गायत्री कच्चरबी न चुकता दर महिन्याला पोटात होणार्या असह्य वेदना सोसत असते. वेदनांचे ते तीन दिवस तिला आपल्या मासिक पाळीची आठवण करून देतात, पण तिची पाळी वर्षभरापूर्वीच थांबली आहे.
“पोटात खूप दुखतं आणि मला कळतं की आपली पाळी आली आहे, पण मला रक्तस्राव मात्र होत नाही,” अठ्ठावीस वर्षांची गायत्री सांगते. “तीन मुलांना जन्म दिला, त्यामुळे आता माझ्या शरीरात कदाचित तेवढं रक्तच शिल्लक नसेल.” गायत्रीला ॲमनोरिया आहे म्हणजे तिला पाळीच येत नाही. पण तरीही पोटात दुखणं, पेटके येणं, पाठदुखी या वेदनांपासून मात्र तिची सुटका झालेली नाही. “इतकं दुखतं, जणू प्रसूतीवेदनाच! उठून बसणंही कठीण होतं मला,” गायत्री सांगते.
उंच आणि शेलाटी, चमकदार डोळ्यांची गायत्री शेतमजूर आहे. कर्नाटकातल्या मडिगा या दलित समाजाच्या वस्तीत, ‘मडिगरा केरी’मध्ये ती राहते. हावेरी जिल्ह्यातल्या रानीबेन्नुर तालुक्यात, आसुंदी गावाच्या वेशीवर ही वस्ती आहे.
काही वर्षं गायत्रीला पोटदुखीचा त्रास होत होता. गेल्या वर्षी लघवी करतानाही तिला वेदना व्हायला लागल्या आणि तिच्या गावापासून दहा किलोमीटरवर असलेल्या ब्याडगी गावातल्या एका खाजगी दवाखान्यात ती गेली.
“सरकारी रुग्णालयांमध्ये नीट लक्ष देत नाहीत,” ती म्हणते. “माझ्याकडे मोफत वैद्यकीय सेवेचं कार्ड नाही.” प्रधान मंत्री जन आरोग्य योजनेबद्दल ती बोलते. ‘आयुष्मान भारत’ मोहिमेअंतर्गत येणारी ही आरोग्य विमा योजना प्रत्येक कुटुंबाला दुसर्या आणि तिसर्या पातळीवरच्या रुग्णालयांमधल्या उपचारांसाठी वर्षाला पाच लाख रुपयांचं विमा कवच देते.
गायत्री ज्या खाजगी दवाखान्यात गेली, तिथल्या डॉक्टरने तिला रक्त तपासणी आणि पोटाची सोनोग्राफी करायला सांगितली.
वर्ष झालं त्याला, गायत्रीने अजून या तपासण्या करून घेतलेल्याच नाहीत. “कमीतकमी २,००० रुपये लागतात या सगळ्याला. मला कसं परवडणार? आणि या तपासण्यांचे रिपोर्ट्स न घेता गेले तर डॉक्टरही ओरडतील. त्यामुळे मी त्या डॉक्टरकडेही पुन्हा गेले नाही,” ती सांगते.
त्याऐवजी गायत्रीने स्वस्त आणि मस्त उपाय शोधला… औषधाच्या दुकानातून वेदनाशामक गोळ्या घेण्याचा! “पोटात दुखतंय असं नुसतं सांगितलं तरी औषधाच्या दुकानातून कोणत्यातरी गोळ्या देतात,” ती म्हणते.
आसुंदीची लोकसंख्या आहे ३८०८. गावातली सरकारी आरोग्य सेवा एवढ्या लोकसंख्येसाठी अगदीच तुटपुंजी आहे. गावात एमबीबीएस झालेला एकही डॉक्टर नाही. एकही खाजगी रुग्णालय किंवा नर्सिंग होम नाही.
आसुंदीपासून दहा किलोमीटरवर, रानीबेन्नूर गावात सरकारी माता बाल रुग्णालय आहे. इथे एकच स्त्रीरोगतज्ज्ञ आहे. दोन पदं मंजूर झालेली आहेत, प्रत्यक्षात आहे मात्र एकच. दुसरं सरकारी रुग्णालय आहे ते हिरेकेरूरला, आसुंदीपासून ३० किलोमीटरवर. इथे स्त्रीरोगतज्ज्ञाचं एक पद मंजूर झालेलं आहे, पण प्रत्यक्षात स्त्रीरोगतज्ज्ञ मात्र एकही नाही. आसुंदीपासून २५ किलोमीटरवर असलेल्या हावेरीच्या जिल्हा रुग्णालयात मात्र सहा स्त्रीरोगतज्ज्ञ आहेत. इथे सर्वसाधारण वैद्यकीय अधिकार्यांच्या २० जागा आणि नर्सिंग सुपरिटेन्डन्टच्या सहा जागा रिकाम्या आहेत.
