एका दुपारी, बागलकोट-बेळगाव रस्त्यावर एस. बंदेप्पा आपला मेंढ्यांचा कळप घेऊन चालला होता तेव्हा माझी त्याची भेट झाली. आपल्या मेंढ्या शेतात बसवण्यासाठी तो एखाद्या शेतकऱ्याची जमीन शोधात होता. “मेंढ्यांच्या लेंडीची चांगली किंमत देणारे शेतमालक आम्ही शोधतो,” तो म्हणाला. ते हिवाळ्याचे दिवस होते, कुरुबा मेंढपाळ साधारण ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये चारणीला बाहेर पडतात; तेव्हा शेताची कामंही तुरळकच असतात.
तेव्हापासून मार्च-एप्रिल पर्यंत, अनुसूचित जमातीत गणले जाणारे कर्नाटकातील हे कुरुबा दोन-तीन कुटुंबांच्या गटात भटकंतीला बाहेर पडतात. साधारणपणे त्यांच्या नेहमीच्या वाटेने ते ६०० ते ८०० मैलांचा प्रवास करतात. त्यांची मेंढरं आणि शेरडं पडक रानात चरतात आणि त्यांच्या प्राण्यांच्या लेंड्यांच्या खताचा शेतकऱ्याकडून त्यांना मोबदला मिळतो. ‘चांगल्या’ जमीनमालकाकडून बंदेप्पाला काही दिवसांच्या एका थांब्याचे हजारेक रुपये मिळतात. मग तो पुढच्या थांब्याकडे निघतो, आणि वाटेवर जवळपासच्या इतर शेतकऱ्यांसोबत नवीन चांगला सौदा होईल का हे बघतो. पूर्वी त्याला धान्य, गूळ आणि कपडेदेखील मिळत पण आता शेतकऱ्यासोबत असा सौदा करणं कठीण होत चाललंय असं तो सांगतो.
“(हल्ली) जमीनमालकाच्या शेतात
मुलाबाळांना घेऊन राहणं सोपं नाही,” निलाप्पा चचडी म्हणतात. बेळगाव (आता बेळगावी)
जिल्ह्याच्या बैलहोंगल तालुक्यातील बैलहोंगल-मुनवल्ली रस्त्यावर माझी त्यांची भेट
झाली तेव्हा ते मेंढ्यांना रोखण्यासाठी शेताभोवती दोर बांधीत होते.
पण मेंढपाळ कुरुबांच्या पुढ्यात एवढा एकच बदल नाहीये. गेल्या २० वर्षांत, त्यांच्या दक्खनी जातीच्या मेंढ्यांच्या लोकरीला असणारी मागणी कमी होत चाललीये. या मेंढ्या इथलं कोरडे हवामान सहन करू शकतात. पूर्वापारपासून, कुरुबांच्या उत्पन्नाचा मोठा भाग कांबळी (घोंगडी किंवा आंध्रात म्हणतात गोंगली) बनवण्यासाठी होणाऱ्या लोकरीच्या विक्रीपासून येत होता. मेंढ्यांच्या लेंडीखतापासून मिळणाऱ्या पैशाचा हातभार लागे. ही लोकर जवळच मिळत असे, स्वस्त असे आणि तिला मागणीही खूप असे.
बेळगावी जिल्ह्याच्या रामदुर्ग तालुक्यातील दडीभावी सालापूर गावातील विणकर हे प्रामुख्याने त्यांचे खरेदीदार होते. त्यांपैकी बहुतेक कुरुबा जमातीच्या पोटजातीतीलच आहेत. (काही कुरुबा गावामध्ये कायमस्वरुपी घरं बांधून स्थाईक झालेले आहेत. त्यांच्या पोटजाती आहेत, मेंढपाळ, विणकर, शेतकरी इ.) पूर्वी त्यांनी विणलेली कांबळी सैन्यदलात लोकप्रिय होती पण आता त्यांना फारशी मागणी नाही. “आता ते (जवान) स्लीपिंग बॅग्ज वापरतात,” एक विणकर पी. ईश्वरप्पा सांगतात. दडीभावी सालापूर मध्ये त्यांचा एक खड्ड्यातील हातमाग (डबऱ्या माग) आहे आणि त्यावर ते आजही काळ्या घोंगड्या विणतात.
दडीभावी सालापूर पासून दोनशे किमी. अंतरावरच्या रानेबेन्नुर (जि. हावेरी) येथील एका दुकानाचे मालक दिनेश शेठ म्हणतात, “दक्खनी कांबळ्यांची मागणी कमी होण्याचं एक कारण म्हणजे मिश्र कृत्रिम धाग्यांची आणि इतरही प्रकारची स्वस्त पांघरुणं उपलब्ध आहेत.”


