मीना यादव अगदी सहज वेगवेगळ्या भाषा बोलते. कोलकात्याच्या लेक मार्केट या बहुरंगी परिसरात गाडीवर मक्याची कणसं घ्यायला येणारे, रस्ता विचारायला थांबलेले लोक किंवा मित्र-मैत्रिणींशी ती अगदी मजेत भोजपुरी, बंगाली आणि हिंदीत बोलत असते. “कोलकात्यात [भाषेची] काय अडचण येत नाही,” स्थलांतरित कामगार म्हणून रोज काय काय अडचणी येतात हे मीना सांगते.
“यह सिर्फ कहने का बात है की बिहारी लोग बिहार में रहेगा. अंगमेहनतीची सगळी कामं आम्हीच तर करतो. हमाल घ्या, पाणीवाले घ्या, स्टेशनवरचे कूली पण बिहारीच आहेत. बंगाली लोकांना जमणारच नाहीत ही कामं. तिथे न्यू मार्केट, हावडा, सियालदाला जाऊन पहा... सगळी जड कामं बिहारीच करतायत. पण, इतके कष्ट करूनही त्यांना आदर मात्र मिळत नाही. बिहारी लोक सगळ्यांना बाबू म्हणतात, पण लोक मात्र त्यांना कमी समजतात. कसंय, आंब्याचा गर बंगाली माणसाला आणि कोय बिहाऱ्याला अशी गत आहे,” ती सांगत राहते.
भाषा आणि समाज म्हणून आपली ओळख याबद्दल मीना अगदी सहज आपले विचार मांडते.
“तिथे चेन्नईत आम्हाला [संवाद साधण्यात] अवघड जातं,” ती सांगते. “हिंदी किंवा भोजपुरीत बोललं तर तिथे कुणी उत्तरच देत नाही. ते त्यांच्याच भाषेत बोलतात. ती आम्हाला येत नाही. पण इथे तसं काही नाही,” मीना सांगते. “कसंय, बिहारी अशी काही एक भाषा नाहीये. घरी आम्ही ३-४ भाषा बोलतो. भोजपुरी, कधी हिंदी तर कधी दरभंगिया [मैथिली] आणि कधी कधी बांग्ला. पण दरभंगियाच खरं तर जास्त,” बिहारच्या छपराची मूळ रहिवासी असलेली ४५ वर्षीय मीना सांगते.
“आम्ही कधी कधी आरा किंवा छपरा बोलीत बोलतो. काही अडचण येत नाही. आम्हाला वाटतं त्या भाषेत आम्ही बोलतो,” बहुभाषिक मीना ‘त्यात काय एवढं’ अशा आविर्भावात सांगते. आणि तरीही आपल्याला इतक्या सगळ्या भाषा येतात हे काही विशेष कौशल्य असल्याचं तिच्या मनातही येत नाही.

बिहारची स्थलांतरित कामगार मीना यादव कोलकात्याच्या लेक मार्केट परिसरात मक्याची कणसं विकते. कामाचा भाग म्हणून ती अगदी सहज भोजपुरी, बंगाली, मैथिली आणि हिंदी बोलू शकते. इतकंच काय ती आरा आणि छपरा बोलीही बोलू शकते
‘या बहुगुणी जगाबद्दल बोलण्याच्या बहुविध प्रकार साजरे करू या’ वगैरे गप्पा युनेस्कोच्या महासंचालकांसाठीच राखून ठेवलेल्या बऱ्या. मीनासाठी हिशोब सरळसाधा आहे. तिला ज्यांच्यासाठी काम करतो, जे कामावर ठेवतात, जे गिऱ्हाईक आहेत आणि जे आसपास राहतात त्यांची भाषा तिला शिकावीच लागते. “इतक्या सगळ्या भाषा येतात ही चांगलीच गोष्ट आहे पण त्या शिकण्यामागचं कारण कामाची निकड आहे,” ती सांगते.
आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनाच्या निमित्ताने पारीने मीनासारख्या इतर काही लोकांशी संवाद साधला. गरिबीमुळे गाव सोडून दुसरीकडे गेलेले, आपल्याच देशात परके ठरणारे, ज्या बोलीत जन्मलो तिच्यापासून विलग झालेले हे आपलेच देशबांधव आहेत. देशाच्या कानाकोपऱ्यात राहत असताना ते त्यांचं भाषाविश्व कसं जगतात, कसं जतन करतात आणि फुलवतात त्याचा मागोवा घेण्याचा आम्ही प्रयत्न केला.
आसामच्या शंकर दास यांची अडचण जरा अनोखीच आहे. काचर जिल्ह्याच्या बोरखोला तालुक्यातल्या जरैलताला गावी शंकर लहानाचे मोठे झाले. पण शेजार सगळा बंगाली बोलणाऱ्यांचा. त्यामुळे ते आसामची राज्यभाषा आसामी कधी शिकलेच नाहीत. विशीत असताना त्यांनी गाव सोडलं आणि पुण्यातल्या सुमारे पंधरा वर्षांच्या मुक्कामात त्यांनी मराठी आणि हिंदीवर चांगलीच पकड मिळवली.
“मला मराठी नीट बोलता येते. मी अख्खं पुणं पालथं घातलंय. पण मला आसामी काही बोलता येत नाही. समजते, पण बोलू शकत नाही,” ४० वर्षीय शंकर सांगतात. एका यंत्रांच्या कारखान्यात काम करणाऱ्या शंकर यांची नोकरी कोविड-१९ च्या महासाथीत गेली आणि त्यांना आसामला परत जावं लागलं.
अभिव्यक्तीच्या बहुविध पद्धती साजऱ्या करण्याशी मीना यादवचा दुरान्वयेही संबंध नाही. ‘इतक्या सगळ्या भाषा येतात ही चांगलीच गोष्ट आहे पण त्या शिकण्यामागचं कारण कामाची निकड आहे,’ ती सांगते
“इथे तर साधं बसमध्ये शिरणं अवघड आहे. मालकाशी बोलणं फार पुढचं झालं,” ते म्हणतात. “मला तर वाटतं पुण्याला परत जावं. तिथे कामही मिळेल आणि भाषेचीही अडचण नाहीये.” त्यांच्या घरी त्यांचं चूल पेटणार नाही असंच म्हणावं लागतं.
गुवाहाटीहून तब्बल दोन हजार किलोमीटरवर देशाच्या राजधानीत १३ वर्षांचा प्रफुल सुरिन कष्टाने हिंदी शिकतोय. काहीही करून शाळा सुरू रहावी म्हणून. अपघातात वडील वारले आणि प्रफुलला आपल्या आत्यासोबत झारखंडच्या गुमलामधल्या पहानटोली पाड्यावरून नवी दिल्लीच्या मुनिरका गावात यायला लागलं. “इथे आलो तेव्हा मला फार एकटं एकटं वाटत होतं,” तो सांगतो. “कुणालाच मुंडारी भाषा यायची नाही. सगळे हिंदीच बोलायचे.”
गावातल्या शाळेत त्याची हिंदी आणि इंग्रजीची अक्षरओळख झाली होती. पण नंतर तो या शहरात आला. ती अक्षरओळख बोलण्यासाठी किंवा मनातलं सांगण्यासाठी पुरेशी नव्हती. दिल्लीमध्ये दोन वर्षं शाळा आणि आत्याने लावलेल्या विशेष शिकवणीनंतर आता त्याला “शाळेत थोडं थोडं किंवा मित्रांबरोबर खेळण्यापुरतं हिंदी बोलता येतं,” तो सांगतो. “पण घरी, आत्याशी मी मुंडारीतच बोलतो. माझी मायबोली तीच.”
दिल्लीहून १,१०० किलोमीटरवर छत्तीसगडमध्ये १० वर्षांच्या प्रीतीला शाळेत जायचं नाहीये. ती आई-वडलांसोबत राहते पण आपल्या अशा भाषेपासून कोसो दूर.
