सन २०२१ च्या उन्हाळ्यातल्या त्या सकाळी मीनू सरदार पाणी भरायला बाहेर पडली तेव्हा इतकं भयंकर काही घडेल, हे तिच्या ध्यानीमनीही नव्हतं. जेमतेम बावीस वर्षांच्या आणि गेली तीन-चार वर्षं आरोग्याच्या अनेक समस्यांनी गांजून गेलेल्या दयापूर गावातल्या मीनूचं खरं तर हे रोजचंच काम होतं. तळ्याकडे जाणार्या पायर्या अनेक ठिकाणी तुटलेल्या होत्या. मीनूचा त्यावरून पाय घसरला आणि ती गडगडत खाली आली, तोंडावर पडली.
‘‘माझ्या छातीत आणि पोटात प्रचंड वेदना व्हायला लागल्या,’’ ती बंगालीत सांगते. ‘‘योनीतून रक्तस्राव व्हायला लागला. बाथरूमला गेले तर योनीतून काहीतरी बाहेर आलं आणि लादीवर पडलं. मांसाच्या गोळ्यासारखं काहीतरी आतून बाहेर येतंय हे मला कळत होतं. मी बाहेर खेचायचा प्रयत्न केला, पण नाही जमलं मला ते.’’
जवळच्या गावातल्या एका खाजगी दवाखान्यात तिला नेण्यात आलं आणि तिथल्या डॉक्टरनी तिचा गर्भपात झाला आहे, यावर शिक्कामोर्तब केलं. उंच, सडसडीत, सगळ्या चिंता बाजूला ठेवत सतत हसतमुख असणार्या मीनूची पाळी तेव्हापासून अनियमित झाली आहे. सोबत प्रचंड शारीरिक वेदना आणि मानसिक त्रास आहेच.
पश्चिम बंगालमधल्या दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातल्या गोसाबा तालुक्यातल्या मीनूच्या गावाची लोकसंख्या आहे जवळपास पाच हजार. डोलणारी हिरवीगार शेतं आणि सुंदरबनातलं खारफुटीचं जंगल... गोसाबा तालुक्यातल्या रस्त्याने जोडल्या गेलेल्या मोजक्याच गावांमधलं हे एक गाव, दयापूर.
त्या दिवशी पडल्यामुळे गर्भपात झाल्यावर मीनूला महिन्याभर सतत रक्तस्राव होत होता. हे एवढंच नव्हतं. ‘‘शारीरिक शोम्पोर्के एतो ब्यथा कोरे’’ (शरीरसंबंधांच्या वेळीही प्रचंड वेदना होतात), ती सांगते. ‘‘कुणीतरी फाडून तुकडे तुकडे करतंय माझे, असं वाटतं मला. संडासला गेल्यावर थोडा जोर लावला किंवा जड काही उचललं तर आपलं गर्भाशयच खाली येतंय, असं वाटतं.’’
त्या वेळची परिस्थिती आणि गावातल्या लोकांच्या नाही नाही त्या समजुती यामुळे तिच्या वेदनांमध्ये अधिकच भर पडली. पडल्यानंतर सतत रक्तस्राव होत असूनही ‘आशा’ सेविकेला हे न सांगण्याचा निर्णय जेमतेम दहावीपर्यंत शिकलेल्या मीनूने घेतला. ‘‘तिला कळूच द्यायचं नव्हतं मला हे,’’ मीनू म्हणते. ‘‘कारण मग माझ्या गावातल्या इतरांनाही माझा गर्भपात झालाय हे कळलं असतं. आणि शिवाय असं काही झाल्यावर काय करायचं हे तिला माहीत असेल, असं मला नाही वाटत.’’
मीनू आणि तिचा नवरा बाप्पा सरदार हे काही त्या वेळी मुलासाठी प्रयत्न करत नव्हते. पण मीनू त्या वेळी कोणतंच गर्भनिरोधकही वापरत नव्हती. ‘‘माझं लग्न झालं तेव्हा मला कुटुंब नियोजन कसं करतात तेच ठाऊक नव्हतं. कोणी काही सांगितलंच नव्हतं मला. माझा गर्भपात झाला, त्यानंतर मला हे सगळं कळलं.’’
