फेब्रुवारीमध्ये झालेल्या या मोर्चासाठी अनेकांनी आपापली पारंपरिक वाद्यं आणली होती. २० फेब्रुवारी रोजी सुरू झालेला मोर्चा २१ फेब्रुवारी रोजी रात्री उशीरा, सरकारने मोर्चाच्या सगळ्या मागण्या मान्य केल्यानंतर आणि तसं लेखी आश्वासन दिल्यानंतर रहित करण्यात आला.


डावीकडेः मोर्चाच्या पहिल्या दिवशी (२० फेब्रुवारी, २०१९) वारली आदिवासी असणारे ५० वर्षीय सोन्या मलकरी त्यांचा पारंपरिक तारपा वाजवत होते. ते पालघर जिल्ह्याच्या विक्रमगड तालुक्याच्या साखरे गावाहून आले होते आणि नाशिकच्या महामार्ग बस स्टँडपाशी राज्यभरातले हजारो शेतकरी जमले होते, तिथे तारपा वाजवत होते. उजवीकडेः नाशिकच्या सुरगाणा तालुक्यातल्या वांगण सुळे गावचे ५५ वर्षीय वसंत सहारे. ते पावरी वाजवत होते. सहारे कोकणा आदिवासी आहेत आणि वन खात्याच्या मालकीची दोन एकर जमीन कसतात

बिवा गाळे चिपळीच्या तालावर देवाची गाणी गातायत. ते श्रीकृष्णाचे भक्त असणाऱ्या वासुदेव समुदायाचे आहेत आणि ते दारोदारी जाऊन गाणी गाऊन भिक्षा मागतात. ते नाशिकच्या पेठ तालुक्यातल्या रायतळे गावचे आहेत.

गुलाब गावित, वय ४९ (डावीकडे) तुणतुणं वाजवतायत. ते नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातल्या फोपशी गावाहून आलेत. भाऊसाहेब चव्हाण, वय ५० (उजवीकडे, लाल टोपी घालून) देखील फोपशीहून आलेत आणि खंजिरी वाजवतायत. गावित आणि चव्हाण दोघंही दिंडोरी तालुक्यातल्या इतर शेतकऱ्यांच्या साथीने शेतकऱ्यांच्या मोर्चाचं कौतुक करणारी गीतं म्हणत होते.

महाराष्ट्र सरकार आणि अखिल भारतीय किसान सभेच्या नेत्यांमधल्या चर्चेतून काय निष्पन्न होतंय याची वाट पाहतानाच २१ फेब्रुवारीच्या रात्री मोर्चेकऱ्यांनी गाण्यांवर एकीत ताल धरला
अनुवादः मेधा काळे