तिला फक्त तिचं नाव लिहिता आणि वाचता येतं. लक्ष देत, घोटून ती देवनागरीत आपलं नाव लिहिते, तेव्हा तिच्या चेहऱ्यावरचा अभिमान लपत नाहीः गो-प-ली. आणि मग त्याच चेहऱ्यावर हसू उमलतं, हास्याच्या लकेरीच, सगळ्यांना हसवणाऱ्या.
चार पोरांची आई असलेली ३८ वर्षांची गोपली गमेती म्हणते की बायांनी जर मनावर घेतलं ना तर त्या काय वाटेल ते करू शकतात.
उदयपूर जिल्ह्याच्या गोगुंदा तालुक्यात करदा गावाच्या वेशीबाहेर असलेल्या अगदी तीसच घरांच्या वस्तीत गोपली राहते. तिची चारही मुलं घरीच जन्मली आहेत, सोबतीला तिच्या समाजाच्या काही बायका. तिने आयुष्यात पहिल्यांदा दवाखाना पाहिला तो चौथ्या बाळंतपणानंतर. तिची तिसरी मुलगी जन्मली आणि त्यानंतर नसबंदी करण्यासाठी ती दवाखान्यात गेली होती.
“आता आपलं कुटुंब पूर्ण झालं असं म्हणण्याची वेळ आली होती,” ती म्हणते. गोगुंदा सामुदायिक आरोग्य केंद्रातली एक आरोग्य कार्यकर्ती घरभेटीसाठी आली असताना तिने आणखी मुलं नको असतील तर “ऑपरेशन” करून घेण्याचा सल्ला देऊन गेली होती. खर्चही काहीच नव्हता. तिला फक्त एकच गोष्ट करायची होती. तीस किलोमीटरवर असलेल्या सामुदायिक आरोग्य केंद्रात पोचायचं होतं. चार प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या कक्षेत येणाऱ्या गावांना या आरोग्य केंद्रातर्फे आरोग्यसेवा देण्यात येतात.
तिने किती तरी वेळा घरी हा विषय काढून पाहिला, पण तिच्या नवऱ्याने काहीच लक्ष दिलं नाही. पुढचे काही महिने तिने मनाशी आपला निर्धार पक्का केला. मुलगी अंगावर पीत होती आणि गोपली मनाशीच विचार करत होती की आपण घेतलेला निर्णय आपण तडीस नेऊ शकणार का नाही.
“एक दिवस मी अशीच घरातून बाहेर पडले आणि सांगितलं की मी नसबंदी करायला दवाखान्यात निघाले आहे,” ती म्हणते. हिंदी आणि भिलीत बोलणाऱ्या गोपलीला तो प्रसंग आठवून आजही हसू येतं. “माझा नवरा आणि सासू माझ्या मागे पळतच आले.” बाहेर रस्त्यातच त्यांच्यात थोडा वाद झाला, पण त्यांना कळून चुकलं की गोपलीने मनाशी पक्कंच ठरवलं आहे. मग मात्र ते तिघं एकत्रच बसमध्ये बसले आणि गोगुंदाच्या सीएचसीत गेले. गोपलीचं तिथेच नसबंदीचं ऑपरेशन झालं.
त्याच दिवशी तिथे नसबंदी करून घेण्यासाठी इतरही बाया आलेल्या होत्या. पण नसबंदी शिबिर होतं का किंवा तिथे आणखी किती जणी होत्या ते काही तिला आता आठवत नाही. छोट्या शहरात नसबंदीची शिबिरं घेतली जातात कारण एरवी गावातल्या आरोग्य केंद्रांमध्ये आवश्यक आरोग्य कर्मचारी नसतात. पण गेल्या कित्येक दशकांपासून या शिबिरांवर खूप टीका होत आहे. तिथे पुरेशी स्वच्छता किंवा इतर काळजी घेतली जात नाही आणि सगळा भर फक्त आकडे गाठण्यावर असतो.
