हे पॅनेल दिसणारं काम, न दिसणाऱ्या बाया या ऑनलाइन फोटो प्रदर्शनातील आहे. ग्रामीण बाया किती विविध तऱ्हेची कामं करतात ते या फोटोंमधून आपल्याला दिसतं. १९९३ ते २००२ या काळात पी. साईनाथ यांनी भारतातल्या १० राज्यांमध्ये हे फोटो काढले आहेत. अनेक वर्षं भारताच्या विविध भागांत सादर झालेलं हे मूळ प्रदर्शन पारीने कल्पकरित्या डिजिटाइझ केलं आहे.
आयुष्य वेचताना
तिचा दिवस पहाटे ४.३० वाजता सुरू झालाय. तासाभरातच ती छत्तीसगडच्या सरगुजाच्या जंगलात तेंदूपत्ता गोळा करू लागलीये. आता छत्तीसगडच्या वेगवेगळ्या भागात हजारो आदिवासी बाया अगदी हेच काम करत असतील. अख्खी कुटुंबंच तेंदूपत्ता गोळा करण्याचं काम करतात. पानांचा वापर बिड्या वळण्यासाठी होतो.
सहा जणांचं तिचं कुटुंब एका दिवसात ९० रुपये (१.८५ डॉलर) कमवू शकतं. हा चांगला दिवस म्हणायचा. तेंदूच्या ऐन मोसमात दोन आठवड्यात जेवढी कमाई होते, ती पुढच्या तीन महिन्यांहून जास्त असू शकते. त्यामुळे हंगाम चालू असताना त्यांना जितकं शक्य आहे तितकं काम करणं भाग असतं. दीड महिन्यानंतर जीविकेसाठी त्यांना दुसरा काही तरी मार्ग शोधायला लागेल. या पट्ट्यातलं जवळ जवळ प्रत्येक कुटुंब आता जंगलात आहे. आदिवासींच्या अर्थव्यवस्थेत तेंदूला फार मोलाचं स्थान आहे.
ती मोहाची फुलं गोळा करतीये. किंवा चिंच, किंवा चारोळी, किंला साल. देशाच्या काही भागात, आदिवासींची निम्मी गुजराण या गौण वन उपजावर होते. पण या उत्पादनांच्या मूल्याच्या तुलनेत त्यांना अगदीच किरकोळ मोबदला मिळतो. केवळ मध्य प्रदेशात या सगळ्या उत्पादनांचं मूल्य वर्षाला किमान २००० करोड रुपये (४१२ दशलक्ष डॉलर) इतकं आहे.
राज्यांनी जंगलं प्रतिबंधित केली असल्याने नक्की आकडा काढणं अवघड आहे. पण संपूर्ण देशाचा विचार केला तर गौण वनोपजाचं मूल्य १५,००० करोड इतकं आहे. म्हणजेच वर्षाला ३.०९ अब्ज डॉलर.
या आदिवासी बाईला आणि तिच्या कुटुंबाला मात्र यातलं फारच थोडं वाट्याला येतं. त्यांच्यासाठी याचं मूल्य म्हणजे – जगण्यासाठी आधार. खरं तर ते त्यासाठीही पुरेसं नाही. खरा पैसा तर दलाल, सावकार आणि व्यापारीच करतात. पण हे सगळं गोळा कोण करतं, त्यावर प्रक्रिया करून ते विकतं कोण? प्रामुख्याने गावाकडची बाई. वनांमधल्या या बहुतेक गोष्टी ती गोळा करते. यात वनौषधीही आल्या. त्याचा जर जगभर लाखो-करोडोंचा धंदा होतो. व्यापाराची भरभराट होत असताना इथे ही बाई आणि तिच्या कुटुंबाचं जिणं मात्र अधिकच बिकट होत जातं. तिच्या श्रमाचं शोषण करणाऱ्यांनी तशी सोयच करून ठेवलीये.


जंगलं जितकी जास्त तुटतील, ओसाड होतील तितकं तिचं काम अवघड होत जाणार. कामाचे तास वाढणार आणि रोजच्या कामासाठी चालायचं अंतरही. आदिवासी कुटुंबं अधिक गरीब होऊ लागली की जंगलातून मिळणाऱ्या गोष्टींवरचं त्यांचं अवलंबित्वही वाढत जातं. म्हणजेच तिच्या जबाबदाऱ्याही. ओरिसामधल्या अशा प्रकारचं काम करणाऱ्या बायांना दिवसाकाठी तीन ते चार तास चालावं लागतं. आणि त्यांचा कामाचा दिवस किमान १५ तासांचा किंवा जास्तच मोठा असतो. देशातल्या लाखो आदिवासी बाया आपली कुटुंबं तगून रहावीत यासाठी फार मोलाची भूमिका बजावतात. आणि हे सगळं करत असताना त्यांना वनरक्षक, व्यापारी, पोलिस, कायम अडवणूक करणारं प्रशासन आणि बऱ्याचदा अन्यायकारी कायद्यांचा जाच सहन करावा लागतो.
खराटा बांधणाऱ्या या बाया आंध्र प्रदेशातल्या विजयानगरममधल्या आहेत. या राज्यातल्या अनेक आदिवासी कुटुंबांची निम्म्याहून अधिक कमाई गौण वनोपज विकून होते. आणि बिगर आदिवासींमधल्याही अनेकांची उपजीविका या वनोपजावरच अवलंबून आहे.
मध्य प्रदेशच्या बुंदेलखंडमधली ही बाई अनेक कलांमध्ये वाकबगार आहे. भांडी-कुंडी, तवे तयार करणं, दुरुस्त करणं इतकंच तिचं काम नाहीये. तो तर तिचा पिढीजाद धंदा आहे. पण ती दोऱ्या वळते, टोपल्या आणि कुंचे विणते. इतक्या तऱ्हतऱ्हेच्या वस्तू ती बनवते की बास! आणि हे सगळं ती जिथे राहते तिथे, जिथलं जंगल जवळ जवळ नामशेष झालंय. एखादी ठराविक प्रकारची माती कुठे मिळते हे तिला बरोबर ठाऊक असतं. तिच्याजवळचं ज्ञान आणि ती करते ते काम अफाट आहे. आणि तिची घरची परिस्थिती? ती मात्र हलाखीची आहे.

