पोटात वाढणाऱ्या गोळ्यामुळे सुनीता देवी अगदी चिंतातुर होती. तिला खाणं जात नव्हतं, पोट डब्ब झाल्याची भावना होत होती. दोन महिने तिने दुर्लक्ष केलं पण त्यानंतर ती घराजवळच्या खाजगी दवाखान्यात गेली. डॉक्टरांनी जे सांगितलं त्याने ती चक्रावलीच. “आप को बच्चा ठहर गया है.”
हे कसं काय होऊ शकतं, तिला समजेनाच. दिवस जाऊ नयेत म्हणून तांबी बसवली त्याला सहा महिने देखील झाले नव्हते.
२०१९ साली घडलेली ही घटना सांगत असताना तिचा चेहरा आणखीच फिका पडत जातो. केसांचा अंबाडा बांधलेला. खोल गेलेले डोळे थकले होते. तिच्या चेहऱ्यावरची उजळलेली एकच गोष्ट म्हणजे तिची लाल रंगाची टिकली.
सुनीता (नाव बदललं आहे) ३० वर्षांची आहे आणि तिला ४ ते १० वयोगटातली चार मुलं आहेत, दोन मुली-दोन मुलं. २०१९ साली मे महिन्यात सुनीतानं ठरवलं की आता आणखी मूल नको. तेव्हा तिचा सगळ्यात धाकटा मुलगा दोन वर्षांचा होता. त्या भागात काम करणाऱ्या आशा कार्यकर्तीकडून तिला कुटुंब नियोजनाच्या वेगवेगळ्या पद्धतींची माहिती मिळाली होती. सगळ्या पर्यायांचा विचार केल्यावर तिने गर्भनिरोधक इंजेक्शन असणाऱ्या अंतराची निवड केली होती. हे इंजेक्शन घेतल्यावर तीन महिने तरी दिवस जात नाहीत. “मी विचार केला, इंजेक्शन घेऊन तरी पाहू या,” ती सांगते.
सुनीताचं घर म्हणजे ८ बाय १० फुटाची एक खोली. जमिनीवरच्या चटईवर बसून आम्ही बोलत होतो. कोपऱ्यातल्या गॅसच्या टाकीवर आणखी काही चटया घडी करून ठेवलेल्या होत्या. शेजारच्या खोलीत सुनीताचा दीर आणि त्याचं कुटुंब राहतं. आणि आणखी एक खोली दिसते, तिथे तिचा दुसरा दीर राहतो. नैऋत्य दिल्ली जिल्ह्याच्या नजफगडमधल्या महेश गार्डन परिसरात सुनीता राहते.
गोपाळ नगर प्राथमिक आरोग्य केंद्र सुनीताच्या घरापासून दोन किलोमीटर अंतरावर आहे. आशा कार्यकर्तीबरोबर ती अंतरा इंजेक्शन घ्यायला तिथेच गेली होती. पण पीएचसीतल्या डॉक्टरांनी वेगळाच सल्ला दिला. “डॉक्टर मला इंजेक्शनऐवजी तांबीबद्दल माहिती द्यायला लागल्या. तांबी जास्त सुरक्षित असल्याने तीच बसवून घे, असं त्या म्हणाल्या,” सुनीता सांगते. “मी स्वतः डॉक्टरांना तांबीबद्दल काहीही विचारलं नव्हतं,” ती ठाम आवाजात सांगते. “पण डॉक्टर सारखी म्हणत होती, की सगळं ठीक होईल. ‘तुला अजून मुलं नको आहेत ना?’ तिने मला विचारलं होतं.”
त्या वेळी सुनीताचा नवरा (त्याचं नाव तिने सांगितलं नाही) बिहारमधल्या दरभंगा जिल्ह्याच्या कोलहंटा पटोरी या आपल्या गावी गेला होता. नजफगडमध्ये तो फळं विकण्याचं काम करतो. “डॉक्टर मागेच लागली. म्हणाली, ‘या निर्णयाशी तुझ्या नवऱ्याचा काय संबंध? तुझ्या हातात आहे सगळं. ही कॉपरटी लावलीस तर पुढची पाच वर्षं तुला दिवस जाणार नाहीत’,” सुनीता सांगते.
शेवटी सुनीता अंतरा इंजेक्शनच्या ऐवजी तांबी बसवून घ्यायला तयार झाली. नवरा दहा दिवसांनी गावाहून परत आला तोपर्यंत तिने त्याला त्याविषयी काहीच सांगितलं नाही. “मी गुपचुप, त्याला काहीही न सांगता हे करून घेतलं होतं. तो प्रचंड संतापला. मला दवाखान्यात नेलं म्हणून तो आशा कार्यकर्तीलाही खूप काय काय बोलला.”
