"या [एका मोठ्या ब्रॅंडने विक्रीला काढलेल्या] कुडतीवर असलेला बिल्ला बघा. 'तोडा पुखुर' म्हणे. कापडावर छपाई केलीये नुसती! आणि यांना आपली माहितीदेखील तपासून घ्यावीशी वाटली नाही; आमच्या कामाला 'पुखुर' अन् काय काय म्हणतायत.. असले शब्द तर आमच्या बोलीतच नाहीत," वासमल्ली के. म्हणतात.
तोडा बोलीत या जमातीच्या भरतकामाला पोहोर म्हणतात. त्यांच्या साठीत असलेल्या वासमल्ली एक अनुभवी कारागीर आहेत. त्या तमिळनाडूतील निलगिरी जिल्ह्यातील कुंदा तालुक्यात कारीकडमुंड नावाच्या वस्तीत राहतात. इथून १६ किमी दूर, ऊटी (उदगमंडलम्) येथे शीला पॉवेल तोडा भरतकामाची विक्री करणारं दुकान चालवतात. एका नावाजलेल्या विक्रेत्याने फक्त २,५०० रुपयांना 'तोडा' साडी ऑनलाईन विकायला ठेवली होती. हे पाहून त्यांना देखील विश्वास बसेना. त्यांनी लगेच ती साडी मागवली. "जाहिरातीत लिहिलं होतं 'तोडा भरतकामाची साडी, तमिळनाडूतील महिलांनी आपल्या हातांनी विणलेली'. ते एवढ्या कमी पैशात ही साडी कशी विकू शकतात आणि ती बनवली कुठे आहे, हे मला जाणून घ्यावंसं वाटलं."
साडी काही दिवसांत घरपोच मिळाली. "मशीनने भरतकाम केलेलं होतं. आणि खराब धागे लपवण्यासाठी उलट्या बाजूवर एक कापडाची पट्टी लावली होती," शीला म्हणतात. "तसं भरतकाम काळ्या आणि लाल रंगातच केलं होतं, एवढंच काय ते साम्य."
पारंपरिक पद्धतीत तोडा जमातीच्या महिला ब्लीच न केलेल्या पांढऱ्या सुती कापडावर विशिष्ट लाल आणि काळ्या (आणि कधी कधी निळ्या) रंगांच्या धाग्याचं भरतकाम करतात. तोडा जमातीचा पारंपरिक पोशाख म्हणजे पुटुकुली, एक विशेष तऱ्हेची शाल. हा पोशाख केवळ खास प्रसंगीच परिधान केला जातो – जसं की मंदिरात दर्शनाला जाणं, सणवार आणि अखेर प्रेतवस्त्र म्हणून. १९४० दरम्यान तोडा जमातीच्या महिलांनी इंग्रज ग्राहकांसाठी मागाल-तसे-मिळेल या तत्त्वावर टेबलक्लॉथ, पिशव्या आणि इतर वस्तू बनवायला सुरुवात केली. पुढे बरीच दशकं ही विक्री जो मागणी करेल त्याच्यापुरतीच मर्यादित होती. पूर्वी फक्त सुती धागा वापरला जायचा, पण आता बहुतांश महिला लोकरी धागा वापरतात, कारण, त्या म्हणतात, तो स्वस्त आणि वापरायला सोपा आहे.
“एका सहावारी साडीवर भरतकाम करायला कमीत कमी सहा आठवडे लागतात आणि ती कमीत कमी ७,००० रुपयांना तरी विकली जाईल. त्यामुळे, एखादं अस्सल विणकाम २,५००-३,००० रुपयांना विकणं परवडण्याजोगं नाही,” शीला समजावून सांगतात.