नसबंदीच्या शस्त्रक्रियेमध्ये स्त्रीच्या गर्भाशयाला जोडलेल्या बीजवाहिन्यांना छेद देऊन त्यांची टोकं बांधून टाकली जातात. गर्भनिरोधनाची ही कायमस्वरुपी पद्धत आहे. साधारणपणे तीस मिनिटात ही शस्त्रक्रिया पूर्ण होते. २०१५ साली संयुक्त राष्ट्रसंघाने प्रकाशित केलेल्या एका अहवालानुसार , जगभरात स्त्री नसबंदी ही गर्भनिरोधनाची सर्वात जास्त वापरली गेलेली पद्धत आहे. १९ टक्के विवाहित स्त्रियांची नसबंदी झाल्याचंही या अहवालात म्हटलं आहे.
भारतामध्ये १५ ते ४९ वयोगटातल्या ३७.९ टक्के विवाहित स्त्रियांची नसबंदी झाली असल्याचं राष्ट्रीय कुटुंब आरोग्य पाहणी अहवालाच्या पाचव्या फेरीमध्ये (२०१९-२१) आढळून आलं आहे.
भडक केशरी रंगाचा घुंगट डोळ्यापर्यंत ओढून घेतलेल्या गोपलीसाठी हे एक क्रांतीकारी पाऊल होतं. चौथ्या बाळंतपणानंतर ती अगदी थकून गेली होती. तब्येतीची तशी काही तक्रार नव्हती. तिने खरं तर आर्थिक कारणांमुळे हा निर्णय घेतला होता.
तिचा नवरा सोहनराम कामासाठी सुरतेला असतो. वर्षभरात फक्त होळी आणि दिवाळी या सणांना तो घरी येतो. चौथ्या बाळाच्या जन्मानंतर काही महिन्यांनी जेव्हा सोहनराम गावी आला होता, तेव्हा काहीही करून या वेळी दिवस राहू द्यायचे नाहीत असा चंगच गोपलीने बांधला होता.
“पोरांना सांभाळायला पुरुष माणसं कधीच घरी नसतात,” गोपली सांगते. गोपलीचं घर विटामातीचं असून गवताने शाकारलेलं छप्पर आहे. गार फरशीवर बसून ती माझ्याशी बोलत होती. जमिनीवर थोडी मका वाळत घातलीये. तिच्या जवळ जवळ सगळ्यात बाळंतपणात सोहनराम काही घरी नव्हता. आणि ती मात्र अगदी दिवस भरेपर्यंत आपल्या अर्धा बिघा (एकराचा तिसरा हस्सा) शेतजमिनीत आणि दुसऱ्यांच्या रानात राबत होती, घरचं सगळं पाहत होती. “आहेत त्याच पोरांना खाऊ घालायला पैसा पुरत नाही. मग आणखी पोरं कशाला हवीत?”
गर्भनिरोधकं वापरली का या प्रश्नावर ती लाजून हसते. आपल्या स्वतःच्या नवऱ्याबाबत ती काहीच बोलत नाही. पण तिच्या समाजाच्या बाकी बायांच्या मते पुरुषांना कोणतंही गर्भनिरोधक वापरायला सांगणं म्हणजे दगडावर डोकं आपटल्यासारखं आहे.
*****
रोयदा पंचायतीत येत असलेलं करदा गाव अरावली पर्वतरांगांच्या पायथ्याशी असून शेजारच्या राजसमंद जिल्ह्यातल्या कुंभलगड किल्ल्यापासून फक्त ३५ किलोमीटर अंतरावर आहे. करद्याचे गमेती हे भिल गमेती या आदिवासी समुदायाचे असून त्यांची इथे १५-२० घरं आहेत. गावाच्या वेशीबाहेर राहणाऱ्या गमेतींकडे स्वतःची एक बिघ्याहून कमी जमीन आहे. इथे राहणाऱ्या कोणत्याच बाईचं शाळेचं शिक्षण पूर्ण झालेलं नाही आणि पुरुषांची स्थितीही फार काही बरी नाहीये.