तांबी बसवल्यानंतर दोन महिन्यांनी पाळीच्या वेळी सुनीताला अंगावरून खूप जास्त जायला लागलं. हा रक्तस्राव तांबीमुळे होतोय असं वाटून ती काढून टाकायला सुनीता जुलै २०१९ मध्ये गोपाल नंगरच्या दवाखान्यात गेली. पण दर वेळी तिथे तिला रक्तस्राव कमी होण्यासाठी औषध गोळ्या तेवढ्या देण्यात आल्या.
२०१९ साली नोव्हेंबरच्या सुमारास तिची पाळी चुकली आणि तिला पोटात काही तरी गोळा आहे अशी जाणीव व्हायला लागली. नजफगडच्या विकास हॉस्पिटलमध्ये केलेल्या “बाथरुम जांच” म्हणजेच गरोदरपणाच्या तपासणीतून तिला दिवस गेल्याचं आणि तांबी निकामी झाल्याचं सिद्ध झालं.
तांबी वापरणाऱ्या स्त्रियांना दिवस जाण्याचे प्रकार बऱ्याच वेळा घडत असतात, पश्चिम दिल्लीच्या स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. पूनम चढ्ढा सांगतात. “असं काही तरी घडण्याचं प्रमाण शंभरात एक इतकं आहे. आणि याला ठोस काहीही कारण देता येत नाही. कुठलीही [गर्भनिरोधक] पद्धत निकामी होऊ शकते,” त्या सांगतात. गर्भाशयात बसवली जाणारी तांबी त्यातल्या त्यात सुरक्षित आणि प्रभावी पद्धत मानण्यात येत असली तरी ती जर निकामी ठरली तर त्यातून पुढे नको असलेलं गरोदरपण किंवा गर्भपाताचा धोका निर्माण होतो.
“मैं तो इसी भरोसे बैठी हुई थी,” सुनीता म्हणतो. “तांबी बसवलीये त्यामुळे दिवस जाणार नाहीत याची खात्री वाटत होती मला. दवाखान्यातल्या डॉक्टरांनी मला पटवून सांगितलं होतं की पुढची पाच वर्षं काही चिंता नाही. पण एका वर्षाच्या आतच हा घोळ होऊन बसलाय,” ती म्हणते.
२०१९-२० मधील राष्ट्रीय कुटुंब पाहणी अहवाल – ५ नुसार भारतामध्ये १५-४९ वयोगटातल्या केवळ २.१ टक्के महिलांनी तांबी वापरतायत. गरोदरपण टाळण्यासाठी सर्वात जास्त वापर होत असलेली गर्भनिरोधक पद्धत म्हणजे महिला नसबंदी. विवाहित महिलांपैकी ३८ टक्के स्त्रियांची नसबंदी झाली आहे. २-३ मुलं झाल्यानंतर विवाहित महिलांमध्ये गर्भनिरोधकांचा वापर वाढत असल्याचं हा अहवाल सांगतो . सुनीतालाही पाचवं मूल नकोच होतं.
पण विकास हॉस्पिटलमध्ये काही तिला गर्भपात करून घेता आला नाही. तिथे ३०,००० रुपये खर्च येणार होता.
सुनीता गृहिणी असून घरचं सगळं पाहते. तिचा नवरा फळं विकतो आणि या कामातून त्याची महिन्याला साधारणपणे १०,००० रुपये कमाई होते. त्याचे दोघं भाऊ गावातल्या एका कपड्याच्या दुकानात कामाला जातात. तिघं भाऊ भाड्याच्या घरात वेगवेगळ्या खोल्यांमध्ये राहतात. प्रत्येक जण महिन्याच्या भाड्याचा हिस्सा म्हणून २,३०० रुपये देतो.
सुनीताने हिरव्या पिवळ्या त्रिकोणांची नक्षी असलेला लाल रंगाचा सलवार कमीझ घातला आहे. ड्रेसला मॅचिंग असणाऱ्या रंगीबेरंगी बांगड्या तिच्या मनगटात किणकिणतायत. पावलांना लावलेला आलता फिकट पडलाय. पायात पैंजण आहेत. त्याचीही झळाळी उडून गेलीये. घरच्यांसाठी स्वयंपाक करत करत ती आमच्याशी बोलते. तिचा मात्र आज उपास आहे. “लग्न होऊन सहा महिने झाले नसतील, चेहऱ्यावरचं तेज गेलं, ते गेलंच,” ती म्हणते. आधी तिचा चेहरा कसा तजेलदार होता ते सांगते. वयाच्या १८ व्या वर्षी तिचं लग्न झालं, तेव्हा तिचं वजन ५० किलो होतं. आणि आता तेच ४० किलो झालंय. सुनीताची उंची ५ फूट १ इंच आहे.
