सकाळच्या वेळी अनू झाडाखाली प्लास्टिकची फाटकी सतरंजी टाकून बसलीये. केस विस्कटलेले आणि चेहऱ्याचा रंग उडालेला. तिथून जाणारे लोकही तिच्याशी जरा अंतर राखूनच बोलतायत. जवळ काही गुरं निवांत बसलीयेत आणि कडबा उन्हात वाळतोय.
“पाऊस असला तरी मी छत्री घेऊन इथे झाडाखाली बसते पण घरात पाय ठेवत नाही. माझी सावली देखील कुणावर पडता कामा नये. देवाचा कोप झालेला परवडायचा नाही,” अनू म्हणते.
तिच्या घरापासून १०० मीटरवर, मोकळ्या माळावर असलेलं हे झाड दर महिन्यात तिची पाळी आली की तिचं घर असतं.
“माझी मुलगी माझ्यासाठी ताटलीत जेवण ठेवून जाते,” अनू सांगते (नाव बदललं आहे). बाजूला बसलं की वापरायची भांडी पण वेगळी आहेत. “आता मी काही मजा म्हणून इथे बसलेले नाहीये. मला [घरी] काम आहे, पण आमची रीत जपायचीये म्हणून मी इथे येते. पण जेव्हा खूप काम असतं तेव्हा मी आमच्या रानातलं काम करते की.” अनूच्या घरची १.५ एकर शेती आहे आणि त्यात ते नाचणीचं पीक घेतात.
या ‘विलगीकरणाच्या’ काळात अनू एकटी असली तरी ही रीत पाळणारी काही ती एकमेव नाहीये. तिच्या मुली, वय १९ आणि १७, या दोघीही हेच करतात (तिच्या २१ वर्षांच्या थोरल्या मुलीचं लग्न झालंय). तिच्या पाड्यावरच्या कडुगोल्ला समुदायाच्या साधारण २५ कुटुंबांमधल्या सगळ्याच स्त्रियांना अशा प्रकारे बाजूला बसायला लागतं.
नुकत्याच बाळंत झालेल्या बायांना तर जास्तच कठोर निर्बंध सहन करावे लागतात. अनूला आसरा देणाऱ्या झाडापासून जवळच एकमेकींपासून जराशा अंतरावर सहा झोपड्या आहेत. बाळ-बाळंतीण इथे येऊन राहतात. एरवी या रिकाम्याच असतात. आणि ज्यांची पाळी सुरू आहे अशांनी झाडाखालीच मुक्काम करायचा असतो.
या झोपड्या आणि झाड या वस्तीच्या परसात आहे असं म्हणता येईल. कर्नाटकातल्या रामनगर जिल्ह्याच्या चन्नपटणा तालुक्यातल्या अरलसंद्रा (जनगणना २०११ नुसार १०७० लोकसंख्या) गावाच्या उत्तरेकडे हा पाडा आहे.
बाजूला बसलेल्या, ‘विलगीकरणात’ असलेल्या या झुडुपांच्या आडोशाला किंवा रिकाम्या झोपड्यांमध्ये आपले विधी उरकतात. घरचे लोक किंवा शेजारी बादल्या किंवा टमरेलात पाणी देतात.
बाळंतिणीला आणि तिच्या नवजात बाळाला किमान एक महिना या बाहेरच्या झोपड्यांमध्ये रहावं लागतं. पूजा (नाव बदललं आहे) गृहिणी आहे. वयाच्या १९ व्या वर्षी लग्न झाल्यानंतर तिने वाणिज्य शाखेची पदवी घेतली आहे. २०२१ च्या फेब्रुवारी महिन्यात बंगळुरुच्या एका खाजगी दवाखान्यात तिला बाळ झालं. “सिझर झालं. माझे सासरचे आणि नवरा दवाखान्यात आले पण त्यांना एक महिनाभर बाळाला हात लावायला मनाई असते. माझ्या माहेरी [अरलसंद्रा गावाचा कडुगोल्ला पाडा. ती आणि तिचा नवरा याच जिल्ह्यात, वेगळ्या गावी राहतात] आल्यावर मी १५ दिवस या झोपडीत काढले. त्यानंतर मी या झोपडीत आले,” आपल्या माहेरच्या घरासमोरच असलेल्या झापाच्या खोपटाकडे बोट दाखवत पूजा सांगते. बाळंत होऊन ३० दिवस पूर्ण झाल्यानंतरच ती बाळाला घेऊन घरात आली.
