पक्षाचे थोपूदुर्थी प्रकाश रेड्डी यांच्यामध्ये. २००९ आणि २०१४ साली रेड्डी श्रीराम यांच्या आई पारिताला सुनीता यांच्याकडून पराभूत झाले होते. पुलिवेंदुलामध्ये वाएसआर काँग्रेसचे नेते जगनमोहन रेड्डी तेलुगु देसमच्या कुमार रेड्डींच्या विरोधात उभे आहेत. जगनमोहन यांच्याकडे अनेक जण भावी मुख्यमंत्री म्हणून पाहत आहेत आणि त्यांचंच पारडं भारी आहे.

हिंदूपूर लोकसभा मतदारसंघात तेलुगु देसमच्या निर्मला किस्तप्पा आणि वायएसआर काँग्रेसचे गोरंटला माधव यांच्यात लढत आहेत. कडपा लोकसभा जागेसाठी वायएसार काँग्रेसचे विद्यमान खासदार वाय एस अविनाश रेड्डींची लढत त्यांचे मुख्य प्रतिस्पर्धी तेलुगु देसमचे आदिनारायण रेड्डी यांच्याशी होणार आहे.

पण, अनंतपूरच्या गावांमध्ये मात्र लोकांसाठी पक्ष आणि गटातटाशी असलेली निष्ठा उमेदवारांपेक्षा जास्त महत्त्वाची आहे. रापताडूमध्ये आम्ही ज्या गावकऱ्यांशी बोललो त्यांचं जास्त लक्ष हिंदूपूर लोकसभा लढतीपेक्षा विधानसभेच्या निवडणुकांवर होतं (अर्थात ते दोन्हींसाठी मतदान करणार आहेत). या मतदारसंघांमध्ये सगळीकडेच मतदरांना राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकांमध्येच जास्त रस असल्याचं चित्र होतं.

Bags with Chandrababu Naidu’s image, are given at ration stores in Andhra Pradesh.
PHOTO • Rahul M.
A farmer, who supports Naidu's TDP, watches as a TDP leader campaigns in Anantapur city
PHOTO • Rahul M.

डावीकडेः चंद्राबाबू नायडूंची छबी असणाऱ्या या पिशव्या आंध्र प्रदेशच्या रेशन दुकानांवर दिल्या जात आहेत. उजवीकडेः एक तेलुगु देसम समर्थक शेतकरी अनंतपूर शहरात पक्षाच्या प्रचार सभेत

अनंतपूरमध्ये, नारायणस्वामी आणि इतरांच्या मते तुमच्या वैयक्तिक समस्या आणि तुमच्या मतदारसंघाचे प्रश्न या दोन्हींपेक्षा तुमची (पक्ष)निष्ठा जास्त महत्त्वाची ठरते. या जिल्ह्यातल्या गावांमधले कार्यकर्ते किती तरी वेळा काम सोडतात, अर्धपोटी राहतात आणि ज्या पक्षांचे ते अनुयायी आहेत त्यांच्या प्रचारासाठी झोकून देतात.

“दर वेळी असे मोजके मतदार असतातच,” नारायणस्वामी सांगतात, जे कोणत्याच बाजूचे नसतात पण प्रत्येकाकडून काही ना काही उकळायचा प्रयत्न करतात. “या अशा लोकांसाठी आमच्या शासनाने एक रुपयाचाही लाभ दिलेला नाही.” बाकी बहुतेक जण पक्ष, गटतट आणि जातीच्या आधारावर मत देण्याची शक्यता आहे. नारायणस्वामी स्वतः तेलुगु देसमचे निष्ठावान कार्यकर्ते आहेत.