सुनीताला रक्तक्षय आहे. त्यामुळेच कदाचित तिचा चेहरा फिकुटलाय आणि तिला सतत थकल्यासारखं वाटत असतं. भारतातल्या १५-४९ वयोगटातल्या ५७ टक्के स्त्रियांना रक्तक्षय आहे. सप्टेंबर २०२१ पासून सुनीता नजफगडच्या एका खाजगी दवाखान्यात उपचार घेतीये. दर दहा दिवसांनी तिला तिथे जावं लागतं. दर वेळी डॉक्टरांची फी आणि औषधांचा खर्च ५०० रुपये तरी येतो. कोविड-१९ ची भीती असल्यामुळे ती सरकारी दवाखान्यात जात नाही. शिवाय ती घरचं सगळं काम आवरून संध्याकाळी या दवाखान्यात जाऊ शकते आणि तिथे रुग्णांच्या लांब रांगाही नसतात.
पलिकडच्या खोलीतून मुलांचा भरपूर आरडाओरडा ऐकू येतो आणि आमचं बोलणं थांबतं. “अख्खा दिवस हे असंच चाललेलं असतं,” सुनीता सांगते. मुलांची मारामारी सुरू असणार आणि आता ती गेल्याशिवाय ती शांत बसणार नाहीत, ती म्हणते. “दिवस गेल्याचं कळलं आणि मी काळजीत बुडाले. माझा नवरा म्हणाला, असू दे. ‘जो हो रहा है, होने दो’. पण भोगणार कोण? मीच. मुलाला वाढवायचं, त्याचं सगळं कोण करणार? मीच,” ती अगदी वैतागून म्हणते.
आपल्याला दिवस गेल्याचं कळाल्यावर काही दिवसांनी सुनीताने नजफगड-धनसा रस्त्यावर एका खाजगी केंद्रात सोनोग्राफी करून घेतली. एक हजार रुपये खर्च आला. तिच्यासोबत तिथे गेलेल्या आशा कार्यकर्तीने नंतर तिला नऊ किलोमीटरवच्या जफरपूरमधल्या राव तुला राम मेमोरियल हॉस्पिटलला नेलं. सुनीताला तांबी काढून टाकून गर्भपात करायचा होता. सरकारी दवाखान्यांमध्ये हे उपचार मोफत होतात.
“जफरपूरमध्ये त्यांनी सांगितलं की कॉपर टी काही काढता येणार नाही. जन्माच्या वेळी बाळाबरोबर ती बाहेर येईल.” डॉक्टर असंही म्हणाले की गर्भ तीन महिन्यांचा झालाय. आता गर्भपात करणं अवघड तर आहेच पण तिच्या जिवालाही धोका होऊ शकतो. “ती जोखीम घ्यायची त्यांची [डॉक्टरांची] तयारी नव्हती,” सुनीता सांगते.
“माझ्या जिवाला धोका होता त्याचं मला काहीच वाटत नव्हतं. काहीही होवो, मला आणखी एक मूल नको होतं,” सुनीता मला सांगते. आणि असं वाटणारी ती काही एकटी नाहीये. एनएफएचएस-५ नुसार ८५ टक्के विवाहित स्त्रियांना दोन जिवंत अपत्यं असतील तर आणखी मुलं नकोत असंच वाटत असल्याचं आढळतं.
मग गर्भपात करून घेण्यासाठी सुनीताने दुसऱ्या सरकारी दवाखान्यात जाण्याचा निर्णय घेतला. २०२० च्या फेब्रुवारी महिन्यात तिला जवळ जवळ चौथा महिना लागला होता. मग दुसऱ्या एका आशा कार्यकर्तीने तिला नजफगडपासून ३० किलोमीटरवर असलेल्या दिल्लीच्या मध्यवर्ती भागात असलेल्या लेडी हार्डिंग हॉस्पिटलमध्ये नेलं. दोघी जणी दिल्ली मेट्रोने गेल्या आणि प्रत्येकी १२० रुपये प्रवासावरच खर्च झाले. गोपाल नगरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातल्या डॉक्टरांशी चर्चा केल्यानंतर लेडी हार्डिंगमधल्या डॉक्टरांनी गर्भपाताची शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.