"तरीसुद्धा, हे [काम] बरंच किचकट आहे आणि
डोळ्यांवर ताणही येतो, म्हणून कोणीही दिवसाला तीन ते चार तासच काम करू शकतं," सिम्मवनी पी., ५४, म्हणतात. त्या वासमल्ली यांच्या
नणंद होत. नक्षीचा कुठेही छापा नसतो आणि कापडाचा ताणाबाणा आधार म्हणून वापरून तिच्यावर
भरतकाम करण्यात येतं. काहींचे टाके घट्ट विणले असतात, तर इतर ठिकाणी नक्षीचा भाग म्हणून धाग्याचे गुंडाळे लोंबते ठेवतात. दोन्ही बाजूंनी
इतकं सुबक काम केलं जातं, की तोडा भरतकामात कुठेही उलट
टाके घालावे लागत नाहीत – ही सर्व कारागिरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे.
मोठ्या ब्रँडनी दिलेला तपशील केवळ खोटाच नाही, तर ते एक प्रकारचं उल्लंघनही ठरू शकतं. तोडा भरतकामाला २०१३ मध्ये भौगोलिक संकेत (जी. आय.) मिळाला. एका विशिष्ट समुदायाच्या पारंपरिक ज्ञानाचं किंवा विशिष्ट खाद्यपदार्थ, सामग्री आणि हस्तकलेचं रक्षण करण्यासाठी शासनाद्वारे जी. आय. देण्यात येतो. हा एक प्रकारचा बौद्धिक संपदा हक्क होय. तोडा भरतकामाला मिळालेल्या जी. आय. चा अर्थ असा होतो की निलगिरीच्या बाहेर केलेलं भरतकाम, तसेच हातांऐवजी दुसऱ्या कुठल्याही पद्धतीने केलेलं भरतकाम हे एकउल्लंघन होय. तोडा भरतकामाचा जी. आय. पोंपुहर (तमिळनाडू हातमाग विकास निगम), की स्टोन फाऊंडेशन (नीलगिरीत काम करणारी एक समाजसेवी संस्था) आणि तोडा नलवाळू संगम (कुन्नूरमध्ये राहणाऱ्या काही तोडा कारागीर आणि एका तोडा जमाती बाहेरच्या दंतचिकित्सक यांनी मिळून काढलेली संघटना) यांच्या मालकीचा आहे.
तोडा भरतकामाचा जी. आय. असूनसुद्धा, वासमल्ली म्हणतात, “मोठ्या कंपन्या नीलगिरीच्या बाहेर राहून मशीन वापरून किंवा कापडावर छपाईकरून ते ‘तोडा भरतकाम’ म्हणून विकत आहेत. ते असं कसं करू शकतात?”
मोठ्या कंपन्याच नाही, तर इतर कारागीर देखील उल्लंघन करताहेत. जयपूरमध्ये लावलेल्या एका प्रदर्शनात वासमल्ली यांना एका दुसऱ्या स्टॉलवर लोकरीच्या शालींवर तोडा भरतकाम केल्याचं दिसलं. “एक ग्राहक माझ्यावर खेकसून म्हणतो की तिकडे याच वस्तू अर्ध्या किमतीत विकल्या जात असताना तुमच्या वस्तू एवढ्या महाग का?” त्या सांगतात. “तिकडल्या [दुसऱ्या स्टॉलमधील] वस्तूंवरचं काम हाताचं नव्हतं आणि [म्हणून] ती फार स्वस्त होती.”
तोडा जमातीची लोकसंख्या फार कमी – २०११ च्या जनगणनेनुसार नीलगिरीतील १२५ तोडा वस्तींपैकी ५३८ घरांमध्ये फक्त २००२ माणसं – असल्याने हे भरतकाम हळूहळू बिगर-तोडा समुदाय हस्तगत करतील अशी भीतीदेखील त्यांना वाटू लागलीये. त्यांच्या स्वतःच्या अंदाजाने या जमातीत पोहोर करणाऱ्या ३०० महिला शिल्लक उरल्यात. मात्र, तरुण मुलींमध्ये भरतकामाची आवड कमी होत चालली असल्याने या कलेचं एकूण भविष्य धोक्यात आहे.
