रविवार सकाळचे १०.३० वाजलेत आणि हनी कामावर जाण्यासाठी तयार होतीये. आरशासमोर बसून ती आरक्त लाल रंगाची लिपस्टिक ओठांना लावतीये. “माझ्या ड्रेसला अगदी मॅच होईल हा रंग,” ती म्हणते आणि लगबगीने आपल्या सात वर्षांच्या लेकीला खाणं भरवायला उठते. आरशासमोरच्या ड्रेसिंग टेबलवर काही मास्क आणि इयरफोन इथेतिथे पडलेत. टेबलावर मेकअपचं साहित्य आणि सौंदर्य प्रसाधनं विखुरलीयेत. खोलीच्या एका कोपऱ्यात भिंतीवर टांगलेल्या देवी-देवतांच्या तसबिरी आणि नातेवाइकांचे फोटो आरशात दिसतायत.
हनी (नाव बदललं आहे) हॉटेलमध्ये एका क्लायंटला किंवा गिऱ्हाइकाला भेटायली निघालीये. नवी दिल्लीच्या मंगोलपुरी भागातल्या वस्तीत तिची एक खोली आहे. तिथून हे हॉटेल ७-८ किलोमीटरवर आहे. हनीचं वय अंदाजे ३२ वर्ष असेल आणि ती धंदा करते. देशाच्या राजधानीच्या नंगलोई जाट परिसर हे तिचं कामाचं क्षेत्र. ती मूळची हरयाणातल्या एका खेड्यातली आहे. “दहा वर्षं झाली, मी इथे आले. आणि आता मी इथलीच झालीये. पण दिल्लीला आले आणि माझ्या आयुष्यात एका मागोमाग एक संकटं येत गेली.”
कसली संकटं?
“चार वेळा गर्भ पडून गेला, बहुत बडी बात है! माझ्यासाठी तरी निश्चितच. त्यात मला खायला घालणारं, माझी काळजी घेणारं आणि मला दवाखान्यात नेणारं देखील कुणी नव्हतं,” काहिशा खेदाने हनी सांगते. या सगळ्या गोष्टी मागे टाकून ती फार पुढे गेलीये असं तिच्या बोलण्यातून सूचित होत होतं.
“केवळ याच कारणासाठी मी या धंद्यात आले. माझं, तेव्हा पोटात असणाऱ्या माझ्या बाळाचं पोट भरायला माझ्याकडे पैसे नव्हते. पाचव्यांदा दिवस गेले होते. दोन महिने झाले तेव्हाच माझा नवरा मला सोडून गेला होता. माझ्या आजारामुळे काही घटना घडल्या होत्या, आणि मग मी ज्या प्लास्टिकचे डबे बनवणाऱ्या कारखान्यात काम करत होते तिथल्या मालकाने मला कामावरून काढून टाकलं. मला महिन्याला १०,००० रुपये मिळत होते त्या कामावर,” ती म्हणते.
हनीच्या आई-वडलांनी वयाच्या १६ व्या वर्षीच हरयाणात हनीचं लग्न लावून दिलं होतं. ती आणि तिचा नवरा काही वर्षं तिथेच राहिले – तो ड्रायव्हरचं काम करायचा. ती २२ वर्षांची असताना ते दिल्लीला आले. आणि मग तिचा दारुडा नवरा अधून मधून गायब व्हायला लागला. “कित्येक महिने तो गायब असायचा. कुठे? मला माहित नाही. अजूनसुद्धा त्याचं तसंच चालू आहे. तो कधीच काही सांगत नाही. इतर बायांबरोबर जातो आणि त्याचे खिसे खाली झाले की मग परत येतो. तो फूड डिलिव्हरीचं काम करतो. पण मिळणारा पैसा फक्त स्वतःवर खर्च करतो. चारदा माझा गर्भ पडून गेला त्याचं हेच मुख्य कारण होतं. मला लागणारी औषधं, खाणं तो काहीच आणायचा नाही. मी प्रचंड अशक्त झाले होते.”
सध्या हनी आपल्या मुलीबरोबर मंगोलपुरीतल्या तिच्या घरी राहते. महिन्याला ३,५०० रुपये भाडं भरते. तिचा नवरा त्यांच्याबरोबर राहतो, पण अजूनही थोड्या थोड्या महिन्यांनी गायब होण्याची त्याची सवय मोडलेली नाही. “माझं काम गेल्यानंतर काही काळ कसं तरी करून मी भागवलं, पण ते काही जमण्यासारखं नव्हतं. मग गीता दीदीनी मला धंद्याविषयी सांगितलं आणि माझं पहिलं गिऱ्हाईकही तिनेच आणलं. तेव्हा मला पाचवा महिना सुरू होता – मी २५ वर्षांची असेन जेव्हा मी धंद्यात आले,” ती म्हणते. माझ्याशी बोलता बोलता ती लेकीला खाणं भरवत होती. हनीची मुलगी इंग्रजी माध्यमाच्या एका खाजगी शाळेत शिकते, महिन्याला ६०० रुपये फी आहे शाळेची. टाळेबंदीच्या काळात तिच्या मुलीचे वर्ग ऑनलाइन सुरू आहेत, हनीच्या फोनवर. ज्या फोनवर तिचे गिऱ्हाइकही फोन करतात.