“ते काय बोलत होते, मला काहीही माहित नाही. फक्त तेच बोलत होते आणि मग त्यांनी ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला,” सुनीता सांगते. मग आधी त्यांनी रक्ताच्या काही तपासण्या केल्या आणि त्यानंतर काहीतरी औषध लावलं. “काय औषध होतं ते माहित नाही. उन्होंने कुछ दवाई अंदर डाल कर सफाई किया था. आतमध्ये नुसती जळजळ व्हायला लागली आणि मला गरगरायला लागलं,” ती सांगते. तिचा नवरा तिच्या बरोबर आला होता, पण, ती म्हणते, “त्याची काही फारशी इच्छा नव्हती.”
मग डॉक्टरांनी सुनीताला गर्भाशयातून बाहेर काढलेली मोडलेली तांबी दाखवली. गर्भ चार महिन्यांचा होता असं सुनीतासोबत गेलेली आशा कार्यकर्ती, सोनी झा सांगते. “तिची केस जरा नाजूक असल्यामुळे ‘नॉर्मल डिलिव्हरी’ कशी होते तसा गर्भ बाहेर काढावा लागला,” ती म्हणते.
नसबंदी करायचीच यावर सुनीता ठाम होती, पण मार्च २०२० मध्ये कोविड-१९ ची साथ आली. त्यानंतर एका वर्षाने तिचं ऑपरेशन झालं. तेही बिहारमध्ये
गर्भपात तर एकच पायरी होती. तिला नसबंदी करून घ्यायची होती. गर्भपात झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याच दवाखान्यात ती ऑपरेशन करून घेणार होती. पण त्या दिवशी डॉक्टरांनी ऑपरेशन केलं नाही. “मी ऑपरेशनसाठीचे कपडे घातले आणि मला खोकला सुरू झाला,” ती सांगते. “डॉक्टर कोणतीच जोखीम घ्यायला तयार नव्हते.” गर्भपात झाल्यानंतर चार दिवसांनी सुनीताला अंतराचं एक इंजेक्शन देऊन घरी पाठवण्यात आलं.
पण नसबंदी करायचीच हा सुनीताचा निर्धार कायम होता. पण मार्च २०२० मध्ये कोविड-१९ ची साथ आली. त्यानंतर एक वर्षाने तिचं ऑपरेशन झालं. तेही बिहारमध्ये. २०२१ च्या फेब्रुवारी महिन्यात सुनीता आणि तिचं कुटुंब तिच्या दिराच्या लग्नासाठी हनुमान नगर तालुक्यातल्या कोल्हंता पटोरी या आपल्या गावी गेलं होतं. तिथे असताना तिने आशा कार्यकर्तीशी संपर्क साधला. तिने तिला दरभंगा इथल्या सरकारी हॉस्पिटलमध्ये नेलं. “ती आशा मला अजूनही फोन करते आणि तब्येतीची चौकशी करते,” ती म्हणते.
“तिथे [दरभंगामध्ये] तुम्हाला पूर्ण भूल देत नाहीत. तुम्ही शुद्धीवरच असता. तुम्ही ओरडलात, किंचाळलात, तरी कुणाला काही फरक पडत नाही,” ती सांगते. नसबंदी केल्याबद्दल सुनीता शासनाकडून २,००० रुपये मिळण्यास पात्र आहे. “पण माझ्या खात्यात पैसे आलेत का काही माहित नाही. मी कुणाला पहायलाच सांगितलं नाहीये,” ती म्हणते.
आमचं बोलणं संपत येतं तसं तिच्या चेहऱ्यावर एक प्रकारचं समाधान दिसतं. “एकदाचं सगळं पार पडलं हे बरंय. आता मी निश्चिंत आहे. नाही तर सारखं काही ना काही होतच राहिलं असतं. वर्ष झालं, सगळं काही ठीक आहे. अजून एक दोन मुलं झाली असती ना, संपलंच असतं सगळं.” असं असलं तरी ती मनातून नाराज आहे. “एवढ्यासाठी मला किती वेगवेगळ्या दवाखान्यात किती तरी डॉक्टरांकडे जावं लागलं. माझी प्रतिष्ठा राहिली का सांगा?”
पारी आणि काउंटरमीडिया ट्रस्टने पॉप्युलेशन फाउंडेशन ऑफ इंडियाच्या सहाय्याने ग्रामीण भारतातील किशोरी आणि तरुण स्त्रियांसंबंधी एक देशव्यापी वार्तांकन उपक्रम हाती घेतला आहे. अत्यंत कळीच्या पण परिघावर टाकल्या गेलेल्या या समूहाची परिस्थिती त्यांच्याच कथनातून आणि अनुभवातून मांडण्याचा हा प्रयत्न आहे.
हा लेख पुनःप्रकाशित करायचा आहे? कृपया zahra@ruralindiaonline.org शी संपर्क साधा आणि namita@ruralindiaonline.org ला सीसी करा.
अनुवादः मेधा काळे