ती बोलत असतानाच बाळ रडायला लागतं. मग तिच्या आईच्या साडीच्या झोळीत ती बाळाला टाकते. “ती तिथल्या झोपडीत एकटीने १५ दिवस राहिली. आमच्या गावात आम्ही तितकं कडक पाळत नाही. [कडुगोल्लांच्या] इतर गावांमध्ये आई आणि बाळाला किमान दोन महिने झोपडीत रहावं लागतं,” पूजाची आई गंगम्मा सांगतात. त्या अंदाजे चाळिशीच्या आहेत. हे कुटुंबं मेंढरं पाळतं आणि त्यांच्या एकरभर रानात नाचणी आणि आंबा आहे.
पूजा आई काय म्हणतीये ते ऐकतीये. बाळ झोळीत शांत निजलंय. “मला काहीच त्रास झाला नाही. आई आहे ना सगळं सांगायला. बाहेर गरम फार होतं, तितकंच,” ती म्हणते. आता २२ वर्षांची असलेली पूजा एमकॉम करू इच्छिते. तिचा नवरा बंगळुरूच्या एका खाजगी कॉलेजमध्ये मदतनीस आहे. “त्याला पण वाटतं की ही प्रथा मी पाळावी,” ती म्हणते. “सगळ्यांचं तेच म्हणणं आहे. मला काही इथे रहावंसं वाटत नाहीये. पण मी भांडत बसले नाही. आम्ही सगळ्यांनी हेच करावं अशी अपेक्षा आहे.”
*****
ही प्रथा कडुगोल्लांच्या इतर पाड्यांवर पण आढळून येते. या पाड्यांना स्थानिक भाषेत गोल्लारादोड्डी किंवा गोल्लाराहट्टी म्हणतात. काडुगोल्ला पूर्वी भटके मेंढपाळ होते आणि कर्नाटकात त्यांचा समावेश इतर मागासवर्गीयांमध्ये करण्यात आला आहे (त्यांची मागणी अनुसूचित जमातीमध्ये नोंद व्हावी अशी आहे). कर्नाटकात त्यांची संख्या ३ लाख (मागासवर्ग कल्याण विभाग, जि. रामनगर चे उप संचालक पी. बी. बसवराजू यांच्या अंदाजानुसार) ते १० लाख (कर्नाटक मागासवर्ग आयोगाचे माजी सदस्य, ज्यांना नाव उघड करायचे नाही) अशी आहे. बसवराजू सांगतात की हा समुदाय विशेषकरून राज्याच्या दक्षिण आणि मध्य प्रांतातल्या १० जिल्ह्यांमध्ये राहतो.
पूजाच्या या झोपडीपासून ७५ किलोमीटर दूर, तुमकुर जिल्ह्याच्या डी. होसहळ्ळी गावातल्या काडुगोल्ला पाड्यावर जयम्मा दुपारच्या वेळी आपल्या घरासमोरच्या रस्त्यावर एका झाडाखाली बसलीये. पाळीचा पहिलाच दिवस आहे. ती बसलीये तिथून मागेच उघडी नाली वाहतीये. तिच्या शेजारी जमिनीवरच एक स्टीलची ताटली आणि पेला ठेवलाय. दर महिन्यात तीन दिवस ती झाडाखालीच मुक्काम करते, अगदी भर पावसातसुद्धा, ती सांगते. घरचं स्वयंपाकाचं काम बंद असतं. पण ती जवळच्या माळावर मेंढरं चारायला नेते.
