हा लेख पारी निर्मित वातावरण बदलाच्या मागावरः रोजच्या जगण्यातल्या विलक्षण कहा ण्यांपैकी असून या लेखमालेस २०१९ सालासाठीच्या पर्यावरणविषयक लेखन विभागाअंतर्गत रामनाथ गोएंका पुरस्कार मिळाला आहे.

“तुमच्या गावात पाऊस आहे का?” उत्तर गुजरातच्या बानसकांठाहून काराभाई आल फोनवर विचारत होते. “इथे तर पत्ताच नाही.” जुलैच्या शेवटच्या आठवड्यातलं हे संभाषण. “पाऊस झाला तर आम्ही घरी परतणार,” थोडी फार आशा बाळगत त्यांनी सांगितलं.

९०० किलोमीटरवरच्या पुणे शहरातल्या शेतीशी संबंध नसलेल्या एका व्यक्तीबरोबर हे बोलणं चालू आहे यात त्यांना काहीही वावगं वाटत नव्हतं, इतका घोर त्यांच्या मनाला लागून राहिला होता. दर वर्षी काराभाई आणि त्यांच्या कुटुंबाला जगण्यासाठी जी काही कसरत करावी लागते त्यात मोठा हात असतो मोसमी पावसाचा. तोच लहरी होत चालल्यामुळे काराभाईंच्या डोक्यात सध्या फक्त पाऊसच होता.

आपला मुलगा, सून, दोन नातवंडं, भाऊ आणि त्याचं कुटुंब या सगळ्यांसोबत ७५ वर्षांचे पशुपालक काराभाई आपल्या दर वर्षीच्या भटकंतीला बाहेर पडले त्याला आता बारा महिने झालेत. चौदा जणांचा हा तांडा त्यांची ३०० मेंढरं, तीन उंटं आणि राखणीला असणारा कुत्रा – विचियो या सगळ्यांसोबत चारणीला निघाला. या १२ महिन्यांमध्ये त्यांनी – त्यांच्या जनावरांसोबत – कच्छ, सुरेंद्रनगर, पाटण आणि बानसकांठा जिल्ह्यातलं ८०० किमी अंतर पार केलंय.

दर वर्षी काराभाई आल यांचं कुटुंब गुजरातच्या तीन जिल्ह्यांमधून ८०० किमी अंतर पायी तुडवतं, तो मार्ग स्रोतः गूगल मॅप्स

काराभाईंच्या पत्नी दोसीबाई आणि त्यांची लहानगी शाळकरी नातवंडं मागे घरी राहिलीयेत. गुजरातच्या कच्छ जिल्ह्याच्या रापर तालुक्याच्या जाटावाडा गावी. हे कुटुंब रबारी समाजाचं आहे (इतर मागास वर्गीय अशी जिल्ह्यात नोंद) आणि दर वर्षी ८-१० महिने आपल्या मेंढरांना चारणीवर नेण्यासाठी ते गाव सोडून बाहेर पडतात. सामान्यपणे हे मेंढपाळ दिवाळी झाली (ऑक्टोबर-नोव्हेंबर) की लगेच बाहेर पडतात पुढच्या वर्षी पावसाची चाहूल लागली की परततात.

याचा अर्थ हा की पावसाळा सोडला तर वर्षातला बाकी सर्व काळ ते भटकंती करत असतात. आणि परत आल्यानंतरही घरची काही मंडळी घराबाहेरच असतात, जाटावाडाच्या वेशीपाशी मेंढ्या चारत. मेंढरं गावाच्या आत राहत नाहीत, त्यांना मोकळ्यावर गायरानात रहायला आवडतं.

“आम्हाला वाटलं गावच्या पटेलने आम्हाला इथून हाकलून लावण्यासाठी तुम्हाला पाठवलंय.” सुरेंद्रनगरच्या गावना गावातल्या एका शोष पडलेल्या रानात आम्ही त्यांचा माग काढत पोचलो तेव्हा काराभाईंनी आमचं स्वागत केलं ते असं. हे गाव होतं अहमदाबादपासून १५० किलोमीटरवर.