मीनूला एकच स्त्रीरोगतज्ञ माहीत आहे, ती गोसाबा ग्रामीण रुग्णालयातली. हे रुग्णालय दयापूरपासून बारा किलोमीटरवर आहे आणि ही स्त्रीरोगतज्ञ तिथे कधीच उपलब्ध नसते. मीनूच्या गावात दोन ‘ग्रामीण’ डॉक्टर्स आहेत. हे आहेत ‘रुरल मेडिकल प्रॅक्टिशनर्स’ (आरएमपी), अधिकृत परवान्याशिवाय व्यवसाय करणारे डॉक्टर्स.
दयापूरचे दोन्ही ‘आरएमपी’ पुरुष आहेत.
‘‘मला काय होतंय, ते मी एका पुरुषाला कसं सांगणार? अवघडल्यासारखं वाटत होतं मला. आणि शिवाय ते दोघं काही तज्ज्ञ नाहीत,’’ मीनू म्हणते.
मीनू आणि बाप्पा मग जिल्ह्यातल्या अनेक खाजगी डॉक्टरांकडे जाऊन आले. पार कोलकात्याच्याही एका डॉक्टरकडे. दहा हज्जार रुपये खर्च झाले त्यांचे, पण उपयोग शून्य! एका छोट्या धान्य दुकानात काम करणार्या बाप्पाचा पाच हजार रुपये पगार, एवढंच त्यांचं उत्पन्न. त्यांनी मग या सगळ्या डॉक्टरांची फी देण्यासाठी मित्रमंडळींकडून पैसे उसने घेतले.
दयापूरमधल्या एका होमिओपाथकडून मीनूने औषधं घेतली. या औषधांमुळे काही काळानंतर तिची पाळी नियमित झाली. ‘‘हा एकच पुरुष डॉक्टर असा आहे, ज्याच्याकडे माझ्या गर्भपाताबद्दल मी मोकळेपणाने बोलू शकले, मला अवघडल्यासारखं वाटलं नाही,’’ मीनू म्हणते. तिला होणारा प्रचंड रक्तस्राव आणि वेदना यासाठी पोटाची सोनोग्राफी करण्याचा सल्ला या डॉक्टरने दिला होता, पण त्यासाठी पुरेसे पैसे जमा होईपर्यंत मीनूला थांबावं लागणार आहे.
तोपर्यंत तिला कोणतीही जड वस्तू उचलता येणार नाही, थोडं काम आणि थोडा आराम, असं करत राहावं लागेल.
आरोग्यसेवा मिळवण्यासाठी मीनूला करावा लागलेला द्राविडी प्राणायाम हा काही वेगळा नाही, या प्रदेशातल्या गावांमधल्या अनेक स्त्रियांना हाच मार्ग पत्करावा लागतो. २०१६ मध्ये सुंदरबनमधल्या आरोग्य व्यवस्थेचा अभ्यास केला गेला होता. त्यानुसार, इथल्या रहिवाशांना ज्या प्रकारची आरोग्य सेवा उपलब्ध आहे ती घ्यावी लागते, कारण निवड करण्यासाठी काही पर्यायच उपलब्ध नसतात. सरकार पुरवीत असलेल्या आरोग्य सुविधा एकतर अस्तित्वातच नाहीत, असल्याच तर चालू स्थितीत नाहीत. आणि चालू असल्याच तर या प्रदेशाच्या भौगोलिक रचनेमुळे तिथपर्यंत पोहचताच येत नाही. मागणी आणि पुरवठा यांच्यातली ही दरी मग भरून काढतात ते अनधिकृत, अर्थात, अधिकृत परवान्याशिवाय व्यवसाय करणारे डॉक्टर्स... ‘रुरल मेडिकल प्रॅक्टिशनर्स’ (आरएमपी). नेहमीचं आयुष्य चालू असो की वादळासारखं एखादं अस्मानी संकट आलेलं असो, आरएमपी हा इथल्या लोकांना मोठा दिलासा असतो.