डावीकडे : मोठ्या हमरस्त्यांवरून (इथे बागलकोट-बेळगाव रस्ता) चालणे सोपं नाही, जनावरं जखमी होतात, आजारी पडतात. उजवीकडे : इथल्या खडकाळ परिसरात ‘रस्ता सोडून’ स्थलांतर देखील सोपं नाही. शिवाय या मेंढपाळांचा जर शेतकऱ्यासोबत सौदा नसला तर त्याला जपून, शेतजमीन-पिकं दूर ठेवूनच मेंढरं घेऊन जावं लागतं
वीसेक वर्षांपूर्वी, कांबळ्यांची व रगची मागणी तेजीत होती तेव्हा या कुरुबा मेंढपाळांकडून विणकर ३० ते ४० रुपये किलो दराने लोकर घेत असत पण आता त्याना ती ८-१० रुपये दराने मिळते. स्थानिक दुकानात तयार ब्लँकेट ६००-८०० रुपयांना तर छोटी बसकरं २००-३०० रुपयात मिळतात. शिवाय हे उत्पन्नही कमी जास्त होत राहतं. माझ्या बोलण्यातून मला लक्षात आलं की १०० मेंढ्या बाळगणाऱ्या कुटुंबाला लोकर. खत आणि मेंढ्यांची विक्रीतून वर्षाला साधारण ७० ते ८० हजाराचं उत्पन्न मिळतं.
नियमित, स्थिर उत्पन्न मिळावं म्हणून दडीभावी सालापूर गावातील अनेक कुटुंबांतील स्त्रियांनी बचत गट स्थापन केलेत. या स्त्रिया आजही दक्खनी लोकर वळतात आणि घोंगड्या विणतात. आणि पुरुष शेती पाहतात.
आणि चरितार्थासाठी कुरुबा नवनवीन मार्गही शोधू लागलेत. मेकलमरडी गावातील (सांपगाव गट, ता. बैलहोंगल, जि. बेळगावी) येथील दस्तगीर जामदार, शरीराने थोडे अधू आहेत पण त्यांनी ताग, चामडे आणि लोकर यांतून पिशव्या आणि बसकरं विणायला सुरवात केली आहे. “या वस्तू स्थानिक बाजारात विकल्या जातात. कधी कधी बंगळूरूहून खरेदीदार येतात आणि थोडा फार माल जातो पण मागणीचा भरोसा नाही,” ते सांगतात.
काही मेंढपाळ आता त्यांची उपजीविका प्रामुख्याने आपली जनावरं (मांस व दूध यांसाठी) विकून मिळवण्याकडे वळत आहेत. कर्नाटक मेंढी व लोकर विकास महामंडळामार्फत राज्य सरकार दक्खनी जातीशिवाय इतर जातींना – लाल नेल्लोर, येल्गू, माडग्याळ - प्रोत्साहन देत आहे. या जाती लोकरीपेक्षा मांस अधिक देतात आणि आता कुरुबासुद्धा या जाती पाळू लागलेत. एका नर कोकराला रु. ८००० पर्यंत किंमत मिळते. पी. नागप्पा यांनी फेब्रुवारी २०१९ मध्ये तीन महिन्याचं एक कोकरू तुमकुर जिल्ह्यातील सिरा शहरात ६००० रुपयांना विकलं. आता या भागात बकरीच्या दुधाचा व्यवसाय वाढत असल्याने काही जण दुधासाठी बकऱ्या पाळू लागले आहेत.
गेल्या वीस वर्षांपासून, मेंढपाळांसोबत काम करणाऱ्या एका स्थानिक पशुवैद्याने मला सांगितले की, आपली मेंढरं निरोगी दिसावीत म्हणून हल्ली काही कुरुबा त्यांना भरपूर औषधं देतात, तीही डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय आणि बोगस विक्रेत्यांकडून घेऊन.
पुन्हा येऊ या बागलकोट-बेळगाव रस्त्यावर... एस. बंदेप्पा अजूनही योग्य अशा शेताच्या शोधात आहे. साधारण दहा वर्षांपासून उ. कर्नाटकातील अनेक शेतकरी सेंद्रिय शेतीपेक्षा रासायनिक खतांकडे वळत आहेत. त्यामुळे मेंढ्यांच्या खतापासून मिळणारं उत्पन्न हे काही आता नियमित उपजीविकेचं साधन नाही. त्यामुळे बंदेप्पा व इतर मेंढपाळ वर्षभर शेतात कामं शोधतात.
शेतकरी आणि मेंढपाळ यांच्यातील परंपरागत परस्परावलम्बित्व आता उतरणीला लागलंय. काही मेंढपाळ आपलं कुटुंब आणि बाडबिस्तरा घेऊन दूर दूर अंतरापर्यंत भटकंती करतात – समंजस, मायाळू शेतकरी आणि चराऊ जमिनींच्या शोधातील हा प्रवास अधिकाधिक कठीण होत चाललाय.


