दिल्ली चलो ही हाक ऐकल्यानंतर महाराष्ट्रातल्या पालघर जिल्ह्यातल्या आदिवासी वारली शेतकरी बाया २७ नोव्हेंबर रोजी प्रवासाला निघाल्या. डहाणूहून त्यांनी लोकलने विरार गाठलं, मग दुसऱ्या गाडीने त्या मुंबई सेंट्रलला आल्या आणि तिथनं त्यांनी दिल्लीकडे जाणारी तिसरी गाडी पकडली.
देशभरातल्या १५०-२०० शेतकरी संघटनांच्या अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीद्वारे २९-३० नोव्हेंबर रोजी आयोजित केलेल्या मोर्चासाठी त्या निघाल्या होत्या. यामध्ये मोठी भूमिका आहे अखिल भारतीय किसान सभेची. गोदुताई परुळेकरांच्या नेतृत्वाखाली किसान सभेने वारल्यांचा ऐतिहासिक उठाव केला होता त्यामुळे आदिवासी समुदायांमध्ये किसान सभेला मोठा जनाधार आहे.
पाय मोकळे करायलाही जागा नसणाऱ्या डब्यात २४ तास सलग प्रवास करून १०० हून अधिक जणांची पालघर तुकडी हझरत निझामुद्दिन स्थानकात पोचली. त्यांच्या त्या प्रवासाची ही कहाणी.

२७ नोव्हेंबरच्या दुपारी पालघर जिल्ह्याच्या डहाणू तालुक्यातल्या मीना बरसे कोम, साखरी वनसाड दांडेकर आणि इतर डहाणू रोड स्थानकात गोळा झाले.


मीनाच्या केसात फुलं माळायला साखरी मदत करतात. केसात फुलं माळलेल्या, उजळ रंगाची वस्त्रं परिधान केलेल्या या वारली बायांमुळे डहाणूचं स्थानकच उजळून निघालं.


नीलम प्रकाश रावते आता आठवडाभर तरी घरी परतणार नाही. त्यांच्या तिन्ही मुलांना त्यांची कमी भासणार हे नक्की. याच वर्षी मार्च महिन्यात लाँग मार्चला गेल्या असताना त्यांचं धाकटं लेकरू आजारी पडलं होतं. तो त्यांना सारखा फोन करतोय. मीना अनेक वर्षं किसोन सभेशी संलग्न आहेत.


मुंबईपासून १४४ किमी अंतरावर, मुंबई लोकलच्या पश्चिम लाइनवर असणाऱ्या डहाणू स्थानकात देशाच्या पश्चिमी राज्यांकडून मुंबईला येणाऱ्या आणि मुंबईकडून जाणाऱ्या मालगाड्यांची वर्दळ चालू असते.

किसान सभेचे कार्यकर्ते गोळा झाल्यामुळे पोलिसांचंही त्यांच्याकडे लक्ष जातं आणि मग ते मोर्चाचे आणि मोर्चेकऱ्यांचे तपशील लिहून घेतात.

पालघरच्या इतर तालुक्यातले शेतकरी त्यांच्या महिला कॉम्रेड्सना डहाणू स्थानकात भेटतात. हे सगळे जण विक्रमगडहून आलेत.

दिल्लीपर्यंतचा रेल्वेचा प्रवास खडतर आहे. खचाखच भरलेल्या जनरल डब्यात २०० प्रवासी जवळ जवळ २१ तास प्रवास करणार आहेत. त्यातले किमान १०० जण पालघरचे शेतकरी कार्यकर्ते आहेत.

पालघरच्या डहाणू तालुक्यातल्या धामणगावच्या सुनीता वळवी, वय ४० (उजवीकडून पहिल्या) याच जागी पुढचे २१ तास बसून राहणार आहेत. साधं संडासला जायचं तरी आजूबाजूला बसलेल्या सहप्रवाशांना तुडवून जावं लागणार. आणि जनरल डब्यातून जात असल्यामुळे नुसतं संडासला जाऊन यायचं म्हटलं तरी त्या उठल्या की त्यांची जागा जाणार हे नक्की.


डब्यात जागा नसली तरी हे शेतकरी-कार्यकर्ते या लांबलचक, कष्टप्रद प्रवासात वेळ जावा म्हणून क्रांतीकारी गाणी म्हणतात. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य, राजा गेहला शेतीवरच्या अरिष्टावर त्यांनी रचलेली गीतं म्हणतात.
या शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ निघालेल्या अनेक मध्यम वर्गीयांपैकी एक, मुंबईच्या जोगेश्वरीचे संजीव शमनथाल.