*****
गर्भपात आणि त्यानंतरच्या वेदना ही मीनूच्या आरोग्याची पहिलीच समस्या नव्हती. २०१८ मध्ये तिच्या संपूर्ण अंगावर पुरळ आलं होतं. प्रचंड खाज सुटत होती त्याला. लालेलाल फोडांनी मीनूचे हात, पाय, छाती आणि चेहराही फुलून गेला होता. आपले हात आणि पाय सुजले आहेत, हे मीनूला जाणवत होतं. उन्हाळा वाढला तसा हा त्रासही प्रचंड वाढला. डॉक्टर आणि औषधं यावर या कुटुंबाने २० हजार रुपये खर्च केले.
‘‘वर्षभर हॉस्पिटलच्या चकरा मारणं हेच माझं आयुष्य झालं होतं,’’ मीनू सांगते. सगळं बरं व्हायला खूप दिवस लागले. आणि त्या काळात हे पुरळ पुन्हा येईल का, अशी भीती सतत तिच्या मनात होती.
मीनूच्या गावापासून जेमतेम दहा किलोमीटरवर, रजत ज्युबिली गावात मच्छिमार असलेली ५१ वर्षांची आलापी मोंडल राहाते, तीही अशीच कथा सांगते. ‘‘तीन-चार वर्षांपूर्वी अचानक माझ्या सर्व अंगाला खूप खाज यायला लागली. इतकी, की काही वेळा त्यातून पू यायचा. मला अशा कितीतरी बायका माहिती आहेत, ज्यांना असंच होत होतं. एक वेळ अशी आली की आमच्या आणि आसपासच्या गावांमध्ये प्रत्येक घरात कोणालातरी हे असं इन्फेक्शन होतंच. डॉक्टर म्हणाले की हा एक प्रकारचा व्हायरस आहे.’’
आलापी आता बरी आहे. जवळपास वर्षभर तिने औषधं घेतली. सोनारपूर तालुक्यातल्या एका खाजगी धर्मादाय दवाखान्यातल्या डॉक्टरकडे ती जाऊ शकली. प्रत्येक वेळी तिथे फक्त दोन रुपये द्यावे लागायचे, पण औषधं मात्र महागडी होती. आलापीच्या कुटुंबाने तिच्या उपचारांसाठी १३ हजार रुपये खर्च केले. दवाखान्यात जाण्यासाठी तिला चार-पाच तासांचा प्रवास करावा लागे. आलापीच्या गावात खरं तर एक छोटासा सरकारी दवाखाना आहे. पण त्या वेळी तो आहे हे तिला माहितीच नव्हतं.
‘‘माझ्या त्वचेची खाज खूपच वाढली तेव्हा मी मासेमारीला जाणं बंद केलं,’’ आलापी सांगते. पूर्वी ती मासेमारीला जायची. नदीच्या काठाजवळ गळाभर पाण्यात तासन्तास उभं राहून टायगर प्रॉन्ससाठी जाळं टाकून ठेवायची. आता ती मासे पकडायला जात नाही, जाऊ शकतच नाही.
रजत ज्युबिली गावातल्या अनेक स्त्रियांना त्वचेचा त्रास होतो आणि त्यांच्या मते प्रचंड क्षार असलेलं सुंदरबनचं पाणी हे त्याचं कारण आहे.
मीनूच्या आरोग्याची ही पहिलीच समस्या नव्हती.
