पावसाळ्याच्या दिवसात यश महाळुंगेला दररोज आपला जीव धोक्यात टाकावा लागतो, तेही शाळेत जाण्यासाठी. आठ वर्षांचा यश अर्धवट पडलेल्या पुलाच्या निसरड्या कठड्यावरून चालत जातोय, त्याच्यासोबत इतर काही मुलं-मुली आणि त्यांचे पालकही आहेत. इथून जर का पडलं तर थेट काही फूट खोल झाडं-झुडपं आणि चिखलाचा गाळ आहे.
रोज सकाळी दोनदा, शाळेत जाताना आणि घरी परत येताना, मुलांचा हा घोळका एका रांगेत चालत असतो, बहुतेक जण अनवाणीच पायपीट करतात, तेही एका हातात छत्री आणि पाठीवरच्या शाळेच्या दप्तराचं ओझं सावरत. ३० सेकंद जीव मुठीत घेऊन चालल्यानंतर, त्यांचे पाय पुलाच्या शिल्लक राहिलेल्या सिमेंटच्या पृष्ठभागावर सुरक्षित पडतात. तिथून पुढे औरे पाल्हेरीतल्या त्यांच्या घरी पोहचण्यासाठी ते चिखलाच्या पायवाटेवर चालू लागतात – त्यांचा पाडा आवरे गावातल्या शाळेपासून दोन किलोमीटर दूर आहे.
“मी खाली बघितलं ना तर भीती वाटते. असं डोकं फिरतं. मी बाबाचा हात घट्ट धरतो मग,” यश सांगतो.
अगदी २००५ पर्यंत औरे पाल्हेरीतल्या ७७ रहिवाशांना (आवरे ग्रामपंचायत कार्यालयातील नोंदीनुसार) ही असली जीवघेणी कसरत करावी लागत नव्हती. तेव्हा भातसा नदीचा प्रवाह ओलांडण्यासाठी लहानसा पूल होता. पण त्या वर्षी २८ जुलैला मुसळधार पाऊस पडला आणि हा पूल वाहून गेला. १९९८ साली ठाणे जिल्हा परिषदेतर्फे पूल बांधण्यात आला होता. त्या पावसात पुलाचा मधला भाग वाहून गेला आणि फक्त दोन्ही बाजूचे कठडेच शिल्लक राहिले आहेत.


डावीकडे : यश (डावीकडे) आणि अनीश पाण्याची पातळी कमी असताना नदी ओलांडताना. उजवीकडे: पाड्यातील मुलांसाठी ‘स्ट्रीमिंग’चा अर्थ जरा वेगळाच आहे
“नीट ध्यान देऊन [कठड्यावरून] चालावं लागतं. कुनी तरी असावं लागतं मुलांच्या सोबतीला. एकटी नाय ना चालू शकत ती आणि [शाळेत जाण्यासाठी] दुसरा काय मार्ग पन नाय. मुलांचं काय विचारताय, मोटे पन एकटं नाय जात. कधीकधी पान्याची पातळी कमी असंल, तर नदीतून पलीकडं जातो. दुसऱ्या गावचं कोन येत नाय आमच्याइकडं. का मनून येतील, जीव घालवायला? आमचं गाव एकदम शेवटाला येतं,” यशचे वडील, आनंद महाळुंगे सांगतात, ते शहापूर तालुक्यात रिक्षा चालवतात, दिवसाची २००-३०० रुपये कमाई होते.
अनेक वर्ष लोटली, पडझड झालेल्या पुलाच्या मधल्या भागात सिमेंट-चिखलाच्या गाळात बरीच झाडं आणि झुडपं उगवली आहेत – मागील १४ वर्षांमध्ये दुरूस्तीचं कुठलंही काम इथं झालेलं नाही. इतक्या वर्षांच्या कालवधीत खडतर असा हा प्रवास इथल्या गावकऱ्यांच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनला – शाळेत जाण्यासाठी, कधी रोजगारासाठी, दवाखान्यात तर कधी बाजारात जाण्यासाठी किंवा आणखीही बऱ्याच कामांसाठी. पावसाळ्याव्यतिरिक्त इतर वेळीही हाच मार्ग आहे, फरक इतकाच तेव्हा हा मार्ग ओला आणि निसरडा नसतो. “पावसाळा असू द्या नाही तर उन्हाळा, आमाला हे असंच सहन करावं लागतं,” आनंद म्हणतात. “पावसाळ्यात जरा जास्त खबरदारी घ्यावी लागते, बाकीच्या वेळेस कमी, इतकंच. काय करणार?”
