“गेली २१ वर्षं मी शेती करतोय, हे असं संकट कधी पाहिलं नव्हतं,” चितरकाडू गावातले कलिंगडाचे शेतकरी, ए. सुरेश कुमार सांगतात. इथल्या इतर शेतकऱ्यांप्रमाणे ४० वर्षीय कुमार प्रामुख्याने भातशेती करतात, पण हिवाळ्यामध्ये त्यांच्या पाच एकर रानात आणि नातेवाईक आणि मित्रांकडून भाडेपट्ट्यावर घेतलेल्या १८.५ एकरात कलिंगडं घेतात. १८५९ वस्तीचं त्यांचं गाव तमिळ नाडूच्या चेंगलपट्टू जिल्ह्यातल्या चिथमूर तालुक्यात आहे.
“६५ ते ७० दिवसांत कलिंगडं तयार होतात. आमची सगळी तयारी झाली होती, आता फळं काढून तमिळ नाडू, बंगळुरु आणि कर्नाटकातल्या वेगवेगळ्या खरेदीदारांकडे माल पाठवायची तयारी सुरू होती आणि २५ मार्च रोजी टाळेबंदी जाहीर झाली,” ते सांगतात. “आता सगळा माल सडायला लागलाय. एरवी आम्हाला टनाला १०,००० चा भाव मिळतो, पण यंदा कुणीही २००० च्या वर भाव सांगत नाहीये.”
तमिळ नाडूमध्ये कलिंगडाची लागवड तमिळ कालगणनेनुसार मरगळी आणि थई महिन्यात म्हणजे इंग्रजी दिनदर्शिकेनुसार डिसेंबर ते फेब्रुवारी दरम्यान केली जाते. या भागात याच काळात फळांची वाढ चांगली होते. दक्षिणेकडचा उन्हाचा कडाका वाढायला लागला की फळं काढणीला येतात. कलिंगडं करणाऱ्या राज्यांच्या यादीत तमिळ नाडू आठव्या स्थानावर आहे – ६.९३ हजार हेक्टर जमिनीतून १६२.७४ टन फळाचं उत्पादन होतं.
“मी माझ्या रानात तुकड्या-तुकड्यामध्ये अशी लागवड केलीये की साधारणपणे दर दोन आठवड्याच्या अंतराने फळं तयार व्हावीत. फळ तयार झाल्यावर जर लगेच काढलं नाही तर ते वाया जातं,” कुमार सांगतात (शीर्षक छायाचित्रात) “आम्हाला या टाळेबंदीबद्दल काहीही सांगितलं गेलं नाही. त्यामुळे माझा माल तयार झाला [मार्चचा शेवटचा आठवडा], आणि गिऱ्हाईकच नाही ना माल वाहतुकीसाठी ट्रकचालकही नाहीत.”
कुमार यांच्या अंदाजानुसार चिथमुर तालुक्यात कलिंगडाची शेती करणारे ५० तरी शेतकरी असतील. आता अनेकांना फळ सडू द्यायचं किंवा कवडीमोल भावात विकायचं हेच त्यांच्यासमोरचे पर्याय आहेत.


डावीकडेः कोक्करंथंगल गावात एम. सेकर यांच्या रानातली तयार कलिंगडं. दागिने गहाण ठेवून त्यांनी हे रान भाड्याने घेतलंय. उजवीकडेः ए. सुरेश कुमार यांचं चिथरकाडू गावातलं रान, मार्चच्या अखेरच्या आठवड्यात त्यांच्या मालाला गिऱ्हाईकही नव्हतं आणि माल वाहून नेण्यासाठी ट्रक ड्रायव्हरही
काही शेतकऱ्यांनी तर कर्जही घेऊन ठेवलीयेत आणि आता हा असा फटका बसलाय. त्यांच्यातलेच एक आहेत चिथरकाडूपासून ३ किमीवर असणाऱ्या कोक्करंथंगल गावचे ४५ वर्षीय एम. सेकर. “मी माझ्या तीन मुलींच्या नावे ठेवलेले दागिने गहाण ठेवले आणि चार एकर रान भाडेपट्ट्यावर घेऊन कलिंगडाचं पीक घेतलंय,” ते सांगतात. “आणि आता माल हातात आलाय आणि गिऱ्हाईकच नाहीये. इतर पिकांसारखं थांबून चालत नाही. मी आता फळ लादून बाजारात धाडला नाही, तर माझं सगळं पीक पाण्यात जाणार.”