या निष्ठा – गटतट, राजकीय आणि अगदी सिने अभिनेत्यांची भक्ती – समजून घेणं अनंतपूरची माहिती नसणाऱ्यांना अवघडच आहे. या सगळ्यातून तयार होणाऱ्या गटबाजीमुळे या जिल्ह्याला राजकीय वैर आणि हिंसेचाही इतिहास प्राप्त झाला आहे. इथले मतदार काही भोळेभाबडे नाहीत किंवा त्यांना त्यांच्या मतदारसंघाचे, भागाचे प्रश्न माहित नाहीत असंही नाही. तरीही त्यातले बहुतेक जण त्या आधारे मतदान करत नाहीत. त्यांच्या निष्ठाच मतदानासाठी महत्त्वाच्या ठरतात.

अनंतपूरमध्ये तुमची निष्ठा हाच तुमच्यासाठी मुद्दा असतो.

रायलसीमा (अनंतपूरचाही समावेश याच प्रदेशात होतो) भागातल्या अनेक गावांची हीच कहाणी आहे. निवडणुकीच्या वर्षात तर अधिकच. तेलुगु देसमच्या काळात इथल्या कल्याणकारी कार्यक्रमांची स्थिती या राजकीय निष्ठांनीच ठरवली आहे. इतर पक्षांच्या कार्यकाळातही हे घडलं – पण गेल्या पाच वर्षात अधिकच भेदकपणे पुढे आलं. आता असेही काही आहेत ज्यांनी तेलुगु देसमला पाठिंबा दिला पण तरीही त्यांना काही फारसा लाभ मिळालेला नाही. पण तरीही त्यांची निष्ठा त्याच पक्षाशी आहे. इतर काही, जसे एखाद्या सिने अभिनेत्याचे कट्टर चाहते, तो जे राजकीय वळण घेईल त्याच्या मागे जाऊ शकतात. आणि इतर काही जातीपातीवर आधारित गटांच्या पाठीशी उभे राहू शकतात.

A TDP admirer in Anantapur is excited about an N. T. Rama Rao biopic.
PHOTO • Rahul M.
A poster of the biopic features Paritala Sunitha and Paritala Sreeram and other TDP leaders
PHOTO • Rahul M.

आंध्र प्रदेशात गटातट, राजकारण, सिने अभिनेत्याची भक्ती आणि अगदी जातही तुमची निष्ठा ठरवू शकते. डावीकडेः अनंतपूरमधला एक तेलुगु देसम समर्थक एन टी रामा राव यांच्या जीवनपटावर एकदम खूश आहे. उजवीकडेः या चित्रपटाच्या पोस्टरवर पारिताला सुनीता व पारिताला श्रीराम आणि तेलुगु देसमच्या इतर नेत्यांना स्थान मिळालं आहे.

सत्ताधारी तेलुगु देसम पक्षांतर्गतही या निष्ठा काम करत असतात. रापताडू मतदारसंघातला तेलुगु देसमचा एक छोटा नेता सध्या नाराज आहे कारण त्याला अतिशय निकड असतानाही त्याच्या पक्षाने त्याला कर्ज मिळण्यात मदत केली नाही. पक्षामध्ये या गटबाजीमुळे सत्ता कशी काम करते आणि लाभही कसे मिळतात याकडे कार्यकर्ते बोट दाखवतात. जे निष्ठा आणि जात या दोन्ही अक्षांवर नेतृत्वाच्या जवळचे आहेत त्यांना सर्वाधिक लाभ होतात. मात्र यामध्ये पक्षातले इतर भरडले जातात हेही खरंच.

“त्याला [पक्षाचा छोटा नेता] हवं असलेलं कर्ज मिळाल्यात जमा होतं. मात्र अखेर ते मंजूर झालं नाही. पण या अशा सगळ्या गोष्टींचा विचार करत बसणं बरोबर वाटतं का, सांगा,” तेलुगु देसमचा एक कार्यकर्ता सांगतो. अनेकदा सरकारी कर्ज मंजूर होणार का नाही हे अर्जदाराचे कोणाशी कसे लागेबांधे आहेत त्यावर ठरत असतं.