डावीकडे: काही कुटुंबं, आपली पोरंबाळं- कुटुंब, बाडबिस्तरा आणि शेरडं आणि मेंढरं मावतील अशा व्हॅन स्थलांतरासाठी भाड्याने घेतात. घोड्यांसारखे मोठे प्राणी पायी नेले जातात. उजवीकडे: पारसगड (जि. बेळगावी) गटातील चचडी गावाजवळील दृश्य

बऱ्याचदा दोन-तीन कुटुंबं आपापलं जितराब राखण्याची जबाबदारी वाटून घेतात. ते एकत्र कुटुंबाप्रमाणे राहतात आणि दिवाळीनंतर (ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये) स्थलांतर करतात आणि पाडव्याला (मार्च-एप्रिल मध्ये) पुन्हा आपल्या गावी परततात

विजय, वय ५ आणि नागराजू, वय ८ कळपातल्या कोणत्याही जनावरालाही ओळखू शकतात. ‘हा माझा सगळ्यात जवळचा दोस्त आहे,’ नागराजू हसून म्हणतो


डावीकडे: लहानगे विजय आणि नागराजू आपल्या घोड्यासह (मोठं, वजनदार सामान लादण्यासाठी घोडी वापरतात), सोबत त्यांचे वडील नीलाप्पा चचडी. उजवीकडे: अनेक दिवस रस्ता काटल्यावर नवीन ठिकाणी मुक्काम तयार करणं हे मोठे काम असतं; मुलंही त्यात भाग घेतात. विजय पाचच वर्षांचा आहे पण तोही हातभार लावतो


डावीकडे: मेंढपाळ आणि त्यांचे कळप बेळगावी जिल्ह्यातील बैलहोंगल-मुनावल्ली रस्त्यावरील एका शेतात. नैसर्गिक खत मिळवण्याचा हा पर्यावरणस्नेही मार्ग आता हळूहळू विरत चाललाय. बरेच शेतकरी आता रासायनिक खतं वापरतात. उजवीकडे: एका शेतावर... गायत्री विमला, एक कुरुबा मेंढपाळ स्त्री, चरणाऱ्या मेंढ्यांवर लक्ष ठेवता ठेवता आपल्या लहानग्यासाठी स्वयंपाक बनवतीये. रस्सी बांधून एका जागी ठेवलेला कळप ‘नव्या मुक्कामी’. चारणीच्या वाटेवर कुठे मुक्काम करायचा हे ठरवण्यासाठी पाण्याचा स्रोत हा महत्त्वाचा घटक असतो

पुढील मुक्कामाकडे निघताना छोट्या कोकरांना आवर घालणं कष्टाचं असतं, छोट्या व्रात्य मुलांना सांभाळण्यासारखंच असते ते


डावीकडे: स्थलांतरासाठी चालतांना जखमी आणि आजारी जनावरांची खूप काळजी घेतली जाते; इथे एका जखमी बकरीला व्हॅनमधील पुढील आसनावर बसवलेलं आहे. उजवीकडे: कुरुबा आपल्या जितराबाचा आदर करतात, विशेषत: घोड्यांचा. अलखनुर गावात मेंढपाळ आपल्या घोड्याला नमस्कार करत आहे

काही गावांतील महिलांनी बचत गट स्थापले आहेत आणि दक्खनी लोकरीपासून अधिक चांगले उत्पन्न मिळवण्याचे प्रयत्न या गटांद्वारे केले जातात. दडीभावी सालापूर मधील शांतव्वा बेवूर चरख्यावर धागा काढतेय, सावित्री लोकर पिंजत आहे तर लम्मस बेवूर चरख्यावर काम करण्यासाठी वाट बघत आहे

दक्खनी कांबळी बनवण्यासाठी वापरला जाणारा खड्ड्यातील माग. पी. ईश्वराप्पा आणि त्याचा मुलगा बीरेंद्र मागावर काम करताना, सोबत तिसऱ्या पिढीतील नारायण


डावीकडे : मेकलमर्डी गावात, दस्तगीर जामदार आपले उत्पन्न वाढवण्यासाठी जूट, चामडे आणि लोकर यांच्यापासून पिशव्या आणि इतर वस्तू तयार करतात. उजवीकडे: दुकानदार दिनेश शेठ कांबळ्याचा पोत तपासत आहेत. अशा कांबळ्यांची किंमत ८०० ते १५०० रुपये असते तर छोटी बसकरे ४०० ते ६०० रुपयांना विकली जातात. पण दक्खनी लोकरीच्या वस्तूंची मागणी घटतच चालली आहे.

जनावरांच्या बाजारात आपली मेंढरं निरोगी दिसावीत म्हणून हल्ली काही कुरुबा त्यांना भरपूर औषधं देतात. मैलार बंदेप्पानेही जंतावरील औषधं व प्रतिजैविकं द्यायला सुरुवात केली आहे, तेही पशुवैद्यकांच्या सल्ल्याशिवाय

सिराच्या जनावरांच्या बाजाराकडे आपली जनावरं घेऊन जाताना काका नागप्पा. विविध जातीच्या मेंढीपालनाला प्रोत्साहन देण्याच्या कर्नाटक सरकारच्या धोरणामुळे, कुरुबा आता इतर जातीच्याही मेंढ्यांची उपज करू लागले आहेत. मटणाच्या बाजारात मेंढ्याला सगळ्यात जास्त मागणी असते

तुमकुर जिल्ह्यातील सिरा शहरातील मंगळवारच्या जनावरांच्या बाजारासाठी जनावरं ट्रकमध्ये भरली जात आहेत
अनुवादः छाया देव