“धंदा केला म्हणून मला घरभाडं भरता आलं, औषध-पाणी, खाण्याचा खर्च भागवता आला. सुरुवातीच्या काळात माझी महिन्याला ५०,००० रुपयांपर्यंत कमाई व्हायची. तेव्हा मी तरुण होते, सुंदर होते. पण आता वजन वाढलंय,” हनी म्हणते आणि हसायला लागते. “मी विचार केला होता की बाळाच्या जन्मानंतर धंदा सोडून दुसरं बरं काम शोधावं, अगदी कामवालीचं असलं तरी चालणार होतं. पण माझ्या नशिबात वेगळंच काही तरी वाढून ठेवलं होतं.”
“मला पाचव्यांदा गर्भपात नको होता, त्यामुळे काहीही करून मला काम करून पैसा कमवायचा होता. माझ्या गर्भात असणाऱ्या बाळाला मला सर्वोत्तम औषधं आणि पोषण द्यायचं होतं. म्हणून मग मी अगदी नववा महिना भरला तरी गिऱ्हाइक घेत होते. खूप दुखायचं, त्रास व्हायचा, पण दुसरा काही पर्यायच नव्हता. आता या सगळ्यामुळे बाळंतपणात गुंतागुंत होणार हे कुठे मला माहित होतं,” हनी म्हणते.
“गरोदरपणाच्या तिसऱ्या तिमाहीत जर लैंगिक संबंध सुरू असतील तर त्यातून बरेच धोके असतात,” लखनौ स्थित स्त्री रोग तज्ज्ञ, डॉ. नीलम सिंग सांगतात. “पाणमोट फुटू शकते, लिंगसांसर्गिक आजाराची लागण होऊ शकते. अपुऱ्या दिवसात मूल जन्माला येऊ शकतं आणि अर्भकालाही लिंगसांसर्गिक आजाराची बाधा होण्याची शक्यता असते. तसंच गरोदरपणाच्या सुरुवातीच्या काळात जर वारंवार संभोग झाला तर त्यातून गर्भपाताचाही धोका असतो. बहुतेक वेळा धंदा करणाऱ्या बाया दिवस जाऊ देत नाहीत. पण जर त्यांना दिवस गेले तरी त्या काम सुरूच ठेवतात. आणि मग त्यातून असुरक्षित आणि जास्त दिवस भरल्यावर गर्भपात होऊ शकतो. त्यातून त्यांचं प्रजनन आरोग्य धोक्यात येऊ शकतं.”
“एकदा मला असह्य खाज आणि वेदना सुरू झाल्या म्हणून सोनोग्राफी करायला गेले,” हनी सांगते. “तेव्हा मला कळालं की मला मांड्या आणि ओटीपोटावर वेगळीच काही तरी ॲलर्जी आली होती, योनिमार्गाला सूज होती. इतकं दुखत होतं आणि परत खर्च होणार या विचारानेच मला जीव द्यावासा वाटत होता.” डॉक्टरांनी तिला सांगितलं की तो लिंगसांसर्गिक आजार होता. “पण मग माझ्या एका गिऱ्हाइकानी मला पैशाची मदत केली आणि मानसिक आधार दिला. मी काय काम करते ते काही मी डॉक्टरला सांगितलं नाही. नाही तर उगाच अडचणी वाढल्या असत्या. नवऱ्याला भेटायचंय असं ती म्हणाली असती तर मग मी कोणत्या तरी गिऱ्हाइकाला घेऊन गेले असते.”
“त्या भल्या माणसामुळे आज मी आणि माझी मुलगी ठीक आहोत. माझ्या उपचाराचा सगळा खर्च त्याने केला. मग तेव्हा मी ठरवलं की मी हे काम सोडणार नाही म्हणून,” हनी म्हणते.
“किती तरी संस्था त्यांना निरोधचा वापर करायला सांगतात,” नॅशनल नेटवर्क ऑफ सेक्स वर्कर्सच्या समन्वयक, किरण देशमुख सांगतात. “पण धंदा करणाऱ्या बायांमध्ये गर्भ पडून जाण्यापेक्षाही करवून घेतलेल्या गर्भपातांचं प्रमाण जास्त आहे. पण कसं होतं, त्या सरकारी दवाखान्यात जातात पण तिथेही त्या काय काम करतात हे कळाल्यावर डॉक्टरसुद्धा त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात.”
