“अच्छा, ती फक्त आपल्या ‘गेस्टहाउस’ची चौकशी करायला आलीये,” राणी आपल्या ‘रुममेट’ला, लावण्याला सांगते. माझ्या भेटीचा उद्देश काय ते समजल्यावर दोघी हुश्श करतात.
जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला आम्ही जेव्हा या गेस्टहाउसबद्दल चौकशी सुरू केली, तेव्हा मदुराई जिल्ह्याच्या टी. कल्लूपट्टी तालुक्यातल्या कूवालपुरम गावामध्ये एकदम खळबळच उडाली. दबक्या आवाजात बोलत काही पुरुषांनी दोन बायांकडे बोट दाखवलं. तरुण वयाच्या या दोघी आया दूर एका ओसरीवर बसलेल्या होत्या.
“ते तिथे पलिकडे आहे, चला,” त्या म्हणतात आणि जवळ जवळ अर्धा किलोमीटर अंतरावर गावाच्या एका टोकाला त्या आम्हाला घेऊन जातात. विराण जागेतल्या दोन खोल्या म्हणजेच ते तथाकथित ‘गेस्टहाउस’. आम्ही गेलो तेव्हा रिकामंच होतं. गंमत म्हणजे या दोन खोल्यांच्या मध्ये असलेल्या कडुनिंबाच्या झाडावर अनेक पिशव्या मात्र लटकत होत्या.
या गेस्टहाउसचे ‘गेस्ट’ कोण, तर पाळी चालू असणाऱ्या स्त्रिया. अर्थात त्या काही इथे कुणी निमंत्रण दिलं म्हणून किंवा स्वतःच्या मर्जीने येत नाहीत. आपल्या गावच्या कर्मठ प्रथांमुळे त्यांना इथे वेगळं बसावं लागतं. कूवालपुरम हे ३००० वस्तीचं गाव मदुराई शहरापासून ५० किलोमीटरवर आहे. गेस्टहाउसमध्ये आम्ही ज्या दोघींना भेटलो, त्या राणी आणि लावण्या (नावं बदलली आहेत) इथे पाच दिवस राहतील. पण पहिली पाळी आलेल्या मुलींना तसंच बाळंतिणींना मात्र आपल्या नवजात बाळासकट इथे महिनाभर रहावं लागतं.
“आम्ही आमचं सामानसुमान आमच्याबरोबर खोलीतच ठेवतो,” राणी सांगते. पाळी सुरू असताना बायांना जी वेगळी भांडी वापरावी लागतात, ती या पिशव्यांमध्ये आहेत. इथे खाणं बनवलं जात नाही. घरून, बहुतेक वेळा शेजाऱ्या-पाजाऱ्यांनी बनवलेलं अन्न या भांड्यांमध्ये भरून ठेवलं जातं. आणि स्पर्श होऊन विटाळ होऊ नये म्हणून या पिशव्या अशा झाडाल्या लटकवल्या जातात. प्रत्येक ‘गेस्ट’साठी खास वेगवेगळी भांडी असतात – अगदी एकाच घरातल्या 'पाहुण्या' असल्या तरी. पण खोल्या मात्र दोनच आणि त्यातच सगळ्यांनी मुक्काम करायचा.
कूवालपुरममध्ये राणी आणि लावण्यासारख्या अन्य स्त्रियांना पाळी चालू असताना इथे या दोन खोल्यांमध्ये मुक्काम करण्यावाचून दुसरा कोणताही पर्याय नाही. यातली एक खोली गावातल्या लोकांनी वर्गणी काढून बांधली आहे. या दोघी २३ वर्षांच्या आहेत आणि विवाहित आहेत. लावण्याला दोन मुलं आहेत तर राणीला एक. दोघींचे नवरे शेतमजूर आहेत.
“सध्या तरी आम्ही दोघीच आहोत, पण कधी कधी आठ-नऊ जणी असतात. मग इथे गर्दी होते,” लावण्या सांगते. आता अशी वेळ बऱ्याचदा येत असल्यामुळे गावातल्या जुन्या जाणत्यांनी मोठ्या मनाने दुसरी खोली बांधून देण्याचं कबूल केलं आणि मग एका तरुण मंडळाने निधी गोळा केला आणि ऑक्टोबर २०१९ मध्ये दुसरी खोली बांधली गेली.
