बकऱ्या, मेंढ्या, कोंबड्या, रेडे, कंद, पानं आणि फळं – नियामगिरीच्या वार्षिक सणात कशाची कमी नाही. ओडिशाच्या नैऋत्येकडच्या रायगड आणि कलहंडी जिल्ह्यातले आदिवासी इथे मोठ्या संख्येने गोळा होतात.

दर साली २२ ते २५ फेब्रुवारी दरम्यान, सुगीनंतर लगेचच नियाम राजाला वंदन करण्यासाठी सगळे डोंगरिया कोंढ गोळा होतात. नियामगिरीच्या या पर्वतरांगा म्हणजे त्या कायद्याच्या राजाचीच रुपं आहेत. नियामगिरीच्या वार्षिक सणाचा हा काळ. हा सोहळा तेव्हापासून सुरू आहे जेव्हा “जगाच्या या भागात कोणतंच सरकार वगैरे काही नव्हतं, इथे [फक्त] डोंगरियाच राहत होते,” लोडो सिकोका सांगतात. “त्या काळी,” ते सांगतात, त्यांचे लोक, “सुखी होते, मुक्तपणे आणि सन्मानाने जीवन जगत होते, स्वतःची भाषा बोलत होते. घनदाट जंगलं होती, झरे वाहत होते आणि सर्वत्र पशुपक्षी नांदत होते.” सिकोका डोंगरिया कोंढ आहेत आणि बॉक्साइटच्या खाणींपासून या प्रदेशाचं आणि आदिवासींचं रक्षण करण्यासाठी स्थापन झालेल्या नियामगिरी सुरक्षा समिती या संघटनेचे नेते आहेत.

“आदिवासी निसर्ग आणि पर्यावरण सोडून कोणत्याच देवतेची उपासना करत नाहीत,” लिंगराज आझाद सांगतात. ते समितीचे समन्वयक आहेत आणि कलहांडी जिल्ह्यातील केसिंगास्थित कार्यकर्ते आहेत. “कुई भाषेमध्ये ते ‘धरणी पेनू’ म्हणजेच धरतीमातेची आणि ‘होरू’ म्हणजे पर्वत किंवा पितृदेवाची उपासना करतात. जल, जंगल, वृक्ष आणि वायूलाही जीवनाधार मानलं जातं आणि त्यांचीही उपासना केली जाते. आणि म्हणूनच जेव्हा [सरकारने] ही भूमी वेदांताला खाणकामासाठी देण्याचं ठरवलं तेव्हा आम्ही त्याचा कडाडून विरोध केला.”

किती तरी काळापासून डोंगरिया आदिवासींनी सरकारी मालकीच्या ओडिशा खनिकर्म महामंडळ आणि स्टर्लाइट इंडस्ट्रीज (आता वेदांता) या ब्रिटिश बहुराष्ट्रीय कंपनीच्या प्रकल्पाला विरोध केला आहे. ओडिशाच्या लांजीगड तहसिलातल्या वेदांताच्या शुद्धीकरण प्रकल्पासाठी नियामगिरींच्या पर्वतरांगांमध्ये (अल्युमिनियम निर्मितीसाठी) बॉक्साइटचं उत्खनन या प्रकल्पामध्ये करण्यात येणार होतं. डोंगरिया कोंढ आदिवासींच्या १२ ग्रामसभांनी आणि इतर आदिवासी समूहांनी २०१३ मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार घेण्यात आलेल्या जनादेशाद्वारे कोणत्याही प्रकारच्या खाणकामाला विरोध नोंदवला होता. तरीही ओडिशा सरकारने या परिस्थितिकीसंदर्भात संवेदनशील असणाऱ्या डोंगररांगांमध्ये खाणकामाला परवानगी द्यावी यासाठी याचिका दाखल करणं थांबवलेलं नाही.

