एकटेपणा जिगर देद यांना नवा नाही. श्रीनगरच्या दल सरोवरातल्या एका घाटावर त्या आपल्या हाउसबोटशेजारच्या लाकडी झोपडीत एकट्याच राहतात. त्यांचा नवरा वारला आणि मग त्यांचा मुलगा. त्याला आता तीस वर्षं होऊन गेली. या काळात सगळ्या हाल अपेष्टा त्यांनी एकटीनेच सहन केल्या आहेत.
तरीही, त्या म्हणतात, “गेली तीस वर्षं मी एकटीच जगतीये, पण गेल्या एका वर्षात जितके हाल सोसले तितके त्या आधी कधीच नाहीत. सगळं काही ठप्प केलं होतं, त्यानंतर जरा पर्यटक यायला लागले आणि मग हा करोना आला आणि टाळेबंदी लागली. आम्हाला सगळ्यांना जणू कैदेत टाकलंय.”
५ ऑगस्ट २०१९ रोजी सरकारने अनुच्छेद ३७० रद्द केलं आणि त्यानंतर जी बंदी घातली गेली त्यामुळे लोकांचं अतोनात नुकसान झालंय. “तेव्हापासून एकही गिऱ्हाईक आलेलं नाही,” जिगर सांगतात. तेव्हा अधिकृत सूचना करण्यात आली होती, की स्थानिकेतर सगळ्यांनी परत जावं, अर्थातच पर्यटकही माघारी गेले. “आम्ही अक्षरश- कोलमडून गेलो,” त्या म्हणतात. “आमच्या धंद्याला जबर फटका बसला. आधीच माझं आयुष्य विस्कटून गेलं होतं, ते पुरतं मोडकळीला आलं.”
सगळं कसं विस्कटत गेलं, त्या एकाकीपणाच्या गर्तेत कशा ढकलल्या गेल्या ते सगळं त्यांना नीट आठवतंयः “माझ्या बहिणीचा साखरपुडा होता. आम्ही सगळे एकत्र जमलो होतो, सगळे खुशीत गात-नाचत होते,” ऐंशी वर्षं पार केलेल्या (त्यांच्या मते) जिगर सांगतात. “माझा नवरा, अली मोहम्मद थुल्ला, माझ्यापाशी आला आणि छातीत कळ येतीये असं सांगू लागला. आणि मग, जेव्हा मी त्याला माझ्या कुशीत घेतलं तेव्हा त्याचं शरीर गार पडत चाललं होतं... त्या क्षणी मला वाटलं जसं काही आभाळच फाटलंय.”
पन्नाशी पार केलेले अली मोहम्मद गेले आणि जिगर आणि त्यांचा एकुलता एक मुलगा मन्झूर मागे राहिले, “दुःख सोसण्यासाठी.” मन्ना, जिगर यांच्या मुलाचं लाडाचं नाव, फक्त १७ वर्षांचा होता. चार खोल्यांची इंदूरा, त्यांची हाउसबोट त्यांच्या झोपडीपासून जवळच पुलापाशी पाण्यात गळ टाकून उभी होती.
“जेव्हा केव्हा माझा मुलगा हाउसबोटीसाठी पर्यटकांना आणण्यासाठी बाहेर पडायचा, तेव्हा तो आमच्या शेजाऱ्यांना माझ्यावर लक्ष ठेवायला सांगायचा. त्याच्या वडलांच्या आठवणीत माझा बांध फुटेल हे त्याला माहित होतं,” जिगर सांगतात. आपल्या एका खोलीच्या घरात पलंगावर बसलेल्या जिगर यांची नजर घराबाहेर जाते. त्यांचे पती आणि मुलाच्या फोटोंनी घराच्या लाकडी भिंती सजल्या आहेत.
अलीच्या जाण्याचं दुःख विरतं न विरतं तोच, सातच महिन्यांनी मन्झूरलाही काळाने हिरावून नेलं. कधी किंवा कशामुळे तो गेला हे काही जिगर यांना आठवत नाही. पण वडलांच्या जाण्याचं दुःख त्याला सहन झालं नाही असं त्यांना वाटतं.
“माझं अख्खं जगच माझ्या डोळ्यासमोर उलटं-पालटं झालं,” त्या म्हणतात. “माझ्या आयुष्यातले दोघं हिरो मला एकटीला सोडून गेले आणि मागे राहिली ती त्यांच्या आठवणींनी भरलेली ही हाउसबोट.” त्या म्हणतात, “या आठवणी मला दिवसभर छळतात. माझ्या दुखण्यांमुळे अनेक गोष्टींचं मला विस्मरण झालंय, पण या रोजरोज छळणाऱ्या स्मृती मात्र ताज्यातवान्या आहेत.”