जूनच्या शेवटापासून ते सप्टेंबर या पाऊसकाळात जमिनी तयार करून गहू पेरला जातो, तेवढा काळ फक्त ही पुरुष मंडळी महिनाभर आपल्या घरी राहतात. आणि कोविड-१९ नंतरचा काळ तर इतका खडतर होता की बहुतेक पुरुष सुरतेतच आहेत. अखंड ताग्यातून सहा मीटर साडी कापायच्या कारखान्यांमध्ये ते काम करतात. साडी कापून झाली की कडांना मणी किंवा गोंडे लावले जातात. हे पूर्णपणे अकुशल काम असून दिवसाला ३५०-४०० रुपये मजुरी मिळते.
राजस्थानाच्या दक्षिणेकडच्या प्रदेशातून लाखो पुरुष गेल्या कित्येक दशकांपासून मंडळी सुरत, अहमदाबाद, मुंबई, जयपूर आणि नवी दिल्लीत कामासाठी जातायत. गोपलीचा नवरा सोहनराम आणि त्याच्या गोतातले इतर गमेती याच लाखातले मोजके काही. ते कामासाठी परगावी गेल्यावर गावांमध्ये फक्त बाया मागे उरतात.
पुरुषांच्या अनुपस्थितीत पूर्ण निरक्षर किंवा थोडं फार शिकलेल्या बाया गेल्या काही वर्षांमध्ये आरोग्यासंबंधी काही क्लिष्ट असे निर्णयही स्वतः घेऊ लागल्या आहेत.
नुकतीच तिशी पार केलेली पुष्पा गमेती म्हणते की बायांना जुळवून घ्यावं लागलं. पुष्पाला तीन अपत्यं आहेत. करोनाची महासाथ येण्याच्या आधीच बालमजुरीविरोधी काम करणाऱ्या एका कार्यकर्त्याने तिच्या किशोरवयीन मुलाला सुरतेतून सोडवून घरी परत आणलं होतं.
पूर्वी, घरात अचानक कुणाची तब्येत बिघडली, तर बाया एकदम घाबरून जायच्या. बायांची स्थिती कशी व्हायची त्याचे ती काही अनुभव सांगते. समजा मुलाला ताप आलाय आणि आठवडा झाला तरी उतरतच नाहीये अशी स्थिती झाली किंवा शेतात काम करत असताना काही तरी कापलं आणि रक्तस्राव थांबलाच नाही तर अशी वेळी भीतीने बायांची अगदी गाळण उडायची. “गावात पुरुष मंडळी कुणीच नाहीत, दवाखान्याचा खर्च करायचा तर हातात रोख पैसा नसायचा, दवाखान्यात जायचं तर बसने कसं जायचं हेही आम्हाला माहित नव्हतं,” पुष्पा सांगते. “हळूहळू आम्ही सगळ्या गोष्टी शिकलोय.”
पुष्पाचा थोरला मुलगा आता परत कामाला लागलाय. सध्या तो शेजारच्याच गावात खोल खड्डे खणणाऱ्या मशीनचालकाच्या हाताखाली काम करतोय. तिची धाकटी मुलं, मंजू, वय ५ आणि मनोहर, वय ६ या दोघांसाठी इतून पाच किलोमीटरवरच्या अंगणवाडीत कसं जायचं ते पुष्पाने शिकून घेतलं.
“आमच्या थोरल्या मुलांसाठी अंगणवाडीतून आम्हाला काहीही मिळालं नाही,” ती म्हणते. पण अलिकडच्या काळात करद्यातल्या तरुण माता रोयद्याकडे जाणारी महामार्गाची चढण चढून अंगणवाडीत पोचतात. तिथे स्तनदा माता आणि लहान मुलांना गरम जेवण मिळतं. मंजूला तर ती कडेवर घेऊन चालत जायची. कधी तरी एखाद्या वाहनातून प्रवास करता यायचा.
“हे सगळं करोना [कोविड-१९] च्या आधीचं,” पुष्पा म्हणते. टाळेबंदीनंतर मे २०२१ पर्यंत तरी बायांना अंगणवाडी परत सुरू झाली आहे का याबद्दल काहीही माहिती मिळाली नव्हती.