‘त्यांचं वेदांताच्या विरोधातलं आंदोलन केवळ नियामगिरीचं जंगलं वाचवण्यासाठी नव्हतं. त्यांची जीवनपद्धती, त्यांची भाषा, पोषाख, त्यांची संस्कृती आणि उपजीविका हे सगळंच वाचवण्याचा हा लढा होता’

व्हिडिओ पहाः नियामगिरीच्या सोहळ्यातली गाणी आणि नाच

“त्यांचं वेदांताच्या विरोधातलं आंदोलन केवळ नियामगिरीचं जंगलं वाचवण्यासाठी नव्हतं. त्यांची जीवनपद्धती, त्यांची भाषा, पोषाख, त्यांची संस्कृती आणि उपजीविका हे सगळंच वाचवण्याचा हा लढा होता,” आझाद सांगतात. ते सांगतात आदिवासींना एक सामायिक जाण आहे की जगण्याचे आणि मानव आणि इतर पशुपक्ष्यांच्या निरंतर अस्तित्वाचे मूलभत घटक म्हणजे हवा, पाणी, अग्नी, जमीन, जंगल आणि आकाश.  “ते या घटकांचा केवळ विचारच करत नाहीत तर [हे तत्त्वज्ञान] त्यांच्या रोजच्या जगण्याचे ते अविभाज्य अंग आहेत,” ते म्हणतात.

गेल्या काही काळात बिगर आदिवासी समाजांशी डोंगरियांचा संपर्क आला आहे आणि त्यातूनच त्यांच्या निसर्गाधारित तत्त्वज्ञानाकडे बरेच लोक आकर्षित झाले आहेत. आणि त्यांच्या खाणकामाविरोधातल्या संघर्षामुळे नियामराजाच्या या वार्षिक सोहळ्याला अनेक कार्यकर्ते आणि पत्रकार हजेरी लावू लागले आहेत.

नियामगिरीच्या पर्वतरांगामधल्या पठारी प्रदेशात भरणारा हा सोहळा आता ‘जल, जंगल, जमिनीसाठी’ लढणाऱ्या आंदोलनांचा अनधिकृत मंच बनला आहे. दिल्ली, कोलकाता, भुबनेश्वर आणि बारगाहसारख्या किती तरी शहरांमधून आणि राज्यातून लोक इथे सहभागी होतात. “आमचा हा सण एकजुटीचा जण आहे. ओडिशा आणि संपूर्ण भारतातल्या आंदोलनांची एकजूट” गेल्या फेब्रुवारीत नियामगिरीला आलेला कलाहांडी जिल्ह्यातला कार्यकर्ता भवानीपटणा सांगतो.

तरी, आजही इथले बहुतेक सगळे सहभागी सात गट ग्रामपंचायतींच्या गावांमधलेच आहेत. मुनीखाल, दहीखाल, हाटामुनीगुडा, कुरली, सानाखेमुंडी, परसाली आणि त्रिलोचनपूर ही ती गावं. नियामगिरीच्या डोंगरांमध्ये सुमारे १०० डोंगरिया गावं आहेत आणि पायथ्याला तशीच १८०, ज्यात प्रत्येक गावात १० ते ३० कुटुंबं वस्तीला आहेत.

या सोहळ्याचा खर्च घरटी ३० रुपये वर्गणीतून केला जातो. प्रत्येक कुटुंब आपापला शिधा घेऊन येतं जो आदिवासींच्या समितीकडे सुपूर्द केला जातो. ते मोकळ्यावर चुली थाटतात आणि भात, डाळ आणि भाजी असं जेवण सोहळ्याला आलेल्या प्रत्येकाला रांधतात. नियामराजाला चढवलेल्या कोंबड्या आणि इतर प्राण्यांचं मटणही शिजवून वाढलं जातं.

डोंगरिया कोंढ जमातीसाठी, जे आदिम जमातीमध्ये (Particularly Vulnerable Tribal Group) गणले जातात, हा सोहळा म्हणजे त्यांच्या परंपरा जपण्याचं निधान आहे. “हा सण साजरा करताना आमचा आनंद पोटात मावत नाही आणि आमच्याप्रमाणेच आमच्या देवताही आनंदून जातात,” लोडो सांगतात. “डोंगरदेव खूश होतो, नदी देवता आनंदी होते आणि जंगलाचा देवही सुखात असतो – या सोहळ्यात आलेले सगळेच जण कसे सुखी असतात.”