“कुणाला असं उघड्यावर निजावंसं वाटेल?” ती विचारते. “पण सगळे असं करतात कारण देवाचीच [काडुगोल्ला कृष्णाचे भक्त आहेत] तशी इच्छा आहे,” ती म्हणते. “काल पावसात मी डोक्यावर हे [ताडपत्री] पांघरून बसले होते.”
जयम्मा आणि तिचा नवरा दोघंही मेंढरं पाळतात. त्यांची विशीत असलेली दोन्ही मुलं बंगळुरूत एका कारखान्यात कामाला आहेत. “त्यांची लग्नं झाली की त्यांच्या बायकांना देखील या काळात बाहेरच निजावं लागेल. आम्ही आमचे रिवाज पाळतो,” ती सांगते. “मला आवडत नाही म्हणून सगळं बदलत नसतं. माझ्या नवऱ्याने आणि गावातल्या इतरांनी जर ठरवलं की ही प्रथा थांबवायची, तरच मी त्या दिवसात घरात थांबेन.”
कुणिगळ तालुक्यातल्या डी. होसहळ्ळी गावाच्या काडुगोल्ला पाड्यावरच्या इतर बायांचीही हीच गत आहे. “माझ्या गावात पाळी आली की बाया तीन दिवस घराबाहेर राहतात आणि चौथ्या दिवशी सकाळी घरात येतात,” ३५ वर्षीय लीला एम एन (नाव बदललं आहे) सांगतात. त्या अंगणवाडीत काम करतात. त्या देखील पाळीच्या काळात बाहेर बसतात. “सवय झालीये. देवाचा कोप होऊ नये म्हणून कुणीच ही प्रथा थांबवत नाहीये,” त्या सांगतात. “रात्रीच्या वेळी घरातली पुरुष मंडळी – भाऊ, आजा किंवा नवरा – घरातूनच लक्ष ठेवतात किंवा घराबाहेर जरा लांब थांबतात,” लीला सांगतात. “चौथ्या दिवशी जर पाळी सुरूच असली तर त्या घरात आल्या तरी घरच्यांपासून लांबच थांबतात. बाया नवऱ्यासोबत शेजेत झोपत नाहीत. पण घरातली कामं मात्र आम्ही करतो.”
या आणि इतरही अनेक काडुगोल्ला पाड्यांवरच्या स्त्रियांना दर महिन्यात असं घराबाहेर रहावं लागत असलं तरी पाळी सुरू असलेल्या किंवा बाळंतिणीला बाजूला बसायला लावणं कायद्याने गुन्हा मानलं आहे. कर्नाटक अघोरी प्रथा आणि जादूटोणा प्रतिबंध व निर्मूलन कायदा, २०१७ (४ जानेवारी २०२० रोजी अधिसूचित) नुसार एकूण १६ प्रथांवर बंदी घालण्यात आली आहे ज्यात, “पाळी सुरू असलेल्या किंवा बाळंतिणीला एकटं टाकणे, गावात प्रवेश नाकारणे किंवा बाजूला बसायला लावणे अशा अघोरी प्रथां”चाही समावेश आहे. अशा गुन्ह्यांसाठी एक ते सात वर्षांची कैद आणि दंडाची तरतूद करण्यात आली आहे.
पण या कायद्याच्या धाकामुळे या प्रथा पाळायचं कुणी थांबवलेलं नाही, काडुगोल्ला समाजाच्या आशा किंवा अंगणवाडी कार्यकर्त्यांनीही नाही. डी. होसहळ्ळी गावातल्या आशा डी. शारदाम्मा (नाव बदललं आहे) दर महिन्यात पाळीच्या काळात उघड्यावरच मुक्काम करतात.
“गावात सगळ्याच हे पाळतात. मी चित्रदुर्गमध्ये लहानाची मोठी झाले. तिथे लोकांनी हे थांबवलंय कारण त्यांच्या मते बाहेर वातावरण तितकं काही सुरक्षित नाही. इथे मात्र सगळ्यांना ही भीती आहे की आपण प्रथा मोडली तर देवाचा कोप होईल. समाजाची एक घटक म्हणून मी देखील हे पाळते. एकटीने काय बदल घडणारे? आणि बाहेर असताना मला कसलाही त्रास झालेला नाही,” शारदाम्मा सांगतात. त्या अंदाजे चाळिशीच्या असतील.