त्यांच्या शंकेला जागा होतीच. जेव्हा संकट असतं, जसं की तीव्र दुष्काळात, तेव्हा जमीनदार पशुपालकांना आणि त्यांच्या कळपांना आपल्या जमिनीतून हाकलून लावतात. आपल्या स्वतःच्या जनावरांसाठी जे काही गवत आणि धसकटं राहिली असतील ती त्यांना हवी असतात.

“यंदाचा दुष्काळ फार बेकार आहे,” काराभाईंनी आम्हाला सांगितलं होतं. “त्यामुळे आम्ही गेल्या वर्षी आखाडातच [जून-जुलै] गाव सोडलं, करणार काय, पाऊसच नव्हता.” त्यांच्या कोरड्या हवामानाच्या जिल्ह्यात दुष्काळ हटलेला नसल्याने त्यांची वार्षिक भटकंती गेल्या वर्षी लवकरच सुरू झाली.

“आम्ही पाऊस येईतोवर मेंढरं घेऊन हिंडत राहतो. पाऊसच आला नाही तर आम्ही घरी परततच नाही! मालधाऱ्याचं जीवन असलंच असतं,” त्यांनी आम्हाला सांगितलं. मालधारी हा शब्द गुजरातीतील माल (पशुधन) आणि धारी (पालक) असा तयार झाला आहे.

“२०१८-१९ साली गुजरातच्या कोरड्या आणि निम-कोरड्या प्रदेशांमध्ये इतका भयंकर दुष्काळ होता की काही पशुपालक जे खरं तर किमान २५ वर्षांपासून गावात स्थिरावले होते, तेही गायरान, चारा आणि उपजीविकेच्या शोधात भटकंती करायला लागले आहेत,” नीता पांड्या सांगतात. १९९४ पासून पशुपालकांसोबत काम करणाऱ्या अहमदाबादच्या मालधारी रुरल ॲक्शन ग्रुप (मारग) या सामाजिक संस्थेच्या त्या संस्थापक आहेत.

PHOTO • Namita Waikar
PHOTO • Namita Waikar

कधी काळी जिऱ्याचं रान असणाऱ्या या पडक शेतात आल कुटुंबाची ३०० मेंढरं चरतायत, काराभाई (उजवीकडे) जाटावाड्यातल्या आपल्या मित्राकडे गावाकडची खुशाली विचारतायत

हे मालधारी कुटुंब राहतं त्या कच्छ जिल्ह्यात २०१८ साली पाऊसमान १३१ मिमी इतकं खालावलंय. कच्छमध्ये वर्षाकाठी ‘सामान्य’पणे ३५६ मिमी पाऊस होतो. गेल्या १० वर्षात इथे मोसमी पाऊस जास्तीत जास्त लहरी होत चालल्याचं दिसतं. भारतीय वेधशाळेच्या आकडेवारीनुसार, जिल्ह्यात २०१४ साली २९१ मिमी, २०१६ साली २९४ मिमी इतका कमी पाऊस झाला पण २०१७ साली मात्र ४९३ मिमी इतकी पावसाची नोंद आहे.१९७४-७८ दरम्यानही अशाच प्रकारची पाच वर्षं दिसतात – एक वर्ष अवर्षणाचं अरिष्ट (१९७४ साली ८८ मिमी) आणि त्यानंतरची चार वर्षं सामान्य प्रमाणापेक्षा जास्त पाऊस.