Tribal women walking in a field with a load on their heads
PHOTO • Purusottam Thakur

दर वर्षी भरणाऱ्या नियामगिरी सोहळ्यासाठी अनलाभाटा गावाच्या वाटेवर

Three tribal women, who are priests, dancing after conducting their rituals
PHOTO • Purusottam Thakur

बेजुनी या डोंगरिया आदिवासींच्या भगत स्त्रिया. सगळे विधी पार पडले की नियाम राजाचं रुप असणाऱ्या त्यांच्या देवतांसमोर त्यांचे पाय ठेका धरतात

Tribal men dancing with their axes
PHOTO • Purusottam Thakur

डोंगरिया कुऱ्हाड पवित्र मानतात, कामासाठी तर ती वापरलीच जाते पण तिचा वाद्य म्हणूनही वापर केला जातो

People sitting and resting in the shade of trees
PHOTO • Purusottam Thakur

सोहळा पाहण्यासाठी तरुण मुलांनी चांगली जागा निवडलीये, झाडांच्या बेचक्यात

Tribal women cooking in an open field
PHOTO • Purusottam Thakur

सोहळ्याला आलेल्या सर्वांसाठी मोकळ्यावर मांडलेल्या चुलींवर डोंगरिया साधंसं जेवण रांधतात – भात, डाळ आणि भाजी

Rice being stored on a wooden platform
PHOTO • Purusottam Thakur

जेवणाची वेळ होईपर्यंत सावलीत बांबूच्या मोठ्या सुपात भाताची वाफ काढली जाते

Tribal women walking uphill carrying water on their heads
PHOTO • Purusottam Thakur

स्वयंपाकासाठी लागणारं पाणी अर्धा किलोमीटर अंतरावरच्या झऱ्यातून भरून आणलं जातं – कष्टाचं हे काम दर वर्षी मनापासून केलं जातं

Tribal women wearing their colourful jewellery
PHOTO • Purusottam Thakur

आपला पारंपरिक पोषाख आणि दागिने परिधान करुन सणासाठी सजलेले आदिवासी

A young tribal girl wearing her traditional jewellery
PHOTO • Purusottam Thakur

आपल्या जमातीच्या चालीरिती आणि परंपरा तरुण पिढीही तितक्याच नेमाने पाळते

A tribal man wearing necklaces and a nose ring
PHOTO • Purusottam Thakur

डोंगरियांच्या दृष्टीने स्त्रिया आणि पुरुष भिन्न नाहीत. मुलगे आणि पुरुषही सणासाठी सजून तयार होतात, स्त्रिया आणि पुरुषांचे कपडे व दागिने सारखेच असतात

A tribal woman and a young tribal girl in their traditional attire
PHOTO • Purusottam Thakur

एकाच कुटुंबातल्या दोन पिढ्या – सणासाठी अगदी सारख्या पद्धतीने सजल्या आहेत

Tribals huddled next to a campfire in the evening
PHOTO • Purusottam Thakur

हा सण नियामगिरीच्या डोंगररांगांमधल्या पठारावर अनलाभाटा गावात साजरा केला जातो. हे गाव बाकी गावापासून किंवा घरांपासून दूर असल्याने, आदिवासी खुल्या आभाळाखालीच झोपतात. संध्याकाळी शेकोटीच्या उबेत गप्पांना रंग चढतो

Tribals standing around a campfire at night
PHOTO • Purusottam Thakur

तरुण मुलगे एकेका शेकोटीपाशी जातात, तिथल्या मुलींना भेटतात आणि आपली भावी जोडीदार निवडतात

Groups of tribals sitting on the ground after the festivities
PHOTO • Purusottam Thakur

रात्रीच्या शेकोट्या अजूनही विझलेल्या नाहीत, तिथेच पहाटे आदिवासी उबेला बसलेत

अनुवादः मेधा काळे

Purusottam Thakur
purusottam25@gmail.com

Purusottam Thakur is a 2015 PARI Fellow. He is a journalist and documentary filmmaker. At present, he is working with the Azim Premji Foundation and writing stories for social change.

Other stories by Purusottam Thakur
Translator : Medha Kale
mimedha@gmail.com

Medha Kale is based in Pune and has worked in the field of women and health. She is the Translations Editor, Marathi, at the People’s Archive of Rural India.

Other stories by Medha Kale