लता भोई, वय ४० आणि तिचे पती सुरेंद्र भोई, वय ६० मलुआ कोंध आदिवासी आहेत. ते ओडिशाच्या कलाहांडी जिल्ह्याच्या केंदुपारा गावातून रायपूरला आले आहेत. एका खाजगी फार्महाउसवर ते राखणदार म्हणून राहतात. त्यांना अगदी गरजेपुरती छत्तीसगडी येते आणि शेतातल्या मजुरांशी ते कामापुरतं बोलू शकतात. “वीस वर्षांपूर्वी आम्ही रोजीरोजीच्या शोधात इथे आलो,” लता सांगते. “माझे गणगोत सगळे ओडिशात आहेत. ते सगळे उडिया बोलतात. पण माझ्या मुलांना ओडिया लिहिता वाचताही येत नाही. त्यांना फक्त बोलता येत नाही. घरी आम्ही सगळे उडियाच बोलतो. मलाही आमची भाषा लिहिता वाचता येत नाही. फक्त बोलता येतं.” तिच्या सगळ्यात धाकट्या मुलीला, प्रीतीला हिंदी कविता आवडत असल्या तरी शाळेत जायला मात्र तिला आवडत नाही.



शंकर दास (डावीकडे) पंधरा वर्षं पुण्यात राहिलेत त्यामुळे त्यांना मराठी बोलता येतं. पण आसामी येत नसल्याने त्यांना स्वतःच्या राज्यात आसाममध्ये मात्र त्यांना नोकरी मिळणं मुश्किल झालं आहे. प्रीती भोई (मध्यभागी) आणि तिची आई लता भोई (उजवीकडे) ओडिशाहून कामासाठी स्थलांतरित झाल्या आहेत. प्रीतीच्या शाळेतली मुलं तिला चिडवतात त्यामुळे तिला शाळेत जावंसंच वाटत नाही
“मी माझ्या वर्गातल्या मुलांबरोबर छत्तीसगडीत बोलू शकते. पण मला इथे शिकायचंच नाहीये, कारण वर्गातली मुलं मला ‘ओडिया-धोडिया’ असं चिडवतात,” प्रीती सांगते. छत्तीसगडीमध्ये धोडिया म्हणजे घाबरट आणि बिनविषारी साप. प्रीतीचे आई-वडील तिला अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या जागेवर प्रवेश मिळाला तर ओडिशातल्या निवासी शाळेत पाठवण्याचा विचार करत आहेत.
आपले आई-वडील, मायभूमी आणि भाषेपासून अगदी लहानपणीच दुरावलं जाणं हा जवळपास प्रत्येक स्थलांतरिताचा अनुभव आहे.
रोजगाराच्या शोधात गाव सोडलं तेव्हा नागेंद्र सिंग फक्त आठ वर्षांचा होता. क्रेन चालवणाऱ्या सर्विस सेंटरवर क्लिनर म्हणून तो कामाला लागला. उत्तर प्रदेशच्या कुशीनगर जिल्ह्यातलं जगदीशपूर हे २१ वर्षीय नागेंद्रचं मूळ गाव. तिथे सगळे भोजपुरीच बोलायचे. “हिंदीहून खूप वेगळी आहे ही भाषा,” तो सांगतो. “आम्ही भोजपुरीत बोलायला लागलो तर तुम्हाला काहीही कळणार नाही.” आम्ही म्हणजे बंगळुरूच्या उत्तरेला असलेल्या बांधकामावर रंगकाम करणारे त्याचे तिघं साथीदार. अली, वय २६ आणि मनीष, वय १८ आणि नागेंद्र वेगवेगळ्या वयाचे, गावांतले आणि धर्माचे हे तिघं. पण समान धागा एकच – त्यांची मायबोली, भोजपुरी.
अगदी किशोरवयात ते आपली भाषा गावी सोडून इथे आले. “तुमच्याकडे कसब असेल ना तर तुमचं काहीही अडत नाही,” अली सांगतो. “मी दिल्ली, मुंबई, हैद्राबाद आणि अगदी सौदी अरेबियालाही जाऊन आलोय. तुम्हाला पासपोर्ट दाखवू का? मी तिथे इंग्रजी आणि हिंदी शिकलो.” हा प्रवास कसा होतो ते नागेंद्र समजावून सांगतो. “जिथे काम तिथे आम्ही जाणार. गाव का कोई लडका बुला लेता है, हम आ जाते है,” तो म्हणतो.