साउथ एशिया नेटवर्क ऑन डॅम्स, रिव्हर्स अँड पीपलचे हिमांशु ठक्कर यांनी २०१८ साली लिहिलेल्या गुजरात्स वॉटर क्रायसिस रूटेड इन इयर्स ऑफ मिस्प्लेस्ड प्रायॉरिटीज या अहवालात असं म्हटलं आहे की गेल्या तीन दशकांहून अधिक काळात सत्तेत असलेल्या सरकारांनी कच्छ, सौराष्ट्र आणि उत्तर गुजरात या दुष्काळी जिल्ह्यांसाठी जीवनदायिनी म्हणून फक्त नर्मदा धरणाचा पुरस्कार केला आहे. प्रत्यक्षात मात्र हे प्रदेश प्राधान्यक्रमात सर्वात शेवटी असल्याचं दिसतं. शहरं, उद्योग आणि मध्य गुजरातेतल्या शेतकऱ्यांच्या गरजा भागल्यानंतर उरतं ते पाणीच त्यांच्या वाट्याला येतंय.

स्रोतः भारतीय वेधशाळेची कस्टमाइज्ड रेनफॉल इन्फर्मेशन सिस्टिम व  डाउन टू अर्थ – एन्व्ही स्टॅट्स इंडिया - २०१८

“नर्मदेचं पाणी या भागातल्या पशुपालक आणि शेतकऱ्यांसाठी वापरलं पाहिजे,” ठक्कर दूरध्वनीवर आम्हाला सांगतात. “पूर्वी हाती घेण्यात आलेल्या विहीर पुनर्भरण आणि बंधारे बांधण्याच्या योजना परत सुरू केल्या पाहिजेत.”

मालधारी आपल्या कळपांच्या चारणीसाठी गायरानं आणि गावातल्या माळरानांवर अवलंबून असतात. बहुतेकांकडे जमीन नाही आणि ज्यांच्याकडे आहे ते बाजरीसारखी कोरडवाहू पिकं घेतात – त्यांच्यासाठी धान्य होतं आणि जनावराला चारा.

­“आम्ही दोनच दिवसांपूर्वी इथे पोचलोय आणि आता निघायच्या तयारीत आहोत. इथे [आमच्यासाठी] फारसं काहीच नाही,” जिऱ्याच्या पडक रानाकडे बोट दाखवत काराभाई म्हणतात. हवा कोरडी आणि प्रचंड उष्मा. १९६० साली जेव्हा काराभाई तरुणपणाच्या उंबरठ्यावर असतील तेव्हा सुरेंद्रनगर जिल्ह्यात ३२ अंशापेक्षा जास्त तापमान असणारे वर्षाकाठी २२५ दिवस असतील. आज त्यांची संख्या २७४ किंवा त्याहून अधिक झाली आहे. न्यू यॉर्क टाइम्सच्या वातावरण आणि जागतिक तापमान वाढीबद्दलच्या एका संवादी पोर्टलवरची आकडेवारी सांगते की ५९ वर्षांच्या काळात उष्ण दिवसांच्या संख्येत ४९ हून जास्त दिवसांची भर पडली आहे.

आम्ही या तांड्याला भेटलो त्या सुरेंद्रनगरमध्ये ६३ टक्क्यांहून अधिक कामगार शेतीत काम करतायत. संपूर्ण गुजरातसाठी हा आकडा ४९.६१ टक्के आहे. कापूस, जिरं, गहू, तृणधान्यं, डाळी, भुईमूग आणि एरंड ही इथली मुख्य पिकं आहेत. कापणी झाल्यावर उरणारी धसकटं म्हणजे मेंढ्यांसाठी उत्तम चारा.

२०१२ सालच्या पशुधन जनगणनेनुसार गुजरातच्या ३३ जिल्ह्यांमध्ये मिळून मेंढरांची संख्या १७ लाख इतकी असून एकट्या कच्छमध्येच त्याच्या एक तृतीयांशहून जास्त, ५,७०,००० इतकी मेंढरं आहेत. काराभाई राहतात त्या वागड प्रदेशात सुमारे २०० रबारी कुटुंबं राहतात. या समुदायासोबत काम करणाऱ्या मारग या संस्थेनुसार ही सगळी कुटुंबं मिळून एकूण ३०,००० मेंढरं घेऊन दर वर्षी ८०० किलोमीटर भटकंती करतात. आणि काहीही झालं तरी हे सगळेआपल्या घराच्या २०० किलोमीटर त्रिज्येमध्येच फिरत असतात.

