गुंजी गावातले कोरीव काम केलेले लाकडी दरवाजे पहाटे ४.४५ ला एक एक करत उघडतात आणि पाण्याच्या बाटल्या हातात घेऊन लोक बाहेर पडू लागतात. प्रातःविधीसाठी काही वर्षांपूर्वी हातात पत्र्याचा किंवा स्टीलचा डबा असायचा त्याची जागा आता ‘वापरा अन् फेका’ प्लास्टिकच्या बाटल्यांनी घेतली आहे.
एकमेकांना हसून रामराम करत ते वेगवेगळ्या शेतांमध्ये पांगतात. यातली अनेक शेतं पडीक आहेत कारण शेतमालक स्थलांतर करून बाहेरगावी गेलेत. झुंजुमुंजुला लवकर उठलेले काही प्रातःविधी उरकून रिकाम्या बाटल्या हातात घेऊन परतायत.
या कामासाठी सगळ्यात चांगली जागा म्हणजे दाट अशा झाडोऱ्यामागे. अर्थात ३,२०० मीटरच्या उंचीवर या जागा तशा कमीच. त्यामुळे लवकर उठणाऱ्यांनाच या मोक्याच्या जागा मिळतात. अपी पर्वतरांगांची बर्फाच्छादित शिखरं केशरी होत फटफटू लागलं की गुंजीवासियांच्या उठाबशा सुरू होतात.
तिथनं जवळच कुती-यांक्ती नदीचा खळखळाट कानी पडतोय. घोड्यांच्या गळ्यातल्या घंटा दगडी रस्त्यावर त्यांच्या नालांच्या टापांशी ठेका धरतायत. त्यांचे मालक किंवा गुराखी ५० किलोमीटरवरच्या गर्बाधारला गुरं घेऊन चाललेत. याच भागात भारत-चीन सीमेपार चालणाऱ्या निर्यातीचा माल घेऊन जाण्यासाठी ते तिथे वाट पाहत थांबतील – इथनं सीमा फक्त २२ किलोमीटरवर आहे.


गुंजीच्या प्रवेशद्वाराजवळच स्त्रिया आणि पुरुषांसाठी अशी तीन शौचालयं आहेत, कुलुपबंद, एक वरिष्ठ पोलिस अधिकारी आपल्या गावाला भेट द्यायला आले तेव्हा आणखी सहा शौचालयं बांधण्यात आली तीदेखील आज बंद आहेत
गुंजीच्या वेशीजवळच स्त्रिया आणि पुरुषांसाठी तीन शौचालयं बांधलेली आहेत. ही शौचालयं बंद आहेत. एक वरिष्ठ दर्जाचा पोलिस अधिकारी त्याच्या गावी भेट द्यायला आला होता तेव्हा सहा तात्पुरती शौचालयं बांधण्यात आली होती, तीदेखील आज बंद आहेत. २०० वर्षं जुन्या दगडी छतांच्या घरांमध्ये ही शौचालयं फारच वेगळी दिसतात. या शौचालयांच्या चाव्या गुंजीच्या ग्रामप्रधानाकडे असतात. पण बहुतेक वेळा त्या इथून ७० किलोमीटरवर असणाऱ्या धाराचुलामध्ये असतात.
उत्तराखंड राज्याच्या पिथोरागढ जिल्ह्याच्या धाराचुला तालुक्यातल्या हिमालयाच्या पर्वतराजीतल्या उंचावरच्या २१ गावांमधलं एक गाव म्हणजे गुंजी. इथलो लोक हंगामी स्थलांतर करतात. दर वर्षी नोव्हेंबर महिन्यात लोक आपली जनावरं घेऊन धाराचुलामध्ये त्यांच्या हिवाळी घरांमध्ये जाऊन राहतात.
मे महिन्याच्या सुरुवातीला, बर्फ वितळायला लागल्यावर लोकं गुंजीत परतू लागतात. साठ-सत्तर किलोमीटरची ही चढण चढून यायला त्यांना चार दिवस लागतात, आल्यावर ते शेतीची कामं सुरू करतात. पाऊस चांगला झाला (गेल्या दोन वर्षात पाऊस खूप कमी किंवा पडलाच नाहीये) तर ते कुट्टू, राजमा, वाटाणा आणि इतर पिकं घेतात, ऑक्टोबर महिन्यात पिकं हाती आली की ते आपल्या जनावरांना घेऊन पुन्हा आपल्या हिवाळी मुक्कामी पोचतात.

