“त्यांच्या जास्त जवळ जाऊ नका. बिचकून पळून जातील. मग या एवढ्या मोठ्या प्रदेशात त्यांना शोधायचं म्हणजे मला कठीण होऊन जाईल. हाकणं तर सोडाच,” जेठाभाई रबारी म्हणतात.

भटके पशुपालक असलेले रबारी ज्यांच्याबद्दल बोलतायत ना ते आहेत त्यांचे खास उंट. आणि खाण्याच्या शोधात ते पोहत चाललेत.

उंट? पोहतायत? काय सांगताय काय?

तंतोतंत खरं आहे हे. जेठाभाई ज्या विस्तीर्ण प्रदेशाबद्दल बोलतायत ते आहे कच्छच्या आखाताच्या दक्षिणेकडच्या सागरकिनाऱ्याला लागून असलेलं समुद्री राष्ट्रीय उद्यान व अभयारण्य (Marine National Park and Sanctuary (MNP&S)). आणि इथे या भटक्या पशुपालकांचे उंटांचे कळप त्यांच्या आहाराचा अगदी मोलाचा हिस्सा असलेल्या कांदळवनाच्या शोधात समुद्रात या बेटावरून त्या बेटावर पोहत जातायत.

“या उंटांना जर फार काळ खारफुटीचा पाला खायला मिळाला नाही तर ते आजारी पडतात, अशक्त होतात आणि त्यातच मरूही शकतात,” कारू मेरू जाट सांगतात. “म्हणूनच, त्या सागरी अभयारण्यात आमचे उंट खारफुटीच्या शोधात पोहत भटकंती करत असतात.”

Jethabhai Rabari looking for his herd of camels at the Marine National Park area in Khambaliya taluka of Devbhumi Dwarka district
PHOTO • Ritayan Mukherjee

देवभूमी द्वारका जिल्ह्याच्या खंबालिया तालुक्यात असलेल्या सागरी राष्ट्रीय उद्यानात जेठाभाई रबारी आपला उंटांचा कळप कुठे दिसतोय का ते पाहतायत

एकूण ४२ बेटांचा हा प्रदेश आहे. यातली ३७ बेटं राष्ट्रीय उद्यानाच्या क्षेत्रात तर ५ बेटं अभयारण्यामध्ये येतात. गुजरातच्या सौराष्ट्रामध्ये येणारा हा प्रदेश जामनगर, देवभूमी द्वारका (२०१३ साली जामनगरमधून वेगळा काढण्यात आला) आणि मोरबी या जिल्ह्यांमध्ये पसरला आहे.

“आमच्या कित्येक पिढ्या इथे राहिल्या आहेत,” मुसा जाट म्हणतात. कारू मेरूंसारखे तेही फकिरानी जाट असून सागरी राष्ट्रीय उद्यानात राहतात. या भागात आणखी एक समुदाय राहतो – भोपा रबारी. जेठाभाई याच समुदायाचे आहेत. या दोन्ही समुदायांचा पिढीजात धंदा म्हणजे पशुपालन. त्यांना इथे ‘मालधारी’ म्हणतात. ‘माल’ म्हणजे पशुधन आणि ‘धारी’ म्हणजे त्यांचा मालक-रक्षक. संपूर्ण गुजरातेत मालधारी समुदाय गाय-म्हैस, उंट, घोडे आणि शेरडं-मेंढरं पाळतो.

या सागरी अभयारण्याच्या परिघावर असलेल्या गावांमध्ये मी या लोकांशी बोलत होतो. इथे सुमारे १,२०० लोकांची वस्ती आहे.

“आम्हाला आमच्या या भूमीचं मोठं मोल आहे,” मुसा जाट सांगतात. “किती तरी वर्षांपूर्वी जामनगरच्या राजाने आम्हाला इथे येऊन वसण्याचं निमंत्रण दिलं होतं. १९८२ मध्ये हा प्रदेश सागरी अभयारण्य म्हणून जाहीर झाला, त्याच्या कित्येक वर्षं आधी.”