पूर्वापारपणे मेंढरं रानात बसायची आणि लेंड्या आणि मूत्रापासून रानाला खत मिळायचं. त्या बदल्यात शेतकरी मेंढपाळांना बाजरी, साखर आणि चहा देऊ करायचे. वातावरणाबरोबरच शतकानुशतके एकमेकांशी असणाऱ्या नात्यातही आता प्रचंड बदल होत आहेत.

“तुमच्या गावात कापण्या झाल्यात का?” आमच्याबरोबर असणाऱ्या गोविंद भारवाड यांना काराभाई विचारतात. “आम्ही त्या रानांमध्ये मेंढ्या बसवू शकतो का?”

“तुमच्या गावात कापण्या झाल्यात का?” आमच्याबरोबर असणाऱ्या गोविंद भारवाड यांना काराभाई विचारतात. “आम्ही त्या रानांमध्ये मेंढ्या बसवू शकतो का?”

“कापण्या दोन दिवसांनी व्हायच्या आहेत,” पाटण जिल्ह्यातल्या सामी तालुक्यातल्या धानोरा गावातले एक कृषक-पशुपालक आणि मारग गटाचे एक सदस्य असणारे गोविंद सांगतात. “यंदा मालधारी आमची रानं पार करून जाऊ शकतील पण मुक्काम करू शकणार नाहीत. आमच्या पंचायतीने तसा निर्णय घेतलाय, कारण चारा आणि पाण्याची टंचाई तीव्र आहे.”

काराभाई आणि त्यांचं कुटुंब यांचा पुढचा मुक्काम इथेच होता – पाटण. फिरून जेव्हा ते परत घरी पोचतील तेव्हा त्यांनी तीन मुख्य प्रदेश पायाखाली घातले असतीलः कच्छ, सौराष्ट्र आणि उत्तर गुजरात.

हवामान, वातावरण बदलत असलं तरी एक गोष्ट मात्र बिलकुल बदललेली नाही ती म्हणजे त्यांचं अगत्य – त्यांच्या भटकंतीतल्या तात्पुरत्या मुक्कामातही. हिराबेन आल, काराभाईंच्या सुनेने घरच्यांसाठी बाजरीच्या रोटल्यांची चवड थापून ठेवलीये आणि सगळ्यांसाठी गरमागरम चहा तयार आहे. “तुम्ही किती शिकलायत? मी तर शाळा पाहिलीही नाहीये,” त्या सांगतात आणि भांडी घासू लागतात. दर वेळी उभं राहताना त्या त्यांची काळी ओढणी तोंडावर ओढून घेतात कारण घरची मोठी पुरुष मंडळी आजूबाजूला बसलीयेत. कामासाठी खाली बसलं की त्या परत ओढणी मागे सरकवून टाकतात.

या कुटुंबाकडची मेंढरं गुजरात आणि राजस्थानमधली देशी मारवाडी जातीची आहेत. वर्षभरात ते २५ ते ३० मेंढे विकतात, प्रत्येकी २००० ते ३००० रुपये येतात. मेंढीचं दूध हा उत्पन्नाचा आणखी एक स्रोत, पण त्यांच्या कळपाचं दुधाचं उत्पादन तुलनेने कमी आहे. काराभाई सांगतात की २५-३० मेंढ्या मिळून रोज ९-१० लिटर दूध देतात. एका लिटरला छोट्या स्थानिक डेअऱ्यांमध्ये ३० रुपये भाव मिळतो. मग हे लोक उरलेलं दूध विरजून त्याचं ताक करतात आणि जे लोणी निघेल त्याचं तूप कढवतात.

“घी पेट मा छे­!” काराभाई खुदकन हसतात. “इतक्या गरमीत चालायचं तर तळव्यांची आग होते, तूप खाल्ल्याने आराम पडतो.”