औरे पाल्हेरीतली नऊ कुटुंबं– जी इथल्या गावकऱ्यांच्या सांगण्यानुसार बहुजन समाजातील आहेत – १९७०-७१ च्या काळात इथे येऊन वसली. इथून सुमारे २० किलोमीटरवर असलेलं ठाण्याच्या शहापूर तालुक्यातलं त्यांचं मूळ गाव पाचिवरे भातसा सिंचन प्रकल्पामुळे बुडिताखाली गेलं. आजही, इतर ११८ विस्थापित कुटुंबांप्रमाणे, ते महाराष्ट्र प्रकल्पग्रस्त पुनर्वसन कायदा, १९९९ अंतर्गत पुर्नवसनाची वाट पाहत आहेत. या कायद्याअंतर्गत त्यांचं पर्यायी जागेवर पुनर्वसन होण्याची तरतूद आहे. विस्थापित झालेली बरीच कुटुंबं आसपासच्या गावांमध्ये आणि पाडयांमध्ये जाऊन वसली आणि तिथे त्यांनी त्यांच्या नव्या जीवनाला सुरूवात केली. (पाहा ‘अनेक कुटुंबं तर गायबच झाली’ )
‘पाऊस जेवा थांबला ना, तेवा माहित पडलं की पूलच नाय रायला, पलिकडं जायाला. कशीबशी नदी ओलांडली आणि आवरे गावातल्या सरपंचाला सांगितलं’
२००५ ची पूल कोसळल्याची घटना आनंद यांना आठवते. त्यावेळी ते २१ वर्षांचे होते. “बरेच दिवस पाऊस पडत होता. पानी पुलावरून जात होतं. आमी घरातून बाहेरच नाय पडलो तेवा, जिवाच्या भीतीने. गावाचा बाहेरच्यांशी संपर्कच तुटला. पाऊस जेवा थांबला ना, तेवा माहित पडलं की पूलच नाय रायला, पलिकडं जायाला. कशीबशी नदी ओलांडली आणि आवरे गावातल्या सरपंचाला सांगितलं. जिल्हा परिषदेचे लोक आले आणि पाहनी करून गेले, पन त्याउपर कायच केलं नाय. पूल पुन्हा बांधून देण्याची आमची मागणी सुरूच आहे.”
दुसऱ्या गावांमध्ये किंवा शहापूरच्या बाजारात, बस स्थानकांत (जवळजवळ १० किलोमीटर दूर) किंवा कामासाठी जायचं असेल तर धोकादायक कठड्यांवरून चालणं किंवा वाहती नदी ओलांडण्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय राहिला नाही. औरे पाल्हेरीतली बरीच जण अपघाताला बळी पडली आहेत.
२०१६ च्या जुलै महिन्यात, तुकाराम विदे, वय ६५ आणि त्यांचा मुलगा रवींद्र, वय ३५, प्रत्येकी १० लीटर अशा दूधाच्या दोन किटल्या घेऊन या निसरड्या मार्गावरून जात होते, शहापूरधील दूध डेअरीत दूध घालायला. तुकाराम यांचा पाय कठड्यावरून घसरला आणि ते सरळ झुडपांमध्ये जाऊन पडले. त्यात त्यांचा डावा पाय मोडला. “मी बेशुद्ध होतो. गावातल्यांनी डोलीतून आवरे गावापरत नेलं आणि मग तिथून रिक्षातून शहापूर जिल्हा रुग्णालयात. सहा महिनं होतो तिथे. आता पायात सळी हाय,” ते सांगतात.


डावीकडे : २०१६ साली तुकाराम यांचा पाय कठड्यावरून घसरला आणि त्यात त्यांचा डावा पाय मोडला. उजवीकडे: रामू विदे सांगतात, ‘कोनी आजपरत मेलं नाय नदी ओलांडताना. पन [महाराष्ट्र शासन] काय मरायची वाट बघतायत का?’
