ऑक्टोबरच्या मध्यावर, भर दुपारी, मिझोरममधल्या मुइफंगच्या डोंगर-माथ्यावरील ढगांनी आच्छादलेल्या जंगलात सूर्याची किरणं झिरपत खाली येताहेत. तरीही हिरव्या गर्द वनराजीत वातावरण थंडगार आणि अंधारलेलं आहे. एक प्रसन्न शांतता त्या जंगलात सर्वत्र व्यापून राहिली आहे - केवळ पक्ष्याचे मंजुळ आवाज आणि लाकूड तोडतानाचा तालबद्ध थ्वॅक थ्वॅक एवढाच काय तो आवाज ऐकू येतोय.
६५ वर्षांच्या झुइलियानी कमरेत ओणवं होऊन पूर्णपणे मग्न होऊन काम करत होत्या. जवळच सरपणाची छोटी रास होती. या आहेत मुइफुंगच्या लालझुइलियानी. आपल्या घरासाठी लाकूड गोळा करण्याच्या कामात व्यस्त. त्यांना सगळे झुइलियानी म्हणतात. त्यांच्या पायाजवळ कुऱ्हाडीसारखं एक हत्यार आहे. त्याचं पाचराच्या आकारासारखं जड पातं एका लांब दांड्यात बसवलंय, वापरून वापरून हा दांडा गुळगुळीत झालेला दिसतोय. झुइलियानी या कुऱ्हाडीने बाटलांगकेन झाडाच्या (क्रॉटॉन लिसोफायलस) ओंडक्यांचे सपासप तीन ते साडेचार फूट लांबीचे फाटे करत होत्या. लाकडं अजूनही ओली आहेत. हा गोळा केलेला लाकूडफाटा जवळजवळ ३० किलोग्रॅम भरेल.
घरी नेण्यासाठी लाकडं फोडत असताना त्यांचे हात असे झपाझप चालतात की त्यांच्या हातातला दाऊ (कोयता) जणू दिसेनासा होतो. त्यांच्या हालचालींमधली सफाई केवळ वर्षानुवर्षांच्या रोजच्या सवयीतून आलेली आहे हे निश्चित.

मिझोरमच्या ऐझ्वाल जिल्ह्यातली लुशाई टेकड्यांवरची, मुइफांगची १,६०० मीटर ऊंचीवरची घनदाट जंगलं, ऐझ्वाल शहराच्या दक्षिणेला सुमारे ५० किलोमीटर अंतरावर

६५ वर्षांच्या झुइलियानी, कमरेत वाकून, हातातल्या दाऊने(कोयता), सरपणासाठी तोडलेल्या लाकूडफाट्यावरचं शेवाळं आणि दगडफूलांचा थर तासून काढत आहेत

झुइलियानी सरपणाच्या ढिगावर अजून एक फाटा फेकतात. मागे त्यांची वेताची करंडी पडलेली आहे. फुलांची नक्षी असलेला गुलाबी अंगरखा त्यावर टाकलेला दिसतोय

सरपणाच्या चौकटीत झुयिलियानींचा चेहरा. उतारावर टेकू लावून ठेवलेल्या करंडीच्या बाजूला त्या पाय दुमडून बसल्या आहेत. घर एक किलोमीटर लांब, तेही चढणीवर. त्यामुळे त्या करंडीत सरपण नीट रचून ठेवतात

हातात सरपण, कामातून उसंत काढत क्षणभर वर पाहणाऱ्या झुइलियानी. कपाळ आणि पापण्यांवरच्या सुरकुत्या सहा दशकांचा अनुभव सांगतायत. त्यांच्यामागे असलेल्या हिरव्या जंगलासारखाच त्यांचा टी-शर्टही हिरवागार आहे

उतारावर लाकडाचा टेकू लावून ठेवलेली करंडी आणि त्यातला लाकूडफाटा झुइलियानी परत एकदा निरखून पाहतात. "स्वयंपाकाचा गॅस (एलपीजी) विकत घेणं आम्हांला परवडत नाही आणि इथल्या मागणीच्या प्रमाणात गॅस सिलेंडरचा पुरवठाही होत नाही. ," त्या म्हणतात

नीट लाकडं रचलेली, तोललेली सरपणाची करंडी जवळ जवळ त्यांच्या उंचीची आहे. टोपलीचा पट्टा डोक्यावर घेण्याआधी त्या परत एकदा ती पाहून घेतात. करंडीला एक मजबूत दोर बांधलाय, त्याला वेताचा एक सापतीसारखा पट्टा आहे, (याला स्थानिक भाषेत ‘नाम' म्हणतात). झुइलियानी त्यांची पाठ करंडीला टेकवतायत, सापतीच्या मदतीने त्या करंडीचा भार डोक्यावर घेण्याच्या तयारीत आहेत

सरावाने आलेल्या सफाईदारपणे आणि काहीशा डौलात , झुइलियानी पाठीवर अवजड करंडी तोलत उभ्या राहतात. डोक्याच्या मागे ठेवायला कापडाची चुंबळ तयार करतात

दुपार होऊन गेलीये, गोळा केलेलं सरपण भरलेली करंडी पाठीवर तोलत, झुइलियानी जंगलाच्या वाटेने घराकडे जाण्यास निघतात