आपली पाळी का बंद झाली, आपल्याला दर महिन्याला एवढा त्रास का होतो, हे गायत्रीला आजवर समजलेलंच नाही. “माझं शरीर जड पडतं,” ती म्हणते. ”माझ्या पोटात दुखतं ते अलीकडेच मी खुर्चीवरून पडल्यामुळे, किडनी स्टोनमुळे की पाळीमुळे, कोण जाणे!”
गायत्रीचं लहानपण हिरेकेरूर तालुक्यातल्या चिन्नमुळगुंद गावात गेलं. पाचवीपर्यंत शिकून तिने शाळा सोडली. हाताने परागीकरण करण्याचं नाजूक कौशल्य ती शिकली. याचे बरे पैसे मिळतात. सहा महिन्यांतून निदान पंधरा-वीस दिवस तरी हमखास काम मिळतं. “एका परागीकरणाचे २५० रुपये मिळतात,” गायत्री सांगते.
वयाच्या सोळाव्या वर्षी गायत्रीचं लग्न झालं. शेतमजूर म्हणून तिला मिळणारं काम अनिश्चित होतं. आसपासच्या गावांतल्या लिंगायत जमीनदारांना जेव्हा मका, लसूण, कपाशी यांच्या काढणीसाठी मजुरांची गरज असते, तेव्हाच फक्त तिला काम मिळतं. “दिवसाला २०० रुपये मजुरी मिळते आम्हाला. जमीनदाराने बोलावलं तरच काम मिळतं, नाही तर नाही,” ती म्हणते. तीन महिन्यांतून गायत्रीला साधारण ३० ते ३५ दिवस काम मिळतं.
शेतमजुरी आणि परागीकरणाचं काम यातून गायत्रीला महिन्याला २,४०० ते ३,७५० रुपये मिळतात. तिच्या औषध उपचारांसाठी हे अजिबातच पुरेसे नाहीत. उन्हाळ्यात कामही नसतं आणि मग पैशाची ही टंचाई अधिकच चिमटा घेते.
गायत्रीचा नवराही शेतमजूर आहे, पण तो दारूडा आहे. त्यामुळे घरासाठी तो फार काही कमवत नाही. तो वरचेवर आजारी असतो. गेल्या वर्षी त्याला टायफॉइड झाला होता. त्यामुळे सहा महिने तो कामच करू शकला नव्हता. २०२२च्या उन्हाळ्यात त्याला अपघात झाला आणि त्याचा हात मोडला. त्याची काळजी घेण्यासाठी गायत्री तीन महिने घरी राहिली. त्याचा डॉक्टर, औषधं हा सगळा खर्च जवळजवळ २०,००० रुपये झाला.
गायत्रीने सावकाराकडून १० टक्के व्याजावर पैसे उचलले. हे व्याज फेडण्यासाठी मग आणखी एकाकडून पैसे घेतले. तिच्यावर आणखी तीन ठिकाणच्या कर्जाचा बोजा आहे. तीन मायक्रोफायनान्स कंपन्यांचं मिळून हे लाखभर रुपयांचं कर्ज आहे. दर महिन्याला ती त्यासाठी १०,००० रुपयांचा हप्ता भरते.
“कूळी मादिदरागे जीवना अगोळरी माते [रोजंदारीवर आम्ही आमचं आयुष्य चालवू शकत नाही]. आजारपणाच्या वेळेला तर कोणाकडून तरी पैसे घ्यावेच लागतात,” ती म्हणते. “कर्जफेड करणं चुकवता येत नाही. घरात खायला प्यायला काही नसलं तरी आम्ही एकवेळ बाजारात जाणार नाही, पण संघाच्या (मायक्रोफायनान्स कंपन्या) पैशाची परतफेड मात्र करावीच लागते. यातून पैसे उरले, तरच आम्ही भाज्या वगैरे घेतो.’’
गायत्रीच्या जेवणात डाळी, भाज्या जवळजवळ नसतातच. अजिबात पैसे नसतात तेव्हा ती शेजार्यांकडून टोमॅटो आणि मिरच्या मागून आणते आणि त्याचाच रस्सा बनवते.