“हे अपघात टळले असते, पूल असता तर. डिलिविरीला हास्पिटलला घेऊन जायचं तरी पोरींचा जीव धोक्यात घालावा लागतो. देवाला हात जोडावे लागतात, जेवा-जेवा मुलं घराबाहेर पडतात तेवा,” तुकाराम पुढे सांगतात. ते जवळपास १४ वर्षांचे होते जेव्हा त्यांना त्यांच्या आई-वडिलांसोबत भातसा धरणामुळे विस्थापित व्हावं लागलं. आता ते फक्त त्यांच्या तीन म्हशींचं दूध काढायचं काम करतात आणि त्यांच्या मुलगा रवींद्र डेअरीत दूध घालतो. त्यांचं कुटुंब दोन एकर रानात भातही काढतं.
“काय दुसरं करायला हाय काय? घरात रिकामं बसून राहू नाय शकत. धोका तर घ्यावा लागंलच. जिल्हा परिषद काय आमच्या इतक्या वर्षांच्या पुलाच्या मागणीवर गंभीर नाई. बरेच जण आमच्या गावात आता जखमी हायंत नाय तर अंथरूणाला खिळलेत. असं दुर्लक्ष करून मस्करीच करतायत ते आमच्या दुःखाची,” ते पुढे सांगतात.
६८ वर्षांच्या द्वारकाबाई विदे त्यांच्या सिमेंट-काँक्रीटच्या
बैठ्या घरात, चाकाच्या खुर्चीने हिंडता-फिरतात. अगदी मागच्या वर्षीपर्यंत, त्या
त्यांची चार एकर जमीन कसत होत्या. २०१८ च्या फेब्रुवारी महिन्यात, शहापूरला वाणसामान खरेदी करायला जाताना, द्वारकारबाई
विदे भिंतीवरून खाली पडल्या. मी त्यांच्या घरी गेले तेव्हा त्या खुर्चीवर बसून,
खिडकीबाहेर पाहत होत्या.
“पडल्यापासून त्या जास्त बोलत नाहीत. त्या घाबरल्यात. नाही तर, त्या भरपूर बोलायच्या,” त्यांची सून तारा सांगतात. द्वारकाबाईंचं कुटुंब त्यांच्या चार एकर जमिनीवर भात आणि भाज्या पिकवतं. त्यांचा मोठा मुलगा भिवंडीतल्या गोदामात पर्यवेक्षक म्हणून काम करतो. “लहान-सहान आजार आल्यावर – ताप, सर्दी, किंवा एखाद्या अर्जंट डिलिव्हरीसाठी गावात काहीच सोय नाही. मोठा त्रास आहे,” तारा सांगतात.


डावीकडे : २०१८ च्या फेब्रुवारी महिन्यात, शहापूरला वाणसामान खरेदी करायला जाताना, द्वारकारबाई विदे कठड्यावरून खाली पडल्या. उजवीकडे : औरे पाल्हेरीतील प्रत्येकालाच पलिकडे जाण्यासाठी आपला जीव धोक्यात घालावा लागतो
औरे पाल्हेरीतील बहुतांश कुटुंब त्यांच्या २ ते ५ एकरच्या जमिनीवर शेती करतात, त्या जमिनी त्यांच्या मालकिच्या नाहीत. ते पावसाळ्यात भातशेती करतात. पिकं निघाली की ते भेंडी, कारली आणि चवळीसारख्या वेगवेगळ्या भाज्या घेतात आणि आसपासच्या गावांमध्ये जाऊन विकतात. त्यांच्यातील तरुण मंडळी शहापूर तालुक्यात रिक्षा चालवतात किंवा खाद्यपदार्थांच्या टपऱ्या चालवतात.