गेल्या अनेक वर्षांपासून रापताडू हा तेलुगु देसम पक्षाचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र राज्यात सत्तापालट झाला तर या गावाची समीकरणं बिघडू शकतात. २००४ साली विधानसभा निवडणुकांमध्ये तेलुगु देसमचा पराभव झाल्यानंतर इथल्या आमदार पारिताला सुनीता यांचे पती पारिताला रवींद्र यांची भर दिवसा हत्या करण्यात आली होती.

गेल्या चार दशकांहून अधिक काळ वैर असणाऱ्या घराण्यांमधल्या गटातटाच्या युद्धाचा परिपाक म्हणजे ही हत्या. दोन पिढ्या चाललेल्या या सूडनाट्यावर राम गोपाल वर्मांनी दोन भागांचा एक सिनेमा बनवला – रक्त चरित्र. हत्या झालेले आमदार पारिताला रवींद्र यांच्यावर बेतलेल्या पात्राचा खून होतो आणि लगेचच एक बाळ जन्माला येतं आणि तिथेच हा चित्रपट संपतो. मजा म्हणजे, पारितालांचा मुलगा श्रीराम रापताडू मतदारसंघातून तेलुगु देसमच्या तिकिटावर आता आंध्राच्या राजकारणात प्रवेश करत आहे.

YSRCP activists in a village in Raptadu constituency
PHOTO • Rahul M.
YSRCP activists in a village in Raptadu constituency
PHOTO • Rahul M.

रापताडू मतदारसंघात वायएसार काँग्रेसचे कार्यकर्ते

स्वातंत्र्यानंतरचा रायलसीमा प्रदेशाचा राजकीय इतिहास खून आणि हिंसेने व्यापलेला आहे. केवळ निष्ठा आणि गटबाजीमुळे अनेकांचे खून पडले (अनेकांनी खून केले). वायएसआर काँग्रेसचे जगनमोहन रेड्डी यांच्या कडपा (२०१० साली याचं नामकरण वायएसआर करण्यात आलं) जिल्ह्यातही गटातटाचं युद्ध आहेच. जगनमोहन हे दिवंगत मुख्यमंत्री वाय एस राजशेखर रेड्डी (वायएसआर म्हणून लोकप्रिय) यांचे पुत्र. वायएसआर २००९ साली अपघातात वारले. काँग्रेसमधून बाहेर पडून जगनमोहन यांनी स्थापन केलेला वायएसआर काँग्रेस पक्ष आंध्र प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीत तगडा दावेदार समजला जात आहे.

अगदी सत्ताधीशांनाही हत्येपासून सुटका नाही. वायएसआर यांचे वडील वाय एस राज रेड्डींचा १९९९ साली खून झाला होता. १९९३ मध्ये तत्कालीन आमदार असलेल्या एका माजी मंत्र्यालाच या खुनाच्या आरोपाखाली खटला भरून दोषी ठरवण्यात आलं होतं मात्र नंतर उच्च न्यायालयाने त्याची सुटका केली. या वर्षी मार्च महिन्यात वायएसआर यांचे बंधू विवेकानंद रेड्डींचा पुलिवेंदिला इथे राहत्या घरी खून करण्यात आला. जगनमोहन रेड्डी या मतदार संघाचे विद्यमान आमदार आहेत आणि या वेळी देखील ते इथूनच लढणार आहेत.

कडपा लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार वायएसआर काँग्रेसचे अविनाश रेड्डी २०१४ साली तेलुगु देसमच्या प्रतिस्पर्ध्याचा २ लाख मतांनी पराभव करून जिंकून आले होते. २०११ साली हीच जागा जगनमोहन रेड्डी यांनी काँग्रेसच्या उमेदवाराचा विक्रमी ५,५०,००० मतांनी पराभव करून जिंकली होती. मात्र या वेळी (कडपा मतदारसंघातील) पुलिवेंदुला जागेबद्दल लोकांना जास्त उत्सुकता आहे.