“या काकांसारखेही काही जण आहेत,” नागेंद्र आपल्यासोबत काम करणाऱ्या मदुराईच्या ५७ वर्षीय सुब्रमण्यम यांच्याकडे बोट दाखवून म्हणतो. “आम्ही खुणांनी बोलतो. आम्हाला कुणाला काही सांगायचं असेल तर आम्ही सुताराला सांगतो आणि मग तो काकांना सांगतो. पण आमच्या आमच्यात आम्ही भोजपुरीच बोलतो. मी संध्याकाळी खोलीवर परत जातो, खाणं बनवतो आणि भोजपुरी गाणी ऐकतो,” असं म्हणत तो खिशातून आपला मोबाइल फोन काढतो आणि त्याचं आवडतं गाणं आम्हाला ऐकवतो.


नागेंद्र सिंग (डावीकडे) आणि अब्बास अली (उजवीकडे) वेगवेगळ्या वयाचे, गावांतले आणि धर्माचे पण उत्तर बंगळुरुच्या बांधकामावर एकत्र रंगकाम करतात. ते खुणांमधून एकमेकांशी बोलतात. उजवीकडेः नागेंद्र स्वतः स्वयंपाक करता आणि डबा घेऊन येतो. तरीही गावाकडची चव आजही त्याच्या मनातून गेलेली नाही.


डावीकडेः तमिळनाडूचा सुब्रमण्यम आणि उत्तर प्रदेशातला मनीष बंगळुरूत बांधकामावर एकत्र काम करतात. ते खुणांमधून एकमेकांशी बोलतात. उजवीकडेः नागेंद्र स्वतः स्वयंपाक करता आणि डबा घेऊन येतो. तरीही गावाकडची चव आजही त्याच्या मनातून गेलेली नाही.
सवयीचं खाणं, गाणी, सण-सोहळे आणि आपल्या संस्कृतीची नाळ असलेल्या आपल्या अनेक धारणांचा अनुभव आपण भाषेच्या माध्यमातूनच घेत असतो. आणि म्हणूनच, आम्ही मायबोलीविषयी विचारू लागल्यावर अनेक जण आपसूक त्यांच्या संस्कृतीविषयी बोलू लागले.
३९ वर्षांचे बसंत मुखिया बिहारमधलं आपलं गाव सोडून मुंबईत घरगडी म्हणून कामाला आले त्याला वीस वर्षं उलटली. पण आजही मैथिली भाषेचा उल्लेख करताच घरचं खाणं आणि गाण्यांच्या आठवणी ओसंडून वाहू लागतात. “सत्तू फार आवडतं. आणि चिवडा किंवा पोहा,” ते सांगतात. मुंबईत यातल्या काही गोष्टी मिळतात पण, “माझ्या गावाची चव त्यात नाही,” असं म्हणत बसंत आपल्याला खाद्यभ्रमंतीवर घेऊन जातात. “आमच्याकडे दर शनिवारी दुपारच्या जेवणात खिचडी आणि संध्याकाळी तोंडात टाकायला भुजा. पोह्यात, भाजलेले शेंगदाणे, फुटाणे आणि त्यात चिरलेला कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, मीठ, मोहरीचं तेल आणि मसाला कालवला की भुजा तयार. इथे मुंबईत शनिवार कधी आला, कधी गेला तेही समजत नाही,” त्यांच्या चेहऱ्यावर सखेद हसू.
गावाची आणखी एक आठवण म्हणजे होळी. “त्या दिवशी तुमची दोस्त मंडळी काहीही न विचारता तुमच्या घरात घुसणार. मग काय रंगाचा नुसता राडा. आणि मग मालपुव्यावर ताव मारायचा. आम्ही फागुआ म्हणजे होळीची गाणी गायचो,” बसंत सांगतात. ते परक्या बोलीत बोलत असले तरी त्यांचं स्वतःचं गाव आपल्या डोळ्यासमोर अगदी हुबेहूब उभं राहतं.