“उपासमारीचं डाएट आहे हे,” डॉ. शैब्या सलढाणा म्हणतात. बंगळुरूच्या सेंट जॉन्स मेडिकल कॉलेजमध्ये त्या प्रसूती व स्त्रीरोग विभागात सहयोगी प्राध्यापक आहेत. “उत्तर कर्नाटकातल्या बहुतेक शेतमजूर स्त्रिया अशाच उपासमारीच्या डाएटवर जगतात. भात आणि कसलंतरी पातळ पाणेरी सार, हे त्यांचं जेवण. वर्षानुवर्षं झालेल्या या उपासमारीने त्यांना वर्षानुवर्षं ॲनिमिक केलेलं असतं. त्यांच्या अंगात रक्तच नसतं आणि त्यामुळे त्या चटकन थकतात,” डॉ. सलढाणा म्हणतात. लहान आणि कुमार वयातली मुलं यांचं आरोग्य सुधारण्यासाठी काम करणार्या ‘एनफोल्ड इंडिया’ या स्वयंसेवी संस्थेच्या त्या सहसंस्थापक आहेत. २०१५ मध्ये कर्नाटक सरकारने वैद्यकीय कारण नसताना केलेल्या गर्भाशय काढण्याच्या शस्त्रक्रियांची चौकशी करण्यासाठी एक समिती नेमली होती, तिच्या त्या सदस्य होत्या.
गायत्रीला कधीकधी खूप अशक्तपणा वाटतो, कधी हातापाय बधीर होतात, कधी पाठ दुखते, तर कधी थकवा येतो. ही सगळी लक्षणं कुपोषण आणि रक्तक्षय (ॲनिमिया) यांची आहेत, असं डॉ. सलढाणा सांगतात.
२०१९ ते २१ या काळाच्या पाचव्या राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणानुसार , कर्नाटकात गेल्या चार वर्षांत १५ ते ४९ या वयोगटातल्या महिलांमधल्या रक्तक्षयाचं प्रमाण वाढलं आहे. २०१५-१६ या वर्षात ते ४६.२ टक्के होतं, तर आता २०१९-२० मध्ये ५०.३ टक्के आहे. हावेरी जिल्ह्यात अर्ध्याहून अधिक स्त्रियांना रक्तक्षय आहे.
गायत्रीच्या अशा तोळामासा तब्येतीचा परिणाम तिच्या रोजगारावरही होतो. “मी आजारीच असते. एक दिवस कामाला जाते, दुसर्या दिवशी नाही,” उसासा टाकत ती सांगते.
पंचवीस वर्षाच्या मंजुळा महादेवप्पा कच्चरबीच्याही सतत पोटात दुखत असतं. पाळी येते तेव्हा पोटात पेटके येतात. ओटीपोटात खूप दुखतं. आणि पाळी संपल्यानंतर अंगावरून जात राहातं.
“पाळीचे पाच दिवस खूपच भयंकर असतात. प्रचंड दुखतं पोटात. पहिले दोन-तीन दिवस तर मी उठूही शकत नाही, चालणं तर दूर राहिलं. काही खातही नाही मी, खावंसं वाटतच नाही. पडून राहाते फक्त,” मंजुळा सांगत असते. तीही शेतमजूर म्हणून दिवसाला २०० रुपये मजुरीवर काम करते.
या वेदनांपलीकडे गायत्री आणि मंजुळा यांची आणखी एक गोष्ट समान आहे: स्वच्छ आणि सुरक्षित स्वच्छतागृहांचा अभाव.
बारा वर्षांपूर्वी गायत्रीचं लग्न झालं आणि ती आसुंदीच्या दलित वस्तीत साडेसात बाय दहा फुटांच्या, विनाखिडकीच्या घरात राहायला आली. टेनिसच्या एक चतुर्थांश कोर्टाएवढं हे घर. दोन भिंतींनी माजघर, स्वयंपाकघर आणि न्हाणी वेगळी केलेली. स्वच्छतागृहासाठी इथे जागाच नाही.
मंजुळा त्याच वस्तीत राहते. ती, तिचा नवरा आणि इतर १८ जण, यांचं हे कुटुंब दोन खोल्यांच्या घरात राहतं. मातीच्या भिंती आणि साड्यांचे पडदे यांनी या खोल्यांचे सहा भाग केले आहेत. “कश्शासाठीच जागा नाही इथे,” मंजुळा सांगते. “कधी सणासमारंभाला कुटुंबातले सगळेजण घरात असतात, तेव्हा घरात बसायलाही जागा नसते,” त्या वेळी मग रात्री झोपण्यासाठी पुरुषांची रवानगी वस्तीतल्या हॉलमध्ये होते.