At the entrance to Talupuru village.
PHOTO • Rahul M.
TDP/YSRCP campaign autos in Anantapur city
PHOTO • Rahul M.

डावीकडेः तालुपुरू गावाच्या वेशीपाशी. उजवीकडेः अनंतपूरमध्ये तेलुगु देसम/वायएसआर काँग्रेस च्या प्रचाराच्या रिक्षा

रायलसीमामध्ये होणाऱ्या हत्यांनी इथे कधी कधी सत्तापालट झालेले पाहिले आहेत. हातून सत्ता गेल्यास सूडाचं राजकारण होऊ शकेल त्यांची अनंतपूरमधल्या अनेक तेलुगु देसम कार्यकर्त्यांना धास्ती वाटत आहे. ज्या निष्ठांनी त्यांचं कल्याण केलं, त्यांना सत्ता मिळवून दिली त्याच निष्ठा आता त्यांच्यासाठी धोकादायक ठरू पाहतायत. वायएसआर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना मात्र या निवडणुकीबद्दल आत्मविश्वास आहे अर्थात ते सतर्कही आहेत. मी तेलुगु देसमचा समर्थक आहे असा एका वायएसआर काँग्रेस कार्यकर्त्याचा गैरसमज झाला आणि मी ‘चौकशी’ करत असल्याच्या संशयावरून त्याला पोलिसात माझी तक्रार करायची होती. रापताडू विधानसभा मतदारसंघातल्या वोडिपल्ली या आपल्या गावात शेतकऱ्यांच्या मुलाखती घेणं मी थांबवावं अशी त्या कार्यकर्त्याची मागणी होती.

असं असलं तरीही, वायएसआर काँग्रेस पक्षाला आपण विजयी होणार असा जो विश्वास वाटतोय त्याचं कारण म्हणजे कल्याणकारी आणि विकासाच्या कार्यक्रमापासून वंचित ठेवलेले मतदार. या मतदारांच्या कोणत्याही निष्ठा नाहीत.

आदिवासी समाजाचे टोपल्या विणणारे साके गंगण्णा हे कोणत्याही पक्षाचे किंवा गटाचे समर्थक नाहीत. रस्ता रुंदीकरणाच्या कामात त्यांची झोपडी गेली. एके काळी जिथे गंगण्णांची झोपडी होती त्याच्या समोरच्या बाजूलाच तेलुगु देसम समर्थकांना जागा देण्यात आली होती. “मी जेव्हा त्यांना सांगायला गेलो, ‘भाऊ मलाही जागा द्या’ तेव्हा त्यांनी स्पष्ट नकार दिला. त्यांनी सरळ सरळ सांगितलं की ते जागा देणार नाहीत.” गंगण्णा या वेळी वायएसआर काँग्रेसला मत देणार आहेत.

ते रोज बांबूच्या टोपल्या आणि इतर लाकडी वस्तू विकण्यासाठी ५० किमी प्रवास करतात. “आमचा व्यवसाय आमच्या हातातल्या कलेवर आहे. भाऊ, आमच्यापाशी काही जमीन नाही. राजकीय नेत्यांचं आम्हाला काही पडलेलं नाही. आम्ही कोणावरही टीका करू शकतो. वायएसआर काँग्रेसने जर चूक केली तर आम्ही त्यांनाही बोल लावू शकतो,” गंगण्णा सांगतात. गंगण्णांसारख्या शासकीय योजनांपासून दूर ठेवलेल्यांचीच मतंच कदाचित आंध्र प्रदेशात सत्तापालट करून दाखवू शकतील.

अनुवादः मेधा काळे

Rahul M.

Rahul M. is an independent journalist based in Andhra Pradesh, and a 2017 PARI Fellow.

Other stories by Rahul M.
Translator : Medha Kale
mimedha@gmail.com

Medha Kale is based in Pune and has worked in the field of women and health. She is the Translations Editor, Marathi, at the People’s Archive of Rural India.

Other stories by Medha Kale