गुंजी फार काही अपरिचित नाहीये – ते भारत-चीन सीमेवरचं बऱ्यापैकी मोठं गाव आहे
अर्थात, सगळ्या कुटुंबांना काही दोन दोन घरांची ऐश परवडत नाही. हाडं गोठवून टाकणाऱ्या थंडीत, अगदी उणे २० अंश सेल्सियस तापमानातही वीस-पंचवीस कुटुंबांना गुंजीतच रहावं लागतं. उन्हाळ्यामध्ये गुंजीचं तापमान १० अंशाच्या आसपास असतं.
गुंजी फारसं काही अपरिचित गाव नाही – भारत-चीन सीमेवरचं ते बऱ्यापैकी मोठं गाव आहे. इथे इंडो-तिबेटन बॉर्डर पोलिस छावणी, सशस्त्र सीमा दलाची छावणी, कस्टमचं कार्यालय आणि भारतीय स्टेट बँक व पोस्टाच्या हंगामी शाखा आहेत ज्या वर्षातले सहा महिने कार्यरत असतात.
या १९४ कुटुंबांच्या या गावात (जनगणना, २०११) एकच चालू संडास आहे, तोही इंटलिजन्स ब्यूरोच्या (आयबी) कचेरीत. इथे आयबीची कचेरी आहे कारण इथून आंतरराष्ट्रीय सीमा जवळ आहे, इथे अवैध व्यापार होण्याची शक्यता जास्त आहे आणि कैलास मानसरोवराला जाणारे भाविक गुंजीमधून जातात. असं असलं तरी आयबीच्या संडासातही नळाचं पाणी नाही, दर वेळी संडासाचा वापर करायचा असेल तर नळावरून बादली भरून आणावी लागते.
या गावात एकच नळ आहे, जवळून वाहणाऱ्या कुती-याक्ती नदीतनं आणलेला. इथले लोक पिण्यासाठी, अंघोळीसाठी आणि कपडे धुण्यासाठी याच पाण्याचा वापर करतात. हिवाळ्यामध्ये जेव्हा गुंजी आणि आसपासचे पर्वत बर्फाखाली असतात तेव्हा नळातलं पाणीही गोठतं. अशा वेळी इथून दीड किलोमीटरवर मनिला इथे स्थित जनरल रिझर्व्ह इंजिनियर फोर्स (जीइआरएफ) मार्फत गुंजीच्या रहिवाशांना कधी कधी पाणी पुरवठा केला जातो.
आयबीच्या संडासातही नळाचं पाणी नाही, दर वेळी संडासाचा वापर करायचा असेल तर नळावरून बादली भरून आणावी लागते.
“जीइआरएफ कधी कधी हिवाळ्यात आम्हाला पाणी पुरवतं पण एरवी तर आमचं आम्हालाच भागवावं लागतं,” कडाक्याच्या थंडीतही गुंजीत राहणारे मंगल गुंजीवाल सांगतात. या पर्वतांमध्ये जेव्हा बर्फाळ वारे वहायला लागतात तेव्हा पाणी आणणं कर्मकठिण असतं. बहुतेक वेळा जी एकमेव जलवाहिनी आहे तीदेखील बर्फामुळे किंवा दरडींमुळे तुटते. आम्ही कुती-याक्ती नदीवरून पाणी भरून आणतो [बादलीने, अनेक खेपा करत], पण नदी देखील गोठून जाते. मग आम्ही बर्फ गरम करून वितळवतो आणि त्याचं पाणी पितो किंवा चहा करतो.

‘आमच्या इथे संडास नाही कारण आम्हाला पाणीच मिळत नाही,’ हिवाळ्यात गुंजीतच मुक्काम करणारे फाल सिंह गुंजीवाल सांगतात.
१५ एप्रिल २०१७ रोजी पेय जल व स्वच्छता मंत्रालयाने गुंजीचा समावेश असणारा पिथोरागढ जिल्हा हागणदारी मुक्त (Open Defecation Free – ODF) असल्याचं जाहीर केलं. या वर्षी २३ जून रोजी स्वच्छ भारत मिशन – ग्रामीण तर्फे ग्रामीण उत्तराखंड हे भारतातलं चौथं हागणदारी मुक्त राज्य जाहीर करण्यात आलं (सिक्किम, हिमाचल प्रदेश आणि केरळ ही पहिली तीन राज्यं आहेत). अभियानाच्या मते, उत्तराखंडच्या १५,७५१ गावांमधलं कुणीही आता उघड्यावर शौचाला जात नाही.
धाराचुलाच्या तालुका कचेरीतील स्वच्छ भारत मिशनच्या कागदपत्रांनुसार, गुंजीमधल्या प्रत्येक कुटुंबाच्या धाराचुलातील काली नदीच्या तीरावर वसलेल्या हिवाळी घरांमध्ये संडास आहे. पण गावकऱ्यांच्या मते त्यांच्या हिवाळी घरांमध्येही त्यांना उघड्यावरच शौचाला जावं लागतं कारण तिथे पाणीच नाहीये.
“आमच्या इथे संडास नाही कारण आमच्याकडे पाणीच नाहीये. उन्हाळ्यामध्ये नळाला पाणी येतं, पण तेव्हा सगळेच धाराचुलाहून गुंजीला परततात त्यामुळे दर डोई खूपच कमी पाणी मिळतं,” फाल सिंह गुंजीवाल सांगतात, ते हिवाळ्यातही गुंजीतच वास्तव्य करतात.