Jethabhai Rabari driving his herd out to graze in the creeks of the Gulf of Kachchh
PHOTO • Ritayan Mukherjee

कच्छच्या आखातातल्या खाड्यांमध्ये जेठाभाई रबारी आपला उंटांच्या कळप चारणीला नेतायत

भुजमधल्या सेंटर फॉर पॅस्टोरलिझम या केंद्राचं पाहणाऱ्या सहजीवन संस्थेच्या ऋतुजा मित्रा देखील या दाव्याला पुष्टी देतात. “असं म्हणतात की या प्रदेशातला राजपुत्र या दोन्ही समुदायांना आपल्या नवानगर या राज्यात घेऊन आला. कालांतराने हे राज्य जामनगर म्हणून ओळखलं जाऊ लागलं. आणि तेव्हापासून या पशुपालकांच्या पुढच्या अनेक पिढ्या इथे राहत आहेत.”

“या भागातल्या काही गावांची नावं पाहिली तर लक्षात येतं की हे फार पूर्वीपासून इथे आहेत,” ऋतुजा सांगतात. त्या सहजीवनमध्ये वन हक्क कायद्यासंबंधी राज्य समन्वयक म्हणून काम करतात. “एक गाव आहे, उंटबेट शांपार – ज्याचा अर्थ होतो ‘उंटांचं बेट’.”

आणि ज्या अर्थी हे उंट पोहायला शिकलेत त्या अर्थी ते खूप पूर्वीपासून इथे राहिले असणार. ससेक्सच्या इन्स्टिट्यूट ऑफ डेव्हलपमेंट स्टडीजच्या लैला मेहता विचारतात, “जर पूर्वापारपासून उंट आणि कांदळवनांचा एकमेकांशी संबंध नसता, तर उंट पोहायला तरी कशाला शिकले असते?”

ऋतुजा सांगतात की या सागरी अभयारण्यात अंदाजे १,१८४ उंट चरत असावेत. आणि ७४ मालधारी कुटुंबं यांचं पालन करतात.

इ.स. १५४० मध्ये नवानगर संस्थानाची राजधानी म्हणून जामनगर वसवण्यात आलं. सतराव्या शतकात कधी तरी मालधारी इथे आले आणि तेव्हापासून हेच त्यांचं घर आहे.

The Kharai camels swim to the mangroves as the water rises with high tide
PHOTO • Ritayan Mukherjee

भरती आली की खराई उंट कांदळवनाच्या दिशेने पोहू लागतात

या “भूमीचं मोल आहे” ते का हे स्पष्टच दिसून येतं. तुम्ही भटके पशुपालक असाल आणि तुम्हाला इथली सगळी सागरी संपदा माहीत असेल तर नक्कीच. या सागरी उद्यानात प्रवाळाची बेटं आहेत, खारफुटीचं जंगल, पुळणी, मऊ गाळपेर जमीन, खाड्या, खडकाळ सागर किनारे, समुद्री गवत आणि किती तरी गोष्टी आहेत.

हा प्रदेश एकमेव आहे आणि ते का हे २०१६ साली इंडो-जर्मन बायोडायव्हर्सिटी प्रोग्राम (GIZ) ने प्रकाशित केलेल्या एका शोधनिबंधात नमूद केलं आहे. या प्रदेशात किमान १०० प्रकारचं शेवाळ, ७० प्रकारचे समुद्री स्पंज आणि ७० प्रकारचे मृदू आणि कठीण प्रवाळ सापडतात. २०० प्रकारचे मासे, २७ प्रकारची कोळंबी, ३० प्रकारचे खेकडे आणि चार प्रकारचं समुद्री गवत इथे आहे.

इतकंच नाही. या शोधनिबंधानुसार इथे समुद्री कासवं आणि सस्तन प्राण्यांच्या प्रत्येकी तीन प्रजाती आहेत, २०० प्रकारची कालवं, ९० प्रकारचे शिंपले, ५५ प्रकारच्या गोगलगायी आणि ७८ प्रकारचे पक्षी देखील आहेत.