पालघरच्या शेतकऱ्यांच्या घोषणा आणि चर्चांबद्दल राजस्थानच्या काही महिला प्रवाशांना उत्सुकता लागून राहिलीये. त्यासुद्धा शेतकरीच आहेत. राजस्थानच्या बुंदी जिल्ह्यातल्या हिंडोली तालुक्यातल्या दबलाना गावच्या मनभरी देवी सांगतात की दुष्काळ आणि कोरड्या पडलेल्या कालव्यांमुळे त्यांचं ज्वारी आणि गव्हाचं पीक हातचं गेलं आहे. राजस्थानच्या करौली जिल्ह्यातल्या तोडाभीम तालुक्यातल्या प्रेमबाई सांगतात की त्यांच्या शेतमालाचा उत्पादन खर्च आणि भाव कधीच मेळ खात नाही आणि त्यांचं कुटुंब पोट भरण्यासाठी इतरांच्या रानात मजुरी करतं. शेतमालाला किमान हमीभाव आणि जलसंकटावर तोडगा या दिल्लीच्या किसान मोर्चाच्या प्रमुख मागण्यांपैकी आहेत.


दोन दिवसांचा हा रेल्वेचा प्रवास महिला प्रवाशांसाठी जास्तच अवघड बनतो कारण आक्रमक अशा पुरुष प्रवाशांचा त्यांना सामना करावा लागतो.
सुनीता वळवींचे वडील किसान सभेचे कार्यकर्ते आहेत. त्या नाशिक ते मुंबई लाँग मार्चमध्ये देखील सहभागी झाल्या होत्या. त्या म्हणतात, ‘आमच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आम्ही असेच मोर्चे काढत राहू’.

अखेर, २७ नोव्हेंबर रोजी रात्री ९.२५ वाजता निघालेली सुवर्ण मंदिर मेल २८ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ६.४५ वाजता हजरत निझामुद्दिन स्थानकात पोचते.

जेव्हा कार्यकर्त्यांच्या मोठ्या तुकड्या गाडीने प्रवास करत असतात, तेव्हा कोणीतरी हरवण्याची शक्यता असतेच. २४ तासांचा हा रेल्वेचा प्रवास करून येणाऱ्या सगळ्यांसाठी एका ठिकाणी गोळा होता यावं म्हणून निझामुद्दिन स्थानकात किसान सभेचा एक मोठा बॅनर लावलेला आहे.

पालघरच्या या तुकडीत १०० जण आहेत. इथनं ते आता गुरुद्वारा बाला साहिबजीकडे रवाना होतील, तिथे नेशन फॉर फार्मर्सने त्यांची राहण्याची आणि लंगर भोजनाची सोय केली आहे.

दिल्लीच्या प्रचंड आणि न हटणाऱ्या ट्रॅफिकमधूनच निझामुद्दिन स्थानकाहून गुरुद्वारेकडे हे सारे शेतकरी २० मिनिटाचा पायी प्रवास करतायत. येत्या काही दिवसात दिल्लीच्या रस्त्यांवर मिळणारं चविष्ट खाणं खायची संधी मिळणारसं दिसतंय.

शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ असणारा नेशन फॉर फार्मर्स हा शहरी जनांचा गट, किसान सभेचे कार्यकर्ते आणि गुरुद्वारा श्री बाला साहिबजीच्या व्यवस्थापनाने या अर्धवट बांधलेल्या इमारतीमध्ये सतरंज्या टाकून, काही वीज जोडण्या, पाणी आणि फिरत्या शौचालयांची व्यवस्था करून महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगण आणि दक्षिणेकडच्या इतर राज्यातून आलेल्या पाहुण्यांची राहण्याची सोय केली आहे. २९ नोव्हेंबरच्या दुपारी दक्षिणेकडचा हा ५००० हून अधिक शेतकऱ्यांचा जत्था गुरुद्वारेच्या उत्तरेकडे नऊ किलोमीटर अंतरावरच्या रामलीला मैदानाकडे रवाना होईल. देशभरातले शेतकरी दिल्लीच्या पाच मार्गांवरून रामलीला मैदानाकडे पोचतील, त्यातला हा एक मार्ग. ३० नोव्हेंबर रोजी सगळे मिळून संसदेच्या दिशेने कूच करतील.
अनुवादः मेधा काळे