शासकीय सेवेत असलेल्या काडुगोल्ला समुदायाच्या घरांमध्येही या प्रथा सुरूच आहेत. ४३ वर्षीय मोहन एस. (नाव बदललं आहे) डी. होसहळ्ळी ग्राम पंचायतीत काम करतात. त्यांच्या वहिनीने एमए बीएड केलंय. तिला डिसेंबर २०२० मध्ये बाळ झालं तेव्हा तीदेखील बाळाला घेऊन दोन महिने त्यांच्यासाठी खास तयार केलेल्या खोपटात राहिली. “जेवढे दिवस बाहेर रहावं लागतं ते संपवूनच ती नंतर घरात आली,” मोहन सांगतात. त्यांची पत्नी भारती (नाव बदललं आहे) वय ३२ मान डोलावून दुजोरा देते. “मी देखील पाळी आली की कशालाही स्पर्श करत नाही. सरकारने ही प्रथा अजिबात बदलू नये. त्यांना काही करायचंच असेल तर आम्हाला राहण्यासाठी एखादी चांगली खोली बांधून द्यावी. म्हणजे झाडाखाली मुक्काम करावा लागणार नाही.”
*****
मधल्या काळात अशा खोल्या बांधण्याचे प्रयत्नसुद्धा झालेत. कर्नाटक सरकारने प्रत्येक काडुगोल्ला पाड्याच्या बाहेर एका वेळी १० स्त्रिया एकत्र राहू शकतील असं महिला भवन बांधण्याच्या सूचना केल्या असल्याचं १० जुलै २००९ रोजी आलेल्या बातम्यांमधून कळतं.
हा आदेश येण्याआधीच डी. होसहळ्ळी गावातल्या जयम्माच्या पाड्याबाहेर स्थानिक पंचायतीने सिमेंटच्या भिंतींची एक खोली बांधली होती. कुणिगल तालुका पंचायतीचे सदस्य असणारे कृष्णप्पा जी. टी. सांगतात की ती खोली ५० वर्षांपूर्वी, ते अगदी लहान असताना बांधली होती. त्यांच्या गावातल्या बायका झाडाखाली झोपण्याऐवजी त्या खोलीचा वापर करत होत्या. आता त्या खोलीची पडझड झालीये आणि झाडोरा आणि वेली वाढल्या आहेत.
अरलसंद्राच्या काडुगोल्ला पाड्यावर देखील अशीच एक खोली बांधली होती. ही मोडकळीला आलेली खोली आताशा कुणीच वापरत नाही. “चार-पाच वर्षांपूर्वी जिल्हा प्रशासनातले आणि पंचायतीचे काही सदस्य आमच्या पाड्यावर आले होते,” अनू सांगते. “त्यांनी [पाळीच्या काळात] बाहेर बसलेल्या बायांना घरी जायला सांगितलं. ते म्हणाले की असं बाहेर बसणं चांगलं नाहीये. आम्ही खोली रिकामी केल्यानंतरच ते गेले. त्यानंतर सगळ्या परत खोलीत आल्या. काही महिने गेले आणि ते परत आले आणि आम्हाला सांगायला लागले की पाळी सुरू असताना आम्हीच घरीच रहायला पाहिजे. त्यानंतर त्यांनी ती खोली पाडायला सुरुवात केली. पण खंर तर ती खोली आमच्या उपयोगाची होती. किमान आम्हाला संडासला जायला तरी फार कष्ट पडत नव्हते.”