पण डॉक्टरांना कसं काय समजतं?
“अहो, स्त्री रोज तज्ज्ञ असतात ते,” किरणताई म्हणतात. त्या सांगली स्थित वेश्या अन्याय मुक्ती परिषदेच्या अध्यक्ष आहेत. “डॉक्टर पत्ता विचारतात आणि त्यावरनं ते अंदाज बांधतात. मग त्या बाईला [गर्भपातासाठी] तारीख दिली जाते, जी काही कारणाने पुढे ढकलली जाते. आणि मग डॉक्टर सांगून टाकतात की गर्भपात करता येणार नाही, का तर ‘तुम्हाला चार महिने होऊन गेलेत आणि आता गर्भपात करणं बेकायदेशीर आहे’.”
अनेक बाया उपचारासाठी सरकारी दवाखान्यात जायचंच टाळतात. संयुक्त राष्ट्रसंघाच्या देहविक्री आणि एचआयव्ही/एड्स कार्यक्रमाच्या २००७ सालच्या अहवालानुसार , तब्बल “धंदा करणाऱ्या बायांपैकी ५० टक्के स्त्रियांनी गरोदरपणातील सेवा आणि बाळंतपणासाठी सरकारी दवाखान्यात उपचार घेतले नसल्याचं सांगितलं.” सामाजिक कलंक, लोकांचा दृष्टीकोन आणि बाळंतपणाच्या वेळी तातडीच्या उपचारांची गरज ही त्यामागची काही कारण असल्याचं दिसतं.
“त्यांच्या व्यवसायचा प्रजनन आरोग्याशी थेट संबंध आहे,” अजित सिंग म्हणतात. गेली २५ वर्षं देहविक्रीविरोधात काम करणाऱ्या वाराणसी स्थित गुडिया संस्थेचे ते संचालक आहेत. त्यांनी दिल्लीच्या जीबी रोड भागातल्या स्त्रियांसोबतही काम केलं आहे. आपल्या अनुभवाच्या आधारावर ते सांगतात, “धंदा करणाऱ्या स्त्रियांपैकी ७५-८० टक्के स्त्रियांना प्रजनन आरोग्याच्या काही ना काही तक्रारी असतातच.”
“आमच्याकडे सगळ्या प्रकारचं गिऱ्हाईक येतं,” नंगलोई जाटमध्ये हनी सांगते. “एमबीबीएस डॉक्टर, पोलिस, विद्यार्थी किंवा रिक्षाचालक, सगळे आमच्याकडे येतात. तरुण वयात आम्ही जो चांगला पैसा देईल त्याच्याकडेच जातो, पण जसजसं वय वाढायला लागतं तसं हे निवड करणं थांबतं. खरं सांगायचं तर या डॉक्टर आणि पोलिसांशी चांगलं राहिलेलंच बरं असतं. त्यांची कधी मदत लागेल सांगू शकत नाही.”
सध्या एका महिन्यात तिची कमाई किती होतीये?
“लॉकडाउनचा काळ सोडला तर महिन्याला २५,००० रुपये मिळत होते. पण हा सुद्धा अंदाजे आकडा आहे. गिऱ्हाइक कोण कसा आहे, काय काम करतो त्याप्रमाणे पैसे मिळतात. शिवाय पूर्ण रात्र दिली का काही तास यावरही पैसे ठरतात,” हनी सांगते. “गिऱ्हाइकाबद्दल शंका असेल तर मग आम्ही त्याच्यासोबत हॉटेलमध्ये जात नाही आणि त्यालाच इथे बोलावतो. मी मात्र त्यांना नंगलोई जाटमध्ये गीतादीदीच्या घरी बोलावते. मी दर महिन्यात काही रात्री आणि दिवस इथे राहते. गिऱ्हाईक मला जेवढे पैसे देतात त्यातले निम्मे ती घेते. ते तिचं कमिशन.” हेही बदलत जातं. पण पूर्ण रात्रीसाठी ती १,००० रुपये घेते असं हनी सांगते.
चाळिशीची असलेली गीता या भागातल्या धंदा करणाऱ्या बायांवर देखरेख ठेवते. ती स्वतःदेखील ‘देहव्यापारात’ आहे, पण प्रामुख्याने तिची कमाई जागेच्या कमिशनमधून येते. गिऱ्हाइकांना भेटण्यासाठी ती या बायांना तिचं घर वापरू देते आणि बदल्यात कमिशन घेते. “मी गरजू बायांना या धंद्यात आणते आणि त्यांच्याकडे जागा नसते तेव्हा मग मी माझी जागा त्यांना वापरायला देते. त्यांच्या कमाईचा फक्त ५० टक्के हिस्सा माझा असतो,” गीता सरळ सांगते.
