अगरतळ्यात सगळीकडे ढाक निनादतोय. ११ ऑक्टोबरला दुर्गापूजा सुरू होणार असली तरी दर वर्षीप्रमाणे सणाची तयारी मात्र कित्येक आठवडे आधीच सुरू झाली आहे. मांडव उभारले जातायत, मूर्तीकार मूर्तींची अखेरची सजावट करतायत आणि घरोघरी नव्या कपड्यांची खरेदी सुरू आहे.
गळ्यात अडकवलेल्या किंवा खाली ठेवून वाजवल्या जाणाऱ्या ढाकशिवाय मात्र दुर्गापूजेचा सोहळा अपूर्णच आहे.
ढाक वाजवणं हे फक्त सणावाराचं काम आहे. दुर्गापूजेचे लक्ष्मीपूजेपर्यंतचे पाच दिवस. यंदा लक्ष्मीपूजा २० ऑक्टोबर रोजी आहे. काही ढाकींना दिवाळीत सुद्धा वाजवण्यासाठी बोलावलं जातं. पण अगरतळ्यात किंवा त्रिपुरा राज्यातल्या इतरही ठिकाणी त्यांची खरी मागणी असते दुर्गापूजेदरम्यान.
ढाकींना पंडाल समित्या किंवा काही कुटुंबं वाजवायला बोलावतात. कधी कधी त्यांना काम देण्याआधी त्यांच्याकडून वाजवून घेतलं जातं. बहुतेक ढाकी आपल्या घरच्या जुन्या जाणत्या सदस्यांकडून शिकलेले असल्याने वादनात तरबेज असतात. “मी माझ्या थोरल्या चुलत भावाबरोबर वाजवायचो,” ४५ वर्षीय इंद्रजीत रिषीदास सांगतात. “मी आधी काशी वाजवायला लागलो (काश्याची थाळी ज्याच्यावर टिपरीने वादन करतात), त्यानंतर ढोल आणि त्यानंतर ढाक.” ते आणि इचक रिषीदास, रोहिदास आणि रविदास कुटुंबं मुची समुदायाची आहेत आणि त्रिपुरा राज्यात त्यांचा समावेश अनुसूचित जातींमध्ये करण्यात आला आहे.
अगरतळ्यातल्या इतर किती तरी ढाकींप्रमाणे इंद्रजीत देखील बाकी वर्षभर सायकल रिक्षा चालवतात. कधी कधी ते लग्न किंवा इतर सण सोहळ्यांमध्ये बँडमध्ये वाजवतात – यांना इथे बँडपार्टी असं म्हटलं जातं. अधून मधून मिळणारी ही अशी काही कामं सोडता बहुतेक ढाकी प्लंबर, इलेक्ट्रिशियन, भाजीवाले म्हणून काम करतात. काही जण आसपासच्या गावांमध्ये शेती करतात आणि वाजवायचं काम असेल तेव्हा अगरतळ्यात येतात.

