मंगळवार, २७ नोव्हेंबर, दुपारचे चार वाजून गेलेत, मध्य दिल्लीच्या राजीव चौक मेट्रो स्टेशनच्या बाहेर काही लोक जमलेत. रिक्षाचालक, विद्यार्थी, विक्रेते काही मध्यमवर्गीय व्यावसायिक आणि इतरही बरेच कोण कोण. रस्त्याच्या कडेला उभं राहून ते चर्चा करतायत शेतकऱ्यांच्या समस्यांची. २९-३० नोव्हेंबर रोजी दिल्लीत होणाऱ्या किसान मुक्ती मोर्चाला पाठिंबा देणाऱ्या नेशन फॉर फार्मर्स आणि आर्टिस्ट्स फॉर फार्मर्स या गटांचे सेवाभावी कार्यकर्ते कृषी संकटावर चर्चा करण्यासाठी संसदेचं २१ दिवसांचं संयुक्त सत्र बोलावण्यात यावं या मागणीला समर्थन देण्यासाठी फलक घेऊन उभे होते, पत्रकं वाटत होते. शेजारच्या सेंट्रल पार्कमध्ये उभे असलेले काही जण आले आणि त्यांनी काही प्रश्नं विचारायला सुरुवात केली – मोर्चाविषयी आणि शेतीवरच्या अरिष्टाविषयी. आणि मग गप्पा सुरू झाल्या. त्यातले काही जण काय म्हणत होतेः

सोनू कौशिक, वय २८, कनॉट प्लेसमध्ये बाटा स्टोअरमध्ये संगणकावर काम करतो. तो हरयाणाच्या झज्जरच्या अहरी गावचा आहे. Òगेल्या वर्षी माझ्या गावातल्या शेतकऱ्यांना १००० रु. क्विंटल दराने बाजरी विकावी लागले होते,Ó तो सांगतो. Òशेतकरी असा कसा जगू शकेल? मी माझ्या बऱ्याच मित्रांना घेऊन मोर्चाला येईन.Ó यानंतर त्याने आसपासच्या काही जणांना सवाल केला की शेतकरी का बरं आत्महत्या करतायत. Òशेतकरी कधीही सुटी घेत नाही, दिवस रात्र काम करतो आणि तरीही त्याच्या मालाला भाव मिळत नाही. असं का?Ó शेतकरी दिल्लीला मोर्चा घेऊन का येत आहेत आणि आता त्यांच्यासमोर कोणतं संकट उभं आहे याचा विचार करा, केवळ हा राजकीय मुद्दा आहे असा विचार करू नका असं आवाहन तो त्यांना करत होता.

कमलेश जॉली, दिल्लीच्या पितमपुराच्या ८० वर्षांच्या गृहिणी. Òपूर्वी मला शेतकऱ्यांच्या हलाखीविषयी बरंच माहित असायचं, पण आता माझ्या तब्येतीमुळे माझा फारसा संबंध राहिलेला नाही.Ó मोर्चाची तारीख आणि स्थळ त्या मला विचारतात. Òमी नक्की येईन,Ó त्या तिथेच ठरवून टाकतात.

उत्तर प्रदेशच्या उन्नावमधल्या साफीपूरचा २२ वर्षीय दिव्यांशु गौतम दिल्ली विद्यापीठात गणिताचं पदवीचं शिक्षण घेतोय. Òशेतकरी कुटुंबातल्या माझ्या बऱ्याच मित्रांकडून मी ऐकलंय की त्यांच्या मालाला त्यांना कधीच चांगला भाव मिळत नाही. ते सांगतात की शेतमाल ठेवण्यासाठी जी शीतगृहं आहेत ती सगळी खाजगी कंपन्यांच्या हातात आहेत [आणि ते त्यासाठी भरपूर पैसे लावतात]. हे थांबायला पाहिजे आणि शेतकऱ्यांना स्वस्तात शीतगृहांची सुविधा मिळायला पाहिजे.

मध्य दिल्लीचा २४ वर्षीय आकाश शर्मा तीस हजारी न्यायालयात कारकून आहे. Òभाज्या महागल्या की लोक नेहमी शेतकऱ्यांना नावं ठेवतात. काही वर्षांमागे कांदा महागला होता तेव्हा लोक शेतकऱ्यांवर कांदा साठवून ठेवल्याचा आणि भाव वाढवल्याचा चुकीचा आरोप करत होते. त्यांनी खरं तर शेतकऱ्यांना नावं ठेवायची सोडून त्यांच्या समस्या समजून घेतल्या पाहिजेत.

उत्तर प्रदेशच्या जौनपूर जिल्ह्याचल्या बरसाती तालुक्यातल्या महौरी गावचे पन्नाशीचे रिक्षाचालक, जयप्रकाश यादव विचारतात, Òहे शेतकरी परत मोर्चा काढायला कशाला आलेत? मागच्या वेळी [मार्च २०१मध्ये नाशिकहून] मुंबईला त्यांनी मोर्चा काढला तेव्हा त्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत का?Ó थोडा विचार करून मग ते विचारतात, Òशेतकरी काबाड कष्ट करतात, पण त्यांच्या मालाला भावच मिळत नाही. २९-३० तारखेच्या मोर्चाला मी येईन, थोडा वेळ रिक्षा बंद ठेवीन.

दिल्लीचा मुक्त छायाचित्रकार, तिशीचा विकी रॉय म्हणतो, Òलोकांना हे कळायला पाहिजे की शहरात राहणारे आपण सगळे जण खरं तर शेतकऱ्यांनी दिलेल्या अनुदानावर जगतोय. शेतकऱ्यांना त्यांच्या मालासाठी कधीच [रास्त] भाव मिळत नाही. हे समजून घेणं महत्त्वाचं आहे आणि म्हणूनच त्यांना पाठिंबाही द्यायला पाहिजे.
अनुवाद - मेधा काळे