आणि लोकर विकतात त्याचं काय? “अगदी दोन वर्षांमागे एका मेंढरामागे २ रुपयाला लोकर विकली जायची. आता तर कुणालाच लोकर नकोय. आमच्यासाठी ही लोकर म्हणजे सोनं आहे, पण तेच फेकून द्यायची वेळ आलीये,” खेदाने काराभाई सांगतात. त्यांच्यासाठी आणि इतरही लाखो पशुपालक, भूमीहीन, छोट्या, सीमांत शेतकऱ्यांसाठी मेंढरं (आणि शेरडं) हीच त्यांची संपत्ती असते, त्यांच्या उपजीविकेचा कणा

http://dadf.gov.in/sites/default/filess/Annual%20Report.pdf

. आता त्याच संपत्तीला उतरती कळा आलीये.

PHOTO • Namita Waikar

प्रभुवाला आल, वय १३ पुढच्या प्रवासासाठी उंट तयार करतोय तर त्याचे वडील वालाभाई (उजवीकडे) मेंढरं गोळा करतायत. तेवढ्यात प्रभुवालाची आई हिराबेन (खाली डावीकडे) घटकाभर बसून चहा घेतायत तर काराभाई (सर्वात उजवीकडे) बाकी सगळी पुरुष मंडळी पुढच्या लांबच्या पल्ल्यासाठी तयार आहेत ना ते पाहतायत

२००७ ते २०१२ या पशुधन गणनांमधल्या पाच वर्षांच्या काळात भारतात मेंढरांची संख्या जवळ जवळ ६० लाखांनी कमी झालीये – ७.१६ कोटींवरून ६.५१ कोटी. तब्बल ९ टक्क्यांची घट. गुजरातेत देखील हा आकडा जवळ जवळ ३ लाखांनी कमी होऊन सध्याच्या १७ लाखांवर आलाय.

कच्छमध्ये देखील हीच परिस्थिती आहे मात्र या प्राण्यांची स्थिती जरा बरी आहे, कदाचित मालधारी त्यांना इतकं जपतात म्हणूनही असेल. इथे २००७ च्या तुलनेत मेंढरांची संख्या केवळ ४,२०० ने कमी झाली आहे.

२०१७ च्या पशुधन गणनेची आकडेवारी इतक्यात काही प्रसिद्ध होणार नाही, मात्र काराभाईंना ही उतरती कळा जाणवतीये आणि मेंढरांच्या घटत्या संख्येसाठी जबाबदार असणारी विविध कारणंही ते सांगतात. “मी जेव्हा माझ्या तिशीत होतो तेव्हा किती तरी जास्त गवत असायचं, मेंढरं चारायला कधीच अडचण यायची नाही. आता कसंय, जंगलं आणि झाडं तोडून टाकलीयेत आणि गायरानं आक्रसत चाललीयेत, लहान लहान होत चाललीयेत. उष्माही वाढलाय,” ते म्हणतात. हवामान लहरी होत चाललंय त्यातला माणसाचा हात काय, हे ते ठासून सांगतात.

“दुष्काळ पडला की आमचे जसे हाल होतात, तसे मेंढरांचेही होतात,” ते पुढे सांगतात. “गायरानं आक्रसत जातात तेव्हा त्यांनाही गवत आणि चाऱ्याच्या शोधात किती तरी जास्त चालावं लागतं. मेंढरांची संख्या कमी होतीये कारण कदाचित लोक काही तरी कमाई व्हावी म्हणून मेंढ्या विकतही असतील.”