गावाबाहेर जाण्यासाठी सुरक्षित मार्ग नसल्यानं गावकऱ्यांसाठी कामाचे पर्याय मर्यादित राहिलेत. “रस्त्यावर लाईट पन नाय, मग अंधार झाल्यावर चालता पन येत नाय. म्हनूनच [५० ते ६० किलोमीटर अंतरावर लांब] कल्याण किंवा ठाण्याला कामासाठी जाता येत नाही. रोज इतका प्रवास करून संध्याकाळी ७ नंतर येनं शक्य नाय. [जवळजवळ] दोन तासांचा लांबचा प्रवास आहे. शहरात राह्यची सोय आहे तेच राहतात, गोदामात कामं करतात किवा मुलांना कॉलेजला पाठवतात. नाहीतर शक्यच नाय. सातच्या आत घरी परत यावंच लागतं. यामुळेच आमच्या वयाचं [३०-३५] कोनी दहावी पन शिकलं नाय,” शहापूरमध्ये रिक्षा चालवणारे ३५ वर्षांचे जयवंत महाळुंगे सांगतात. त्यांचं १५ जणांचं कुटुंब आहे. दोन लहान भाऊ शहापूर तालुक्यात किंवा आसपासच्या गावांमध्ये भाजी विकतात, ज्यातून दरमहा ४००० रुपयांची कमाई होते.
जयवंत यांचा पुतण्या, यश जिल्हा परिषदेच्या शाळेत जातो पण ती फक्त इयत्ता सातवीपर्यंत आहे; त्यानंतर माध्यमिक शिक्षणासाठी, गावातल्या मुलांना शहापूर तालुक्यात जावं लागतं. “आमचा विकास व्हायचा कसा? आमची मुलं पुढे कशी जायची?” जयवंत विचारतात.
“दिवसाउजेडी लोकं पडून जबर जखमी झालेत, मग, काळोखाचं काय सांगावं? पावसाळ्याच्या दिवसांत आमच्या मुलांची शाळा नेहमी चुकायची. आता नातवंडांचे पन तेच हाल,” त्यांची आई सविता, ६५ सांगतात. त्या त्यांचं पाच एकर रान कसतात.


डावीकडे : पुलाच्या कोसळलेल्या भागावर वाढलेली झाडं-झुडुपं आणि शेवाळं. उजवीकडे : गावकरी रोज पार करतात ती धोकादायक वाट
“१९९८ ला पूल बांधायच्या आधी पन बरीच आंदोलनं केली. पूल कोसळल्यानंतर जिल्हा परिषद कार्यालयाकडे मोर्चा पन नेला, २००५ ला. मग २००७, २००९, २०१२, २०१६,” त्या पुढे म्हणतात, प्रत्येक आकड्यानंतर त्या हाताचं बोट मोडतात. “मधे, आमच्या पोरांनी कलेक्टरला पन लिहलं. केवढं केलं. काय दिसतंय का, फरक?”
त्यांना दुजोरा देत, त्यांचे शेजारी, ७० वर्षांचे रामू विदे, संतापाने म्हणतात, “इतक्या वर्षात पन काय सुधार नाय, हाय ते हायेच. कोनी आजपरत मेलं नाय नदी ओलांडताना. पन [महाराष्ट्र शासन] काय मरायची वाट बघतायत का? शासनानं काय दिलं? तो खराब काम केलेला पूल, तो तर कोसळला. आमचं पुनर्वसन पन करत नाहीत,” पाच दशकांची त्यांची चीड त्यांच्या बोलण्यातून व्यक्त होत होती.
बऱ्याचदा प्रयत्न करूनही ठाणे जिल्हा परिषदेतील अधिकारी या विषयावर वक्तव्य करण्यास उपलब्ध होऊ शकले नाहीत.
भारतीय हवामान खात्याच्या आकडेवारीनुसार ठाणे जिल्ह्यात १ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट दरम्यान सरासरी पाऊस २०२ मिलीमीटर इतका असतो, मात्र या वर्षी त्या सात दिवसांत जिल्ह्यात ६४४ मिलीमीटर इतक्या अतिरिक्त पावसाची नोंद झालीये. ३ आणि ४ ऑगस्ट रोजी औरे पाल्हेरी गावाचा संपर्क तुटला होता आणि दोन दिवस नदीतलं पाणी ओसरण्याची वाट पाहावी लागली होती. “आमी देवाला हात जोडतो, संध्याकाळी घरी परतल्यावर का तर आमी वाचलो म्हणून,” आनंद सांगतात. “आता उद्याचं कुणाला माहित, बघू आता.”
अनुवादः ज्योती शिनोळी