याच प्रदेशात फकिरानी जाट आणि रबारींनी कित्येक पिढ्यांपासून उंट पाळले आहेत. खराई या गुजराती शब्दाचा अर्थ होतो खारा, खारट. खराई उंटांनी स्वतःला या प्रदेशाशी अगदी उत्तम जुळवून घेतलं आहे. एरवी असा पाणथळ प्रदेश आणि उंट हे चित्र काही पटकन डोळ्यासमोर येत नाही. इथल्या अनेक वनस्पती, झुडपं आणि कारू मेरू जाट सांगतात त्याप्रमाणे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खारफुटी हेच त्यांचं खाणं आहे.

या उंटांचे मालक, मालधारी समुदायाचा भाग असणारा समुदाय त्यांच्याबरोबर असतो. या उंटांशिवाय इतर कोणत्याच उंटांना पोहता येत नाही. दोन मालधारी उंटांसोबत पोहत असतात. त्यातला एक जण छोट्याशा नावेतून अन्नधान्य, पिण्याचं पाणी वगैरे आणतो. गावी परत जायला देखील हीच नाव कामी येते. दुसरा उंटपाळ बेटावर आपल्या प्राण्यांसोबत राहतो. थोडं फार खाणं आणि त्यासोबत उंटिणीचं दूध हा त्याचा आहार. या समुदायाच्या आहारात या दुधाला मोठं मोल आहे.

Jethabhai Rabari (left) and Dudabhai Rabari making tea after grazing their camels in Khambaliya
PHOTO • Ritayan Mukherjee

जेठाभाई रबारी (डावीकडे) आणि दुदाभाई रबारी खंबालियामध्ये उंटांना चारून आणल्यानंतर चहा बनवतायत

पण मालधारींसाठी सगळ्याच गोष्टी फार झपाट्याने बदलत चालल्या आहेत. आणि त्याही विपरित दिशेने. “आमचं आणि आमच्या व्यवसायाचं आता कठीण झालंय,” जेठाभाई रबारी म्हणतात. “इथली जास्तीत जास्त जमीन वनविभागाच्या अखत्यारीत चाललीये. त्यामुळे उंटांना चरण्यासाठी आता जागा कमी पडत चाललीये. पूर्वी आम्ही खारफुटीत मुक्त वावर करू शकत होतो. पण १९९५ पासून त्यावर बंदी आलीये. त्यात ती मिठागरं आहेत. त्याची तर आम्हाला डोकेदुखीच होतीये. स्थलांतर करावं तर तेही आता शक्य नाहीये. वरकडी म्हणजे आता आमच्यावर अतिरिक्त चराईचा आरोप केला जातोय. ते शक्य तरी आहे का?”

या प्रदेशात वन हक्क कायद्यासंबंधी बरीच वर्षं कार्यरत असलेल्या ऋतुजा मित्रा पशुपालकांच्या म्हणण्याला दुजोरा देतात. “जर उंट कसे चरतात ते पाहिलं तर आपल्या लक्षात येतं की ते झाडाचे शेंडें खुडून खातात. खरं तर झाडाची वाढ व्हायलाच त्याने मदत होते. सागरी राष्ट्रीय उद्यानाचा प्रदेश हा कायमच खराई उंटांचा अधिवास होता. ते खारफुटी आणि सोबत वाढणाऱ्या वनस्पतींवर जगतात.”

वन खात्याचं म्हणणं मात्र याच्या उलट आहे. वन खात्याने लिहिलेले किंवा काही अभ्यासकांनी लिहिलेल्या शोधनिबंधांचा असा दावा आहे की उंटांच्या इथल्या वावरामुळे अतिरिक्त चराई होत आहे.

खारफुटींचं जंगल आकसत चाललंय, त्याची विविध कारणं असल्याचं २०१६ साली प्रसिद्ध झालेल्या शोधनिबंधात म्हटलं आहे. औद्योगीकरण आणि इतर घटक याला कारणीभूत असल्याचं त्यात स्पष्ट केलं आहे. याला मालधारी आणि त्यांचे उंट जबाबदार असल्याचा एका अक्षराचाही उल्लेख यामध्ये नाही.

हे बाकी सगळे घटक कोणते त्याकडे लक्ष द्यायला पाहिजे.