पुष्पाच्या मुलाने, किशनने अचानक शाळा सोडली आणि आपल्या मित्राबरोबर कामासाठी सुरतेला जायचं ठरवलं तेव्हा पुष्पाला सारखं असं वाटत होतं की या तारुण्यात पदार्पण करणाऱ्या मुलाचं काय करायचं याबद्दल कुटुंबाच्या निर्णयामध्ये तिला कसलंच स्थान नाहीये. “पण माझ्या धाकट्यांच्याबद्दलचे निर्णय मात्र माझ्याच हातात ठेवलेत मी,” ती म्हणते.
पुष्पाचा नवरा नटुराम करद्यातच काम करतो. आणि सध्या त्यांच्या समाजाचा काम करण्याच्या वयाचा एकटाच इथे आहे. २०२० साली मार्चमध्ये टाळेबंदी लागल्यानंतर सुरतेतल्या कामगारांची पोलिसांबरोबर झटापट झाली, तेव्हापासून तो करदाच्या आसपासच कुठे काम मिळतंय का या प्रयत्नात आहे.
गोपलीने पुष्पाला नसबंदीचं महत्त्व समजावून सांगितलंय. शस्त्रक्रिया झाल्यानंतर काही गुंतागुंत किंवा त्रास होऊ शकतात याबद्दल या बायांना काहीही माहित नाही. (जखमेत जंतुलागण, आतड्यांना इजा किंवा अडथळा, मूत्राशयाला इजा) किंवा ही गर्भनिरोधक पद्धत निकामी देखील ठरू शकते हेही त्यांनी ऐकलेलं नाही. किंवा नसबंदीच्या शस्त्रक्रिया लोकसंख्या नियंत्रणाचं लक्ष्य गाठण्यासाठीच्या धोरणाचा भाग आहेत हेही गोपलीला समजत नाही. “चिंता मिटली, बस्स,” ती म्हणते.
पुष्पाचीही तिन्ही बाळंतपणं घरीच झाली आहेत. भावजय, नणंद किंवा त्यांच्याच समाजाच्या एखाद्या म्हातारीने येऊन नाळ कापली होती आणि टोक ‘लच्छाधागा’ वापरून बांधलं होतं. हिंदू लोक मनगटावर बांधतात तसला दोरा म्हणजे लच्छाधागा.
आताच्या तरुण गमेती मुली मात्र घरी अशी जोखमीची बाळंतपणं करायला तयारच होणार नाहीत, गोपली म्हणते. तिची सून गरोदर आहे. “आम्ही काही तिचा किंवा आमच्या नातवंडाचा जीव धोक्यात घालणार नाही.”
तिची सून १८ वर्षांची आहे आणि सध्या आपल्या माहेरी गेली आहे. तिचं माहेर अरावलीच्या पर्वतांमध्ये बरंच उंचावरती आहे आणि अचानक तब्येतीचं काही झाल्यास तिथून बाहेर पडणं फारसं सोपं नाही. “दिवस भरत आले की आम्ही तिला इकडे घेऊन येऊ. मग दोघी-तिघी बाया तिला टेम्पोने दवाखान्यात घेऊन जातील.” टेम्पो म्हणजे इथे गावाकडे प्रवासी वाहतुकीसाठी वापरली जाणारी मोठी तीनचाकी.
“तसंही आजकालच्या पोरींना वेणा सहन कुठे होतात,” गोपली हसत म्हणते. आणि त्या बरोबर तिच्या भोवती जमलेल्या आसपासच्या शेजारणी आणि नात्यागोत्यातल्या सगळ्या बाया माना डोलावत हसायला लागतात.
या वस्तीतल्या इतर दोघी-तिघींनी देखील नसबंदी करून घेतली आहे. पण त्याबद्दल बोलायची त्यांना भारीच लाज वाटतीये. गर्भनिरोधनाच्या बाकी कोणत्याच आधुनिक पद्धतींचा कुणी वापर केलेला नाही. ‘काय माहित, तरुण मुली याबाबत हुशार आहेत,’ गोपली म्हणते
इथून सगळ्यात जवळचं प्राथमिक आरोग्य केंद्र गाठायला १० किलोमीटर अंतर पार करावं लागतं. दिवस गेलेत याची खात्री झाली की करदाच्या तरुण स्त्रिया याच पीएचसीत नाव नोंदवतात. तपासणी करायला तिथे जातात आणि तिथल्या आरोग्य कार्यकर्त्या गावात येतात तेव्हा त्यांना लोह आणि कॅल्शियमच्या गोळ्या देऊन जातात.