इंद्रजीत रिषीदास अगरतळ्याच्या भाती अभोयनगर परिसरातल्या आपल्या घराजवळच कामासाठी बाहेर पडत आहेत. दुर्गापूजेचा सोहळा सुरू होत नाही तोवर अनेक ढाकी सायकल रिक्षा चालवतात
रिक्षा चालवून इंद्रजीत यांची दिवसाची ५०० रुपये कमाई होते. “चार पैसे कमवायला काही तरी काम करायलाच पाहिजे. रिक्षा चालवणं तसं सोपं जातं,” तो म्हणतो. “याहून चांगलं काम मिळण्याची वाट पाहण्यात काही अर्थ नाही.” रिक्षा चालवून एका महिन्यात जेवढी कमाई होते तेवढी तर ते दुर्गापूजेच्या काळात एका आठवड्यात करतात. यंदा पंडाल समित्यांनी त्यांना १५,००० रुपये बिदागीवर वाजवायला बोलावलंय, काही जण मात्र याहून कमी पैसे देऊ करतात.
पंडाल समित्यांमध्ये ढाकींना बोलावलं जातं (अगरतळ्यात शक्यतो केवळ पुरुषच ढाकी म्हणून वादन करतात). तिथे, इंद्रजीत सांगतात, “भटजी जेव्हा सांगतील तेव्हा
आम्हाला तिथे हजर रहावं लागतं. सकाळच्या पूजेच्या वेळी ३-४ तास आणि संध्याकाळी ३-४
तास आम्ही वाजवतो.”
बँड-पार्टीचं काम मात्र कधीमधीच असतं. “आमचा साधारणपणे सहा जणांचा गट असतो, तोही लगीनसराईत. आम्ही किती दिवस बँड वाजवायचा त्याप्रमाणे पैसे घेतो. काही जण आम्हाला १-२ दिवस बोलावतात, तर काही जण ६-७ दिवस,” इंद्रजीत सांगतात. दिवसाला अख्ख्या बँडला मिळून ५,००० ते ६,००० रुपये मिळतात.
गेल्या वर्षी कोविड-१९ च्या महासाथीमुळे किती तरी जणांनी पूजेचे सोहळे रद्द केले त्यामुळे ढाकींनी रिक्षा चालवून किंवा इतर किरकोळ कामं करून आणि जी काही बचत होती त्याच्या जिवावर दिवस काढले. काही जणांना मात्र अगदी अखेरच्या क्षणी ढाक वाजवायची कामं मिळाली होती. (या कहाणीतली सगळी छायाचित्रं ऑक्टोबर २०२० मधली आहेत.)
दुर्गापूजेनंतर एक आठवड्याने लक्ष्मीपूजा असते. हा ढाकींना ‘काम’ मिळण्याचा शेवटचा दिवस. त्या दिवशी ते आपापले ढाक घेऊन एकटे किंवा जोडीने अगरतळ्याच्या रस्त्यांवर जाऊन थांबतात. हा दिवस मंगल मानला जातला असल्याने त्या दिवशी काही घरांमध्ये त्यांना मुहूर्त म्हणून ५-१० मिनिटं ढाक वाजवायला बोलावलं जातं. त्यासाठी त्यांना फुटकळ २०-५० रुपये दिले जातात. अनेक जण तर केवळ परंपरा सुरू ठेवायची म्हणून हे ढाक वाजवत असल्याचं सांगतात.

दुर्गा पूजेच्या १० दिवस आधीच सगळी तयारी सुरू होते. ढाक बाहेर निघतात, वाद्या स्वच्छ करून घट्ट ताणल्या जातात. योग्य स्वर निघण्यासाठी हे केलं जातं. हे कष्टाचं काम आहे कारण वाद्या चामडीच्या असल्याने काही काळाने कडक होतात. या कामासाठी दोन माणसं तरी पाहिजेत. “याला भरपूर ताकद लागते, एका माणसाचं काही हे काम नाही,” इंद्रजीत रिषीदास सांगतात. “ढाकमधून निघणारा नाद याच्यावर अवलंबून असल्यामुळे हे महत्त्वाचं काम आहे”

ढाक साफ करून, सुरात लावून झाले की त्यायावर स्वच्छ कापड गुंडाळून ते उंचावर कुठे तरी ठेवले जातात आणि दुर्गापूजेच्या वेळीच खाली काढले जातात

शहरात सणाची लगबग सुरू आहे, शहराच्या कर्नल चौभूमी (चौक) जवळच्या एका दुकानातून देवीची मूर्ती वाजत गाजत आणली जातीये, दोन ढाकींचा ढाक वाजतोय. दुर्गापूजेच्या काळात वेगवेगळ्या मुहुर्तावर ढाक वाजतो, मूर्ती आणताना, मांडवात ती ठेवली जाते तेव्हा, पूजेच्या वेळी आणि विसर्जन करत असताना

अगरतळ्याच्या कमान चौभूमीपाशी काम मिळण्याची वाट बघत असलेले एक ढाकी. दर वर्षी दुर्गापूजेच्या दोन दिवस आधी शहरात ठराविक ठिकाणी आसपासच्या गावातले आणि शहरांमधले ढाकी थांबलेले दिसतात. काही जण अख्खा दिवस तिथे थांबतात. २०२० साली कोविड-१९ मुळे फार थोड्या ढाकींना काम मिळालं

बाबुल रविदास अगरतळ्यापासून २० किलोमीटरवर असलेल्या आपल्या गावाहून इथे आले आहेत. दिवसभर ताटकळून गेल्याने त्यांनी क्षणभर विश्रांती घ्यायचं ठरवलेलं दिसतंय