सध्या जरी इथे दोघीच असल्या तरी राणी आणि लावण्या नव्या खोलीत मुक्काम करतायत, कारण ती मोठी, हवेशीर आणि उजेडाची आहे. विचित्रयोग असा की या प्रतिगामी प्रथेचं प्रतीक असणाऱ्या खोलीत चक्क एक लॅपटॉप आहे जो लावण्याला ती शाळेत असताना राज्य सरकारकडून मिळाला आहे. “नुसतं बसून रहायचं, मग वेळ कसा जायचा? आम्ही लॅपटॉपवर गाणी ऐकतो, सिनेमे पाहतो. घरी जाताना मी तो सोबत घेऊन जाईन,” ती सांगते.
हे ‘गेस्टहाउस’ म्हणजे ‘मुट्टुथुरई’ किंवा ‘विटाळशी’च्या खोली. तिचंच हे गोंडस नाव आहे. “आम्ही आमच्या मुलांसमोर गेस्टहाउस असाच उल्लेख करतो म्हणजे ते नक्की कशासाठी आहे ते त्यांना कळत नाही,” राणी सांगते. “विटाळशीच्या खोलीत बसायचं म्हणजे इतकं लाजिरवाणं वाटतं ना – खास करून गावातली जत्रा किंवा सण असेल किंवा बाहेरगावाहून कुणी पाहुणे आले असतील आणि त्यांना हे सगळं माहित नसेल तर जास्तच.” मदुराई जिल्ह्यात पाच अशी गावं आहेत जिथे पाळी सुरू असताना बायांना दूर, वेगळं रहावं लागतं. कूवालपुरम त्यातलंच एक. पुडुपट्टी, गोविंदनल्लूर, सप्तुर अळगपुरी आणि चिन्नय्यापुरम ही बाकी चार गावं.
हे असं वेगळं बसणं मोठा कलंक ठरतो. जर बिनलग्नाच्या तरुण मुली ठराविक वेळी गेस्टहाउसमध्ये दिसल्या नाहीत तर लोकांच्या जिभा वळवळायला लागतात. “पाळीचं चक्र कसं काम करतं हे देखील त्यांना माहित नाहीये, पण मी जर दर ३० दिवसांनी विटाळशीच्या खोलीत गेले नाही तर लोक म्हणायला लागतात की माझी शाळा बंद करायला पाहिजे म्हणून,” नववीत शिकणारी १४ वर्षांची भानू (नाव बदललं आहे) सांगते.
“मला अजिबात आश्चर्य वाटत नाहीये,” पाळीदरम्यान पाळल्या जाणाऱ्या विधिनिषेधाबद्दल खुल्याने लिहिणाऱ्या पुडुचेरी स्थित स्त्रीवादी लेखिका सालई सेल्वम म्हणतात. “या जगाने कायमच बाईचं दमन केलंय, तिला दुय्यम नागरिक म्हणून वागवलंय. संस्कृतीच्या नावाखाली चालू असलेल्या या प्रथा म्हणजे तिला तिचे मूलभूत हक्क नाकारण्याची संधी आहेत. ग्लोरिया स्टाइनेम या स्त्रीवादी लेखिकेने तिच्या एका महत्त्वाच्या निबंधामध्ये [‘If Men Could Menstruate’] म्हटलंय तसं, खरंच पुरुषांना पाळी येत असती, तर गोष्टी किती वेगळ्या झाल्या असत्या, नाही का?”
कूवालपुरम आणि सप्तुर अळगपुरीमध्ये मला भेटलेल्या किती तरी बाया सेल्वम सांगतात तेच ठासून सांगतात – संस्कृतीचं नाव देऊन भेदभाव झाकला जातो. राणी आणि लावण्या दोघींना बारावीनंतर शिक्षण सोडायला लावलं होतं आणि लगेच त्यांची लग्नं लावून दिली गेली. “माझं बाळंतपण अडलं होतं आणि मला सिझेरियन करावं लागलं होतं. बाळ झाल्यानंतर माझी पाळी अनियमित झाली होती. पण विटाळशीच्या खोलीत जायला जरा जरी उशीर झाला तरी लोक लगेच विचारायला लागणार, परत दिवस राहिलेत का म्हणून. मला काय त्रास होतोय हे त्यांच्या डोक्यातच शिरत नाही,” राणी सांगते.