गुंजीच्या ग्राम प्रधान नव्याने बांधलेल्या संडासांना कुलपं घालून ठेवतात कारण, ‘पाणी नाही त्यामुळे गावकरी हे संडास घाण करून ठेवतील’
स्वच्छ भारत मिशनचे जिल्हा समन्वयक दीप चंद्र पुनेथा सांगतात की मनरेगासह इतर अनेक योजनांमार्फत हिमालयातल्या उंचावरच्या गावांमध्य सार्वजनिक संडास बांधण्यात आले आहेत. “उंचावरच्या गावांमध्ये जागेची अडचण असल्यामुळे धाराचुलाची जी स्थलांतर करणारी २१ गावं आहेत तिथे सार्वजनिक संडास उभारण्यात येत आहेत,” ते सांगतात.
पण पाण्याची सोय न करता संडास कसे काय बांधले जात आहेत? आणि अगदी नव्याने बांधलेले संडास बंद का ठेवण्यात आले आहेत? अर्चना गुंजीवाल, गुंजीच्या ग्राम प्रधान एकदम भारी कारण देतातः “हे नवे कोरे संडास आहेत. पाणी नसलं तर गावकरी इथे घाण करून ठेवतील ना.” मग नळाचं पाणी कधी सुरू होणार आहे? “त्याला वेळ लागेल. आम्हाला जास्त नळजोड द्यावे लागणार आहेत. तोपर्यंत काही हे संडास वापरता येणार नाहीत.”

‘आमचे बापजादे असेच राहत होते ना. मग आम्ही तरी हे कसं थांबवणार,’ सुखमती देवी विचारतात
तर, लोक उघड्यावर संडासला जायचं थांबवत नाहीयेत आणि सरकारी कागदपत्रांमध्ये मात्र गावात चालू स्थितीतल संडास आहेत. आणि खरं तर स्वच्छ भारत मिशनच्या सतत बिंबवल्या जाणाऱ्या यशोगाथांमधल्या इतर गावांपेक्षा गुंजीची स्थिती फार काही वेगळी नाही. गुंजीहून १९ किलोमीटरवर असणाऱ्या ४,५०० मीटर उंचीवरच्या ३६३ लोकसंख्या असणाऱ्या कुटी गावामध्ये चार संडास होते, दोन स्त्रियांसाठी आणि दोन पुरुषांसाठी. पण यातले दोन संडास अगदीच मोडकळीला आले आहेत. बाकी दोन्हीतला मैला सेप्टिक टँकमध्ये जाणं अपेक्षित आहे. पण इथे नळच नाही. खरं तर बाजूलाच दोन वाहते पाइप आहेत. “आम्ही शौचासाठी संडासाचा वापर करतो, लघवीसाठी आम्ही उघड्यावरच जातो. अगदीच अंधार असेल तर आम्ही घराच्या मागेच लघवीला जातो,” कुटी गावच्या पार्वती देवी सांगतात. त्यांचे यजमान इंडो-तिबेटन सीमा पोलिस दलातून निवृत्त झाले आहेत.
काही वेळा मात्र गावातल्या लोकांचाच बदलाला विरोध आहे. “आमचे बापजादे आणि आम्हीही पूर्वापारपासून असंच जगत आलोय. आता हे आम्ही अगदी अचानक कसं काय बदलणार आणि बाहेरची माणसं आम्हाला सांगतायत त्याप्रमाणे कसं रहायला लागणार?” कुटीच्या एक वयस्क शेतकरी सुखमती देवी विचारतात.
ऑक्टोबर २०१९ पर्यंत ‘स्वच्छ भारत’ हे आपलं उद्दिष्ट स्वच्छ भारत मिशन साध्य करणार असा अभियानाचा दावा आहे. पण पाण्याचीच सोय नसताना मोठ्या संख्येने संडास बांधले जातायत, या असल्या वाईट शौचालयांमध्ये जायला लोक राजी नाहीत असं असताना या भव्यदिव्य अभियानालाच कसला तरी वास येतोय असं म्हणावं लागेल.
अनुवादः मेधा काळे