खराई उंटांशिवाय इतर कोणत्याच उंटांना पोहता येत नाही. उंट पोहत बेटांवर जातात तेव्हा मालधारी समुदायातले त्यांचे मालक त्यांच्यासोबत असतात

व्हिडिओ पहाः गुजरातेतले पोहणारे उंट – खाण्याच्या शोधात

१९८० पासून जामनगर आणि आसपासच्या परिसरात उद्योगांचा झपाट्याने विकास झाला आहे. “मीठ उद्योग किंवा तेलाच्या जेट्टी आहेत त्याचा परिणाम बघा किंवा इतरही प्रकारचं औद्योकीकरण सुरूच आहे,” ऋतुजा सांगतात. “त्यांच्या कामासाठी त्यांना जमीन मिळण्यात फारशा अडचणी येतच नाहीत – ईझ ऑफ बिझनेस! पण पशुपालकांना आपल्या पोटापाण्याच्या धंद्यासाठी जमीन हवी असते तेव्हा मात्र हे खातं एकदम कर्मठपणे वागतं. आणि खरं तर संविधानाच्या कलम १९ (ज) च्या हे पूर्ण विरोधात आहे. हे कलम प्रत्येक नागरिकाला व्यवसाय स्वातंत्र्य देतं म्हणजेच कोणताही व्यवसाय, धंदा किंवा उद्योग करण्याचा अधिकार देतं.”

सागरी उद्यानाच्या आतल्या भागात चराईवर बंदी असल्यामुळे उंटपाळांना वन खात्याकडून त्रास देण्याच्या घटना वारंवार घडतात. अशा त्रासाचा अनुभव घेतलेले मालधारी म्हणजे आदम जाट. ते सांगतात, “दोनेक वर्षांपूर्वी मला उंटांना इथे चारलं म्हणून वनखात्याने ताब्यात घेतलं आणि माझ्याकडून २०,००० रुपये दंड घेतला.” इतर पशुपालकही असेच इतर अनुभव सांगतात.

“२००६ च्या केंद्र सरकारच्या कायद्याची फारशी काही मदत होत नाहीये,” ऋतुजा मित्रा सांगतात. वन हक्क कायदा, कलम ३ (१) (घ) नुसार गुरे चराई आणि भटक्या, पशुपालक जमातींना हंगामी जंगल वापराचा हक्क देण्यात आला आहे.

“असं असलं तरीही मालधारींना फॉरेस्ट गार्ड वारंवार उंटांच्या चराईवरून शिक्षा करतात आणि पकडल्यावर त्यांना अनेकदा २०,००० ते ६०,००० रुपये इतका दंड भरावा लागतो,” त्या सांगतात. वन हक्क कायद्याअंतर्गत अशा समुदायांच्या हक्कांच्या रक्षणासाठी अनेक उपाय सांगितले आहेत मात्र ते सगळे केवळ कागदावरच राहतात.

पिढ्या न् पिढ्या इथे राहणाऱ्या, इतर कुणाही पेक्षा इथल्या परिसराची खडा न् खडा माहिती असणाऱ्या पशुपालकांना सामील न करता केवळ खारफुटीचं जंगल वाचवण्याचे, वाढवण्याचे सगळे प्रयत्न निष्फळ ठरणार आहेत. “हा प्रदेश काय आहे, इथल्या निसर्गाचं तंत्र आम्हाला समजतं. आणि खारफुटीचं संवर्धन करण्याचं सरकारचं धोरण आहे ना, त्याच्या आम्ही बिलकुल विरोधात नाही,” जगाभाई रबारी सांगतात. “आमचं इतकंच म्हणणं आहेः कुठलंही धोरण तयार करण्याआधी एकदा आमचं म्हणणं तर ऐकून घ्या. अन्यथा या प्रदेशात राहणारी १,२०० माणसं तर देशोधडीला लागतीलच पण या उंटांचा जीवही धोक्यात येईल.”

