१९ व्या शतकात जेव्हा भारतात आगगाडीचं आगमन झालं तेव्हा विविध प्रादेशिक रेल्वेमार्ग आणि नेटवर्क तयार झाले. ग्वाल्हेर संस्थानाच्या सिंदियांनी ग्वालियर लाइट रेल्वे सुरू केली. ही गाडी २१० किमी अंतर कापते आणि ती आजतागायत चालू असणारी जगातली सर्वात लांब नॅरो गेज रेल्वे आहे.
गाडी नं. ५२१७१ ही शिवपूर कलान आणि ग्वाल्हेर शहराला जोडणारी एकच थेट गाडी आहे. ती ताशी सरासरी १८ किमी अशा शाही वेगात धावते. याचा अर्थ असा की हा प्रवास पूर्ण करण्यासाठी तुम्हाला मोजून साडे दहा तास लागतात.
ही गाडी आता भारतीय रेलच्या अखत्यारीत आहे. सकाळी ६.२५ वाजता ती ग्वाल्हेर स्थानकाहून सुटते त्यामुळे मी त्या आधी अर्धा तास तिथे पोचलो आणि २९ रुपयांचं तिकिट काढून गाडीत जाऊन बसलो. गाडी आधीच खचाखच भरलेली होती. “ग्वाल्हेर शिवपूर एनजी पॅसेंजर” या गाडीला सात छोटे डबे आहेत आणि प्रवासी क्षमता आहे २००. पण ही गाडी या क्षमतेच्या किमान दुप्पट प्रवासी रोज घेऊन जाते. लोक आत दाटीवाटी करून बसतात, दारात लटकतात आणि वर टपावर चढून बसतात.
इतक्या घाईगर्दीतही माझ्या सहप्रवाशांनी मला गाडीत चढायला मदत केली आणि मला जागा करून देण्याचाही प्रयत्न केला. घोसीपुरा स्थानकात मी चालकाच्या केबिनमध्ये गेलो. चालक अन्वर खान यांनी मला काही काळ त्यांच्यासोबत प्रवास करण्याची संधी दिली. टपावर बसून जाण्याची मला फार ओढ होती पण मग माझ्याच लक्षात आलं की त्यात बराच धोका आहे. या संपूर्ण मार्गावर पुलांच्या कमानी लागतात. [या लोखंडी कमानी त्रिकोणांनी बनलेल्या असतात आणि काही ठिकाणी त्या गाडीच्या अगदी जवळ आहेत.] टपावरचे बरेचसे प्रवासी या कमानींना आदळून कपाळमोक्ष होऊ नये म्हणून पटकन वरनं खाली उतरून खिडक्यांना लटकतात तर काही जण तिथेच उताणे झोपतात.
मोहरीची सुंदर शेतं, ओढे आणि निष्पर्ण माळ पार करत गाडी पुढे जाते. पण माझ्या सगळ्यात जास्त लक्षात राहिली ती माझ्या सहप्रवाशांची मायेची ऊब.

प्रवासी ग्वाल्हेर ते शिवपूर कलान ५२१७१ पॅसेंजरमध्ये चढतायत

हे महाशय त्यांच्या अख्ख्या कुटुंबासह प्रवास करत होते मात्र वरचा माळा फक्त स्वतःसाठीच हा त्यांचा हेका होता

या गाडीत कायमच तिच्या २०० या क्षमतेच्या दुप्पट किंवा तिप्पट संख्येने प्रवासी असतात

अन्वर खान ग्वाल्हेरपासून सहा तास गाडी चालवतात. त्यानंतर दुसरा चालक येतो.

लोखंडी कमानींच्या पुलावरून कुनो नदी पार करताना, नेहमीचे प्रवासी डोकं सांभाळण्यासाठी टपावर चक्क उताणे होतात

ही गाडी स्थानक सोडून इतर कुठेही अचानक थांबू शकते. नक्कीच कुणी तरी आपल्या सोयीच्या ठिकाणी उतरता यावं म्हणून गाडीची साखळी ओढली असणार

कालवा पार करून जात असताना गाडीला लटकलेले दोन प्रवासी

बाहेरची दुनिया मागे पडतीये ते पाहताना

डब्यातली इंच अन् इंच जागा प्रवाशांनी व्यापलीये

ही गाडी मोहरीची सुंदर शेतं, ओढे आणि चंबळची झुडपांची रमणीय जंगलं पार करत जाते

टपावरचे प्रवासी खाली उतरतायत, साधारणतः प्रत्येक स्थानकात गाडी तीन ते पाच मिनिटं थांबते

संबलगढ स्थानकात रोजचा एक प्रवासी गायीला थापटतोय

गाडी स्थानकात थांबली की टपावरचे प्रवासी जरा हात पाय मोकळे करून घेतात

ग्वाल्हेर-शिवपूर कलान पॅसेंजर गाडी डिझेलवर धावते. प्रत्येक फेरी झाल्यानंतर गाडीचं इंजिन देखभालीसाठी ग्वाल्हेरच्या रेल यार्डात पाठवलं जातं
या चित्रकथेची एक आवृत्ती Roads & Kingdoms मध्ये २२ फेब्रुवारी २०१६ रोजी प्रसिद्ध झाली आहे.
अनुवादः मेधा काळे