२०१८ मध्ये तिच्या संपूर्ण अंगावर खाजणारं पुरळ आलं होतं. लालेलाल फोडांनी मीनूचे
हात, पाय, छाती आणि चेहराही फुलून गेला होता. आपले हात आणि पाय सुजले आहेत, हे
मीनूला जाणवत होतं
‘पॉण्ड इकोसिस्टिम्स ऑफ द इंडियन सुंदरबन्स’ या पुस्तकात सौरव दास यांनी स्थानिक उपजीविकेवर पाण्याच्या गुणवत्तेचा काय परिणाम झाला आहे यावर प्रकाश टाकला आहे. याच विषयावरच्या आपल्या लेखात त्यांनी लिहिलंय की, तळ्यातलं खारं पाणी जेवण करण्यासाठी, अंघोळीसाठी, धुण्यासाठी वापरल्यामुळे स्त्रियांना त्वचेचे आजार होतात. कोलंबीची शेती करणारे शेतकरी नदीच्या खार्या पाण्यात दिवसाला चार ते सहा तास उभे राहातात. त्यांनाही या खार्या पाण्यामुळे प्रजनन मार्गाचा संसर्ग होतो, असं सौरव दास यांनी नोंदलं आहे.
समुद्राच्या पाण्याची वाढणारी पातळी आणि वारंवार येणारी वादळं यामुळे सुंदरबनमधल्या पाण्यातल्या क्षारांचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे, असं संशोधनातून सिद्ध झालं आहे. ही सगळी कारणं हे हवामानबदलाचे परिणाम आहेत आणि त्यात कोलंबीची शेती आणि घटलेली खारफुटी यांची भर पडली आहे. मोठ्या नद्यांच्या खोर्यांमधले पिण्याच्या पाण्यासह सर्व जलस्रोत क्षारदूषित होणं हे आता आशिया खंडामध्ये नवं राहिलेलं नाही.
‘‘सुंदरबनमधल्या पाण्यामधलं क्षारांचं अधिक प्रमाण हे इथल्या स्त्रीआरोग्याच्या प्रश्नाचं एक मुख्य कारण आहे, विशेषतः त्यांना होणार्या ओटीपोटाच्या दाहाचं,’’ डॉ. श्यामल चक्रवर्ती सांगतात. ते कोलकात्याच्या आर.जी. कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टिस करतात. संपूर्ण सुंदरबनमध्ये त्यांनी बरीच आरोग्य शिबिरंही घेतली आहेत. ‘‘पण खारं पाणी हे याचं एकमेव कारण नाही. इथली सामाजिक-आर्थिक परिस्थिती, पर्यावरण, इथे होणारा प्लास्टिकचा वापर, स्वच्छता, पोषण, आरोग्यसेवा देण्याची इथली व्यवस्था या सगळ्याच गोष्टी स्त्रियांच्या आरोग्यात महत्त्वाची भूमिका बजावतात.’’
प्रसारमाध्यमांना मदत करणार्या ‘इंटरन्यूज’ या आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संस्थेच्या वरिष्ठ आरोग्य माध्यम सल्लागार डॉ. जया श्रीधरन यांच्या मते, या भागातल्या स्त्रिया, विशेषतः कोलंबीची शेती करणार्या स्त्रिया दिवसातले चार ते सात तास खार्या पाण्यात काम करत असतात. आमांश, अतिसार, त्वचासंसर्ग, हृदय आणि रक्तवाहिन्यांचे आजार, पोटात दुखणं, अल्सर आणि त्यांचा दाह हे आजार त्यांना सहज आणि वारंवार होऊ शकतात, होतातही. खार्या पाण्यामुळे विशेषतः स्त्रियांना उच्च रक्तदाब होऊ शकतो, गर्भावस्थेत त्रास होऊ शकतो, काही वेळा गर्भपातही होऊ शकतो.
*****
सुंदरबनमधल्या १५ ते ५९ या वयोगटातल्या लोकांमध्ये, पुरुषांपेक्षा स्त्रियांना वेगवेगळे आजार होण्याचं प्रमाण कितीतरी जास्त आहे, असं २०१० मध्ये केलेल्या एका अभ्यासात दिसून आलं आहे.