राणी, लावण्या किंवा कूवालपुरमच्या इतर बायांना ही प्रथा कधी सुरू झाली असावी याची काहीच कल्पना नाही. पण, लावण्या म्हणते, “आमच्या आया, आज्या, पणज्या – सगळ्यांना असंच वेगळं बसवलं जात होतं. त्यामुळे फार वेगळं असं काहीच नाही.”
चेन्नई येथील एक वैद्यक आणि द्रविडी विचारवंत डॉ. एळियन नागनाथन या प्रथेमागचं एक भन्नाट पण त्या मानाने तार्किक कारण सांगतातः “आपण शिकार आणि कंदमुळं गोळा करण्याच्या अवस्थेत होतो तेव्हा या प्रथेचा उगम झालाय,” असा त्यांचा ठाम विश्वास आहे.
“वीतुक्कु थूरम [घरापासून दूर – पाळी सुरू असणाऱ्या बायांना वेगळं बसवण्याचं गोंडस नाव] ही तमिळ संज्ञा पूर्वी काटुक्कु थूरम [जंगलापासून दूर] अशी होती. असा समज होता की रक्ताचा वास [पहिल्या पाळीचा, मासिक पाळीचा आणि प्रसूतीवेळचा] हुंगून वन्य प्राणी बायांची शिकार करू शकतील म्हणून त्या जंगलापासून दूर सुरक्षित ठिकाणी थांबायच्या. कालांतराने याच प्रथेचा वापर स्त्रियांवर अन्याय करण्यासाठी करण्यात येऊ लागला.”
कूवालपुरममधे सांगितल्या जाणाऱ्या कहाणीला मात्र इतका तार्किक आधार नाही. इथले रहिवासी सांगतात की सिद्धराला (सिद्धपुरुष) दिलेलं हे एक वचन आहे. आणि पंचक्रोशतील्या पाच गावांना ते बाध्य आहे. “हा सिद्धर आमच्यात रहायचा, फिरायचा. तो देव होता आणि शक्तीमान होता,” कूवालपुरमच्या सिद्धरांच्या – थंगमुडी सामी - मंदिराचे मुख्य कार्यकारी असणारे ६० वर्षीय एम. मुथू सांगतात. “आमचा अशी श्रद्धा आहे की आमचं गाव, पुडुपट्टी, गोविंदनल्लूर, सप्तुर अळगपुरी आणि चिन्नय्यापुरम या सिद्धराच्या पत्नी होत्या. त्यांना दिलेलं वचन जर मोडलं तर गावाचा विध्वंस होईल.”
७० वर्षांचे सी. रासु यांनी त्यांच्या आयुष्याची बहुतेक वर्षं कुवालपुरममध्येच व्यतीत केली आहेत. या प्रथेत कसलाही भेदभाव आहे असं त्यांना वाटत नाही. “त्या सर्वेश्वराप्रती श्रद्धा व्यक्त करण्याचा हा मार्ग आहे. बायांसाठी सगळ्या सोयी करण्यात आल्या आहेत, डोक्यावर छत आहे, पंखे आहेत. ती जागा चांगलीच आहे.”
त्यांच्या जवळ जवळ नव्वदीला आलेल्या भगिनी मुथुरोली यांना त्यांच्या काळात काही हा ‘आनंद’ घेता आला नव्हता. “आमच्या वेळी केवळ झापांची छपरं होती. वीजही नसायची. आजकालच्या मुलींचं सगळं चांगलं चालू आहे, तरी त्या कुरकुर करतात. आपण रीत पाळलीच पाहिजे.”
गावातल्या बहुतेक बायांना ही कथा मनोमन पटल्यासारखी वाटते. एकदा एका बाईने पाळी आली हे लपवून ठेवण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर वारंवार तिच्या स्वप्नात साप यायला लागले. तिच्या मनाने हाच अर्थ काढला की तिने रीत मोडली आणि विटाळशीच्या खोलीत ती गेली नाही म्हणून देव कोपले आहेत.
या सगळ्या चर्चेत एक गोष्ट सांगायचीच राहिली. गेस्टहाउसच्या सगळ्या ‘सुखसोयीं’मध्ये संडास मात्र नाहीत. “शौचाला किंवा नॅपकिन बदलायला आम्ही दूर रानात जातो,” भानू सांगते. गावातल्या शाळेत जाणाऱ्या मुली आता सॅनिटरी नॅपकिन वापरू लागल्या आहेत (जे वापरानंतर जमिनीत पुरले जातात किंवा जाळून टाकले जातात, किंवा गावाच्या वेशीबाहेर फेकून दिले जातात), पण बाकी बाया मात्र आजही कापडच वापरतात, जे धुऊन पुन्हा वापरलं जातं.