जिगर देद त्यांच्या मुलाच्या फोटोसह (उजवीकडील, डावीकडचा पर्यटक आहे). ‘माझा मन्झूर एकदम हिरो होता. एकच कपडा सलग दोन दिवस कधीच घालायचा नाही तो’
आम्ही बोलत असताना मध्येच यातल्या काही आठवणींना उजाळा मिळतो. “माझा मन्ना या पलंगावर झोपायचा,” त्या सांगतात. “फार खट्याळ होता तो. एकुलता एक होता त्यामुळे आमच्यावर फार जीव होता त्याचा. एकदा, मला आठवतंय, आम्ही त्याला न सांगता एक सोफा आणला होता. त्याला जेव्हा हे समजलं तो रुसून बसला. त्याच्या अब्बांनी आणि मी त्याची माफी मागितली तेव्हा कुठे त्यानी अन्नाला हात लावला. या खुदा, त्याची कमी सतत सतत जाणवते!”
तेव्हापासून जिगर देद एकटीच्या बळावर दल सरोवराच्या पाण्यात जीवन कंठतायत. त्यांच्या नवऱ्याची हाउसबोट आहे, तिच्या जोरावर काही कमाई करतायत. एरवी पर्यटनाच्या हंगामात, एप्रिल ते ऑगस्ट दरम्यान त्या महिन्याला १५,००० ते २०,००० रुपयांची कमाई करू शकत होत्या.
पण गेल्या वर्षी ऑगस्ट, २०१९ मध्ये बंदी आली आणि कमाई बुडाली, त्यानंतर दोनच महिन्यांनी त्यांना आणखी एक धक्का बसला. त्यांच्यासोबत अनेक वर्षं काम करणारे मदतनीस हाउसबोट सोडून गेले. “माझ्याकडे कामाला एक जण होता, गुलाम रसूल. तो पर्यटकांचं सगळं पहायचा. माझ्या मुलासारखा होता तो. बोटीचं सगळं बघायचा. बाहेरून खाणं, इतर काही सामान आणायचं असेल तर ते सगळं करायचा.”
पण त्याचा महिन्याचा ४,०००-५,००० रुपये पगार देणं जिगर यांना अशक्य झालं (आणि पर्यटकांकडनं बक्षिसी मिळणं बंद झालं) आणि मग गुलाम रसूल बोट सोडून गेले. “मला एकटीला सोडून जाऊ नये म्हणून त्याला थांबवायला काही मी धजावले नाही. त्यालाही घरदार आहे,” त्या सांगतात.
जिगर देद यांचं वय होत चाललंय आणि आता त्यांना दल सरोवराच्या बाहेर कामासाठी किंवा किराणा आणायलाही जाणं, हाउसबोटमधून बाहेर पडणं अवघड झालंय. बाजारातून काही आणायचं असेल तर त्यांना दुसऱ्या कुणाची तरी मदत घ्यायला लागते. बहुतेक वेळा त्यांचे एक जुने परिचित आहेत, ते मदत करतात पण कधी कधी अशी मदत मिळण्यासाठी त्यांना तासंतास हाउसबोटच्या बाहेर ताटकळत थांबून रहावं लागतं. “आता लोकांनी त्यांची कामं सोडून मला मदत करायला यावं म्हणून काही मी त्यांच्या मागे लागू शकत नाही. मग काय कुणी तरी येईल आणि मला मदत करेल याची वाट बघत बसणं तेवढं माझ्या हातात आहे,” त्या म्हणतात.
“पूर्वी कसं, जेव्हा माझ्यापाशी पैसा होता, तेव्हा लोक [सहज] सामानसुमान आणायचे,” त्या पुढे सांगतात. “पण आता गरजेच्या वस्तू मिळण्यासाठी सुद्धा मला किती तरी दिवस थांबावं लागतं कारण त्यांना वाटतं की मी कफल्लक आहे आणि मी त्यांना पैसे देणार नाही.”
आणि आता, गेल्या ३० वर्षांत पहिल्यांदाच असं झालंय की जिगर देद यांची सगळी पुंजी संपत आलीये. सलग लावलेले दोन लॉकडाउन आणि हाउसबोटीत कुणी पर्यटकही येत नाहीयेत. त्यामुळे आता त्या दिवसातून दोन ऐवजी एकदाच जेवतायत – रात्री डाळ आणि भात आणि दुपारचं जेवण म्हणजे तिकडची नून चाय – मिठाचा चहा. कधी कधी दल सरोवरातले त्यांचे शेजारी त्यांच्या घरी किंवा बोटीवर खाण्याची पाकिटं ठेवून जातात.
“लोकांपुढे हात पसरण्यापेक्षा मी भुकेने मेले तरी चालेल. तसं केलं तर माझ्या अलीचं आणि मन्नाचं नाव खराब होईल,” त्या म्हणतात. “आणि दुसऱ्या कुणाला काय दोष देणार, सगळ्यांची गत सारखीच आहे. या लॉकडाउनमुळे आमचा धंदाच ठप्प झालाय. हातात पैसाच राहिलेला नाही. आता गेल्या वर्षी ऑगस्टपासून माझ्याकडे एकही पर्यटक आला नाहीये. इतर अनेक हाउसबोट आणि शिकारावाल्यांचेही हेच हाल आहेत.”
जसजसा हिवाळा जवळ येऊ लागलाय, तसं थंडीच्या कडाक्यात हाउसबोट टिकून राहणार का याचाच जिगर यांना घोर लागलाय कारण बोटीची डागडुजी करण्यासाठी त्यांच्याकडे पैसेच नाहीत. आजकाल तर जरा हवा खराब झाली की त्यांचा डोळ्याला डोळा लागत नाही. “मला भीतीच वाटायला लागते, पाऊस पडला तर मी काय करू? मला तर घोर लागलाय की माझी होउसबोट माझ्यासकट पाण्यात बुडणारे. हा हिवाळा काढायचा तर तिची बरीच दुरुस्ती करावी लागणारे. हिवाळा आणखी वाढायच्या आत थोडे तरी गिऱ्हाईक मिळू देत अशीच माझी खुदाकडे प्रार्थना आहे. जगायचा हा एकच आधार आहे माझा आणि माझ्या अलीची भेट, ती न जावो.”