कुमार आणि सेकर दोघांनीही खाजगी सावकारांकडून अवाच्या सवा व्याजाने कर्जं काढली आहेत. आणि दोघांचा अंदाज आहे की त्यांनी प्रत्येकी ६-७ लाखाची गुंतवणूक केली आहे. यात जमिनीचं भाडं, बियाणं, पिकाची निगा आणि मजुरीचा खर्च समाविष्ट आहे. सेकर गेल्या तीन वर्षांपासून कलिंगड करत असले तरी कुमार गेल्या १९ वर्षांपासून या फळाची लागवड करतायत.
“मी या पिकाकडे वळलो कारण माझ्या मुलीच्या शिक्षणाचा, भविष्याचा विचार करता त्यातला पैसा कामी येईल,” सेकर सांगतात. “आता तर माझ्यापाशी दागिने देखील राहिलेले नाहीत. सगळा खर्च वजा जाता निव्वळ २ लाखांचा नफा झालाय. यंदा आमच्या गुंतवणुकीचा थोडाच मोबदला हाती येईल असं वाटतंय, नफ्याची तर बातच सोडा.”
कोक्करंथंगल गावचे आणखी एक कलिंगड शेतकरी एम. मुरुगवेल, वय ४१ म्हणतात, “हा इतका वाईट भाव मी मान्य करतोय त्याचं एकच कारण आहे, इतकं चांगलं फळ सडून जावं अशी माझी इच्छा नाहीये. माझं तर आधीच मोठं नुकसान झालंय.” मुरुगवेल यांनी कलिंगडाच्या लागवडीसाठी १० एकर जमीन भाडेपट्ट्याने कसायला घेतलीये. ते म्हणताता, “ही परिस्थिती अशीच चालू राहिली तर काय करायचं हेच मला कळत नाहीये. माझ्या गावात इतरही शेतकरी आहेत ज्यांनी अशाच प्रकारे गुंतवणूक केलीये आणि आता कुणीच गिऱ्हाईक त्यांचा माल खरेदी करू शकत नसल्यामुळे त्यांनी रानातच सगळं फळ सडू दिलंय.”


त्रिचीजवळील एक शेतकरी, ट्रकमध्ये कलिंगडं लादली आहेत. काही ट्रकमधून आता फळाची वाहतूक सुरू झालीये, पण शेतकऱ्यांना अगदीच कवडीमोल भाव मिळतोय
“आम्हाला शेतकऱ्यांचं दुःख समजतंय. टाळेबंदीचे पहिले दोन-तीन दिवस वाहतूक करणं फारच मुश्किल झालं होतं हे मला मान्य आह. आम्ही त्याबाबत लगेच पावलं उचलली आणि आता फळं राज्याच्या सगळ्या बाजारपेठांपर्यंत पोचतील आणि जेव्हा केव्हा शक्य असेल तेव्हा शेजारच्या राज्यात पोचतील यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत,” गगनदीप सिंग बेदी सांगतात. ते तमिळ नाडू कृषी खात्याचे कृषी उत्पन्न आयुक्त आणि मुख्य सचिव आहेत.
बेदींनी दिलेल्या आकडेवारीनुसार, चिथमूर तालुक्यातून २७ मार्च ते २ एप्रिल दरम्यान ९७८ मेट्रिक टन कलिंगड तमिळ नाडूच्या विविध बाजारांपर्यंत पोचवण्यात आलं आहे. ते म्हणतात, “काय कारण आहे मला माहित नाही, पण या संकटाच्या काळात कलिंगडाच्या विक्रीवरच प्रचंड परिणाम झालाय, आणि ही मोठीच समस्या आहे. आम्ही आमच्या परीने जे काही करता येईल ते सगळं करतोय.”
शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होणार आहे हे नक्की. राज्य शासन त्यांना त्याची भरपाई देणार का? “सध्या तरी आमचं सगळं लक्ष मालाची वाहतूक कशी सुरळित होईल यावर आहे,” बेदी सांगतात. “भरपाईचा विचार नंतर केला जाईल कारण तो एक राजकीय निर्णय आहे. या संकटातून शेतकरी कसा बाहेर येईल यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत.”
चिथमूरच्या शेतकऱ्यांनीही सांगितलं की आता ट्रक यायला लागलेत म्हणून, पण त्यांची संख्या कमी आहे. “त्यांनी थोडा माल उचलला तरी बाकी फळ तर रानात सडूनच जाणार ना,” सुरेश कुमार म्हणतात. “आणि जे फळ उचललंय त्याचा आम्हाला फुटकळ पैसा मिळतोय. शहरात लोक कोरोनाने आजारी पडतायत, इथे मात्र या आजाराने आमची कमाई हिरावून घेतलीये.”
अनुवादः मेधा काळे