विटाळशीच्या खोलीत राहणाऱ्यांसाठी बाहेर पाण्याचा नळ आहे – त्या नळाला गावातलं दुसरं कुणी हातही लावत नाही. “आम्ही सोबत आणलेलं अंथरुण पांघरुण आणि कपडे धुऊनच नेतो, त्याशिवाय गावात आम्हाला पाऊल टाकायची सोय नाही,” राणी सांगते.
जवळच्याच सेदापट्टी तालुक्यातल्या ६०० लोकसंख्येच्या सप्तुर अळगपुरीमध्ये बायांची अशी ठाम समजूत आहे की जर त्यांनी ही रीत मोडली तर त्यांची पाळीच बंद होईल. करपागम (नाव बदललं आहे), वय ३२, मूळची चेन्नईची आहे. वेगळं बसण्याची ही रीत पाहून ती आधी चक्रावून गेली होती. “पण माझ्या लक्षात आलं की हा संस्कृतीचा भाग आहे आणि मी त्याच्या विरोधात जाऊ शकत नाही. मी आणि माझा नवरा, आम्ही दोघं तिरुप्पूरमध्ये काम करतो आणि फक्त सुट्ट्यांमध्ये घरी येतो.” तिच्या घरातल्या जिन्याखालची छोटीशी जागा दाखवून ती म्हणते, की पाळी सुरू असतानाची ही तिची ‘खोली’.
सप्तुर अळगपुरी येथील मोडकळीला आलेली आणि छोटी विटाळशीची खोली अगदी निर्जन जागी आहे. इथे राहण्यापेक्षा बाया पाळीदरम्यान रस्त्यात मुक्काम करणं पसंद करतात. “पावसाळा सोडून,” ४१ वर्षीय लता (नाव बदललं आहे) सांगतात. तेव्हा मात्र त्या विटाळशीच्या खोलीत जातात.
आणखी एक विचित्रयोग, कूवालपुरम आणि सप्तुर अळगपुरीमध्ये जवळ जवळ सगळ्या घरांमध्ये संडास आहेत. सात वर्षांपूर्वी एका सरकारी योजनेत बांधले गेलेत. तरुण लोक ते वापरतात, पण वयस्क मंडळी, बायांसकट रानात उघड्यावरच जातात. पण दोन्ही गावातल्या विटाळशीच्या खोल्यांमध्ये मात्र संडास नाहीत.
“पाळी आल्यावर आम्ही तिकडे निघालो असलो तरी आम्हाला मुख्य रस्त्याने जायची परवानगी नाही,” २० वर्षीय शालिनी (नाव बदललं आहे) सांगते. ती सूक्ष्मजीवशास्त्राचं शिक्षण घेत आहे. “आम्हाला मोठा वळसा घालून, निर्जन रस्त्यावरून विटाळशीच्या खोलीकडे जावं लागतं.” मदुराईच्या तिच्या कॉलेजमधल्या इतर कुणासोबतच शालिनी पाळीचा विषय काढत नाही. चुकून हे ‘बिंग फुटेल’ अशी सारखी भीती तिला वाटत राहते. “ही काही फार अभिमान वाटावा अशी गोष्ट नक्कीच नाहीये ना,” ती म्हणते.
टी. सेल्वकणी, वय ४३, सप्तुर अळगपुरीमध्ये जैविक शेती करतात. त्यांनी या प्रथेविरोधात गावकऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला आहे. आपण स्मार्टफोन आणि लॅपटॉप वापरायला लागलोय आणि तरीही आज २०२० मध्ये आपल्या बायांना वेगळं बसावं लागतंय? ते विचारतात. विवेकाने विचार करण्याचं आवाहन फुकट जातं. “इथे जिल्हाधिकारी महिला असली तरी तिला हा नियम पाळावा लागेल,” लता (नाव बदललं आहे) म्हणतात. “इथे तर दवाखान्यात आणि रुग्णालयांमध्ये काम करणाऱ्या नर्सेससुद्धा [आणि इतर सुशिक्षित आणि नोकरदार बाया] पाळीच्या काळात बाहेर बसतात,” त्या म्हणतात. “तुमच्या बायकोने पण हे पाळायला पाहिजे, शेवटी श्रद्धेचा सवाल आहे,” त्या सेल्वकणींना सांगतात.