“करदाच्या बाया कधी कधी एकत्र पार गोगुंदाच्या पीएचसीपर्यंतही जातात,” बामरीबाई कालुसिंग सांगते. ती राजपूत असून याच गावात राहते. पूर्वी गमेती बाया पुरुषांशिवाय फार क्वचित गावाबाहेर पडायच्या. पण आपल्या आरोग्याविषयी त्यांना स्वतःचे स्वतः निर्णय घेण्याची गरज पडली आणि त्यांचं आयुष्यच बदलून गेलं, ती म्हणते.
आजीविका ब्यूरोच्या उदयपूर केंद्राच्या संघटिका कल्पना जोशी सांगतात की कामासाठी मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होत असलेल्या गावांमध्ये स्त्रिया माघारी घरी असतात. या स्त्रियांमध्ये स्वतंत्रपणे निर्णय घेण्याची प्रक्रिया हळूहळू सुरू झाली आहे. आजीविका ब्यूरो स्थलांतरित कामगारांबरोबर काम करणारी संघटना असून ती गमेती पुरुषांबरोबरही काम करते. “आता त्या स्वतःच रुग्णवाहिका बोलवू शकतात. अनेक जणी स्वतःच्या स्वतः दवाखान्यात जातात आणि आरोग्य कर्मचारी किंवा सामाजिक संस्थांच्या कार्यकर्त्यांशी त्या मोकळेपणी बोलू लागल्या आहेत,” त्या सांगतात. “अगदी दहा वर्षांपूर्वीपर्यंत स्थिती फार वेगळी होती.” पूर्वी दवाखाना, उपचार वगैरे सगळ्या गोष्टी सुरतेहून घरची पुरुष मंडळी परत येईपर्यंत खोळंबलेल्या असायच्या, त्या म्हणतात.
या वस्तीतल्या इतर दोघी-तिघींनी देखील नसबंदी करून घेतली आहे. पण त्याबद्दल बोलायची त्यांना भारीच लाज वाटतीये. गर्भनिरोधनाच्या बाकी कोणत्याच आधुनिक पद्धतींचा कुणी वापर केलेला नाही. “काय माहित, तरुण मुली याबाबत हुशार आहेत,” गोपली म्हणते. तिच्या सुनेला लग्न झाल्यानंतर एका वर्षाच्या अंतराने दिवस गेले होते.
*****
करदाहून १५ किलोमीटरवर असलेल्या एका गावात, पार्वती मेघवाल (नाव बदललं आहे) सांगते की कामासाठी परगावी गेलेल्या पुरुषाची पत्नी असणं सहजसोपं नसतं. तिचा नवरा गुजरातेतल्या मेहसाणामध्ये जिऱ्याचं पॅकिंग करणाऱ्या एका कारखान्यात काम करतो. काही काळ पार्वती देखील तिथे त्याच्या सोबत जाऊन राहिली, तिने चहाची टपरी देखील चालवून पाहिली. पण त्यानंतर मात्र आपल्या तीन मुलांच्या शिक्षणासाठी ती उदयपूरला परतली.
२०१८ साली तिचा एक अपघात झाला. नवरा परगावीच होता. ती पडली आणि कपाळात एक खिळा घुसला. जखमा बऱ्या झाल्यावर तिला घरी सोडण्यात आलं. पण नंतर दोन वर्षं तिला मानसिक आजार जडला, ज्याचं निदानच झालं नाही, ती सांगते.
“मला सारखी माझ्या नवऱ्याची, मुलांची, पैशाची काळजी लागून राहिलेली असायची. आणि मग हा अपघात झाला,” ती सांगते. त्यानंतर अधून मधून तिला तीव्र दुःख व्हायचं, ती अगदी गलितगात्र होऊन जायची, कधी खूप अस्वस्थ व्हायची. “माझा आरडाओरडा ऐकून, किंवा मी काय करायचे ते पाहून सगळे घाबरून जायचे. अख्ख्या गावातलं कुणीही माझ्यापाशी यायचं नाही. मी दवाखान्याचे सगळे कागद फाडून टाकले, नोटा फाडून टाकल्या, माझे कपडेही...” तिने या सगळ्या गोष्टी केल्याचं तिला माहित आहे आणि आता आपल्याला जडलेल्या मानसिक आजाराची तिला लाज वाटते.