‘‘इथे सुंदरबनमध्ये आमच्या फिरत्या वैद्यकीय युनिटमध्ये आठवड्याला चारशे-साडेचारशे रुग्ण येतात. त्यातल्या जवळपास ६० टक्के स्त्रिया असतात. बहुतेकींच्या त्वचेबद्दलच्या तक्रारी असतात. रक्तक्षय, अंगावरून जाणं, पाळी अनियमित येणं किंवा न येणं अशा तक्रारी घेऊनही अनेक जणी आलेल्या असतात,’’ अन्वरुल आलम सांगतो. दक्षिण २४ परगण्यात दूरवरच्या गावांमध्ये वैद्यकीय सेवा पुरवणारी ‘सदर्न हेल्थ इम्प्रूव्हमेंट समिती’ नावाची एक स्वयंसेवी संस्था आहे. ही संस्था आपली वैद्यकीय व्हॅन घेऊन गावोगावी फिरते. अन्वरूल आलम या व्हॅनचा कोऑर्डिनेटर आहे.
‘‘येणार्या बहुतेक स्त्रीरुग्ण कुपोषित असतात,’’ आलम सांगतो. ‘‘इथे फळं, भाज्या पिकत नाहीत, त्या बोटीने आणल्या जातात. त्यामुळे त्या सगळ्यांनाच काही परवडत नाहीत. उन्हाळ्यातला प्रचंड उष्मा आणि ताज्या पाण्याची भीषण टंचाई या गोष्टी आजारांमध्ये भरच घालतात.’’
मीनू आणि आलापी बहुतेक वेळा डाळभात, बटाटे आणि मासे खातात. फळं आणि भाज्या अगदीच कमी, कारण त्या इथे पिकतच नाहीत. मीनूप्रमाणे आलापीलाही बरेच आजार आहेत.
समुद्राच्या पाण्याची वाढणारी पातळी आणि वारंवार येणारी वादळं यामुळे सुंदरबनमधल्या पाण्यातल्या क्षारांचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे, असं संशोधनातून सिद्ध झालं आहे. ही सगळी कारणं हे हवामानबदलाचे परिणाम आहेत
पाचेक वर्षांपूर्वी आलापीला खूप रक्तस्राव होत होता. ‘‘सोनोग्राफीत कळलं की माझ्या गर्भाशयात गाठ आहे. ती काढण्यासाठी माझ्या तीन शस्त्रक्रिया कराव्या लागल्या. माझ्या कुटुंबाने त्यासाठी ५० हजारांहून अधिक खर्च केले असतील,’’ ती सांगते. तिची पहिली शस्त्रक्रिया झाली ती अपेंडिक्स काढण्यासाठी. आणि मग त्यानंतरच्या दोन गर्भाशय काढण्यासाठी!
शेजारच्या बसंती तालुक्यात सोनाखाली नावाचं गाव आहे. तिथल्या खाजगी रुग्णालयात आलापीच्या या शस्त्रक्रिया झाल्या. तिथपर्यंत पोहोचण्यासाठी खूप यातायात करावी लागली तिला. रजत ज्युबिली गावापासून गोसाबा घाटापर्यंत बोट, गोसाबा घाटापासून गढखाली घाटापर्यंत दुसरी बोट आणि तिथून सोनाखालीला पोहोचायला बस किंवा व्हॅन. सगळा मिळून एका दिशेचा प्रवास दोन ते तीन तासांचा.
आलापीला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. रजत ज्युबिली गावातल्या शस्त्रक्रिया करून गर्भाशय काढून टाकलेल्या निदान चार ते पाच स्त्रिया तिला माहीत आहेत.
त्यापैकी एक आहे मासेमारी करणारी ४० वर्षांची बसंती मोंडल. ‘‘मला डॉक्टरांनी सांगितलं की माझ्या गर्भाशयात गाठ आहे. आधी मी खूप मेहनत करायचे, मासे पकडायला जायचे,’’ बसंती, तीन मुलांची आई सांगते. ‘‘पण गर्भाशय काढून टाकल्यापासून मला तेवढं काम करायची ताकदच नाही राहिलेली.’’ तिने एका खाजगी रुग्णालयात या शस्त्रक्रियेसाठी ४० हजार रुपये मोजलेत.