बायांना पाच दिवसांपर्यंत गेस्टहाउसमध्ये रहावं लागतं. पहिली पाळी आलेल्या मुलींना तसंच बाळंतिणींना आपल्या नवजात बाळासकट इथे महिनाभर रहावं लागतं
“मदुराई आणि थेनी जिल्ह्यात इतर ठिकाणी सुद्धा तुम्हाला अशी ‘गेस्टहाउस’ मिळतील. मंदिरं आणि कारणं वेगळी असतील” सालई सेल्वम म्हणतात. “आम्ही आमच्या परीने लोकांशी बोलण्याचा खूप प्रयत्न केलाय पण श्रद्धेचा विषय आला की लोक आपले कान बंद करून टाकतात. आता हे केवळ राजकीय इच्छाशक्तीतूनच बदलू शकेल. ते करायचं सोडून सत्तेतले लोक गेस्टहाउसचं नूतनीकरण करण्याच्या आणि अधिक सोयी पुरवण्याच्या बाता करतात, मत मागायला आलेले असतात ना ते.”
सेल्वम यांना वाटतं की या सगळ्यापेक्षा सत्ताधाऱ्यांनी गेस्टहाउस मुळातूनच मोडीत काढली पाहिजेत. “त्यांचं म्हणणं आहे की हे मुश्किल आहे कारण हा लोकांच्या श्रद्धेचा प्रश्न आहे. पण अजून किती वर्षं आपण ही अस्पृश्यता सुरू राहू देणार आहोत? बरोबर आहे, सरकारने काही पावलं उचलली तर त्याला विरोध होणार – पण हे [बंद] व्हायला पाहिजे, आणि माझ्यावर विश्वास ठेवा, लोक लवकरच हे विसरूनही जातील.”
पाळीबद्दलचे विधीनिषेध आणि तिरस्कार तमिळ नाडूत सर्रास आढळतात. नोव्हेंबर २०१८ मध्ये जेव्हा तंजावुर जिल्ह्याला गज चक्रीवादळाचा तडाखा बसला तेव्हा पट्टुकोट्टई तालुक्यातल्या अनइक्कडू गावातल्या चौदा वर्षांच्या एस. विजयाला या विटाळ मानण्याच्या प्रथेमुळे आपला जीव गमवावा लागला. पहिलीच पाळी आलेल्या या मुलीला एकटीला घराजवळच्याच एका झोपडीत रहायला पाठवलं होतं. (घरात असलेले तिचे सगळे कुटुंबीय बचावले).
“तमिळ नाडूमध्ये अगदी सगळीकडे तुम्हाला पाळीविषयीच्या अशा रिती सर्रास पहायला मिळतील, त्याची तीव्रता वेगवेगळी असते इतकंच,” बोधपट तयार करणाऱ्या गीता इलंगोवन म्हणतात. २०१२ साली आलेला त्यांचा बोधपट माधवीदाइ (पाळी) पाळीभोवतीच्या या विधीनिषेधांचा मागोवा घेतो. वेगळं किंवा बाहेर बसण्याचे, शहरी भागात फारसे उघडपणे न कळणारे अनेक प्रकार आहेत. “एका प्रशासकीय अधिकाऱ्याच्या पत्नीचं बोलणं मी ऐकलंय. तिच्या मुलीला पाळीच्या काळात ती स्वयंपाकघरात येऊ देत नाही कारण तो ‘विश्रांती’ घेण्याचा काळ असतो, म्हणे. तुम्ही त्याला कितीही नटवा, सजवा, शेवटी हा भेदभावच आहे.”
इलंगोवन असंही सांगतात की पाळीभोवतीचा भेदभाव सगळ्या धर्मांमध्ये आणि आर्थिक-सामाजिक स्तरांमध्ये आढळून येतो, प्रकार थोडे वेगळे असतात, इतकंच. “माझ्या बोधपटसाठी मी अमेरिकेतल्या एका शहरात स्थायिक झालेल्या एका बाईशी बोलले. तिथेही ती पाळीच्या काळात बाहेर बसते. तिचा दावा होता का हा तिचा वैयक्तिक निर्णय आहे. तिच्यासारख्या उच्चवर्गीय, उच्चजातीय बायांसाठी जो वैयक्तिक निवडीचा प्रश्न असतो तोच मुखर नसणाऱ्या, पुरुषसत्तेच्या कर्मठ उतरंडीमध्ये कसलीही सत्ता नसणाऱ्या बायांसाठी समाजाचा दबाव बनतो.”