मंजुळाच्या घराबाहेरच्या छोट्याशा न्हाणीला साडीचा पडदा लावलेला असतो. घरातल्या बायका लघवीला जाण्यासाठी कधीकधी या जागेचा वापर करतात, पण घरात बरीच माणसं असली तर मात्र नाही. काही वेळाने इथून दुर्गंधी यायला लागली. पाइपलाइन टाकण्यासाठी वस्तीतल्या गल्ल्या खोदल्या होत्या, तेव्हा इथे पाणी साचलं होतं आणि भिंतीवर बुरशी चढली होती. मंजुळाची पाळी सुरू असते, तेव्हा ती इथेच सॅनिटरी पॅड बदलते. “फक्त दोनदा पॅड बदलणं शक्य होतं मला. एकदा सकाळी कामाला जाण्यापूर्वी आणि नंतर संध्याकाळी कामाहून आल्यावर.” तिच्या कामाच्या ठिकाणी स्वच्छतागृहंच नाहीत.
सगळ्याच दलित वस्त्यांप्रमाणे आसुंदीची मडिगरा केरी आहे गावकुसाबाहेरच. इथल्या ६७ घरांमध्ये सुमारे ६०० जण राहातात. अर्ध्या घरांमध्ये तीनहून अधिक कुटुंबं आहेत.
साठेक वर्षांपूर्वी आसुंदीच्या मडिगा समाजाला दीड एकर जमीन देण्यात आली होती. त्यानंतर या वस्तीतली लोकसंख्या वाढली, वाढतेच आहे. आणखी घरं हवीत म्हणून अनेक वेळा मडिगांनी निदर्शनं केली, पण काहीही झालं नाही. तरुण पिढी आणि त्यांची कुटुंबं सामावून घेण्यासाठी मग लोकांनी भिंती घालून आणि साड्यांचे पडदे लावून उपलब्ध जागाच विभागली.
गायत्रीचं घरही असंच २२. बाय ३० फुटांच्या एका मोठ्या खोलीपासून तीन छोट्या घरांत विभागलं गेलं. त्यापैकी एका भागात गायत्री, तिचा नवरा, दोन मुलं आणि तिचे सासू-सासरे राहतात. तिच्या नवर्याचं चुलत कुटुंब इतर दोन घरांत राहतं. घरासमोरचा अरुंद, काळोखा बोळ ही घरातली इतर कामं करण्याची जागा. ज्यांना घरात जागा नाही, अशी कपडे धुणं, भांडी घासणं, सात आणि दहा वर्षांच्या तिच्या मुलांना अंघोळ घालणं ही कामं गायत्री या बोळात करते. घर खूपच छोटं आहे, त्यामुळे आपल्या सहा वर्षांच्या मुलीला तिने आपल्या आईवडिलांकडे, चिन्नमुळगुंद गावी ठेवलं आहे.
२०१९-२० च्या राष्ट्रीय राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणानुसार कर्नाटकातल्या ७४.६ टक्के घरांमध्ये ‘सुधारित स्वच्छतागृहं’ आहेत. हावेरी जिल्ह्यात मात्र फक्त ६८.९ टक्के घरांनाच ही सुविधा आहे. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाने केलेल्या व्याख्येनुसार ‘सुधारित स्वच्छतागृह’ म्हणजे फ्लश असलेलं आणि पाइपने सांडपाण्याच्या गटाराला जोडलेलं स्वच्छतागृह किंवा हवा खेळती असलेलं खड्डा शौचालय किंवा स्लॅब असलेलं खड्डा शौचालय किंवा कंपोस्ट खत तयार करणारं कोरडं शौचालय. आसुंदीच्या मडिगरा केरीमध्ये मात्र यापैकी एकाही प्रकारचं स्वच्छतागृह नाही. “आम्हाला शेतातच जावं लागतं,” गायत्री सांगते. “शेतमालक शेताभोवती कुंपण घालतात आणि आम्हाला शिव्या देतात,” पण दुसरा पर्यायच नाही. वस्तीतले रहिवासी मग पहाटे, सूर्योदयापूर्वीच मोकळे व्हायला जातात.
सारखं लघवीला जावं लागू नये म्हणून मग गायत्री पाणीच कमी पिते. शेतमालक आसपास आहेत म्हणून ती तशीच घरी आली तर तिच्या पोटात खूप दुखतं. “आणि मग मी जेव्हा लघवीला जाईन, तेव्हा मला लघवी साफ होण्यासाठी निदान अर्धा तास तरी लागतो. खूप दुखतं.”
