कोल्हापूर जिल्ह्यातल्या टाकवडे गावातले मारुती निर्मल शेतकरीही आहेत आणि ते बागकामही करतात. ते त्यांच्या आठ गुंठ्यात उसाची शेती करतात. ही जमीन त्यांच्या वडलांच्या, राजाराम यांच्या नावावर आहे.
मारुतींचे शेजारी देखील उसाची शेती करतात. त्यांच्या शेताला बांध नाही त्यामुळे मारुती सांगतात, “शेजारच्या रानातला ऊस उंच वाढला की भाराने वाकतो, आणि शेजारच्या पिकांवर त्याची सावली पडते. मी जर सोयाबीन किंवा भुईमूग लावायचा ठरवलंच तर शेजारच्या रानाला लागून असलेल्या काकरीत काही उगवत नाही. ऊनच लागत नाही. आधीच माझ्याकडे फक्त आठ गुंठा जमीन आहे. त्यात पीक वाया जाऊन कसं चालेल?”
त्यांची जमीन इतकी कमी आहे की ऊस लावून त्यांना फार काही फायदा होत नाही. लागवडीलाच १०,००० रुपये खर्च होतो. २०१५ साली मारूतींनी शेतात बोअर मारली. त्याला ७०,००० रुपये खर्च आला. पावसाच्या आणि बोअरच्या पाण्यावर अंदाजे आठ टन ऊस निघतो. उसाला प्रति टन २,७०० ते ३,००० रुपये भाव मिळतो. “सगळं नीट पार पडलं तर मला उसाचं १८ महिन्यांनी १४,००० रुपयांचं उत्पन्न मिळतं,” मारुती सांगतात.

‘गरिबाचं घर कायम गरीबच राहणार,’ टाकवडे गावचे मारुती निर्मल सांगतात. ‘माझीच कमाई बघा की’
म्हणून मग गेली २० वर्षं, मारुती आणखी एक काम करतायत. टाकवड्याहून सात किलोमीटर लांब इचलकरंजीत चार घरांमध्ये ते बागकाम करतात. त्यातून त्यांना महिन्याला ६,००० रुपये कमाई होते.
सध्या मारूतींच्या हातात हा जो काही बरा पैसा खेळतोय त्यासाठी त्यांनी फार कष्ट घेतले आहेत. १९८४ पर्यंत शिवणाकवडी गावातल्या स्पिनिंग मिलमध्ये त्यांनी आठ वर्षं काम केलंय, पाच रुपये रोजावर. त्यानंतर काही वर्षं त्यांनी शेतात मजुरी केली. १९९७ ते २००१, त्यांनी महाराष्ट्र राज्य वीज महामंडळामध्ये माळी म्हणून काम केलं. तिथे त्यांना २० रुपये रोज होता. “ही रक्कम फारच कमी होती. म्हणून मग मी निवासी भागात बागकाम करायचं ठरवलं. तिथे मला दिवसाचे १५० रुपये मिळत होते. त्यात मी खूश होतो. सध्या मी दिवसाला ३०० रुपये कमवतोय. आजच्या काळात तेही पुरत नाहीत म्हणा.”
२०१२ साली मारुतींनी स्टेट बँक ऑफ इंडियामधून १.८ लाखाचं शैक्षणिक कर्ज काढलंय. “हातात काहीही नव्हतं तरी माझ्या मुलाला आणि मुलीला मी शिकवलंय,” ते सांगतात. त्यांच्या मुलीने वाणिज्य शाखेत पदवी घेतली आणि त्यानंतर तिचं लग्न झालं. मारुतींच्या मुलाने कोल्हापूरमधून मेकॅनिकल इंजिनियंरिंगचं शिक्षण घेतलं आणि आता तो कर्नाटकात बेळगावमध्ये नोकरी करतोय. मारुतींच्या पत्नी शोभा गृहिणी आहेत. “आता त्या कर्जावरचं व्याज ही मोठी डोकेदुखी झालीये,” मारुती म्हणतात. या कुटुंबाने आतापर्यंत ३२,००० रुपये फेडले आहेत.
अनेक शेतकरी वेगवेगळी कामं करत असतात आणि त्यातला एक पर्याय म्हणजे शेतमजुरी. मारुतींनी मात्र बागकाम करण्याचा निर्णय घेतला कारण ते त्यांना आवडतं, ते सांगतात. “गरीब शेतकरी गरीबच राहतो बघा.” ते म्हणतात. “आता माझीच कमाई बघा. पण कितीही कठीण काळ आला तरी आपण शर्थीने प्रयत्न करायचं.”
अनुवादः मेधा काळे