अगरतळ्याच्या बट्टाला बस स्थानकापाशी गावी परतण्यासाठी रिक्षात बसणारे ढाकी. काम मिळेल या आशेने आसपासच्या गावांमधून आणि छोट्या शहरांमधून येणारे ढाकी दुर्गापूजेच्या दोन दिवस आधीपासून इथे येऊन थांबलेले असतात. हा गट दिवसभर इथे थांबला होता. अखेर रात्री ९ वाजण्याच्या सुमारास त्यांनी गावी परत जायचं ठरवलं

बिजयकुमार चौभूमी परिसरात एका रिकाम्या मांडवात ढाक वाजतायत. कोविड-१९ महासाथीच्या आधी असं काही घडल्याचं ऐकिवात नाही. अर्थात गेल्या वर्षी देखील अगरतळ्यात बाकी पंडाल इतके ओस पडले नव्हते

गेल्या वर्षी दुर्गा पूजेच्या आधी एक आठवडा एक ढाकी वाद्यांच्या एका दुकानात आपला ढाक दुरुस्त करायला घेऊन आलेत

परंपरा आणि तंत्रज्ञनाचा मिलाफ – रामनगर रोड-४ मध्ये ढाकचा आवाज जोरात यावा यासाठी माइकचा वापर केला जातोय. ढाक मुळात जोरातच वाजतो आणि त्याचा आवाज आजूबाजूला चांगलाच घुमतो. मोन्टू रिषीदास (छायाचित्रात नाहीत) गेली ४० वर्षं ढाक वाजवतायत. ते म्हणतात नवीन तंत्रज्ञानाच्या आगमनामुळे आजकाल ढाकींना फारसं काम मिळेनासं झालंय. “आजकाल फोनचं एक बटण दाबलं की ढाक वाजायला सुरुवात होते”

२०२० मध्ये काही जणांना काम मिळालं. तेही वैयक्तिक ओळखी, काही कुटुंबाशी आणि पंडाल कमिट्यांशी घरोबा असल्यामुळे. रामनगर रोड नं. १ मध्ये एरवी सायकल रिक्षा चालवणारे केशब रिषीदास आपला ढाक गळ्यात घालून स्थानिक मंडळाच्या मांडवात नाचतायत. या मंडळाच्या एका सदस्यांशी त्यांचा परिचय आहे आणि त्यांच्या ओळखीतूनच त्यांना वाजवण्यासाठी इथे बोलावलं गेलंय

केशब रिषीदास वर्षभर सायकल रिक्षा चालवतात आणि दुर्गापूजेमध्ये किंवा एरवी काही सण समारंभ असतील तर आपल्या मुलाला ढोल वाजवायला घेऊन जातात. कधी कधी ढाकच्या जोडीने ढोलही वाजतात. ते आपल्या सायकल रिक्षानेच कामाच्या ठिकाणी जातात

आखौडा रोडजवळ दुर्गामातेची विसर्जनाची मिलनणूक निघाली आहे. यावेळी ढाक वाजतोच

केर चौभूमी परिसरात कालीमातेच्या मंदिरात परिमल रिषीदास पूजा झाल्यानंतर आरती ग्रहण करतायत. “या वर्षी ते मला ११,००० बिदागी देणार आहेत, गेल्या वर्षीपैक्षा ५०० रुपये जास्त,” ते म्हणतात. “सध्या मला ५८ वं चालू आहे. मी १८-१९ वर्षांचा असल्यापासून ढाक वाजवतोय”

लक्ष्मीपूजेच्या दिवशी संध्याकाळी काही ढाकी रस्त्यावर आपले ढाक वाजवतात. त्यांचा आवाज कानावर आला की लोक त्यांना घरी वाजवण्यासाठी बोलावतात. ढाकींचा थोडी फार कमाई करण्याचा हा शेवटचा दिवस असतो

ढाकी एका घरातून दुसरीकडे ढाक वाजवत हिंडतात. प्रत्येक ठिकाणी त्यांना २०-५० रुपये मिळतात

राजीव रिषीदास लक्ष्मीपूजेच्या दिवशी रात्री ९ वाजता घरी परततात. “मला काही हे फारसं आवडत नाही [घरोघरी जाऊन ढाक वाजवणं],” ते म्हणतात. “पण वरचे चार पैसे मिळतात त्यामुळे घरचे लोक जा म्हणतात”

पूजेचा सण संपला की बहुतेक ढाकी परत एकदा आपल्या नेहमीच्या कामांकडे वळतात. आपापल्या सायकल रिक्षा घेऊन वर्षभर ते दुर्गा चौभूमी जंक्शनमध्ये भाड्यासाठी थांबलेले असतात