“आपल्या गावाकडच्या, आपली भाषा बोलणाऱ्या लोकांबरोबर सण साजरे करण्याची मजा काही औरच असते,” ते म्हणतात. आवाजात काहीशी खंत ऐकू येते.
अलाहाबादच्या अमिलौटीच्या राजूंचं अगदी असंच म्हणणं आहे. गेली ३० वर्षं ते पोटापाण्यासाठी पंजाबात काम करतायत. अहिर समाजाचे राजू घरी अवधी बोलायचे. अमृतसरला आल्यावर सुरुवातीला त्यांना खूप त्रास झाला. “पण आज मी एकदम सफाईने पंजाबी बोलतो. आणि सगळ्यांचा मी इथे लाडका आहे,” ते अगदी खुशीत सांगतात.


बसंत मुखिया गेल्या दोन दशकांहून जास्त काळ मुंबईत घरगडी म्हणून काम करतायत. गावाकडची गाणी आणि नाद त्यांना आजही आठवत राहतात. मैथिली या त्यांच्या मायबोलीचं नाव काढताच त्यांना आठवण येते घरच्या खाण्याची


अलाहाबादच्या अमिलौटीचे राजू पंजाबच्या पट्टी शहरात फळं विकतात आणि अस्खलित पंजाबी बोलतात. गावात साजरे होणारे सण इथे नाहीत याची रुखरुख त्यांना लागून राहते
आणि तरीही पंजाबच्या तरन तारन जिल्ह्याच्या पट्टीमध्ये फळं विकणाऱ्या राजूंना आजही गावाकडच्या सणांची-सोहळ्यांची आठवण येतेच. कामाचा भार इतका आहे की ते गावी जाऊही शकत नाहीत. आणि “इथे आमचे सण साजरे करणं शक्यच नाही,” ते म्हणतात. “सण साजरा करायचा तर तो शंभरेक लोकात साजरा होतो. इथे दोन चार लोकांच्या सणाला कोण येणारे, सांगा?”
देशाच्या अगदी दुसऱ्या टोकाला, केरळमध्ये राहणाऱ्या मूळच्या राजस्थानच्या असलेल्या शबाना शेख अगदी हाच प्रश्न विचारतात. “आम्ही आमच्या गावात आमचे सगळे सण साजरे करतो. त्यात कसली भीड नसते. पण इथे केरळमध्ये ते कसं काय करणार?” त्या विचारतात. “दिवाळीमध्ये इथे केरळात फार काही दिवे वगैरे लावत नाहीत. पण राजस्थानात मात्र आम्ही पणत्या लावतो. फार सुंदर दिसतं सगळं,” त्या सांगतात. त्या आठवणींनीच त्यांचे डोळे लुकलुकतात.
भाषा, संस्कृती आणि स्मृती किंवा आठवणी हे सगळं एकमेकांत गुंतलं असल्याचं आम्हाला सगळ्याच स्थलांतरित कामगारांशी बोलताना जाणवत होतं. आपल्या घरापासून दूर एका घरात राहत असताना या सगळ्या गोष्टी कशा जपून ठेवायच्या तेही हे लोक आपल्याला शिकवतात.
साठी पार केलेल्या मश्रू रबारी यांचा पक्का असा पत्ताच नाही. नागपूर, वर्धा, चंद्रपूर किंवा यवतमाळच्या कुठल्या तरी रानात असा फार तर सांगता यावा. मध्य विदर्भातले पशुपालक असलेले मश्रूभाई मूळचे गुजरातेतल्या कच्छचे. “तसं पाहता मी पक्का वऱ्हाडीच आहे,” ते म्हणतात. अंगात रबारी पुरुष घालतात तसा पारंपरिक पोषाख – चुण्याचुण्यांची अंगी, धोतर आणि पांढरं पागोटं. विदर्भाच्या संस्कृतीत ते अगदी मिळून मिसळून गेले आहेत. काही शेलक्या शिव्यासुद्धा देतात ते. आणि तरीही त्यांच्या मायभूमीतले रिती-रिवाज आणि संस्कृतीशी त्यांची नाळ पक्की आहे. एका रानातून दुसऱ्या रानात निघालेल्या उंटांच्या पाठीवर पसारा तर असतोच पण सोबत असतात लोककथा, पिढ्या-पिढ्यांची शहाणीव, गाणी, प्राण्यांबद्दलचं, परिस्थितिकीबद्दलचं परंपरागत ज्ञान आणि इतरही बरंच काही.