The thick mangrove cover of the Marine National Park and Sanctuary located in northwest Saurashtra region of Gujarat
PHOTO • Ritayan Mukherjee

गुजरातच्या सौराष्ट्रच्या वायव्येकडे असलेल्या सागरी राष्ट्रीय उद्यान आणि अभयारण्यामधलं खारफुटीचं दाट जंगल

Bhikabhai Rabari accompanies his grazing camels by swimming alongside them
PHOTO • Ritayan Mukherjee

पोहणाऱ्या उंटांसोबत पोहत जाणारे भिकाबाई रबारी

Aadam Jat holding his homemade polystyrene float, which helps him when swims with his animals
PHOTO • Ritayan Mukherjee

उंटांबरोबर पोहताना उपयोगी ठरणारे घरच्या घरी बनवलेले थर्मोकोलचे फ्लोट घेतलेले आदम जाट

Magnificent Kharai camels about to get into the water to swim to the bets (mangrove islands)
PHOTO • Ritayan Mukherjee

(खारफुटीच्या) बेटांवर पोहत जायच्या तयारीत असलेले देखणे खराई उंट

Kharai camels can swim a distance of 3 to 5 kilometres in a day
PHOTO • Ritayan Mukherjee

उंटांमधली खराई उंट ही पोहणारी एकमेव प्रजात आहे. ते एका दिवसात पोहत पोहत ३ ते ५ किलोमीटर अंतर कापू शकतात

The swimming camels float through the creeks in the Marine National Park in search of food
PHOTO • Ritayan Mukherjee

खाण्याच्या शोधात सागरी राष्ट्रीय उद्यानाच्या खाड्यांमधून पोहत, तरंगत चाललेले उंट

Hari, Jethabhai Rabari's son, swimming near his camels. ‘I love to swim with the camels. It’s so much fun!’
PHOTO • Ritayan Mukherjee

जेठाभाई रबारींचा मुलगा हरी उंटांजवळून पोहत चाललाय. ‘मला उंटांबरोबर पोहायला फार आवडतं. असली धमाल येते!’

The camels’ movement in the area and their feeding on plants help the mangroves regenerate
PHOTO • Ritayan Mukherjee

या भागातला उंटांचा वावर आणि चरण्यामुळे खारफुटीची वाढ व्हायला मदत होते

A full-grown Kharai camel looking for mangrove plants
PHOTO • Ritayan Mukherjee

पूर्ण वाढ झालेला खराई उंट खारफुटीच्या शोधात

Aadam Jat (left) and a fellow herder getting on the boat to return to their village after the camels have left the shore with another herder
PHOTO • Ritayan Mukherjee

आदम जाट (डावीकडे) आणि सोबतचा एक पशुपालक नावेत बसून गावी येण्याच्या तयारीत. दुसऱ्या एका पशुपालकासोबत उंट किनाऱ्यावरून पोहत निघालेत

Aadam Jat, from the Fakirani Jat community, owns 70 Kharai camels and lives on the periphery of the Marine National Park in Jamnagar district
PHOTO • Ritayan Mukherjee

फकिरानी जाट समुदायाचे आदम जाट यांच्या मालकीचे ७० खराई उंट आहेत. ते जामनगर जिल्ह्यातल्या सागरी राष्ट्रीय उद्यानाच्या परीघावर राहतात

Aadam Jat in front of his house in Balambha village of Jodiya taluka. ‘We have been here for generations. Why must we face harassment for camel grazing?’
PHOTO • Ritayan Mukherjee

आदम जाट जोडिया तालुक्यातल्या बालंभा गावी आपल्या घरासमोर. ‘आम्ही कित्येक पिढ्यांपासून इथे आहोत. उंटांना चारलं म्हणून आम्हाला का त्रास देतायत?’