२०१४ साली, माजी महिला बाल कल्याण मंत्री उमाश्री यांनी काडुगोल्ला समुदायाच्या या प्रथांविरोधात आवाज उठवायचा प्रयत्न केला होता. त्याचंच प्रतीक म्हणून त्यांनी डी. होसहळ्ळीमध्ये पाळी सुरू असलेल्या बायांना राहण्यासाठी बांधलेल्या खोलीचा काही भाग पाडला. “उमाश्री मॅडमनी आमच्या बायांना सांगितलं की पाळीच्या काळात घरातच रहायचं म्हणून. त्या आमच्या गावी आल्या होत्या, तेव्हा काही जणींनी त्यांचं म्हणणं ऐकलं. पण कुणीही ही प्रथा पाळायचं थांबवलं नाही. त्या पोलिसांना आणि गावाच्या लेखापालाला सोबत घेऊन आल्या. त्यांनी दरवाजा आणि खोलीचा काही भाग पाडला. त्यांनी आमच्या भागाचा विकास करण्याचं वचन दिलं होतं, पण प्रत्यक्षात काहीच झालं नाही,” तालुका पंचायत सदस्य कृष्णप्पा जी. टी. सांगतात.
असं असलं तरीही फेब्रुवारी २०१७ मध्ये ग्राम पंचायत अध्यक्ष झालेल्या धनलक्ष्मी के. एम. (या काडुगोल्ला समुदायाच्या नाहीत) यांनी पुन्हा एकदा स्त्रियांसाठी स्वतंत्र खोली बांधण्याची करण्याची तयारी दर्शवली. “पाळीच्या किंवा बाळंत झाल्यानंतर लगेचच्या नाजूक काळात बायकांना घराबाहेर रहावं लागतंय, त्यांना इतक्या खालच्या पातळीवर आणून ठेवलंय हे पाहून मला धक्का बसलाय,” त्या सांगतात. “मी किमान त्यांच्यासाठी स्वतंत्र गृहं बांधण्याचा प्रस्ताव तरी ठेवीन. खेदाची बाब ही की अगदी शिकलेल्या तरुण मुलीसुद्धा ही प्रथा पाळणं थांबवत नाहीयेत. त्या स्वतःच विरोध करत असतील, तर मी एकटी फारसा बदल घडवून आणू शकत नाही.”
या खोल्यांचा तिढा एकदाच काय ते सोडवून टाका असं बाकीच्यांचं म्हणणं आहे. “बायांसाठी वेगळ्या खोल्या बांधल्या तर त्याचा उपयोग होऊ शकतो, पण त्यांनी ही प्रथा कायमचीच बंद करावी असं आमचं म्हणणं आहे,” जिल्हा मागास वर्ग विभागाचे पी. बी. बसवराजू म्हणतात. “आम्ही काडुगोल्ला स्त्रियांशी संवाद साधतो आणि अंधश्रद्धा पोसणाऱ्या अशा प्रथा थांबवण्यासाठी त्यांचं समुपदेशन करतो. पूर्वी आम्ही जाणीवजागृती अभियानं देखील राबवली आहेत.”
पाळीच्या काळात स्त्रियांना राहण्यासाठी वेगळ्या खोल्या बांधणं हा काही उपाय नाहीये असं अरलसंद्राजवळच्या गावचे के. अर्केश म्हणतात. ते केंद्रीय राखीव पोलिस दलातून पोलिस महासंचालक म्हणून निवृत्त झाले आहेत. “कृष्णा कुटीर [या खोल्यांचं नाव] बांधून या प्रथेला मान्यता दिली जात होती. कोणत्याही प्रसंगात स्त्रिया विटाळ, अशुद्ध आहेत या संकल्पनेचं समर्थन न करता ती मोडीत काढायची गरज आहे,” ते म्हणतात.
“या अशा कट्टर प्रथा असतात ना त्या अतिशय क्रूर असतात,” ते पुढे म्हणतात. “पण समाजाचा दबावच असा असतो की स्त्रिया एकत्र येऊन त्या विरोधात लढू शकत नाहीत. सामाजिक क्रांती झाली तेव्हा कुठे सतीची प्रथा बंद पाडली गेली. बदल घडावा अशी इच्छा होती. निवडणुकीच्या राजकारणामुळे आपले राजकारणी अशा विषयांना स्पर्शदेखील करू इच्छित नाहीत. खरं तर राजकारणी, सामाजिक कार्यकर्ते आणि लोकांचा एकत्र सहभाग गरजेचा आहे.”