मंजुळाच्या मात्र पोटात दुखतं ते योनी संसर्गामुळे. दर महिन्याला तिची पाळी संपली की तिला पांढरा स्राव सुरू होतो. “पुढची पाळी येईपर्यंत तो सुरू राहतो. पोटात तर दुखतंच, पण पाठही दुखत राहते. माझ्या हातापायात ताकदच राहत नाही.”
चार-पाच खाजगी दवाखान्यांमध्ये मंजुळा जाऊन आली आहे. तिच्या सगळ्या तपासण्या ‘नॉर्मल’ आल्या आहेत. “मूल होईपर्यंत आणखी कसल्या तपासण्या करू नको, असं मला सांगितलं. त्यामुळे मी नंतर कोणत्याही रुग्णालयात गेले नाही. रक्ताची तपासणी नाही केलेली,” मंजुळा सांगते.
डॉक्टरांच्या सल्ल्याने तिचं समाधान झालेलं नाही. त्यामुळे तिने पारंपरिक झाडपाल्यांची औषधं घ्यायला सुरुवात केली. गावातल्या मंदिराच्या पुजार्याकडे जाऊन तिथेही काहीकाही प्रयत्न केले तिने. पण तिचं दुखणं काही थांबलं नाही.
कुपोषण, कॅल्शियमची कमतरता, तासन्तास शारीरिक कष्ट याबरोबरच अस्वच्छ पाणी आणि उघड्यावर शौच या सगळ्यामुळे पांढरा स्राव आणि त्यासोबत पाठदुखी, पोटात आणि ओटीपोटात दुखणं या गोष्टी होतात, असं डॉ. सलढाणा सांगतात.
“फक्त हावेरी किंवा काही भागातच हे आहे असं नाही. या सगळ्या स्त्रिया आता खाजगी आरोग्य सेवांना बळी पडतायत,” टीना झेविअर सांगतात. त्या उत्तर कर्नाटकात आरोग्य क्षेत्रात काम करतात. २०१९ मध्ये उत्तर कर्नाटकात होणार्या मातामृत्यूंसंदर्भात कर्नाटक उच्च न्यायालयात दाद मागणार्या कर्नाटक जनारोग्य चलुवली या संस्थेच्या त्या सक्रिय कार्यकर्त्या आहेत.
ग्रामीण कर्नाटकात सरकारी रुग्णालयांत, दवाखान्यांत डॉक्टर, नर्सेस, इतर कर्मचारी नसतातच. गायत्री आणि मंजुळासारख्या महिलांना मग खाजगी दवाखान्यांचाच आधार घ्यावा लागतो. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत २०१७ मध्ये स्त्रिया आणि मुलांच्या आरोग्याचा लेखाजोखा घेण्यात आला, त्यात कर्नाटकात डॉक्टर, नर्सेस आणि इतर आरोग्य कर्मचारी यांची प्रचंड कमतरता आहे, याकडे लक्ष वेधण्यात आलं.
गायत्रीला या व्यापक पातळीवरच्या समस्या ठाऊकच नाहीत. आपल्या या आजाराचं कधीतरी निदान होईल, या आशेवर ती आहे. ती म्हणते, “मी अजून रक्ताच्या तपासण्याच केलेल्या नाहीत. त्या केल्या असत्या, तर एव्हाना मला नेमकं काय झालंय ते कळलं असतं. कोणाकडूनतरी पैसे घेऊन मी एकदा त्या तपासण्याच करून घेते. मला नेमकं काय झालंय, ते तरी कळेल!”
पारी आणि काउंटर मीडिया ट्रस्ट यांच्यातर्फे ग्रामीण भारतातल्या किशोरवयीन आणि तरुण मुली यांना केंद्रस्थानी ठेवून केल्या जाणार्या पत्रकारितेचा हा देशव्यापी प्रकल्प आहे. ‘पॉप्युलेशन फाउंडेशन ऑफ इंडिया’च्या सहकार्याने उचललेलं हे महत्त्वाचं पाऊल आहे. सामान्य माणसांचा आवाज आणि त्यांचं आयुष्य यांचा अनुभव घेत या महत्त्वाच्या, पण उपेक्षित समाजगटाची परिस्थिती, त्यांचं जगणं सर्वांसमोर आणणं हा त्याचा उद्देश आहे.
हा लेख प्रकाशित करायचा आहे? zahra@ruralindiaonline.org या पत्त्यावर ईमेल करा आणि त्याची एक प्रत namita@ruralindiaonline.org या पत्त्यावर पाठवा.
अनुवादः वैशाली रोडे