‘राष्ट्रीय कुटंब आरोग्य पाहणी - ४’ (२०१५-१६) नुसार, पश्चिम बंगालच्या ग्रामीण भागातल्या १५ ते ४९ या वयोगटातल्या २.१ टक्के स्त्रियांनी शस्त्रक्रिया करून गर्भाशय काढून टाकलं आहे. बंगालमधल्या शहरी भागापेक्षा (१.९ टक्के) हे प्रमाण थोडं जास्त आहे. (भारतातलं प्रमाण – ३.२ टक्के)
गेल्या सप्टेंबरमध्ये ‘आनंद बझार पत्रिका’ या बंगाली दैनिकात प्रसिद्ध झालेल्या आपल्या लेखात स्वाती भट्टाचर्जी लिहितात की, योनीमार्गाचा संसर्ग, अतिरिक्त किंवा अनियमित रक्तस्राव, वेदनादायी शरीरसंबंध, ओटीपोटाचा दाह अशा तक्रारींमुळे सुंदरबनमधल्या २६ ते ३६ वर्षं इतक्या तरुण वयाच्या स्त्रियांनीही शस्त्रक्रिया करून आपलं गर्भाशय काढून टाकलं आहे.
‘तुमच्या गर्भाशयात गाठ आहे,’ असं सांगून अनधिकृत, अपात्र डॉक्टर्स या महिलांना घाबरवतात आणि खाजगी रुग्णालयांमध्ये गर्भाशय काढून टाकण्याची शस्त्रक्रिया करायला लावतात. भट्टाचर्जींच्या मते नफेखोर खाजगी रुग्णालयं राज्य सरकारच्या, ‘स्वास्थ्य साथी’ या आरोग्य विमा योजनेचा फायदा घेतात. ही योजना लाभार्थींच्या कुटुंबाला वर्षाला पाच लाखाचं कवच देते.
मीनू, आलापी, बसंती आणि सुंदरबनमधल्या त्यांच्यासारख्या लाखो स्त्रियांच्या लैंगिक आणि प्रजननसंस्थेच्या आरोग्याच्या समस्या अधिक गंभीर करतात ते आरोग्यसेवांपर्यंत पोहोचण्यात येणारे अडथळे.
गर्भाशय काढण्याची शस्त्रक्रिया करण्यासाठी बसंतीने आपल्या घरापासून गोसाबा तालुक्यात पोहोचण्यासाठी पाच तास प्रवास केला. ‘‘इथे सरकारी रुग्णालयं, दवाखाने यांची संख्या वाढू शकत नाही का? किंवा अधिक स्त्रीरोगतज्ज्ञ तरी...?’’ ती विचारते. ‘‘आम्ही गरीब असू, पण आम्हाला मरायचं नाहीये.’’
मीनू आणि बाप्पा सरदार यांची नावं आणि ठिकाण त्यांची ओळख उघड होऊ नये म्हणून बदलली आहेत.
पारी आणि काउंटरमीडिया ट्रस्टने पॉप्युलेशन फाउंडेशन ऑफ इंडियाच्या सहाय्याने ग्रामीण भारतातील किशोरी आणि तरुण स्त्रियांसंबंधी एक देशव्यापी वार्तांकन उपक्रम हाती घेतला आहे. अत्यंत कळीच्या पण परिघावर टाकल्या गेलेल्या या समूहाची परिस्थिती त्यांच्याच कथनातून आणि अनुभवातून मांडण्याचा हा प्रयत्न आहे.
हा लेख पुनःप्रकाशित करायचा आहे? कृपया zahra@ruralindiaonline.org शी संपर्क साधा आणि namita@ruralindiaonline.org ला सीसी करा