डावीकडेः विदर्भातल्या एका कपाशीच्या रानात बसलेले मूळचे कच्छचे मश्रू रबारी स्वतःला वऱ्हाडी समजतात. उजवीकडेः राजस्थानच्या शबाना शेख (सर्वात डावीकडे) आपले पती मोहम्मद अल्वर (उजवीकडे) आणि लेक सानिया शेख (मध्यभागी) यांच्यासोबत केरळमध्ये राहतात. आपलं गाव उजळून टाकणाऱ्या पणत्यांची उणीव त्यांना भासत राहते
जेसीबीवर काम करणारा झारखंडचा २५ वर्षीय शनाउल्ला आलम सध्या कर्नाटकाच्या उडुपीत राहतोय. कामाच्या ठिकाणी चांगलं हिंदी बोलणारा तो एकटाच आहे. आपली भाषा आणि आपले लोक यांच्याशी त्याला जोडून ठेवणारी एकच गोष्ट आहे. मोबाइल फोन. आपल्या घरच्यांशी किंवा मित्रमंडळींशी फोनवर बोलताना तो हिंदी किंवा खोरठा भाषेत बोलतो. झारखंडच्या संथाल परगणा किंवा उत्तर छोटानागपूर प्रांतात ही भाषा जास्त बोलली जाते.
तेवीस वर्षांचा शोबिन यादव देखील आपल्या गणगोताशी, परिसराशी केवळ मोबाइल फोनमुळेच संपर्कात राहू शकतो. काही वर्षांपूर्वी तो “धोनीच्या घरापासून २०० किलोमीटरवर” असलेल्या आपल्या माजगाव या गावाहून कामाच्या शोधात चेन्नईला आला. इथल्या एका हॉटेलमध्ये काम करणाऱ्या शोबिनला हिंदी बोलण्याची फारशी संधीच मिळत नाही. रोज संध्याकाळी आपल्या बायकोशी बोलतो तेव्हाच त्याला हिंदी बोलता येतं. “मी माझ्या मोबाइल फोनवर हिंदी संवाद असलेले तमिळ सिनेमे पाहतो. सुरिया माझा आवडता नट आहे,” तो तमिळमध्ये सांगतो.
“हिंदी, ऊर्दू, भोजपुरी... इथे कुठलीही भाषा चालत नाही. अगदी इंग्लिशही नाही. फक्त हृदयाची भाषा चालते इथे,” विनोद कुमार सांगतात. मूळचे बिहारच्या मोतिहारी गावचे रहिवासी असणारे ५३ वर्षीय विनोद कुमार गवंडी काम करतात. काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्याच्या पट्टन तालुक्यात साजिद गनी यांच्या स्वयंपाकघरात बसून ते आमच्याशी बोलतात. “घरमालक एका मजुराच्या शेजारी बसून जेवतोय – असं इतर कुठे पाहिलंय का तुम्ही?” साजिद यांच्याकडे निर्देश करत विनोद कुमार आम्हाला विचारतात. “त्यांना माझी जात काय हे माहितही नसेल. आणि तिथे गावी, माझा स्पर्श झालेलं पाणी लोक पीत नाहीत. आणि इथे हा माणूस मला स्वतःच्या स्वयंपाकघरात बसवून खाऊ घालतो, माझ्या शेजारी बसून जेवतो.”