*****
हे होत नाही तोवर दैवी कोप आणि सामाजिक कलंकाची भीती खोलवर रुजलेली असल्याने ही प्रथा सुरूच आहे.
“आम्ही जर ही प्रथा पाळली नाही, तर काही तरी वाईट घडेल,” अरलसंद्राच्या काडुगोल्ला पाड्यावरची अनू सांगते. “बरीच वर्षं झाली, आमच्या कानावर आलं होतं की तुमकुरमध्ये एका बाईने पाळीच्या काळात बाहेर बसायला नकार दिला तर कसं काय माहित नाही पण तिचं घरच पेटलं.”
“आम्ही असं वागावं अशी आमच्या देवाची इच्छा आहे आणि आम्ही जर त्याचं ऐकलं नाही तर त्याचे भोग आम्हालाच भोगावे लागणार,” डी. होसहळ्ळी ग्राम पंचायतीचे मोहन एस. म्हणतात. तर ही पद्धत बंद झाली तर, ते म्हणतात, “आजार वाढतील, आमची शेरडं-मेंढरं मरतील. खूप अडचणी येतील, लोकांचं नुकसान होईल. त्यामुळे ही पद्धत बंद व्हायला नको. आम्हाला असे काही बदल नकोत.”
“मंड्या जिल्ह्यात एक बाई पाळीच्या काळात घरात थांबली होती तर तिला साप चावला,” गिरीगम्मा सांगतात. त्या रामनगर जिल्ह्याच्या सथनूर गावातल्या काडुगोल्ला पाड्यावर राहतात. या गावी शासनाने संडास बाथरूम असलेली एक खोली बांधून दिली आहे. तिचा बाया वापर करतात. गावातल्या एका अरुंद गल्लीतून या खोलीकडे वाट जाते.
गीता यादव सांगते की तीन वर्षांपूर्वी पहिल्यांदाच तिला पाळीच्या काळात या खोलीत एकटीला रहावं लागलं होतं आणि तेव्हा ती फार घाबरून गेली होती. “मी रडले, आईला विनवलं की मला तिथे पाठवू नको म्हणून. पण तिने काहीच ऐकलं नाही. आता तिथे सोबत कुणी तरी मावशी [पाळी सुरू असणारी] असतेच. त्यामुळे मला निवांत झोप लागते. मी क्लासला जाते आणि पाळीच्या काळात तिथून थेट त्या खोलीतच जाते. एकच वाटतं, तिथे खाटा तरी हव्या होत्या, म्हणजे जमिनीवर झोपावं लागलं नसतं,” ११ वीत शिकणारी १६ वर्षांची गीता म्हणते. “भविष्यात जर मी मोठ्या शहरात कामाला गेले तर मी वेगळ्या खोलीत राहीन आणि कशालाही स्पर्श करणार नाही. ही परंपरा मी चालू ठेवीन. आमच्या गावात त्याला फार महत्त्व आहे,” ती म्हणते.
अगदी १६ वर्षांची असणारी गीता ही परंपरा पुढे सुरू ठेवणार असं म्हणते आणि ६५ वर्षांच्या गिरिगम्मा तर ठामपणे म्हणतात की त्यांच्या समुदायातल्या बायांनी कुरकुर बंद केली पाहिजे. बाहेर बसल्यावर चार दिवस आराम मिळतो ना. “आम्ही देखील ऊनवाऱ्यात बाहेरच बसलोय. असंही कधी कधी व्हायचं की वादळ वगैरे आलं तरी मी इतर जातीच्या लोकांच्या घरी आसरा घ्यायचे कारण आमच्या जातीतलं कुणाच्याच घरी मला प्रवेश नव्हता,” त्या सांगतात. “कधी कधी जमिनीवर ठेवलेलं, पानावर वाढलेलं अन्न आम्ही खाल्लंय. आजकाल तरी बायकांना वेगळी भांडी मिळतायत. आम्ही कृष्णाचे भक्त आहोत, इथल्या बायांना ही परंपरा न पाळून कसं चालेल?”