कून्नूर तालुक्यातील नेदीमुंड या तोडा वस्तीत २३ वर्षीय एन. सत्याशीन् हिची व्यथा तिच्यासारख्या इतर कारागिरांची अवस्था स्पष्ट करते. “बरंच काम असतं आणि ते करण्यात फार वेळ जातो. चहाच्या मळ्यात मजुरी केली तर दिवसाला ३०० रुपये तरी मिळू शकतात. या कामात मी दिवसाला पाच ते सहा तास काम करते आणि तरी महिन्याच्या शेवटी मला २,००० रुपयेच मिळतात.”
सत्याशीन शीला (ज्या तोडा जमातीच्या नाहीत) यांच्या मालकीच्या शालोम या तोडा वस्तूविक्री दुकानात काम करते. तोडा जमातीबाहेरच्या महिलांना कामावर ठेवल्यामुळे काही लोकांनी शालोमवर देखील टीका केलीय. “त्या टाके घालणं, मणी किंवा गोंडे ओवणं, असली गौण कामं करतात, भरतकाम नाही,” शीला म्हणतात. “मला ठाऊक आहे की उठसूठ कोणीही ह्या कामाला हात लावला तर ही हस्तकला आपलं महत्त्व हरवून बसेल. सध्या तरी, वर्षभरात थोड्याच वस्तू तयार होतात आणि विकल्या जातात, म्हणून ते अनमोल आहे. पण, हे काम करून घेणं आणि चालू ठेवणं कठीण आहे.”
हे दुकान २००५ मध्ये सुरू करण्यात आलं होतं. आज इथे २२० महिला कारागीर तोडा भरतकाम करून साड्या, शाली, पिशव्या आणि चादरी तयारकरतात. रू. ७,००० ला विकल्या गेलेल्या साडीचे रू. ५,००० कारागिराला मिळतात आणि उरलेला पैसा कच्चा माल आणि व्यापारात खर्च होतो, शीला सांगतात. बहुतांश अनुभवी कारागिरांना त्यांच्या कामानुसार महिन्याला रू. ४,००० ते रू. १६,००० रुपये मिळतात. २०१७-१८ मध्ये शालोम ने रू. ३५ लाखांची उलाढाल केली आणि नीलगिरीतील बरेच लोक बाजारात तोडा भरतकामाचा व्यापार वाढवण्याचं श्रेय शालोमला देतात.
या कलेचं भवितव्य अटळ आहे हे माहित असूनही वासमल्लींना एक खंत आहेः “जर तोडा जमातीव्यतिरिक्त कोणी इतर हे काम करायला लागले, तर ते आपलं मूल्य गमावून बसेल. मात्र, ते पुढे नेण्याकरिता पुरेशी माणसं नसली तर ते नष्ट होईल.”
८४ टक्क्यांएवढं
जास्त साक्षरतेचं प्रमाण असणाऱ्या तोडा जमातीच्या लोकांना बँक आणि इतर क्षेत्रांत नोकऱ्या
मिळाल्या आहेत. वासमल्ली स्वतः समाजशास्त्राच्या पदवीधर असून त्या तमिळनाडू
आदिवासी विकास मंडळाच्या सदस्या आहेत. त्यांचं लेखन साहित्य अकादमीने
प्रकाशित केलंय.
“आम्हा तोडा महिलांच्या डोक्याला हाच ताप आहे! कोण भरतकाम करतंय, कोण चोरी करतंय, त्यांना कशाचीच फिकीर नाही,” त्या म्हणतात. “[आमच्या हातच्या भरतकामाची] विक्री आणि व्यापार हे काही
तोडा जमातीच्या संस्कृतीचा भाग नाही, म्हणून पुरुष मंडळींना त्याचं
काहीच महत्व वाटत नाही. आम्हा महिलांना मात्र दोन्ही
गोष्टी सारख्याच महत्त्वाच्या आहेत – आम्हाला आमचा सांस्कृतिक हक्क
जपायचा आहे, शिवाय तोटा पण होऊ द्यायचा नाहीये.”