“मी आयुष्यात खूप काही पाहिलंय,” हमी म्हणते. “प्लास्टिकच्या कारखान्यात काम, मग नवरा सोडून गेला म्हणून मला कामावरून काढून टाकलं, आणि आता हे कायम चिकटलेली बुरशीची आणि योनीची लागण ज्याच्यावर अजूनही औषधं सुरू आहेत. मला तर वाटतं मी आहे तोवर हे असंच राहणार आहे.” सध्या, हनीचा नवराही तिच्याबरोबर आणि तिच्या मुलीबरोबर राहतोय.
तिच्या धंद्याची त्याला कल्पना आहे?
“पूर्णपणे,” ती म्हणते. “त्याला सगळं माहित आहे. आणि आता तर तो सरळ सरळ पैशासाठी माझ्यावर अवलंबून राहतोय. इतकंच काय, आज तोच मला हॉटेलला सोडणार आहे. पण माझ्या आई-वडलांना [ते शेतकरी आहेत] याबद्दल तसूभरही कल्पना नाही. आणि त्यांना हे कधीही कळू नये अशी माझी इच्छा आहे. ते खूप म्हातारे आहेत. आणि हरयाणात राहतात.”
“अनैतिक देहव्यापार (प्रतिबंध) कायदा, १९५६ खाली वय वर्ष १८ पुढील कोणतीही व्यक्ती धंदा करणाऱ्या बाईच्या कमाईला लाभ घेत असेल तर तो गुन्हा आहे,” आरती पै सांगतात. व्हँप आणि एनएनएसडब्ल्यू या दोन्ही संघटनांच्या त्या कायदेविषयक सल्लागार आहेत. “यामध्ये धंदा करणाऱ्या बाईसोबत राहणारे आणि तिच्या कमाईवर अवलंबून असणारी सज्ञान मुलं, जोडीदार/नवरा आणि पालकांचा समावेश होतो. अशा व्यक्तीला सात वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते.” अर्थात हनी आपल्या नवऱ्याबद्दल अशी काही तक्रार करण्याची शक्यता दिसत नाही.
“लॉकडाउन उठल्यावर हा माझा पहिलाच गिऱ्हाइक आहे. सध्या अगदी थोडे लोक येतायत, नाहीच येत आहेत म्हणा ना,” ती म्हणते. “आणि सध्या, या महामारीच्या काळात जे लोक आमच्याकडे येतायत, त्यांच्यावर किती विश्वास ठेवायचा हेही आहेच. पूर्वी कसं आम्हाला एचआयव्ही किंवा इतर [लिंगसांसर्गिक] आजारांची लागण होऊ नये याची काळजी घ्यायला लागायची. आता, हा करोनाही आलाय. हा संपूर्ण लॉकडाउन म्हणजे आमच्यासाठी शाप ठरलाय. काहीच कमाई नाही – आणि जी काही बचत होती तीही संपलीये. मला तर दोन महिने माझी औषधंदेखील [बुरशीजन्य आजारावरची मलमं] आणता आली नाहीत कारण खायचेच वांदे होते,” हनी म्हणते. आणि मग हॉटेलला जाण्यासाठी मोटारसायकल काढ म्हणून नवऱ्याला हाक मारते.
शीर्षक चित्र: अंतरा रामन, हिने नुकतीच सृष्टी कॉलेज ऑफ आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी, बेंगळूरु येथून व्हिजुअल कम्युनिकेशन या विषयात पदवी घेतली आहे. सर्व प्रकारच्या विचारात्मक कला आणि कथाकथन यांचा तिच्या कलाकुसरीवर मोठा प्रभाव आहे.
पारी आणि काउंटरमीडिया ट्रस्टने पॉप्युलेशन फाउंडेशन ऑफ इंडियाच्या सहाय्याने ग्रामीण भारतातील किशोरी आणि तरुण स्त्रियांसंबंधी एक देशव्यापी वार्तांकन उपक्रम हाती घेतला आहे. अत्यंत कळीच्या पण परिघावर टाकल्या गेलेल्या या समूहाची परिस्थिती त्यांच्याच कथनातून आणि अनुभवातून मांडण्याचा हा प्रयत्न आहे.
हा लेख पुनःप्रकाशित करायचा आहे? कृपया zahra@ruralindiaonline.org शी संपर्क साधा आणि namita@ruralindiaonline.org ला सीसी करा
अनुवादः मेधा काळे