गायरानं आक्रसणं आणि त्यांच्या कळपांसाठी कुरणं कमी होत चाललीयेत हे त्यांचं म्हणणं खरं आहे. गुजरातमधली ४.५ टक्के जमीन गायरान किंवा कुरणं आहेत, सेंटर फॉर डेव्हलपमेंट अल्टरनेटिव्ह्ज या अहमदाबादच्या संस्थेच्या प्रा. इंदिरा हिरवे सांगतात. मात्र अधिकृत आकडेवारीमध्ये या जमिनींवर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणं झाली आहेत त्याची नोंदच घेतली नाही याकडे त्या निर्देश करतात. त्यामुळे खरं चित्र समोरच येत नाही. मार्च २०१८ मध्ये राज्याच्या विधानसभेत सरकारने काही प्रश्नांच्या उत्तरात हे मान्य केलं होतं की ३३ जिल्ह्यात मिळून ४,७२५ हेक्टर गायरान जमिनीवर अतिक्रमण झालं आहे. पण हा आकडाही खूपच कमी असल्याचा दावा करत काही आमदारांनी तो खोडून काढला होता.

२०१८ साली सरकारने स्वतःच मान्य केलं की राज्यात अशी २,७५४ गावं होती जिथे आता गायरानंच उरलेली नाहीत.

तसंच गुजरात औद्योगिक विकास महामंडळाने उद्योगांना देऊ केलेल्या जमिनींमध्येही – ज्यातली काही शासनाने संपादित केली होती – वाढ झाली आहे. केवळ सेझ (स्पेशल इकोनॉमिक झोन – विशेष आर्थिक क्षेत्र) साठी १९९० ते २००१ या काळात उद्योगांना ४,६२० हेक्टर जमीन हस्तांतरित करण्यात आल्याचं दिसतं. २००१-२०११ या दहा वर्षांच्या शेवटी हाच आकडा २१,३०८ हेक्टरवर पोचला होता .

PHOTO • Namita Waikar
PHOTO • Namita Waikar

काराभाई जाटावाडाच्या मार्गावर आणि (उजवीकडे) त्यांची पत्नी डोसीबाई आल आणि शेजारी रत्नाभाई धागल यांच्यासोबत गावातल्या आल कुटुंबियांच्या घराबाहेर

तिथे सुरेंद्रनगरमध्ये मार्च महिन्यात दिवसाचं तापमान वाढायला लागलंय, काराभाई सगळ्या गड्यांना म्हणतात, “दुपार होत आलीये, चला, पाय उचला­!” गडीमाणसं पुढे निघाली आणि त्यांच्या मागून मेंढरं. त्यांचा नातू – १३ वर्षांचा प्रभुवाला हा काराभाईंच्या गटातला एकमेव आहे जो शाळेत गेलाय – सातवीपर्यंत. तो पटकन जाऊन बांधावरची झुडपं झाडतो आणि मागे राहिलेल्या काही मेंढरांना कळपाच्या दिशेने हाकतो.

तिघी बाया खाटा, स्टीलच्या दुधाच्या किटल्या आणि इतर सामान आवरून घेतायत. प्रभुवालाने लांबच्या झाडाला बांधलेल्या उंटाचा कासरा सोडलाय आणि आपली आई हिराबेन जिथे आहे तिथे त्याला आणलंय. हिराबेननी त्यांचा बाडबिस्तरा आणि स्वयंपाकाचं सगळं सामान आवरलंय. आता ते सगळं उंटाच्या पाठीवर लादायचंय.

पाच महिन्यांनी, ऑगस्ट महिन्याच्या मध्यावर आम्ही काराभाईंना परत भेटलो, रापर तालुक्याच्या वाटेवर. मग आम्ही त्यांच्या घरी जाटावाडाला गेलो. “१० वर्षांपूर्वीपर्यंत मीदेखील सगळ्यांबरोबर चारणीला जायचे,” काराभाईंच्या पत्नी, सत्तरीच्या डोसीबाई सगळ्यांसाठी चहा करता करता आम्हाला सांगतात. “मेंढरं आणि लेकरं हेच आमचं धन आहे. त्यांची नीट काळजी घ्यावी, इतकंच मला हवंय.”

त्यांचे शेजारी, भैय्याभाई मकवाना सतत पडणाऱ्या दुष्काळाबद्दल नाराजी व्यक्त करतात. “पाणी नसेल तर आम्ही परतूच शकत नाही. गेल्या सहा वर्षांत मी फक्त दोनदा घरी आलोय.”