“आणि मग टाळेबंदी लागली आणि परत एकदा सगळा काळोख झाला,” ती म्हणते. “पुन्हा एकदा मी कोलमडून पडले.” तिच्या नवऱ्याला २७५ किलोमीटर अंतर चालत घरी यावं लागलं होतं. आणि त्या चिंतेने पार्वती अगदी कडेलोटाला पोचली होती. तिचा सगळ्यात धाकटा मुलगा देखील उदयपूरला होता, तिथे एका खानावळीत तो रोट्या बनवायचं काम करत होता.
मेघवाल दलित आहेत आणि पार्वती सांगते की दलित स्थलांतरित कामगारांच्या बायका गावी राहत असतील तर त्यांना काम शोधायला, चरितार्थ चालवायला प्रचंड संघर्ष करावा लागतो. “एखाद्या दलित बाईला, जिला मनाचा आजार आहे, किंवा झाला होता, तिची गत काय झाली असेल असं वाटतं?”
पार्वतीने पूर्वी अंगणवाडी कार्यकर्ती म्हणून काम केलं होतं आणि सरकारी कार्यालयात मदतनीस म्हणूनही. पण अपघातानंतर, मानसिक स्थिती ठीक नसल्यामुळे तिला नोकरी टिकवून ठेवणं अवघड झालं.
२०२० साली टाळेबंदी उठली तेव्हा तिने तिच्या नवऱ्याला निक्षून सांगितलं की ती यापुढे त्याला कामासाठी परगावी मुळीच जाऊ देणार नाही. मग घरच्यांकडून, एका सहकारी संस्थेतून कर्ज काढून पार्वतीने गावातच किराणा मालाचं एक छोटंसं दुकान थाटलं. तिचा नवरा गावात किंवा आसपासच रोजंदारीवर काही काम मिळालं तर तसं पाहतो. “प्रवासी मजदूर की बीवी नही रहना है,” ती म्हणते. “मनाला फार यातना होत होत्या.”
तिथे करदामध्ये बाया सांगतात की त्यांच्या स्वतःच्या बळावर, त्यांचे नवरे गावी नसताना पोटासाठी काम शोधणं महामुश्किल झालं आहे. त्यांना फक्त मनरेगामध्ये रोजगार मिळतो, आणि करदाबाहेरच्या एका वस्तीवर बायांनी २०२१ मध्ये पावसाळा सुरू होण्यापूर्वीच १०० दिवसांचं काम पूर्ण देखील केलं होतं.
“आम्हाला दर वर्षी किमान २०० दिवसांचं काम हवंय,” गोपली सांगते. सध्या जवळच्या बाजारात जाऊन विक्री करता यावी म्हणून इथल्या बायांनी भाजीपाल्याची लागवड केलीये, ती सांगते. हा निर्णयसुद्धा पुरुषांना न विचारताच घेतलाय. “तसंही आम्हाला जेवणात पोषक काही तरी हवंच आहे, हो की नाही?”
पारी आणि काउंटरमीडिया ट्रस्टने पॉप्युलेशन फाउंडेशन ऑफ इंडियाच्या सहाय्याने ग्रामीण भारतातील किशोरी आणि तरुण स्त्रियांसंबंधी एक देशव्यापी वार्तांकन उपक्रम हाती घेतला आहे. अत्यंत कळीच्या पण परिघावर टाकल्या गेलेल्या या समूहाची परिस्थिती त्यांच्याच कथनातून आणि अनुभवातून मांडण्याचा हा प्रयत्न आहे.
हा लेख पुनःप्रकाशित करायचा आहे? कृपया zahra@ruralindiaonline.org शी संपर्क साधा आणि namita@ruralindiaonline.org ला सीसी करा
अनुवादः मेधा काळे