तोडा भरतकामाला भक्कम पाठिंबा न मिळण्याचं कारण म्हणजे या मुद्द्यांवर विचार करणाऱ्या तोडा कारागिरांच्या एका मध्यवर्ती संघटनेचा अभाव. “एक जमात म्हणून आम्ही विखुरलेले आहोत,” वासमल्ली म्हणतात. “बऱ्याच संघटना झाल्या आहेत. सगळं फार राजकीय होऊन बसलंय. मी स्वतः अनेक संघटनांची सदस्य आहे. पण, मलाही सर्वांना एकत्र आणणं जमत नाही. आम्हाला मदत हवी आहे.”
दरम्यान, कीस्टोन फाऊंडेशनने बेंगळूरु-स्थित वकील झहेदा मुल्ला, ज्या बौद्धिक संपदा, मालकी हक्क आणि स्वामित्व या विषयांत पारंगत आहेत, यांना तोडा भरतकामाच्या जी. आय. साठी नियुक्त केलं होतं. त्या नि:शंकपणे म्हणतात की यावर कायदेशीर खटला भरता येईल. “तोडा भरतकामात ‘उत्पादनाची पद्धत’ हाताने केलेलं काम म्हणूनच नमूद आहे. जर हे भरतकाम कुठल्या दुसऱ्या पद्धतीने, जसं की मशीनद्वारे करण्यात येत असेल तर त्याला ‘तोडा भरतकाम’ म्हणणं चुकीचं आहे. दुसऱ्या शब्दांत सांगायचं झालं तर मशीनवर भरतकाम केलेल्या वस्तू ‘तोडा भरतकाम’ म्हणून विकणं हे उल्लंघन आहे. नोंद करतेवेळी काही ठराविक आकृत्या/आरेखनं देखील नोंदवण्यात येतात.”
तरीसुद्धा, त्या म्हणतात की, “ग्राहकांमध्ये जागरूकता पसरवण्यासाठी तुमच्यापाशी बळ हवं. नकली व्यापाराचा फटका बसलेल्या जी. आय. धारक आणि अस्सल उत्पादक (जी. आय. मध्ये ‘अधिकृत उत्पादक’ म्हणून उल्लेख असलेले) यांनी [त्या त्या अधिकारक्षेत्रात येणाऱ्या उच्च न्यायालयात] एक उल्लंघन याचिका नोंदवून न्याय मिळवला पाहिजे.”
या कथेत उल्लेखिलेले तथाकथित तोडा भरतकाम विकणाऱ्या दोन मोठे ब्रँड म्हणजे रिलायन्स ट्रेंड्सचे सियाही आणि tjori.com. संकेतस्थळावरील उत्पादित वस्तू आणि त्यांची माहिती विशद करावी म्हणून वारंवार ईमेल पाठवूनदेखील tjori ने उत्तर दिलं नाही.
या पत्रकाराने customercare@reliancetrends.com वर पाठवलेल्या ईमेलला रिलायन्स ट्रेंड्सने दिलेलं उत्तर: “ सियाही ब्रँड पारंपरिक भारतीय हस्तकलेपासून प्रेरणा घेतो . आम्ही कारागिरांनी तयार केलेल्या अस्सल वस्तू विकत नाही . भरतकाम मशीनद्वारे करण्यात येतं . सगळं भरतकाम संगणकावर चालणाऱ्या मशीनद्वारे कारखान्यांत करण्यात येतं . भरतकामाची प्रेरणा तोडा शालीपासून घेतली आहे .”
पण वासमल्ली यांचं समाधान झालं नाहीये. “आमची नक्षी चोरणं आणि त्याला आमचं नाव लावणं बरोबर नाही,” त्या म्हणतात.
अनुवाद: कौशल काळू