रत्नाभाई धागल, इतर काही अडचणी सांगतात. “दोन वर्षांच्या दुष्काळानंतर मी घरी परतलो आणि पाहतो तर काय, सरकारने आमच्या गायरानाला कुंपण घातलंय. आम्ही दिवसभर भटकतो तरी आमच्या जितराबाला गवत मिळत नाही. आम्ही काय करावं? त्यांना चारायला न्यावं का डांबून ठेवावं? आम्हाला पशुपालन हे एकच काम येतं आणि तेच आमचं जगणं आहे.”

“दुष्काळामुळे इतके हाल होऊ लागलेत,” दिवसेंदिवस जास्तच लहरी होत असलेलं हवामान आणि वातावरण यामुळे कावलेले काराभाई म्हणतात. “जनावराला खायला नाही, पाणी नाही. अगदी पक्ष्यांना देखील नाही.”

ऑगस्ट महिन्यात झालेल्या पावसाने त्यांना जरा तरी दिलासा मिळाला. सगळ्या आल कुटुंबाची मिळून आठ एकर कोरडवाहू जमीन आहे ज्यात त्यांनी बाजरी पेरलीये.

पशुपालकांची भटकंती आणि जनावरांची चारणी यावर अनेक घटकांचा मिळून परिणाम झालाय. कमी किंवा अपुरा पाऊस, सततचा दुष्काळ, आक्रसत चाललेली गायरानं, राज्यातला औद्योगीकरण आणि शहरीकरणाचा झपाटा, जंगलतोड आणि चारा आणि पाण्याचं दुर्भिक्ष्य. मालधारींच्या स्वतःच्या जगण्यातून हेच दिसून येतंय की यातले अनेक घटक जसे हवामान आणि वातावरणातल्या बदलांमुळे होतायत तसेच ते या बदलांना कारणीभूत देखील ठरतायत. शेवटी काय आहे, या समुदायांच्या संचारावर गंभीर परिणाम झालाय, आणि शतकानुशतकं ते ज्या नेमाने जगत होते तेच सगळं बदलून गेलंय.

“आमच्या समस्यांबद्दल लिहा,” आम्ही त्यांचा निरोप घेताना काराभाई म्हणाले, “बघू काय बदल होतो का ते. नाहीच तर वरती तो आहेच.”

हा लेख लिहीत असताना गावपातळीवर केलेली मदत आणि सहाय्यासाठी मालधारी रुरल क्शन ग्रुप (मारग) च्या अहमदाबाद आणि भूज गटांचे मनापासून आभार.

साध्यासुध्या लोकांचं म्हणणं आणि स्वानुभवातून वातावरण बदलांचं वार्तांकन करण्याचा देशपातळीवरचा पारीचा हा उपक्रम संयुक्त राष्ट्रसंघ विकास प्रकल्पाच्या सहाय्याने सुरू असलेल्या उपक्रमाचा एक भाग आहे

हा लेख पुनःप्रकाशित करायचा आहे? कृपया zahra@ruralindiaonline.org शी संपर्क साधा आणि namita@ruralindiaonline.org ला सीसी करा

अनुवादः मेधा काळे

Reporter : Namita Waikar
namita.waikar@gmail.com

Namita Waikar is a writer, translator and Managing Editor at the People's Archive of Rural India. She is the author of the novel 'The Long March', published in 2018.

Other stories by Namita Waikar
Editor : P. Sainath
psainath@gmail.com

P. Sainath is Founder Editor, People's Archive of Rural India. He has been a rural reporter for decades and is the author of 'Everybody Loves a Good Drought'.

Other stories by P. Sainath
Translator : Medha Kale
mimedha@gmail.com

Medha Kale is based in Pune and has worked in the field of women and health. She is the Translations Editor, Marathi, at the People’s Archive of Rural India.

Other stories by Medha Kale