विनोद कुमार काश्मीरमध्ये पहिल्यांदा कामाला आले त्याला आता ३० वर्षं उलटून गेली. “मी १९९३ साली पहिल्यांदा मजुरीसाठी काश्मीरला आलो. तेव्हा मला काश्मीर म्हणजे काय हेही फारसं माहित नव्हतं. आतासारखं टीव्ही वगैरे तेव्हा काही नव्हतं. आता पेपरमध्ये काही बातम्या येतही असतील, पण मला त्यातलं काय कळणार? मला लिहिता वाचता येत नाही. आमचं कसंय, ठेकेदारानी बोलावलं की आम्ही रोजीरोटीसाठी त्याच्या बरोबर पळणार,” ते सांगतात.


डावीकडेः झारखंडचा शनाउल्ला आलम कर्नाटकाच्या उडुपीत जेसीबीवर काम करतो. आपल्या घरच्यांशी किंवा मित्रमंडळींशी फोनवर बोलताना तो हिंदी किंवा खोरठा भाषेत बोलतो. उजवीकडेः शोबिन यादवदेखील झारखंडचा आहे. चेन्नईत खानावळीत काम करत असताना तो तमिळमध्ये बोलतो आणि आपल्या बायकोशी फोनवर हिंदीत
“तेव्हा मी अनंतनाग जिल्ह्यात काम करत होतो,” सुरुवातीच्या काळातल्या आठवणी ते सांगू लागतात. “आम्ही पोचलो त्याच दिवशी अचानक सगळं बंद झालं. काही दिवस हाताला कामच नव्हतं. खिशात एकही पैसा नव्हता. पण इथल्या गावकऱ्यांनी मला, आम्हाला सगळ्यांनाच मदत केली. आम्ही १२ जण एकत्र इथे कामासाठी आलो होतो. त्यांनी आम्हाला खाऊपिऊ घातलं. तुम्हीच सांगा, कसलीही अपेक्षा न ठेवता असं कोण कुणाला मदत करतं?” ते विचारतात. कुमार आमच्याशी बोलत असताना साजिदभाई त्यांच्या थाळीत चिकनचा एक तुकडा सरकवतात. कुमार नको म्हणत असतानाही.
“मला काश्मिरी भाषेचा एक शब्दही कळत नाही,” कुमार सांगतात. “पण इथे सगळ्यांना हिंदी समजते. त्यामुळे आमचं काम सोपं झालं.”
“आणि मग भोजपुरीचं कसं?” आम्ही त्यांच्या मातृभाषेविषयी त्यांना विचारतो.
“त्यात काय?” ते म्हणतात. “माझ्या गावची मंडळी आली की आम्ही भोजपुरीतच बोलतो. पण इथे कुणाशी बोलणार? तुम्हीच सांगा,” असं विचारत हसत हसत ते म्हणतात, “मी साजिदभाईंनाच माझी भाषा थोडी थोडी शिकवलीये. का हो साजिदभाई? कइसन बानी?”
“ठीक बा,” साजिदभाई उत्तरतात.
“थोडं इथे तिथे चुकतं. पण पुढल्या वेळी तुम्ही याल ना तेव्हा ते तुम्हाला रितेशचं [भोजपुरी कलाकार] एखादं गाणंसुद्धा गाऊन दाखवतील!”
या कहाणीसाठी वार्तांकन पुढीकप्रमाणेः मोहम्मद कमार तबरेज (दिल्ली), स्मिता खटोर (पश्चिम बंगाल), प्रतिष्ठा पांड्या आणि शंकर एन. केचनुर (कर्नाटक), देवेश (काश्मीर), राजासंगीतन (तमिळनाडू), निर्मलकुमार साहू (छत्तीसगड), पंकज दास (आसाम), राजीव चेलनट (केरळ), जयदीप हर्डीकर आणि स्वर्ण कांता (महाराष्ट्र), कमलजीत कौर (पंजाब). संपादन – प्रतिष्ठा पांड्या, सहाय्यः मेधा काळे, स्मिता खटोर, जोशुआ बोधिनेत्र आणि सन्विती अय्यर . फोटो संपादन – बिनायफर भरुचा, व्हिडिओ संपादन – श्रेया कात्यायनी.
शीर्षक छायाचित्रः लाबोनी जांगी