“आम्ही तीन-चार दिवस फक्त बसून राहतो, झोपतो आणि खातो. एरवी स्वयंपाक करा, साफसफाई करा, शेरडांच्या मागे जा. पाळीच्या खोलीत गेलं की यातलं काहीही करावं लागत नाही,” २९ वर्षांची रत्नम्मा (नाव बदललं आहे) सांगते. ती कनकपुरा तालुक्यातल्या कब्बाल ग्राम पंचायतीत अंगणवाडी कार्यकर्ती आहे (सथनूर देखील याच तालुक्यात आहे).
गिरीगम्मा आणि रत्नम्मांना ही परंपरा फायद्याची वाटत असली तर अशा चालीरितींमुळे अनेक अपघात आणि मृत्यूही झाले आहेत. डिसेंबर २०१४ मध्ये वर्तमानपत्रात आलेल्या बातमीनुसार तुमकुरमध्ये आईसोबत झोपडीत राहणारं नवजात अर्भक पावसामुळे थंडीने मरण पावलं. दुसरी एक बातमी मंड्या जिल्ह्यातल्या मड्डूर तालुक्यातली. इथल्या काडुगोल्ला पाड्यावर २०१० साली एका १० दिवसांच्या मुलीला कुत्र्याने ओढून नेलं.
२२ वर्षीय पल्लवी डी. होसहळ्ळीच्या काडुगोल्ला पाड्यावर राहते. या वर्षी फेब्रुवारी महिन्यात तिलं पहिलं बाळ जन्माला आलं. ती असा काही धोका असल्याचं नाकारते. “इतक्या सगळ्या वर्षांत अशा एक दोन घटना झाल्या तर त्याचं काय एवढं? ही झोपडी खरं तर खूपच आरामशीर आहे. मला कशाची भीती? पाळीच्या काळात मी कायमच रात्री अंधारात घराबाहेर राहिले आहे. त्यात काही नवीन नाही,” आपल्या बाळाला जोजवत ती सांगते.
पल्लवीचा नवरा तुमकुरमध्ये एका गॅस कारखान्यात कामाला आहे. ती आपल्या बाळाला घेऊन या झोपडीत मुक्काम करतीये. तिच्या जवळ असावं म्हणून जवळच काही अंतरावर एका वेगळ्या खोपटात तिची आई आणि आजी राहतायत. या दोन्हींच्या मधल्या भागात एक स्टॅंडा पंखा आणि एक दिवा आहे. आणि मोकळ्या भागात चुलीवर पाणी गरम करण्यासाठी पातेलं ठेवलं आहे. पल्लवी आणि तिच्या तान्ह्या बाळाचे कपडे झोपडीवरच उन्हात सुकायला घातलेले आहेत. दोन महिने आणि तीन दिवस पूर्ण झाल्यानंतर आई आणि बाळाला सुमारे १०० मीटरवर असलेल्या त्यांच्या घरी घेतलं जाईल.
काही काडुगोल्ला कुटुंबं नवजात बाळ आणि आईला घरात घेण्याआधी मेंढ्याचा बळी देण्याचा विधी करतात. विटाळ धुऊन काढायचा विधी जास्त प्रमाणात आढळतो, ज्यात ही झोपडी आणि आई व बाळाचे सगळे कपडे स्वच्छ धुऊन काढतात. आणि गावातले जुने जाणते लोक लांबूनच आई आणि बाळाला सूचना देतात. त्यानंतर त्यांना गावातल्या देवळात नामकरणासाठी म्हणजेच नाव ठेवण्यासाठी नेलं जातं. तिथे ते देवाची पूजा करतात आणि जेवतात. आणि त्यानंतर त्यांना घरात प्रवेश मिळतो.
*****
अर्थात या सगळ्याविरोधात थोडे थोडे सूर उमटतायत.