“आपण एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की ही शुचितेची संस्कृती खरं तर ‘वरच्या’ जातींची संस्कृती आहे,” इंगोवन सांगतात. पण तिचा प्रभाव मात्र सगळ्या समाजावर होतो – कूवालपुरममधले बहुतेक रहिवासी दलित आहेत. इंगोवन सांगतात की “त्यांच्या बोधपटाचा अपेक्षित प्रेक्षकवर्ग पुरुष होते, त्यांना हे सगळे प्रश्न समजले पाहिजेत. आणि धोरणकर्ते बहुतकरून पुरुषच आहेत. आपण जोपर्यंत याबद्दल बोलत नाही, जोपर्यंत घरातून या विषयावर चर्चा सुरू होत नाही, चित्र आशादायी नाही.”
शिवाय, “पाण्याच्या वगैरे पुरेशा सोयी नसताना अशा पद्धतीने बायांना पाळीदरम्यान बाहेर बसवणं म्हणजे आजारपणाला निमंत्रण आहे,” चेन्नई स्थित स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. शारदा शक्तीराजन सांगतात. “खूप वेळ ओला कपडा तसाच ठेवल्यामुळे आणि स्वच्छतेसाठी पाण्याची सोय नसल्यामुळे मूत्रमार्गाचा किंवा प्रजननमार्गाचा जंतुसंसर्ग होऊ शकतो. या जंतुसंसर्गामुळे भविष्यात जननक्षमतेवर विपरित परिणाम होऊ शकतो किंवा कटिर पोकळीचा तीव्र संसर्गही होऊ शकतो. अपुरी स्वच्छता (जुन्या कपड्याचा परत परत वापर) आणि त्यातून होणारी जंतुलागण हे ग्रीवेच्या कर्करोगाचं सर्वात महत्त्वाचं कारण आहे,” त्या सांगतात.
२०१८ साली इंटरनॅशनल जर्नल ऑफ कम्युनिटी मेडिसिन अँड पब्लिक हेल्थ मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार ग्रीवेचा कर्करोग हा स्त्रियांना, खास करून तमिळ नाडूच्या ग्रामीण भागातील स्त्रियांना होणाऱ्या कर्करोगामधील दुसऱ्या क्रमांकाचा प्रकार आहे.
तर तिकडे कूवालपुरममध्ये भानूपुढे महत्त्वाच्या किती तरी अन्य गोष्टी आहेत. “ही प्रथा काही बदलणार नाही, तुम्ही कितीही रक्त आटवा,” ती दबक्या आवाजात म्हणते. “पण तुम्हाला आमच्यासाठी काही करायचंच असेल तर प्लीज तिथे विटाळशीच्या खोलीत आमच्यासाठी संडासची सोय करा. आमचं जगणं जरा तरी सुखकर होईल.”
शीर्षक चित्रः प्रियांका बोरार नव माध्यमांतील कलावंत असून नवनवे अर्थ आणि अभिव्यक्तीच्या शोधात ती तंत्रज्ञानाचे विविध प्रयोग करते. काही शिकता यावं किंवा खेळ म्हणून ती विविध प्रयोग करते, संवादी माध्यमांमध्ये संचार करते आणि पारंपरिक कागद आणि लेखणीतही ती तितकीच सहज रमते.
पारी आणि काउंटरमीडिया ट्रस्टने पॉप्युलेशन फाउंडेशन ऑफ इंडियाच्या सहाय्याने ग्रामीण भारतातील किशोरी आणि तरुण स्त्रियांसंबंधी एक देशव्यापी वार्तांकन उपक्रम हाती घेतला आहे. अत्यंत कळीच्या पण परिघावर टाकल्या गेलेल्या या समूहाची परिस्थिती त्यांच्याच कथनातून आणि अनुभवातून मांडण्याचा हा प्रयत्न आहे.
हा लेख पुनःप्रकाशित करायचा आहे? कृपया
zahra@ruralindiaonline.org
शी संपर्क साधा आणि
namita@ruralindiaonline.org
ला सीसी करा
अनुवादः मेधा काळे