आठवणी भरुन राहिलेल्या हाउसबोटमध्येः गेली ३० वर्षं जिगर देद दल सरोवरात एकट्या जगतायत. आपल्या पतीच्या निधनानंतर या हाउसबोटीतून त्यांची कमाई होत होती. पण गेल्या वर्षी अनुच्छेद ३७० रद्द केल्यानंतर काश्मीरमध्ये लावलेल्या टाळेबंदीमुळे तेही थांबलं. ‘गेल्या वर्षी काढले तसे हाल आतापर्यंत कधीही झाले नव्हते,’ त्या म्हणतात. ‘बंदी उठली, जरा जरा पर्यटक यायला लागले तर हा करोना आला आणि मग लॉकडाउन...’

वय झाल्यामुळे जिगर दल सरोवराबाहेर बाजारात जाऊ शकत नाहीत. त्यामुळे मग त्यांच्या पतीचे एक शिकारावाले मित्र आहेत, वाणसामान आणण्यासाठी त्यांची मदत घेण्यावाचून पर्याय नाही

त्यांची दुनिया त्यांची झोपडी आणि त्यांची हाउसबोट इतकीच सीमित झाली आहे, आणि या दोन्हीला जोडणारा एक लाकडी पूलः ‘आता स्वतःची कामं सोडून माझी काम करा असं थोडीच मी म्हणू शकते. कुणी तरी मदतीला येईल याची वाट पाहणं इतकंच माझ्या हातात आहे’

त्यांच्या पतीचे मित्र बाजारातून वाणसामान घेऊन येणारेत, त्यांची त्या वाट पाहतायतः ‘मी सकाळपासून त्यांना तीनदा फोन केलाय कारण माझ्याकडचं सगळं काही संपलंय आणि ते म्हणाले होते की ते येतील म्हणून. ११ वाजलेत. ते लवकर आले तर बरंय, म्हणजे मग मला एक कपभर चहा तरी करून घेता येईल’

गेल्या ३० वर्षांत पहिल्यांदाच जिगर देद यांच्याकडची सगळी पुंजी खर्चून गेलीये आणि याला कारणीभूत ठरले दोन सलग लॉकडाउन. त्यामुळे त्या आता दिवसातून एकदाच जेवतायत. त्या म्हणतात, ‘मी स्वयंपाकात कमीत कमी भांडी वापरते, म्हणजे घासायला जास्त भांडी पडत नाहीत. हिवाळा येतोय, गार पाणी हाताला सहन होत नाही’

‘माझे पती वारले, त्यानंतर मी मन्नाला कुशीत घेऊन झोपायची. मग मला एकटं वाटायचं नाही. पण मग मन्ना पण परलोकाला गेला आणि माझ्यापाशी फक्त आठवणींचं गाठोडं मागे राहिलंय’

एकाकीपणाच्या खोल गर्तेत जाण्यापूर्वीचे दिवसः त्यांच्या कुटुंबाचं एक छायाचित्र, त्यांचा मुलगा मन्झूर (वर डावीकडे), त्यांचे पती, मोहम्मद थुल्ला (उजवीकडे) आणि सगळ्यांचं एकत्र छायाचित्र – पूर्वी कामाला असलेले असदुल्ला, मन्झूर, अली मोहम्मद, एक पर्यटक आणि जिगर देद

जरा हवा बिघडली की जिगर यांचा डोळ्याला डोळा लागत नाही. ‘मला भीती वाटते की पाऊस पडायला लागला तर मी काय करू? असं वाटतं की माझी हाउसबोट मला घेऊन पाण्यात बुडणार. या हिवाळ्यात टिकून रहायची तर तिची बरीच दुरुस्ती करावी लागणार आहे ’
अनुवादः मेधा काळे