अरलसंद्राच्या काडुगोल्ला पाड्यावर राहणाऱ्या डी. जयलक्षम्मा पाळीच्या काळात बाहेर बसत नाहीत. त्यांच्या समाजाच्या लोकांनी वारंवार त्यांना परंपरा पाळण्याची सूचना केली असली तरी. ४५ वर्षीय लक्षम्मा अंगणवाडीत काम करतात. आपल्या चारही बाळंतपणांनंतर त्या दवाखान्यातून थेट आपल्या घरी आल्या. शेजारपाजारच्या काडुगोल्ला कुटुंबांचा रोषही त्यांना पत्करावा लागला.
“माझं लग्न झालं तेव्हा इथल्या सगळ्या बाया पाळीच्या काळात गावाबाहेर जायच्या आणि छोट्या खोपीत किंवा झाडाखाली बसायच्या. माझ्या नवऱ्याने त्याला आक्षेप घेतला होता. लग्नाआधी माझ्या माहेरी देखील मला हे बिलकुल आवडायचं नाही. त्यामुळे मी ते पाळणं सोडून दिलं. पण अजूनही गावातले लोक मला टोमणे मारतात,” दहावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या जयलक्षम्मा सांगतात. वय वर्षं १९ ते २३ या वयोगटातल्या त्यांच्या तिघी मुली देखील पाळीच्या काळात बाहेर बसत नाहीत.
“ते [गावकरी] आम्हाला टोमणे मारायचे, त्रास द्यायचे. आम्हाला काही अडचण आली तर ते लगेच म्हणायचे की आम्ही या चालीरिती पाळत नाही म्हणून असं होतंय. आमचं काही तरी वाईट होणार असंही ते आम्हाला सांगायचे. चक्क आम्हाला टाळायचे. गेल्या काही वर्षांत कायद्याच्या भीतीमुळे लोक आम्हाला टाळायचे ते थांबलंय,” जयलक्षम्मांचे पती ६० वर्षीय कुल्ला करियप्पा म्हणतात. एमए-बीएड केलेले करियप्पा कॉलेजमध्ये प्राध्यापक होते. “जेव्हाही गावातले लोक मला ही प्रथा पाळा म्हणायचे तेव्हा मी त्यांना सांगायचो की मी एक शिक्षक आहे, आणि मी हे असं वागू शकत नाही. आपण कायम त्याग करायला पाहिजे असं आपल्या पोरीबाळींच्या मनावर बिंबवण्यात आलेलं आहे,” ते संतापून म्हणतात.
जयलक्षम्मांप्रमाणे, दोन मुलांची आई असलेल्या ३० वर्षीय अमृताला (नाव बदललं नाही) देखील असं सक्तीने बाहेर बसण्याची प्रथा पाळण्याची इच्छा नाही. पण ती ते थांबवू शकत नाहीये. “वरून कुणी तरी (अधिकारी किंवा राजकारणी) आमच्या गावातल्या म्हाताऱ्या मंडळींनी सांगायला पाहिजे. नाही तर काय माझ्या पाच वर्षांच्या मुलीला [ती मोठी झाल्यावर] सुद्धा ते सोडणार नाहीत. मलाही तिला असंच करायला सांगावं लागेल. मी एकटीने काही ही प्रथा थांबवू शकत नाही.”
पारी आणि काउंटरमीडिया ट्रस्टने पॉप्युलेशन फाउंडेशन ऑफ इंडियाच्या सहाय्याने ग्रामीण भारतातील किशोरी आणि तरुण स्त्रियांसंबंधी एक देशव्यापी वार्तांकन उपक्रम हाती घेतला आहे. अत्यंत कळीच्या पण परिघावर टाकल्या गेलेल्या या समूहाची परिस्थिती त्यांच्याच कथनातून आणि अनुभवातून मांडण्याचा हा प्रयत्न आहे.
हा लेख पुनःप्रकाशित करायचा आहे? कृपया zahra@ruralindiaonline.org शी संपर्क साधा आणि namita@ruralindiaonline.org ला सीसी करा