Jethabhai's family used to own 300 Kharai camels once. ‘Many died; I am left with only 40 now. This occupation is not sustainable anymore’
PHOTO • Ritayan Mukherjee

जेठाभाईंच्या कुटुंबात कधी काळी ३०० खराई उंट होते. ‘किती तरी मरून गेले. आता माझ्याकडे ४० उरलेत. आता हा धंदा करणं फारसं सोपं राहिलं नाही’

Dudabhai Rabari (left) and Jethabhai Rabari in conversation. ‘We both are in trouble because of the rules imposed by the Marine National Park. But we are trying to survive through it,’ says Duda Rabari
PHOTO • Ritayan Mukherjee

दुदाभाई रबारी (डावीकडे) आणि जेठाभाई रबारी गप्पा मारतायत. ‘राष्ट्रीय उद्यानाच्या नियमांमुळे आम्ही दोघंही अडचणीत आलोय. पण त्यातही कसं तरी करून आम्ही मार्ग काढतोय,’ दुदा रबारी म्हणतात

As the low tide settles in the Gulf of Kachchh, Jethabhai gets ready to head back home
PHOTO • Ritayan Mukherjee

कच्छच्या आखातात ओहोटी लागते आणि जेठाभाई घरी परतण्याची तयार सुरू करतात

Jagabhai Rabari and his wife Jiviben Khambhala own 60 camels in Beh village of Khambaliya taluka, Devbhumi Dwarka district. ‘My livelihood depends on them. If they are happy and healthy, so am I,’ Jagabhai says
PHOTO • Ritayan Mukherjee

जगाभाई रबारी आणि त्यांची पत्नी जीवीबेन खंबाला यांचे देवभूमी द्वारका जिल्ह्याच्या खंबालिया तालुक्यातल्या बेह या आपल्या गावी ६० उंट आहेत. ‘माझा प्रपंच त्यांच्यावर अवलंबून आहे. ते खूश, तर मी खूश,’ जगाभाई म्हणतात

A maldhari child holds up a smartphone to take photos; the back is decorated with his doodles
PHOTO • Ritayan Mukherjee

फोटो काढण्यासाठी आपला स्मार्टफोन घेऊन उभा असलेला एक मालधारी मुलगा. फोनच्या मागच्या बाजूवर त्याने काढलेली नक्षी आणि चित्रं

A temple in Beh village. The deity is worshipped by Bhopa Rabaris, who believe she looks after the camels and their herders
PHOTO • Ritayan Mukherjee

बेह गावातलं एक मंदीर. इथली देवता उंटांची आणि उंटपाळांची काळजी घेते असा भोपा रबारींचा विश्वास असून ते तिची उपासना करतात

There are about 1,180 camels that graze within the Marine National Park and Sanctuary
PHOTO • Ritayan Mukherjee

सागरी राष्ट्रीय उद्यान आणि अभयारण्याच्या क्षेत्रात सुमारे १,१८० उंट चराईला जातात

सहजीवन संस्थेच्या उंटांवरील प्रकल्पाचे पूर्वीचे समन्वयक आणि या विषयाचे तज्ज्ञ महेंद्र भानानी यांनी या वार्तांकनासाठी मोलाची मदत केली. त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार.

रितायन मुखर्जी देशभरातील भटक्या पशुपालक समुदायांसंबंधी वार्तांकन करतात. सेंटर फॉर पॅस्टोरिलझमतर्फे त्यांना प्रवासासाठी स्वतंत्र निधी मिळाला आहे. या वार्तांकनातील मजकुरावर सेंटर फॉर पॅस्टरोलिझमचे कोणतेही संपादकीय नियंत्रण नाही.

अनुवादः मेधा काळे

Photos and Text : Ritayan Mukherjee

Ritayan Mukherjee is a Kolkata-based photographer and a PARI Senior Fellow. He is working on a long-term project that documents the lives of pastoral and nomadic communities in India.

Other stories by Ritayan Mukherjee
Video : Urja
urja@ruralindiaonline.org

Urja is a Video Editor and a documentary filmmaker at the People’s Archive of Rural India

Other stories by Urja
Editor : P. Sainath
psainath@gmail.com

P. Sainath is Founder Editor, People's Archive of Rural India. He has been a rural reporter for decades and is the author of 'Everybody Loves a Good Drought'.

Other stories by P. Sainath
Photo Editor : Binaifer Bharucha

Binaifer Bharucha is a freelance photographer based in Mumbai, and Photo Editor at the People's Archive of Rural India.

Other stories by Binaifer Bharucha